सातारा प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांनी शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसैनिकांना योग्य सन्मान द्यावा, अशी ठाम भूमिका पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडली. आत्मसन्मान राखला गेला आणि जागावाटपाच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या, तर महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा विचार होईल. मात्र सन्मान नसेल, तर शिवसेना स्वबळावर किंवा इतर पर्यायांचा विचार करेल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देसाई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार महेश शिंदे, संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, नगराध्यक्ष राजेंद्र यादव, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोर गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुख रेशमाताई जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. देसाई म्हणाले की, महायुतीतील घटक पक्ष म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील जागावाटपात शिवसेनेला प्राधान्य मिळाले पाहिजे. तिन्ही घटक पक्षांनी सन्मानाची वागणूक दिली तरच एकत्र निवडणूक लढवली जाईल. अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल. जागावाटपासाठी आमचे सर्व चर्चेचे पर्याय खुले असून, जो समविचाराने चर्चा करेल, त्याच्याशी राजकीय समीकरणांचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालिका निवडणुकीप्रमाणे जर यावेळी महायुती झाली नाही, तर शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल. कराड पालिकेप्रमाणे पूर्ण ताकदीने आणि आपल्या पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना सामोरे जाण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. फलटण पालिकेत काही अंदाज चुकल्याने अपयश आल्याचे त्यांनी मान्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किंवा भाजपकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पक्ष निरीक्षक नेमून अहवाल घेतले जाणार असून, पक्ष निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय इच्छुकांची माहिती गोळा करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Satara : आज राज्यभरात 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकांचा निकाल उद्या म्हणजे 16 जानेवारीला लागणार आहे. यानंतर लगेच उद्यापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून रणनीती आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडल्याची माहिती मिळात आहे.
आज पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक
मिळालेल्या माहितीनुसार, आज पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार नितीन काका पाटील उपस्थित होते. याबाबत प्रसारमाध्यमांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना विचारले असता, त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नवीन घरी चहा घेण्यासाठी आलो होतो असे सांगितले. पुढील राजकीय भूमिका काय? असं विचारलं असता त्यांनी नो भूमिका असे म्हटले आहे. चहा चांगला होता असे असे मिश्कील उत्तर यावेळी मात्र, नाईक निंबाळकरांनी दिले आहे.
राज्यातील 12 जिल्ह्यात निवडणुकांचा धुरळा उडणार
नगरपालिका, महापालिका निवडणुकानंतर राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. त्यानुसार, राज्यातील 12 जिल्ह्यात निवडणुकांचा धुरळा उडणार असून 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांच्याकडून जाहीर करण्यात आला. त्यानुसार, राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून रोजी 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली. त्यानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, छ. संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयोगाने निवडणुकीने घोषणा करताच 12 जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू झाली आहे.
जागतिक बाजारपेठेतील गोंधळ आणि सुरक्षित संपत्तीच्या वाढत्या मागणीमुळे, सोने आणि चांदीच्या किमती वाढतच आहेत. त्यांच्या किमती गगनाला भिडलेल्या दिसत आहेत. चांदीच्या किमती प्रति किलोग्रॅम ₹२७७,००० पेक्षा जास्त झाल्या आहेत, तर २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमती १४२,००० पर्यंत पोहोचल्या आहेत. या चढ-उतारांसोबतच मोठी वाढही झाली आहे. आता भारतीय बाजारपेठेतील सोने आणि चांदीच्या सध्याच्या किमती जाणून घेऊया. आम्ही तुम्हाला प्रति किलोग्रॅम चांदीच्या किमतीसह २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमती देत आहोत. एक ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील हे देखील आम्ही शोधू.
Add Zee News as a Preferred Source
सोन्याच्या किमती वाढतात
ताज्या अपडेट्सनुसार, सोन्याच्या किमती वाढत आहेत. 13 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 140284 रुपये होती, जी आता दोन हजार रुपयांपेक्षा जास्त वाढून 142151 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. दरम्यान, 22 कॅरेट सोन्याची किंमत सध्या 130086 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 106511 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मागील दिवसाच्या किमतींपेक्षा या सर्व किमती लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत.
चांदीच्या किमतीत जास्त वाढ
सोन्यापेक्षाही चांदीच्या किमती वेगाने वाढत आहेत. 13 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान चांदीच्या किमतीत प्रति किलोग्रॅम 13000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. 13 जानेवारी रोजी चांदीची किंमत 263032 रुपये प्रति किलोग्रॅम होती, जी आता 277512 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. 15 जानेवारीसाठी अपडेट अद्याप प्रलंबित आहे.
1 ग्रॅम सोन्याची किंमत किती आहे?
आता 1 ग्रॅम सोन्याच्या किमतीबद्दल बोलूया. 15 जानेवारी रोजी, देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये/राज्यांमध्ये त्याची किंमत थोडीशी चढ-उतार होऊ शकते. एकूणच, भारतात एक ग्रॅम सोन्याची किंमत 14300 ते 14400 रुपयांच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे. ही किंमत 24 कॅरेट सोन्यासाठी आहे. दरम्यान, जर आपण 22 कॅरेट सोन्याच्या किमतीचा विचार केला तर, एक ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 13000 ते 13300 रुपये असेल. 18 कॅरेट सोन्यासाठी, प्रति ग्रॅम किंमत 10600 ते 10700 रुपयांच्या दरम्यान आहे.
हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की वर नमूद केलेल्या सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये जीएसटी आणि उत्पादन शुल्क समाविष्ट नाही. एकदा हे समाविष्ट केले की, सोन्या-चांदीच्या किमतीत फरक असू शकतो. अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या शहरातील अधिकृत/नोंदणीकृत दागिन्यांच्या दुकानाचा देखील सल्ला घेऊ शकता. ते सोन्या-चांदीच्या किमती, जीएसटी आणि मेकिंग चार्जेससह प्रदान करतील.
भारतीय बौद्ध महासभा सातारा (पूर्व)ची मासिक बैठक संपन्न फलटण : भारतीय बौद्ध महासभा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आपली मातृसंस्था आहे. त्यामुळे संस्थेचे काम गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये पोचवण्यासाठी आपल्याला नव्या उमेदीच्या तरुण पदाधिकाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. वर्षानुवर्षे तेच तेच पदाधिकारी शाखांमध्ये काम करताना दिसत आहेत. जुन्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोबत नव्या व तरुण पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन त्यांच्या खांद्यांवर धम्माची धुरा देऊन आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले पाहिजे. एका बाजूला धर्मांधता बोकाळली असताना आपल्याला आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्रामनेर शिबिरे समता सैनिक दल शिबिरे उपासिका शिबिरे युवक युवती शिबिरे अशी 24 प्रकारची संस्थेने दिलेली शिबिरे राबवण्याची गरज आहे आणि त्यासाठी तरुण पदाधिकाऱ्यांची निवड करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. ते भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पुरवठा मासिक मीटिंग मध्ये बोलत होते.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत सातारा (पूर्व) जिल्ह्याची मासिक बैठक (सह विचार सभा) आज दि. १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता बुद्धविहार, कोळकी (ता. फलटण) येथे यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीस प्रमुख उपस्थिती राज्याचे संघटक तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर,पुणे व सातारा जिल्ह्याचे प्रभारी आयु. दादासाहेब भोसले, अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आयु. नानासाहेब मोहीते होते. बैठकीस जिल्हा सरचिटणीस आयु. सुनिल कदम,सातारा जिल्हा पूर्वचे समता सैनिक दलाचे संरक्षण उपाध्यक्ष संपत भोसले, संघटक आयु.अर्जुन ननावरे, संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे, कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार शिंदे यांच्यासह माण, खटाव, फलटण, खंडाळा व कोरेगाव तालुक्यांतील अध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, माजी श्रामणेर व अजिव सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरवातीला संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेल्या शहिदांना आदरांजली वाहण्याचा ठराव मांडला. त्या ठरावाला सातारा जिल्हा पूर्वचे सरचिटणीस सुनील कदम यांनी अनुमोदन दिले व त्या सर्व शहिदांना दोन मिनिटे आदरांजली वाहून सहविचार सभेची सुरुवात झाली.
मासिक मीटिंगची प्रास्ताविक सातारा जिल्हा पूर्वचे सरचिटणीस आयु. सुनील कदम यांनी केले. त्यांनी आजच्या मासिक मीटिंग चे सर्व विषय व राज्य व केंद्राकडून आलेल्या सूचनांचं आपल्या प्रास्ताविकात विवेचन करून माहिती सादर केली.बैठकीत वितरित करण्यात आलेल्या धम्मयान दिनदर्शिकेच्या धम्मदान मूल्य संकलनाबाबत आढावा घेण्यात आला. तसेच दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सातारा येथे होणाऱ्या भारतीय बौद्ध महासभेच्या विभागीय बैठकीबाबत सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात आले. दि. १८ जानेवारी २०२६ रोजी खंडाळा येथे होणाऱ्या धम्म परिषदेस भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब उपस्थित राहणार असल्याने त्या कार्यक्रमाच्या तयारीबाबतही सखोल विचारविनिमय करण्यात आला. यावेळी बोलताना सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासाहेब मोहिते म्हणाले, ” भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था आहे. आपण इथे कोणत्याही पदासाठी किंवा मानसनमानासाठी काम करत नसून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या धम्म संस्थेच्या वतीने धम्माचा प्रचार प्रसार व भारत बुद्धमय करण्यासाठी आपला आपण खारीचा वाटा उचलत आहोत. कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून संस्थेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. हे करत असताना संस्थेच्या ध्येयधोरणांवर कोणत्याही प्रकारे आघात होणार नाही याचीही काळजी घ्यावी. संस्थेने सांगितलेली 24 प्रकारची शिबिर घ्यावीत यासाठी सातारा जिल्हा पूर्व शाखेकडून आपल्याला सर्वतोपरी मदत मिळेल. “ यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे सरचिटणीस सुनील कदम यांनी सांगितले की, “फॅसिस्ट विचारसरणी किंवा धर्मांधता कमालीची वाढलेले असताना समता सैनिक दलाचे प्रमुख तथा भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे दोघेही एकत्र येऊन राजकीय सत्ता समाजाच्या हाती येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तेव्हा आपणही सनातनी मनुवादी पक्षांमध्ये काम करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पक्षांमध्ये सन्मानाने अभिमानाने काम करावे. “
शेवटी नुकताच जाहीर झालेल्या बौद्धाचार्य परीक्षेत यशस्वी झालेल्या फलटण मधून आयु. भीमराव लोंढे, खटाव मधून स्वप्नील कांबळे, कोरेगाव मधून राजाराम जयराम कांबळे, निलेश मोरे या सर्व भावी बौद्धाचार्यांचे राज्याचे संघटक समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर व सातारा व पुणे जिल्हा प्रभारी आयोग दादासाहेब भोसले सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासाहेब मोहिते व सरचिटणीस आयु.सुनील कदम यांनी सर्व नूतन बौद्धाचार्यांचे अभिनंदन केले व पुढील धम्म कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी राज्याचे संघटक समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर व सातारा व पुणे जिल्हा प्रभारी आयोग दादासाहेब भोसले सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासाहेब मोहिते व सरचिटणीस आयु.सुनील कदम, सातारा जिल्हा पूर्व चे संपत भोसले संरक्षण उपाध्यक्ष आयु. संपत भोसले, सातारा जिल्हा पूर्व चे संघटक अर्जुन ननावरे, संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, खटाव तालुका अध्यक्ष बबन जगताप, खंडाळा तालुका अध्यक्ष यशवंत खुंटे, कोरेगाव तालुका अध्यक्ष राजाराम कांबळे, माण तालुका सरचिटणीस आयु.अरविंद बनसोडे, फलटण तालुका कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, मिलिंद माने, संजय भोसले, निलेश मोरे यावेळी उपस्थित होते. बैठक शांततेत व संघटनात्मक वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
साहस Times :- क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातील पत्रकारितेच्या इतिहासात जेष्ठ पत्रकार म्हणून ज्यांचे नाव आजही आदराने आणि अभिमानाने घेतले जाते, असे माण तालुक्यातील बिजवडी (ता. माण) येथील बापूराव लक्ष्मण गुंजवटे (दादा) हे नाव आहे. आपल्या परखड, स्पष्टवक्त्या व निर्भीड लेखणीच्या जोरावर त्यांनी पत्रकारितेत स्वतःची स्वतंत्र आणि ठळक ओळख निर्माण केली आहे. समाजाच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहून, कोणत्याही दबावाला न झुकता त्यांनी तब्बल 45 वर्षे अखंडित पत्रकारिता केली असून, आज दिनांक 15 जानेवारी रोजी ते 79 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. सन 1981 पासून बिजवडी (ता. माण) येथून डेटलाईन घेत त्यांनी दैनिक शिवसंदेश, ग्रामोद्धार, कर्मयोगी, सह्याद्री एक्सप्रेस, तरुण भारत, ऐक्य, पुण्यनगरी, लोकमत यांसह अनेक नामांकित दैनिके व विविध साप्ताहिकांमध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील विषयांवर सातत्याने व निर्भीडपणे लेखन केले. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य माणूस राहिला आहे. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे आणि चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांवर लेखणीच्या माध्यमातून अंकुश ठेवणे, ही भूमिका त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे निभावली. दुष्काळी माण तालुक्याचे प्रश्न हे गुंजवटे दादांच्या पत्रकारितेचे आत्मकेंद्र राहिले आहेत. सततच्या दुष्काळाने होरपळणारा शेतकरी, कष्टकरी, मजूर, मेंढपाळ, कामगार वर्ग, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, कोरड्या पडणाऱ्या विहिरी व बोअरवेल, टँकरवर अवलंबून असलेले पाणी, महिलांची पाण्यासाठीची पायपीट, जनावरांचा चारा-पाणी प्रश्न – या साऱ्या जळजळीत वास्तवाला त्यांनी सातत्याने लेखणीतून मांडले. पाणी प्रश्न, जलसंधारण, बंधारे, तलाव, पाणीपुरवठा योजना, पीक विमा, नुकसान भरपाई, रोजगार हमी योजना यांतील त्रुटी आणि दिरंगाई त्यांनी निर्भीडपणे उघड केली. आपल्या सत्यनिष्ठ पत्रकारितेमुळे अनेक वेळा त्यांच्यावर न्यायालयीन केसेसही दाखल झाल्या, मात्र अशा कठीण प्रसंगांतही त्यांनी कधीही न्यायाची आणि सत्याची बाजू सोडली नाही. कोर्टकचेऱ्या, मानसिक ताणतणाव आणि अडचणी असूनही त्यांच्या लेखणीची धार कधीही बोथट झाली नाही. कोणत्याही भीतीला किंवा दबावाला न जुमानता त्यांनी समाजहितालाच सर्वोच्च स्थान दिले. कोणाचीही लाचारी न पत्करता, स्वाभिमानाने व निःपक्षपातीपणे पत्रकारिता केल्यामुळे त्यांना पत्रकारितेतील ‘भीष्माचार्य’ अशी उपाधी बहाल करण्यात आली. त्यांच्या या प्रदीर्घ व मूल्यनिष्ठ कार्याची दखल घेत विविध दैनिके, साप्ताहिके, संस्था, मंडळे तसेच माणदेश फाउंडेशन (पुणे), फलटण ग्रामीण पत्रकार संघ, माण तालुका पत्रकार संघ आदी संघटनांनी त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. दादांची पत्रकारिता केवळ बातमीपुरती मर्यादित न राहता ती घडवणारी आणि दिशा देणारी पत्रकारिता ठरली आहे. अनेक तरुणांना पत्रकारितेचे धडे देत, त्यांना या प्रवाहात आणण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. सर्व पत्रकारांना एकत्र आणत सहकाऱ्यांच्या मदतीने माण तालुका पत्रकार संघाची स्थापना करून पत्रकारांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पूर्वी तालुक्यात केवळ दोन-तीनच पत्रकार कार्यरत होते. त्या काळात ना मोबाईल, ना वाहन, ना आधुनिक साधने उपलब्ध होती. बातमी मिळवण्यासाठी एसटीने गावोगावी फिरावे लागत होते, अनेकदा पायी चालत पत्रकारिता करावी लागत होती. लिहिलेली बातमी पोस्टाने साताराला पाठवली जायची आणि दोन-तीन दिवसांनी ती प्रसिद्ध व्हायची. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या डिजिटल युगातही त्या बदलांना सामोरे जात सातत्य, विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा जपण्याचे काम गुंजवटे दादांनी यशस्वीपणे केले आहे. दादांचा हा पत्रकारितेचा व सामाजिक जाणिवेचा वारसा आज त्यांचे चिरंजीव विशाल गुंजवटे समर्थपणे पुढे नेत आहेत. आधुनिक माध्यमांचा स्वीकार करत असतानाही ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी-कष्टकरी आणि सामान्य माणसाचा आवाज बुलंद ठेवण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. त्यामुळे गुंजवटे कुटुंबाची पत्रकारिता ही केवळ नावापुरती न राहता मूल्यांवर आधारित समाजाभिमुख परंपरा म्हणून पुढे चालली आहे. गुंजवटे दादांचे कार्य, त्याग, संघर्ष आणि पत्रकारितेवरील निष्ठा याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. आज त्यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांनी उत्तम आरोग्यासह शंभरी पार करावी, आणि हा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत अखंडितपणे पोहोचावा, हीच सर्वांची मनापासून सदिच्छा…!
अकलूज | प्रतिनिधी :- अकलूज नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा म्हणून रेश्मा अडगळे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या पावनदिनी अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. या निमित्ताने अकलूज नगरपरिषदेला पहिल्यांदाच महिला नगराध्यक्षा लाभल्या असून हा क्षण नगरपरिषदेच्या इतिहासात नोंदला गेला आहे. नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रेश्मा अडगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदी शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून सयाजीराजे मोहिते-पाटील तर अनुमोदक म्हणून सचिन देशमुख यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी निवड प्रक्रिया पूर्ण करत शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांची निवड जाहीर केली. ️ पहिल्या निवडणुकीत निर्णायक विजय अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या उमेदवार रेश्मा अडगळे यांनी तब्बल १२,३१९ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिवतेजसिंह मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील, क्रांतीसिंह माने-पाटील, युवराज दोरकर, वैशाली भोसले, प्रियंका गायकवाड, सचिन देशमुख, विशाल मोरे, नम्रता जगताप, मोहसीन शेख, मंदाकिनी पाडोळे, रेश्मा तांबोळी, मृदुला सूर्यवंशी, प्रतिभा गायकवाड, मनीषा तिकोटे, नाशिक सोनवणे, शीतल बनपट्टे, विलास क्षीरसागर, नामदेव गलांडे आणि स्वाती फुले हे नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. तसेच उबाठा शिवसेनेच्या उज्ज्वला विटेकर, भाजपच्या दीपाली वाघमोडे, महेश शिंदे, राहुल लोंढे व जयश्री एकतपुरे, तसेच पृथ्वीराज अंबुरे हेही नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. 欄 सामाजिक समतोलासाठी तीन स्वीकृत नगरसेवक नगरपरिषदेत सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे, या उद्देशाने तीन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खाटीक समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी मिलिंद कडू जैन समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी योगेश गांधी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी अझरुद्दीन शेख या तिन्ही स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांनी केली. या निर्णयामुळे नगरपरिषदेत सामाजिक समतोल राखला गेला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सर्वांगीण विकासाचा निर्धार पदभार स्वीकारताना नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांनी अकलूज शहराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच लोकाभिमुख प्रशासनावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला. नगरसेवक आणि प्रशासनाच्या समन्वयातून अकलूज शहराचा विकास साधण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फलटण :- फलटण नगरपरिषद हद्दीतील बेकायदेशीर नळ कनेक्शनधारक नागरिकांनी येत्या ३१ जानेवारीपर्यंत स्वतःहून कनेक्शन नियमित करून घ्यावे, असे स्पष्ट आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे. दिलेल्या मुदतीत नोंदणी केल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुदत संपल्यानंतरही जे नागरिक नळ कनेक्शन नियमित करणार नाहीत, त्यांचे कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असून नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही नगरपरिषदेने दिला आहे. दरम्यान, शहरातील सर्व सार्वजनिक नळ कनेक्शन कायमचे बंद करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. सार्वजनिक नळांवर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी पर्याय म्हणून दोन ते पाच नागरिकांच्या गटासाठी ‘ग्रुप नळ कनेक्शन’ देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. फलटण शहरातील नागरिकांना वेळेत व योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, हा निर्णय त्याच धोरणाचा भाग आहे. येत्या काही दिवसांत शहरातील सर्व भागांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा देण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले.
फलटण प्रतिनिधी : भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील चार वीर जवानांनी देशसेवेत प्राणांची आहुती दिल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. सातारा जिल्ह्यातील तीन व अकोला जिल्ह्यातील एका जवानाला वीरगती प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मकर संक्रांतीचा सण न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे मकर संक्रांतीनिमित्त लक्ष्मी विलास पॅलेस येथे होणारा पारंपरिक तिळगुळ व सणाचा कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आला आहे. शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. अवघ्या तीन दिवसांत चार भारतीय जवान हौतात्म्यास प्राप्त झाल्याच्या या अत्यंत दुर्दैवी घटनांनी संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना १२ मराठा इन्फंट्रीचे जवान वैभव श्रीकृष्ण लहाने (मु. कपिलेश्वर, जि. अकोला) यांनी देशासाठी बलिदान दिले. तसेच दक्षिण आफ्रिकेतील शांतता मोहीमेवर कार्यरत असताना सातारा जिल्ह्यातील जवानानी देशसेवेचा सर्वोच्च त्याग केला. यामध्ये नायक विलास विठ्ठल गावडे (मु. बरड, ता. फलटण, जि. सातारा), तसेच जवान अभिजीत माने (मु. भोसे, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि जवान प्रमोद परशुराम जाधव (मु. दरे, जि. सातारा) यांचा समावेश आहे. जवान अभिजीत माने यांनी तर अवघ्या आठ तासांच्या आपल्या नवजात बाळाला न पाहता आले ही घटना अधिकच हृदयद्रावक ठरली आहे. या सर्व शहीद जवानांच्या बलिदानाला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, “देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांचे ऋण कधीही फेडता येणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण राज्य सहभागी आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.
फलटण शहरातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण निर्णय राबवण्यात येणार असल्याची माहिती फलटण नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. महिलांसाठी मोफत बस सेवा, शहरातील चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच प्रमुख ठिकाणी स्वच्छ व अत्याधुनिक शौचालये उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील अनेक ठिकाणी झालेली अतिक्रमणे हटवून चौक प्रशस्त करण्यात येणार असून, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांचा प्रश्न प्रलंबित असल्याने येत्या दोन ते तीन महिन्यांत शहरातील प्रमुख ठिकाणी शौचालयांची उभारणी करण्यात येईल, ती अत्याधुनिक व स्वच्छ असतील, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी मागील नगरपालिकेच्या काळात सद्गुरु उद्योग समूह व महाराजा उद्योग समूह यांच्या सहकार्याने महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्याचा ठराव स्थगित ठेवण्यात आला होता. मात्र आता संबंधित संस्थांशी चर्चा करून महिला व मुलींसाठी मोफत बस सेवा निश्चितपणे सुरू केली जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षांनी दिली. पाणीपुरवठ्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शहरातील अनेक भागांत कमी दाबाने व अस्वच्छ पाणीपुरवठा होत होता. ही समस्या सोडवण्यासाठी नव्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून लवकरच संपूर्ण शहराला योग्य दाबाने १००% शुद्ध पाणी मिळणार आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेवर भाष्य करताना त्यांनी शहरातील सर्व मध्यवर्ती रस्ते सिमेंटचे करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. येत्या सहा ते आठ महिन्यांत खड्डेमुक्त फलटण पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगरपालिकेच्या सेतूमधील दाखले व कर भरण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणून, बाहेरगावी राहणाऱ्या नागरिकांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. नागरिकांनी भरलेल्या कराचा वापर १००% विकासकामांसाठीच केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दर रविवारी भरणारा आठवडी बाजार एकाच ठिकाणी भरवून तेथे सर्व आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत.
साहस Times :- नामांतर आंदोलन हे १९७६ ते १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील ‘मराठवाडा विद्यापीठा’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही ‘सरकारी मागणी’ या आंदोलनाची होती. शेवटी सोळा वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामांतर नव्हे तर नामविस्तार करण्यात आला. १४ जानेवारी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिवस पण या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला १७ वर्ष संघर्ष करावा लागला. शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षाही सर्वाधिक महत्त्वाचा लाभ आहे. दबलेल्या नि पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे व तेही सर्वोच्च नि उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात. अन्यथा त्यांचे जीवन असुरक्षित नि कष्टप्रदच राहील. उच्चशिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. उच्चशिक्षण हे बुद्धीजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी या क्षेत्रात गरीब व दुर्बल घटकाच्या माणसास संधी मिळायला हवी असे डॉ. आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते. हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी १९५० ला औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते. बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने “आपण हे जे महाविद्यालय सुरु करीत आहात ते या ठिकाणी चालेल का?” असा प्रश्न केला. त्यावेळी बाबासाहेब उद्गारले, “येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली.
मराठवाडा विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला. तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत केली. शासननियुक्त समितीने विचारार्थ घेतलेल्या व गाभिर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा, औरंगाबाद, पैठण, प्रतिष्ठान, दौलताबाद, देवगिरी, अजिंठा, शालिवाहन, सातवाहन, अशी सर्व स्थळ व भूमी-राज्यावाचक नावे होती. फक्त दोनच व्यक्तींची नावे सुचविली होती; छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. यातील शिवाजी महाराजांच्या नावाने आधीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पुढे १९६० साली स्थापन झाले, त्यांचे उचित विद्यापीठीय स्मारक झाले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठीय स्मारक झाले नाही. म्हणून औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव २७ जुलै १९७८ ला संमत करण्यात आला. महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेसह सर्वांनाच आनंद झाला. परंतु ह्याने मनुवादी लोकांचे पीत खवळले. त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराला कडाडून विरोध केला. या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच डगमगली नाही. नामांतराची लढाई पुढे जोमाने चालूच ठेवली. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बलिदानाची पर्वा केली नाही. आंबेडकरी जनता आपल्या पित्याच्या (बाबासाहेबांच्या) नावासाठी वाटेल ते करण्यास तयार होती. नामांतराची लढाई ही दीन दलितांच्या अस्मितेची लढाई होती. ही चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी लढाई होती. या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले. कितीतरी युवक नि युवतींना आपले प्राण गमवावे लागले. कित्येकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली. कित्येक दलित आया-भगीनींवर बलात्कार झाले तर काही गावात दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला.
सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना बंदी करण्यात आली. दलित आया-भगीनींच्या कित्येक गावातून भरचौकातून उघड्या-नागड्या धिंडी काढण्यात आल्या. नामांतराच्या या काळामध्ये जातीयवादी नराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती. पोलीसांनीही लहान बालके, स्त्री, वृद्ध, पुरुषांवर बेसुमार लाठीचार्ज केले तर काही वेळा बंदुकीचाही वापर केला. विद्यापीठ म्हणजे काय हेही ज्यांना धडपणे माहित नव्हते त्या दीनदुबळ्या दलितांवर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले. आईच लेकरू आईविना पोरक झाल्यासारखी दलित बांधवांची अवस्था झाली होती. एवढे होत असतानाही धाडसी भीमसैनिकांनी कधीच माघार घेतली नाही. फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय, अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती. जिकडे-तिकडे एकाच नारा गुंजत होता ‘नामांतर झालेच पाहिजे’.
नांदेड मध्ये दलित पेंथरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्व:ताला भरचौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकाच नारा होता, “नामांतर झालेच पाहिजे”. बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले. परभणी जिल्हातही पोचिराम कांबळे यांचे हात-पाय तोडण्यात आले. त्यांनाही जातीयवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले. जनार्धन मवाडे, संगीता बनसोडे, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतिवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले. जातीयवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंगमार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लॉंगमार्च आयोजित करून “जिंकू किंवा मरू, जळतील नाहीतर जाळून टाकतील” अशी आक्रमक भूमिका घेतली. लॉंगमार्च मधील निष्पाप लोकांवर इंग्रजानाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठीहल्ले केले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, कित्येकांना तुरुंगात डांबले. या निष्पाप दलितांचा गुन्हा काय? तर आपल्या पित्याचे (बाबासाहेबांचे) नाव विद्यापीठाला द्यावे हि (सरकारी) मागणी. ज्यांनी दीनदलित , पिचलेल्या आणि उच्चभ्रू समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील माणसाला माणूसपण मिळवून दिले, जगण्याचा हक्क दिला, त्या उत्तरदायीत्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुषपणे वागणूक देणं यांचा निषेध केला पाहिजे.
तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले कि बाबासाहेबांची ही लेकरे बाबासाहेबासाठी प्राण द्यायलाही मागेपुढे पाहात नाहीत. जर यांच्या संयमाचा अंत झाला तर हेच लोक दुसऱ्यांचा प्राण घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता ‘नामांतर नामांतर’. चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या. त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. १७ वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असा नामविस्तार करण्यात आला. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे हि सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागला. नामांतर झाले परंतु अर्धवट नामांतर झाले, हि खंत आजही भिमसैनिकांच्या मनात आहे. विद्यापीठाचे पहिले नाव ‘मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद’ असे होते. नामांतरानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ एवढेच झाले. नामांतराची लढाई हि प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. १४ जानेवारी १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या “प्रवेशद्वाराची” ची मनोभावे पूजा करते. जणूकाही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रेद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात. नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देश, भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नाव लौकिक मिळविला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला.
इतिहास नामांतर आंदोलनाच्या इतिहासाचे वय ३५ वर्षाचे. २७ जुलै १९७८ मध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव पारित झाला. हा आनंद आंबेडकरी अनुयायी अनुभवत असतानांच प्रतिगाम्यांच्या पोटातील पाण्याने कुटील डाव सोडला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला. आणि दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरवात केली. परंतु बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांच “वार” प्यालेल्या कार्यकर्त्यानी गावखेड्यातील बांधवांचे धगधगते मरणतांडव बघीतले. आणि पेटून उठले कार्यकर्त्यांचे सुर्यास्त्र. डोक्याला निळे कफन बांधून ४ ऑगष्ट रोजी दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावली. आणि चळवळीतील नायकांनी पेटलेल्या आभाळातील एक गरुडझेप होती ती प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील ‘लॉंगमार्च’ काढला गेला. या लॉंगमार्च मध्ये मामा सरदार, कवि. इ.मो.नारनवरे, सुरेश घाटे, बबन बोदांटे, जगदीश थुल, थॉमस कांबळे, जे.के. नारायणे, गोपाळराव आटोटे, नामदेवराव खोब्रागडे, दिलीप पाटील, नरेश वहाणे, भीवा बडगे, सरोज मेश्राम यांच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते लढण्यासाठी सज्ज झाले होते. याशिवाय दक्षिण नागपूर येथे सुखदेव रामटेके यांच्या नेतृत्वातही एक लढा लढला होता. पोलिसांनी दलितांच्या जोगीनगर, भीमनगरात अश्रूधूर फेकले असताना ते कॅच पकडून पुन्हा पोलिसांकडे भिरकाणारे कार्यकर्ते आजही या नामांतर आंदोलनाचा इतिहास डोळ्यात साठवून ठेवला आहे. नागपूरात चोहिकडे आंदोलन पेटले होते, पश्चिमचे आंदोलन ऍड. विमलसूर्य चिमणकर, उत्तरचे आंदोलन प्रा. रणजित मेश्राम, उपेंद्र शेंडे यांच्यापासून तर राजन वाघमारे यांच्यापर्यंत लढला गेला. माजी आमदार शेंडेचे उपोषण लॉंगमार्च नंतरचा एक महत्त्वाचा टप्पा. दक्षिणेत भूपेश थुलकर, दादाकांत धनविजय, अमर रामटेके, सुधाकर सोमंकुवर, मधु दुधे, विलास पाटील, बाळु हिरोळे, सुनील लामसोंगे अशी असंख्य नावं घेता येतील. वर्धापन दिनाच्या पर्वावर नामांतराचा वणवा कार्यकर्त्यांच्या जणू बुबुळात पेरला असल्याचे दिसत आहे. आंदोलनाचे चित्र कार्यकर्त्यानी वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला चर्चेतून उभे केले. मराठवाड्यात शिक्षणाची गंगा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आणली, औरंगाबाद शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून, शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत असलेल्या मराठवाडयाला प्रगत करण्याचं काम महामानवाने केले. आणि त्याच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्याचा मुद्दा उपस्तीथ झाला तेव्हा, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ या अविचारी माणसांनी विरोध केला, त्यांच्या या विरोधामुळे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता पेटून उठली व नामांतराची मागणी जोर धरू लागली, ठीक ठिकाणी मोर्चे, आंदोलने होवू लागले, नामांतराला विरोध म्हणून जातियवादी लोकांनी दलितांवर अन्याय, अत्याचार करण्यास सुरूवात केली, जाळपोळ करू लागले.
सफलता सोळा वर्षाच्या लढाई नंतर औरंगाबादेतील मराठवाडा विद्यापीठाला १४ जानेवारी १९९४ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नाव देण्यात आले. नामविस्ताराची अधिकृत घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री यांनी केली.