पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात, पाहा फोटो
Source link
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात
श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे रामराजेंवर टीकास्त्र

फलटण: श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवर प्रशासकाची नेमणूक करत निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावरही निशाणा साधला.
रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच तिजोरी लुटली, हे फलटण तालुक्याचे दुर्दैव आहे. रामराजे यांनी सहकारी संस्था अक्षरशः विकण्यास काढल्या आहेत. तालुक्यातील तरुणांनी आता त्यांना घरी बसवण्याचा निर्धार केला आहे.”
“कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर”
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आरोप केला की, “श्रीराम साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज करण्यात आले आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तिजोरी रिकामी केली. कारखान्यात काहीही शिल्लक नाही. जर शिक्षणावर भर दिला असता, तर बारामतीच्या बरोबरीने प्रगती झाली असती.”
ते पुढे म्हणाले, “20 वर्षांपूर्वी फलटणचा 1 लाख लिटर दूधसंघ होता, तो आज शून्यावर आला आहे. जमीन आणि मशिनरी विक्रीस काढण्यात आली. श्रीराम कारखान्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून, मालोजी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले. मार्केट कमिटीत सहा महिन्यांचे पगार थकले आहेत. एवढेच नाही तर पाणी देखील 30 वर्षे भाड्याने देण्यात आले होते.”
रामराजे विरुद्ध रणजितसिंह – फलटणच्या राजकारणात वाढता संघर्ष
श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपाचा सूर अधिक तीव्र होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष फलटणच्या राजकारणाला नवीन वळण लावणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Judge Cash Row: न्यायाधीशांच्या घरातील ‘तो’ VIDEO सुप्रीम कोर्टाने केला सार्वजनिक, 4 ते 5 पोत्यांमध्ये भरलेल्या नोटा अन्…

Judge Cash Row: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातील पहिला फोटो, व्हिडीओ अखेर समोर आले आहेत. फोटोंमध्ये त्यांच्या घरात नोटांचा साठा दिसत आहे, ज्यामधील काही नोटा जळालेल्या आहेत. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कुठून आली याचा तपास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. पण त्याआधीच फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. सुप्रीम कोर्टाने आपल्या वेबसाईटवर हे फोटो शेअर केले आहेत.
घरात रोख रकमेचा साठा, न्यायाधीशांच्या घरी आग लागल्यानंतर उघड झालं रहस्य; सुप्रीम कोर्टाने केली बदली
यासह जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, “ज्या खोलीत आग लागली तिथे नियंत्रण मिळवल्यानंतर 4 ते 5 अर्धवट अवस्थेत जळालेली पोती सापडली आहेत. ज्याच्या आतमध्ये भारतीय चलन होतं”. यासह प्रकरणाशी संबंधित दिल्ली हायकोर्टाचे चीफ जस्टिस यांचा रिपोर्टही सार्वजनिक झाला आहे. तसंच यावर न्यायमूर्ती वर्मा यांनी दिलेलं उत्तरही सार्वजनिक करण्यात आलं आहे. प्रकरणाशी संबंधित कागदपत्रं वेबसाईटवर शेअर करण्यात आले आहेत.
#BREAKING Video shared by Delhi Police Commissioner regarding the fire at Justice Yashwant Varma’s house, when cash currencies were discovered. pic.twitter.com/FEU50vHwME
— Live Law (@LiveLawIndia) March 22, 2025
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये सांगण्यात आलं आहे की, “सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी.एस. संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अनु शिवरामन यांचा समावेश आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना सध्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना कोणतेही न्यायालयीन काम देऊ नये असं सांगण्यात आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी त्यांचा अहवाल सादर केला आहे”.
दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश काय म्हणाले?
दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणाले, “मी न्यायमूर्ती वर्मा यांच्याशी संपर्क साधला, जे 17 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता दिल्ली उच्च न्यायालयाच्या अतिथीगृहात भेटले, जिथे मी सध्या राहत आहे. न्यायमूर्ती वर्मा यांनी उत्तर देताना सांगितले की, ज्या खोलीत आग लागली त्या खोलीत फक्त काही फर्निचर आणि गाद्या इत्यादी निरुपयोगी घरगुती वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यांनी असेही सांगितले की नोकर, माळी आणि कधीकधी सीपीडब्ल्यूडी कर्मचारी खोलीत येऊ, जाऊ शकत होते. त्यांनी मला असंही सांगितलं की घटनेच्या वेळी ते भोपाळमध्ये होते आणि त्यांना ही माहिती त्यांच्या मुलीकडून मिळाली. न्यायमूर्ती वर्मा यांनी मला पुढे सांगितले की सध्या खोलीत एक काळा जळालेला पदार्थ (काजळी) पडलेला आहे. यानंतर मी त्यांना माझ्या व्हॉट्सअॅपवरील फोटो आणि व्हिडिओ दाखवले, जे पोलिस आयुक्तांनी मला आधीच पाठवले होते. यानंतर त्याने आपल्याविरुद्ध कट रचल्याची भीती व्यक्त केली”.
दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पुढे म्हणाले, “घटनेचा अहवाल, उपलब्ध साहित्य आणि न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचे उत्तर तपासल्यावर मला असं आढळले की पोलिस आयुक्तांनी 16 मार्च रोजीच्या त्यांच्या अहवालात म्हटलं आहे की न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या गार्डनुसार, 15 मार्चला सकाळी ज्या खोलीत आग लागली होती तिथून कचरा आणि इतर अंशतः जळालेल्या वस्तू काढून टाकण्यात आल्या. मी केलेल्या तपासातून बंगल्यात राहणारे लोक, नोकर, माळी आणि सीपीडब्ल्यूडी कर्मचारी (जर असतील तर) यांच्याव्यतिरिक्त इतर कोणी खोलीत प्रवेश केला होता का हे प्रथमदर्शनी उघड होत नाही. त्यामुळे, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे असे माझे प्रथमदर्शनी मत आहे”.
देश – परदेश: सुरम्य आठवणींचे बेळगाव
ज्ञानेश्वर मुळे33 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
बेळगावमधला मराठी बोलणारा माणूस मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांना जपतो आहे. मराठी संस्था आपले कार्यक्षेत्र वाढवत आहेत. स्वभावत: गोड असणारा लाल मातीतील मराठी माणूस आपला गोडवा आणि ओलावा टिकवून आहे. सरस्वती वाचनालय, मराठा मंडळ, सांगाती अकादमी यांसारख्या संस्था जिवंत आहेत, तोपर्यंत बेळगावात मराठी जोमाने वाढणार हे नक्की.
कोल्हापूरकरांना बेळगावविषयी अतिशय जिव्हाळा आणि आकर्षण आहे. शालेय जीवनातच माझा बेळगावशी परिचय झाला आणि मग तो महाविद्यालयीन जीवनापर्यंत वाढतच राहिला. या दरम्यान आठवणींचा एक फार मोठा खजिनाच तयार झाला.
दोन महिन्यांपूर्वी बेळगावच्या सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे आमंत्रण आले आणि मी ते तत्काळ स्वीकारले. या निमित्ताने दोनेक दिवस तिथे राहण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा त्या लाल मातीचा सुगंध आणि बेळगावच्या मंडळींच्या स्नेहातील कुंदा अनुभवण्याची संधी मिळाली. प्रसन्न अशा नव्या आठवणींची वृद्धी झाली.
सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांच्या प्रोत्साहनाने तयार झालेली वाचनालयांची दगडी दुमजली टुमदार इमारत स्वत:च एखाद्या संस्मरणीय आठवणीसारखी बेळगावच्या पटलावर उभी आहे. या वाचनालयाचे उद्घाटन सरस्वतीबाई राणीसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाल्याचा आणि इमारतीसाठी एकूण २६,९३० रुपये खर्च झाल्याचा उल्लेख असलेला शिलालेख प्रवेशद्वाराजवळच्या कारंजाच्या आधी लक्ष वेधून घेतो. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘शाकुंतल’ नाटकाचा पहिला प्रयोग दीडशे वर्षांपूर्वी सर्वप्रथम या वाचनालयात सादर केला गेला. त्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करत पुन्हा एकदा या नाटकाचा प्रयोग नव्या दमाच्या कलाकारांनी अलीकडेच सादर केला. बेळगावकर सहजासहजी इतिहास विसरत नाहीत, हेच या निमित्ताने सिद्ध झाले.
मी शालेय जीवनातच बेळगावच्या आणि बेळगावकरांच्या प्रेमात पडलो होतो. आमची कोल्हापूरची शाळा बेळगावच्या वाड्.मय चर्चा मंडळाच्या गोगटे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करत असे. मीही त्यात भाग घेतला आणि पारितोषिके पटकावली. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे, त्यामुळे बेळगावचा नकळत परिचय झाला. वाड्.मय चर्चा मंडळाची इमारत कृष्णा टॉकीजजवळ होती. अजूनही आहे. या वाड्.मय चर्चा मंडळाच्या स्पर्धांमध्ये दूरदूरच्या शाळा – महाविद्यालयांचे विद्यार्थी भाग घेत असत. माझ्या जडणघडणीत या संस्थेची फार मोठी भूमिका आहे.
हळूहळू या गावातील संपर्क विस्तारत गेला. मारुती गल्लीत आत्माराम सावंत नावाचे कवी राहात असत. आमच्या संस्कृतच्या शिक्षिका करकरे बाई आणि त्यांचा परिचय होता. त्यांच्याकडील वास्तव्यात त्यांच्या आणि बाईंच्या कविता ऐकून आपणही कविता लिहाव्यात, असे वाटू लागले. नंतर आमच्या रामकुमार सावंत सरांच्या विवाहानिमित्त वडिलांच्या सोबत बेळगावला जाणे झाले. अनगोळपासून विवाहस्थळापर्यंत सायकलने जाणे – येणे खूप गंमतीशीर होते.
महाविद्यालयात असतानाही बेळगावला वारंवार जाणे सुरू राहिले. तेव्हा नुकतेच ज्योती कॉलेज सुरू झाले होते. दाजीबा देसाई, एन. डी. पाटील अशी मंडळी या कॉलेजशी जोडली गेली होती. तशात आमचा कोल्हापुरातील मित्र हिंदी विषयात एम. ए. करुन ज्योती कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाला. त्याच्या स्वभावानुसार त्याने सांगाती साहित्य अकादमीची स्थापना केली. बाबूराव नेसरकर आणि अन्य तरुण मित्रांच्या मैत्रीचा गोफ गुंफला. अल्पावधीत सांगाती अकादमीच्या कार्याचा विस्तार वाढला. वाचनालय, पतपेढी, अभ्यासिका असा प्रवास सुरू झाला. सीमा भागात ‘सांगाती’द्वारा साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्रातल्या प्रतिथयश साहित्यिकांना बेळगाव परिसरातील सांगाती साहित्य संमेलन हे मोठेच आकर्षण ठरले. प्रा. तुकाराम पाटील यांच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि बेळगावला जोडणारा दुवा निर्माण झाला.
तुकाराम यांच्या आग्रहामुळे अगदी तिशीतच मी स्वत:चे आत्मकथन लिहिले. त्यांच्यामुळेच मी कविता या साहित्य प्रकाराबरोबरच गद्यातही माझ्या लेखणीचा अंदाज घेऊ लागलो. पुस्तक तयार झाले आणि बेळगावच्याच जवळकर बंधूंच्या नवसाहित्य प्रकाशनाकडून ते प्रकाशित करुन घेतले. इतक्यावरच ते थांबले नाहीत. त्या पुढच्या साहित्य संमेलनात प्रसिद्ध साहित्यिक म. द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते त्या पुस्तकाचे शानदार प्रकाशन झाले. त्यानंतर काही दिवसांतच तुकाराम यांच्या अपघाती निधनाचा धक्का आम्हा सर्व मित्रमंडळींना सहन करावा लागला. आजही त्यांच्या मित्रांनी साहित्यिक – सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली आहे, ही मात्र विशेष अभिमानाची गोष्ट आहे.
सुरुवातीच्या शालेय दिवसांपासून आजपर्यंत एकंदरीतच बेळगावातील अनेक आठवणींचा प्रवास मी अनुभवला आहे. आता कोल्हापूर – बेळगाव महामार्ग विस्तारला आहे. दिल्लीहून बेळगावला दररोज थेट विमानाने प्रवास करता येतो. पूर्वी पुण्याहून दिल्लीला येणारा मी आता बेळगावमार्गे येतो. दरम्यानच्या काळात सीमा चळवळ क्षीण झाली आहे. बेळगावचे बेळगावी झाले आहे. एकीकरण समितीलाही ग्रहण लागून घरघर लागली आहे. अधूनमधून मराठी आणि कानडी नेत्यांमध्ये शब्दांची चिखलफेक होते. पण, बेळगावच्या मागणीचा पाठपुरावा करण्याच्या बाबतीतील उदासीनता दिवसेंदिवस बळावत चालली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवरही बेळगावमधला मराठी बोलणारा माणूस मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांना जपतो आहे. मराठी संस्था आपले कार्यक्षेत्र वाढवत आहेत. स्वभावत: गोड असणारा लाल मातीतील मराठी माणूस आपला गोडवा आणि ओलावा टिकवून आहे. सरस्वती वाचनालय, मराठा मंडळ, सांगाती अकादमी यांसारख्या संस्था जिवंत आहेत, तोपर्यंत बेळगावात मराठी जोमाने वाढणार हे नक्की.
(संपर्कः dmulay58@gmail.com)
रसिक स्पेशल: बलुचिस्तानचा प्रश्न
डॉ. सुखदेव उंदरे3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
बलुचिस्तानातील सिब्बी जिल्ह्यात ११ मार्चला क्वेट्टाहून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला चढवून ही ट्रेनच हायजॅक करण्यात आली. बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) हा हल्ला केला. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या फतेह स्क्वाडचीही साथ त्यांना मिळाली. या हल्ल्यातून पाकिस्तान सरकार आणि लष्कर सावरण्याआधीच ‘बीएलए’ने नुकताच, १६ मार्चला पाकिस्तानी लष्करी बसच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. त्यात ९० सैनिक मारले गेल्याचा दावा ‘बीएलए’ने केला. पाकिस्तानातील या घटनांनी जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे बलुचिस्तान आणि तिथल्या संघर्षाकडे इतिहास, वर्तमान आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहावे लागेल.
पाकमध्ये सामील व्हायचे नव्हते : बलुचिस्तान प्रांत हा मुख्यत्वे चार संस्थानात विभागलेला होता. कलात, खरहान, लॉस बेला आणि मकरा. यापैकी कलात सर्वांत शक्तिशाली संस्थान होते. कलातच्या खानाला सार्वभौम राहायचे होते. भारताच्या फाळणीनंतर कलात म्हणजेच बलुचिस्तान सुमारे २२७ दिवस स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य राहिले. या प्रांताला पाकिस्तानात सामील व्हायचे नव्हते आणि मोहम्मद अली जिनाही सुरूवातीला या भूमिकेशी सहमत होते.
भू-राजकीय, सामरिक महत्त्व : पाकिस्तानातील पंजाब, खैबर पख्तुनख्वाह आणि सिंध या अन्य तीन प्रांतांपेक्षा बलुचिस्तान क्षेत्रफळाने मोठा आहे. पाकिस्तानचा जवळपास ४४ टक्के भूभाग या प्रांताने व्यापला असून, तिथली लोकसंख्या सुमारे दीड कोटी आहे. पाकिस्तानी नौसेनेचे तीन तळ बलुचिस्तानात आहेत. या प्रांतातील चगाईमध्ये अणुचाचणी करूनच पाकिस्तान आण्विक शक्ती बनला. पाकिस्तानची २० टक्के नैसर्गिक संसाधने याच प्रांतात आहेत.
चळवळीचे पुनरुत्थान : बलुच लोकांचे सार्वभौम हित आणि अधिकारांसाठी लढत असल्याचा ‘बीएलए’चा दावा आहे. २००० च्या दशकाच्या प्रारंभी या संघटनेचा उदय झाल्याचे मानले जाते. पण, काही विश्लेषक या संघटनेला पूर्वीच्या बलुच बंडखोरीचे, विशेषत: १९७३ ते १९७७ च्या स्वतंत्र बलुचिस्तान चळवळीचे पुनरुत्थान मानतात. पाकिस्तानच्या निर्मितीपासून बलुच प्रांत अविकसित राहिला आहे. पाकिस्तान सरकारकडून होणाऱ्या उपेक्षेमुळे तिथे स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली. ‘बीएलए’मुळे तिला पाठबळ मिळाले. या भागातील चीनच्या प्रवेशानंतर तिथली परिस्थिती अधिकच चिघळत गेली. पाकिस्तानने बलुचिस्तानातील ग्वादर बंदर चीनला भाडेपट्ट्यावर दिले. स्थानिक बलुच लोकांमधील असंतोष वाढण्यामागचे हेही एक कारण आहे.
भारताची भूमिका काय? बलुच बंडखोरांना भारताचा पाठिंबा असल्याचे आरोप पाकिस्तानकडून सातत्याने केले जातात. भारताने नेहमीच हे आरोप फेटाळले आहेत. तथापि, बलुच लोकांच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचे महत्त्व समोर ठेऊन भारताने अनेकदा संयुक्त राष्ट्रांसह अन्य आंतरराष्ट्रीय मंचांवर बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला आहे. बलुचिस्तानच्या मुद्द्यावर भारताची भूमिका पाकिस्तानसोबतच्या संबंधात राखल्या जाणाऱ्या नाजूक संतुलनामुळे जास्त गुंतागुंतीची बनली आहे. तूर्तास बलुचिस्तानातील लोकांच्या आशा-आकांक्षांचा आदर करणाऱ्या अर्थपूर्ण वाटाघाटींमध्ये या समस्येच्या सोडवणुकीचा मार्ग सापडू शकतो. या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत भारताचा राजनयिक पाठिंबा आणि हातभार भविष्यात निर्णायक ठरेल.
(संपर्कः sukhadevsundare@gmail.com)
कव्हर स्टोरी: रस्ते अपघात कसे रोखणार?
रसिक डेस्क5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
ॲक्सिडेंट कॅपिटल… जगातील सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात, म्हणून हे बिरुद आपल्याला लावले जाते. गेल्या काही वर्षांत देशात एकीकडे रस्ते आणि दळणवळण सुविधा विस्तारत असताना, अपघातांचे प्रमाण आणि त्यात बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. हजारो कुटुंबांच्या आनंदी आयुष्यावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर आघात करणाऱ्या अपघातांची ही कारणमीमांसा…
देशभरात महामार्गांचे जाळे विस्तारत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमधून शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही पक्के रस्ते तयार होत आहेत. रस्ते बांधणी आणि पुलांच्या उभारणीमुळे दळणवळणाला गती येत असल्याचे दिसत आहे. मात्र त्याचवेळी देशातील अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. चांगले रस्ते निर्माण करण्यासाठी झटणारे या खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच, खराब रस्त्यांमुळे देशात अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे अलीकडे म्हटले आहे. रस्त्यांच्या प्रकल्पावर काम करणारे स्थापत्य अभियंते आणि त्यांच्या सल्लागारांनी चुकीचे प्रकल्प अहवाल तसेच निकृष्ट डिझाइन तयार केल्यानेच अपघात वाढले आहेत, परिणामी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे, असा ठपका त्यांनी ठेवला आहे.
विशेष म्हणजे, भारतातील रस्ते अपघात आणि त्यात जाणाऱ्या बळींची संख्या जगात सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २०२१ मध्ये वैश्विक रस्ते सुरक्षेतील सुधारणांसाठी केलेला ठराव महत्त्वाचा आहे. त्यानुसार २०३० पर्यंत रस्ते अपघातांतील बळींचे प्रमाण किमान ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. असेच ध्येय भारतातही केंद्र सरकारने ठेवले आहे. खराब रस्त्यांप्रमाणेच मद्यपान किंवा ड्रगसेवन करुन वाहन चालवणे, अतिवेग आणि अतिभार असलेल्या वाहतुकीवर नियंत्रण नसणे, वाहतुकीच्या शिस्तीचा अभाव, ‘हिट अँड रन’सारख्या घटना, हेल्मेटचा वापर न करणे अशा अनेक गोष्टी वाढत्या अपघातांना कारणीभूत आहेत. नागरिकांनीही वेळेशी मेळ घालण्याच्या प्रयत्नात वाहने वेगाने दामटून स्वत:च्या जीवाशी खेळ करण्याचे प्रकार तातडीने थांबवले पाहिजेत. शासन, प्रशासन आणि समाजाने अपघातांच्या प्रत्येक कारणावर उपाय शोधण्याचा, त्यानुसार कृती करण्याचा दृढनिश्चय केला, तरच ते कमी होऊ शकतील. अन्यथा, ‘जगातील रस्ते अपघातांची राजधानी’ हा देशाच्या नावापुढे लागलेला कलंक पुसला जाणार नाही.
देशातील अपघात आणि बळींची वाढती संख्या
वर्ष – अपघात – मृत्यू २०२० – ३.६६ – १.३२ २०२१ – ४.१२ – १.५४ २०२२ – ४.६१ – १.६८ २०२३ – ४.८० – १.७२ २०२४ – ४.९८ – १.८० (आकडे लाखांमध्ये)
भारताचे अप‘घात’सूत्र…
– रस्ते अपघातांमध्ये होणारे सुमारे ७० टक्के मृत्यू अतिवेगामुळे.
– २००४ ते २०१३ या दशकात १२.१ लाख लोकांचा मृत्यू, ५०.३ लाख जखमी.
– २०१४ ते २०२३ या दशकात १५.३ लाख लोकांचा मृत्यू, ४५.१ लाख जखमी.
– देशात १० हजार कि. मी. मागे २५० मृत्यू; हे प्रमाण चीनमध्ये ११९, अमेरिकेत ५७, ऑस्ट्रेलियात ११.
– २०२३ मध्ये दर तासाला ५५ अपघात आणि २० मृत्यूंची नोंद.
– गेल्या वर्षी ३० हजार विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा अपघातात बळी.
– त्याच वर्षी अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी ६६ टक्के लोक १८ ते ३४ वयोगटातील.
महाराष्ट्राचे ‘घात’चित्र…
– २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत एकूण १ लाख ४ हजार ७१० अपघात.
– या तीन वर्षांतील अपघातांमध्ये सुमारे ४५ हजार ९२५ जणांचा मृत्यू.
– २०२२ मध्ये ३३ हजार ३८३ अपघातांमध्ये १५ हजार २२४ जणांचा मृत्यू.
– २०२३ मध्ये ३५ हजार २४३ अपघातांमध्ये १५ हजार ३६६ जणांचा मृत्यू.
– २०२४ मध्ये ३६ हजार ८४ अपघातांमध्ये १५ हजार ३३५ जणांचा मृत्यू.
स्त्रोत : रस्ते वाहतूक मंत्रालय, इंडिया स्टेटस् रिपोर्ट ऑन रोड सेफ्टी आणि अन्य अहवाल.
१२ वर्षांत दुपटीपेक्षा जास्त वाढली वाहनांची संख्या
२०२० मध्ये कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अपघातांमध्ये मोठी घट झाली. मात्र, नंतर हे प्रमाण वाढत गेले. देशात २०१२ ते २०२४ या १२ वर्षांत वाहनांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली. २०१२ मध्ये १५.९ कोटी वाहने होती. हा आकडा २०२४ मध्ये ३८.३ कोटींवर गेला. या कालावधीत रस्त्यांची लांबीही सुमारे ११ लाख कि. मी. ने वाढली. २०१२ मध्ये देशातील रस्त्यांची एकूण लांबी ४८.६ लाख कि. मी. होती, ती २०२४ पर्यंत ६६.७१ लाख कि. मी. वर पोहोचली.
अपघातांमुळे ‘जीडीपी’ला ५ ते ७ टक्क्यांचा फटका
नवे रस्ते तयार करणे, रस्त्यांचे रुंदीकरण आणि दुरूस्ती यावर देशात हजारो कोटी रुपये खर्च होतात. त्यातून रस्ते बांधणीशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड आर्थिक उलाढाल होते. दुसरीकडे, वाहनांची खरेदी आणि त्यासाठीचे कर्ज, इंधन विक्री, वाहनांचा तसेच व्यक्तिगत अपघात विमा, टोल आदी बाबींमुळे रस्ते वाहतूक क्षेत्राचे एक मोठे अर्थकारण उभे राहिले आहे. जागतिक बँकेच्या अभ्यासानुसार, दरवर्षी रस्त्यांवरील अपघातांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे जीडीपीच्या ५ ते ७% इतके नुकसान होते. याचा अर्थ, ज्यावर काही लाख कोटींची अर्थव्यवस्था उभी आहे, त्या रस्ते वाहतूक क्षेत्रातील अपघातांमुळे लाखमोलाचे जीव जातातच; शिवाय देशाच्या आर्थिक वाढीलाही मोठा फटका बसत आहे.
बहुतांश अपघात निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे…
रस्त्यांचा निकृष्ट दर्जा हे वाढत्या रस्ते अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. चुकीची रस्तेबांधणी, अशास्त्रीय स्पीड ब्रेकर, दुरुस्तीची रेंगाळलेली कामे, रस्त्यावरचे खड्डे यांमुळे होणारे प्राणघातक अपघात टाळता येऊ शकतात. त्यासाठी या गोष्टींना जबाबदार रस्ते कंत्राटदार, त्यावर देखरेख ठेवणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत. टोल रोड असूनही रस्त्याचा दर्जा सुमार असेल, तर रस्ता उत्तम होईपर्यंत टोलवसुली थांबवणे, टोल कंत्राटदाराला दंड करणे असे उपाय केले पाहिजेत. वाहनचालकांना परवाना देताना कठोर परीक्षा घेणेही आवश्यक आहे. या प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे अकुशल ड्रायव्हर रस्त्यावर उतरतात आणि अपघात वाढतात. मद्यप्राशन करुन गाडी चालवणे, ओव्हरलोडिंग यामुळेही मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. त्यासाठी कायद्यांची कठोर आणि जाणवेल अशी अंमलबजावणी झाली पाहिजे.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे
दंडवसुली १०० टक्के होण्याची आवश्यकता…
बेजबाबदारपणे वाहने चालवण्यामुळे ९० टक्के अपघात होतात. मद्यपान करुन वाहन चालवणे, सीटबेल्ट न लावणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, इंडिकेटर किंवा पार्किंग लाइट न लावता रस्त्यावर ट्रक / कंटेनर उभे करणे ही सुद्धा अपघातांची कारणे आहेत. महाराष्ट्रात या प्रकारे नियमभंग करणाऱ्यांकडून होणारी दंडाची वसुली जेमतेम ४० टक्के आहे. ती १०० टक्के होणे आवश्यक आहे. दंड भरत नाही तोवर संबंधिताला पेट्रोल / डिझेल किंवा गॅस मिळणार नाही, अशी व्यवस्था केली पाहिजे. अपघात घडल्यावर जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये मदत मिळणे महत्त्वाचे असते. त्यासाठी महामार्गांवरील हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, लगतच्या गावातील तरुणांच्या सहभागातून आम्ही ‘मृत्युंजयदूत’ उपक्रम सुरू केला होता. या प्रकारे तरुणांना योग्य प्रशिक्षण दिल्यास अपघातग्रस्तांना लगेच मदत मिळून जीव वाचवता येतील.
– डॉ. भूषणकुमार उपाध्याय, माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक (महामार्ग)
माझ्या हिश्श्याचे किस्से: जेवण न पोहोचल्याने उपाशी राहिले होते बिग बी, ‘चेहरे’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांनी हॉटेलमध्ये केवळ सूप पिऊन काढली रात्र
रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आज, २३ मार्च हा माझा वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवशीच मला पहिला सिनेमा मिळाला होता, हे मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगितले होतेच. आज मी तुम्हा साऱ्यांना माझ्या वाढदिवसाशी संबंधित एक आणखी संस्मरणीय किस्सा सांगणार आहे.
तो २३ मार्च १९९८ चा दिवस होता. माझा वाढदिवस असल्याने शुभेच्छा देण्यासाठी लोकांचे फोन येत होते. पुष्पगुच्छांनी घर भरले होते. त्या दिवशी मी पार्टी किंवा डिनर ठेवले नव्हते. दुपारच्या वेळी बच्चन साहेबांचा फोन आला. त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, ‘रूमी, मी बाबूजींना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. लवकर घरी पोहोचलो, तर रात्री तुमच्या घरी येईन.’
मला वाटले, बच्चन साहेब औपचारिकता म्हणून असे म्हणत असतील, ते थोडेच आपल्या घरी येतील? रात्री कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं, याची सायंकाळी आम्ही घरात चर्चा करत होतो. तेवढ्यात बच्चन साहेबांच्या ऑफिसमधून फोन आला की, रूमीजी, बच्चन साहेब आठ वाजता तुमच्या घरी पोहोचतील. ही गोष्ट मी घरात सांगितली आणि साऱ्या कुटुंबात एकदम उत्साह संचारला. बच्चन साहेब घरी येणार असल्याने त्यांचे स्वागत, आदरातिथ्य कसे करायचे, या विचारात आम्ही पती-पत्नी पडलो.
माझ्या पत्नीच्या हातच्या जेवणाची चव साऱ्या फिल्म इंडस्ट्रीला माहीत होती. पण, वेळच इतका कमी होता की बच्चन साहेबांसाठी काय बनवायचे, असा प्रश्न तिला पडला. तर, बच्चन साहेबांसोबत कंपनी देण्यासाठी कुणाला बोलवायचे, या विचारात मी होतो. मी गोविंदा, डेव्हिड साहेब, लाली भाभी, हनी इराणी, रमेश तोराणी यांना फोन करुन विनंती केली की, कृपया लवकर आमच्या घरी या, बच्चन साहेब येणार आहेत.
बच्चन साहेब वेळेचे किती पक्के आहेत, ते सगळ्यांना माहीत आहेच. बरोबर आठ वाजता ते पोहोचले. सोबत जया भाभीजी, अभिषेकही आले होते. हनीच्या समवेत निशी प्रेमही आली. लोक आपल्यासाठी अगदी वेळात वेळ काढून येतात, ते आपल्यावर इतके प्रेम करतात आणि स्वत: बच्चन साहेबही घरी येतात, यापेक्षा वाढदिवसाची मोठी भेट काय असू शकते? माझ्या आयुष्यातील ती एक संस्मरणीय संध्याकाळ ठरली. या गोष्टीवरुन मला नूह नारवी यांचा एक शेर आठवतोय…
आप जिन के क़रीब होते हैं
वो बड़े ख़ुश-नसीब होते हैं…
आपल्या घरी स्वत:च्या हाताने काही बनवून बच्चन साहेबांना आपण खाऊ घालू शकलो नाही, याची सल माझ्या पत्नीला पुढे कायम राहिली. असो. ही गोष्ट २०१९ ची आहे. डिसेंबर महिना होता. आम्ही ‘चेहरे’ सिनेमाच्या शूटिंगसाठी पोलंडला गेलो होतो. बर्फाच्छादित डोंगरावर असलेल्या एका स्किइंग रिसॉर्टमध्ये आम्ही बच्चन साहेबांसोबत शूटिंग करत होतो. तिथे बर्फामध्येच चारी बाजूंनी काचा लावलेले एक किचन होते. माझी पत्नी हनानने बच्चन साहेबांसाठी डिनर बनवायचे ठरवले आणि ती तिथे जाऊन कामाला लागली. शूटिंग सुरू असताना सगळे लोक किचनजवळ जाऊन डोकावायचे. कारण किचन काचेचे होते आणि आतमध्ये हनान स्वयंपाक करत होती.
बच्चन साहेबांनीही तिथे जाऊन पाहिले. मी म्हणालो, बघा, आज हनान तुमच्यासाठी जेवण बनवतेय.. त्यांनी ‘काय बनवतेय?’ असे विचारल्यावर तिने भेंडी, बटाट्याची भाजी, दाल, पनीर अशा सगळ्या पदार्थांची नावे सांगितली. आज भाभीजींच्या हातचे जेवण मिळणार, म्हणून सिनेमाचे निर्माते आनंद पंडितही खुश झाले. बच्चन साहेबांनीही आपले रात्रीचे जेवण बनवू नका, असे त्यांच्या हॉटेलला कळवले. पॅकअप झाले. एव्हाना हनानने जेवण तयार केले होते.
तो बच्चन साहेबांच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी ते परत जाणार होते. त्यामुळे किचनमधले सगळे कर्मचारी त्यांच्यासोबत फोटो काढण्यात गुंतले. मी त्यांना म्हणालो, आधी सगळ्यांचे जेवण पॅक तरी करा.. तर त्यांनी सांगितले की, रात्री सगळ्यांचेच जेवण पाठवून देऊ. बच्चन साहेब सात वाजता जेवतात, आम्ही त्या वेळेपर्यंत जेवण त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोच करु. सहनिर्माता वैशल मला म्हणाला, रूमी भाई, तुम्ही निश्चिंत राहा. जेवण वेळेवर पोहोचेल.. त्यानंतर आम्ही सगळे हॉटेलवर पोहोचलो.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास बच्चन साहेबांचा सहायक प्रवीणचा फोन आला की, जेवण अजून पोहोचले नाही.. मी वैशलला फोन केला. त्याने सांगितले की, आम्ही इथेच आहोत, जेवणाचे पार्सल पाठवतोच आहे. साडेआठला पुन्हा प्रवीणचा फोन आला. तो म्हणाला, सरांच्या जेवणाची वेळ उलटून गेलीय, त्यांना खूप भूकही लागलीय. जेवण कधीपर्यंत येईल..? मी वैशलला पुन्हा फोन केला. तेव्हा त्याने सांगितले.. स्किइंग रिसॉर्टचा पूर्ण रस्ता बर्फाच्छादित असल्याने मेन गेटपासून आतमध्ये, ज्या इमारतीच्या वर किचन आहे, तिथवर पोहोचायला ३५-४० मिनिटे लागतात. तिथे एका वेळी एकच गाडी जाऊ शकते. वरून एखादी गाडी आली, तर ती जाईपर्यंत खालून गाडी सोडत नव्हते. पण, चुकीने दोन्हीकडून गाड्या सोडल्या गेल्या आणि त्या बर्फावरुन घसरत एकमेकांना धडकल्याने रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे बर्फ हटवला जाईल, गाड्या काढल्या जातील आणि रस्ता क्लिअर होईल तेव्हाच इथून जेवण पाठवता येईल.
नऊच्या सुमारास पुन्हा प्रवीणचा फोन आल्यावर त्याला घडलेला प्रकार कथन केला आणि या कारणामुळे जेवण तयार असूनही ते बच्चन साहेबांपर्यंत पोहोचत नसल्याचे सांगितले. मग प्रवीणने तिथल्या किचनमध्ये जाऊन सूप बनवून आणले आणि त्यांना प्यायला दिले. इतक्या उशिरापर्यंत त्यांना भुकेले राहावे लागले होते.
मला आणि माझ्या पत्नीला आजपर्यंत या गोष्टीचे दु:ख वाटते आहे की, बच्चन साहेब घरी आले होते तेव्हा त्यांना स्वयंपाक करुन जेऊ घालू शकलो नाही आणि जेवण बनवले तेव्हा ते वेळेवर हॉटेलमध्ये पोहोचले नाही, म्हणून ते खाऊ शकले नाहीत. पण, बच्चन साहेब खूप मोठ्या मनाचे आणि महान व्यक्ती आहेत. दुसऱ्या दिवशी ते शूटिंगला आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवर नाराजीची, तक्राराची जराशीही छटा नव्हती की, तुमच्या जेवण बनवण्यामुळे मला रात्री उपाशी राहावे लागले. बच्चन साहेबांना सलाम! आज त्यांच्यासाठी त्यांच्या ‘याराना’मधील हे गाणे ऐका…
छूकर मेरे मन को,
किया तूने क्या इशारा…
स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.
डायरीची पाने: नवं साल, नवा गडी
नव्या सालगड्याला पाडव्याच्या संध्याकाळी जेवायला घरी बोलावलं जायचं. त्याला त्या दिवशी बनवलेले कानवले खाऊ घालून आपल्या कुटुंबात दाखल केलं जायचं. पाडव्याला घराघरावर गुढ्या उभारल्या जातात. याच दिवशी शेतकऱ्यांचं नवं वर्ष सुरू होत असतं. आमच्या गावात महानुभावीय दत्त मंदिर आहे. पाडव्याच्या दिवशीच या मंदिराच्या कळसावर निशाण म्हणजे पताका लावण्याची पद्धत आहे. ही शुभ्र पांढऱ्या कपड्याची पताका असते. घराघरातून अशा पताका घेऊन, सनई आणि हलगीच्या सुरात, गावातून सगळ्या लोकांची मिरवणूक निघते. इतक्या सगळ्या पताका मंदिरावर कशा लावणार? म्हणून लोक मंदिराशेजारच्या झाडा-झाडांवर जागा मिळेल तिथे पताका लावतात. त्यामुळे पूर्वी मंदिराभोवतीची झाडेही या पताकांनी पांढरी होऊन जात. जणू काही त्यावर बगळ्यांचे थवे बसले आहेत, असे वाटावे. पाडव्याच्या दिवशीच मंदिरात सगळे गावकरी जमा व्हायचे आणि तेथेच सालगडी ठरवले जायचे. ज्याला कुणाला जुना मालक सोडायचा आहे, असा सालगडी नवा मालक धरीत असे आणि ज्याला कुणाला जुना गडी सोडायचा आहे, असा मालक नवा गडी धरीत असे. त्यांचं साल, सालचंदी आणि बाकीच्या बोलाचाली इथेच होत असत. सगळ्यांसमोर हे ठरवलेलं असल्यामुळं एका अर्थाने गाव पंचायतीच्या मान्यतेची मोहरच त्यावर उमटलेली असायची. नंतर वर्षभर गडी काही कामचुकारपणा करू लागला, तर त्याला जाब विचारता यायचा. पण मला आठवतं, असं फार क्वचित होत असे. शक्यतो आधीचेच सालगडी जुन्या मालकांकडं नव्याने साल धरीत असत आणि वर्षभर राबत असत. दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे एकाच मालकाकडं काम करणारे सालगडी त्या काळात होते. इतकंच नव्हे, तर आमच्या चुलत्यांच्या शेतात कामावर असलेल्या सोयऱ्या मामा नावाच्या गड्याने तर संपूर्ण आयुष्य तिथेच काढलं. ते आप्तच लागत असल्यामुळं त्यांना सगळे सोयऱ्या मामा असंच म्हणायचे, तर त्यांच्या पत्नीला सगळा गाव सोयरी मामी म्हणत असे. हे जोडपं आमच्याच घरातल्या एका बाजूला राहायचे. यांना अपत्य नव्हते. त्यांचे साल काय ठरत असे? ते पैसे कुठे ठेवत असत? यांची काही जमापुंजी होती का? बँकेचं खातं होतं का? याची काही माहीत नाही. बहुदा यातलं काही नसावंच, असं मला वाटतं. कारण या सोयऱ्या मामाचं निधन आमच्या चुलत्याच्या घरात झाले आणि आमच्या गावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सोयऱ्या मामांवर मी एक कविताही लिहिली आहे. कृषी संस्कृतीमध्ये एक काळ असा होता की कामावर राहिलेला सालगडी आयुष्यभर साल सोडत नसे. आणि आज असाही एक काळ आला आहे की बहुतांश सालगडी कधीच साल शेवटाला नेत नाहीत. एकतर मधूनच पैसे घेऊन पळून जातात किंवा ‘मला तुमच्या घरचे काम निभत नाही,’ असं सांगून निघून जातात. सगळेच शेतमालक हैराण आहेत. माणसांना कामं मिळेनाशी झाली आहेत आणि कामांना माणसं मिळेनाशी झाली आहेत. ही वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल. असे कशामुळे झाले? याविषयी चिंतन करावे लागेल. हे चिंतन निरपेक्ष असायला हवे. ते मालक आणि नोकर या दोघांच्याही बाजू समजून घेणारे असले पाहिजे. पण, आज या विषयी कुठली तरी एकच बाजू घेऊन विचार मांडले जात आहेत. त्यामुळे दुसऱ्या बाजूला ते मान्य नसतात. दोन्ही बाजूंचा विचार करून कुठे तरी मेळ बसवायलाच हवा. कामं पडलेली आहेत आणि माणसंही रिकामी आहेत. तेव्हा या दोघांना एकत्र आणणारी काही तरी यंत्रणा निर्माण व्हायला हवी. परिस्थितीत असणारे दोष दूर करायला हवेत. माणसं माणसाजवळ यायला हवीत. म्हणजे माणसं कामाजवळही येतील. माणसं माणसाजवळ यायची असतील, तर सर्वांना निरपेक्ष माणुसकी जपावी लागेल. पाडव्याच्या दिवशी मंदिरात केवळ सालगडीच ठरत असे नाही, तर इतरही अनेक गोष्टी ठरायच्या. गावाचे काही निर्णय घेतले जायचे. गावात काही महानुभाव साधू भिक्षा मागायला येत. त्यांना त्या दिवशी तिथे भिक्षा कबूल करून नंतर ती दिली जायची. असे काही सार्वजनिक निर्णय मंदिरात घेतले जात. सगळ्यांनीच घरून येताना एकेक नारळ आणलेला असे. तो देवासमोर फोडला जाई. त्यासोबत गुळ किंवा साखर असे. ती वाटली जायची. पाडव्याचं असं सार्वजनिक रूप साजरं केलं जायचं. यावर्षी ठरलेल्या नव्या सालगड्याला संध्याकाळी जेवायला घरी बोलावलं जायचं. त्याला खास त्या दिवशी बनवलेले कानवले वाढले जायचे. कानवले हा ग्रामीण भागात बनवला जाणारा एक खास पदार्थ आहे. कणीक लाटून, त्यात करंजीसारखं खसखशीचं गोड सारण भरून मग त्याला तव्यावर भाजायचं. त्या सारणात गुळ असल्यामुळं आपोआपच त्याच्यात पाक तयार होऊन तो पोळीत मुरायचा. ही एका अर्थाने मोठ्या आकाराची पण पसरट करंजीच म्हणायची. कारण या कानवल्याचा आकार अर्धगोलाकार असे. हा चविष्ट कानवला तुपासोबत खाल्ला जायचा. सालावर ठेवलेल्या गड्याला हा गोड पदार्थ खाऊ घालून आपल्या कुटुंबात दाखल केलं जायचं. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तो कामावर येत असे. आम्ही मंदिरातून मांडव राखण्यासाठी परस्पर शेतावर निघून जायचो. दुपारी मोठा भाऊ आमच्यासाठी गावाकडून कानवले घेऊन यायचा. दुपारच्या प्रहरी शेतातल्या मांडवात बसून, बैलाच्या पाठीला पाठ लावून मस्तपैकी हा कानवला खाणे आणि मांडवाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या बिनगीतलं थंडगार पाणी पिणे, याच्यासारखं सुख नाही! हे सुख पाडव्याच्या दिवशी आणखीनच गोड व्हायचं. या कानवल्याची चव खूप दिवस जिभेवर रेंगाळत राहायची. पण, असा कानावला अध्येमध्ये खाऊ वाटला म्हणून कुणीही करून खात नसत. त्यासाठी पुन्हा पुढच्या वर्षीचा पाडवाच यावा लागायचा. पुरणाच्या पोळ्या, तिळगुळाच्या पोळ्या वर्षभरात कधी खाव्याशा वाटल्या, तर आपण अजूनही त्या करून खातो. पण, कानवला कुणी असा अधूनमधून करून खाल्लाय, असे आठवत नाही. तो फक्त आणि फक्त पाडव्याच्या दिवशीच बनवला आणि खाल्ला जायचा. तो त्याचा मान असायचा. बाकी पाडव्याच्या इतर गोष्टी सगळीकडं सारख्याच असल्यामुळं त्यांची इथे उजळणी करण्याची गरज नाही. (संपर्कः inbhalerao@gmail.com)
Source link
‘एआय’च्या विश्वात…: प्रत्येक क्षेत्रातील यशासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्तच!
डॉ. अमेय पांगारकर11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सकाळी नऊ वाजता रामूशेठ त्यांच्या किराणा दुकानात पोहोचले. पण, तिथे आज काहीतरी वेगळे जाणवत होते. दुकानाच्या गल्ल्यावर एक नवीन मशीन ठेवलेले होते. त्यांच्या मुलाने सांगितले, ‘बाबा, हे ‘एआय’वर चालणारे मशीन आहे. आता आपण विक्री, उपलब्ध असलेला माल आणि ग्राहकांच्या सवयी समजून घेण्यासाठी याचा उपयोग करू शकतो.’ रामूशेठना फार काही समजले नाही. त्यांना प्रश्न पडला, ‘एआय म्हणजे नेमकं काय? आणि ते आपल्या दुकानासाठी कसं काय उपयोगाचं?’
‘एआय’ म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) म्हणजे संगणकांना माणसांसारखे विचार करायला शिकवणारी प्रणाली. साध्या भाषेत सांगायचे तर, कुणा व्यक्तीने एखाद्या गोष्टीतून शिकावे तसेच संगणकालाही शिकवता येते. ‘एआय’ विविध पद्धतींनी शिकते आणि काम करते.
मशीन लर्निंग (ML) म्हणजे काय? रामूशेठना त्यांचा मुलगा समजावू लागला.. बाबा, तुम्ही रोज कुठल्या वस्तू जास्त विकल्या जातात, हे लक्षात ठेवता. ही गोष्ट ‘एआय’ आपोआप शिकते आणि आपल्यासाठी त्या वस्तू जास्त मागवायला मदत करते. यालाच ‘मशीन लर्निंग’ (ML) म्हणतात. थोडक्यात, ‘एमएल’ म्हणजे डेटा वापरून संगणक शिकतो आणि स्वत: निर्णय घेऊ लागतो. याची व्यवहारातील काही उदाहरणे पाहू…
– बँका कर्ज देताना कोण कर्ज फेडू शकतो आणि कोण नाही, हे ‘एमएल’ वापरून ठरवतात.
– अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर ई-कॉमर्स साइट तुमच्या आवडीच्या वस्तू सुचवतात.
– गुगल मॅप तुमच्या रोजच्या प्रवासाची माहिती घेऊन, त्या मार्गावरच्या वाहतुकीचा अंदाज लावते.
डीप लर्निंग (DL) कशाला म्हणतात? रामूशेठ विचारात पडले. ‘पण, कॉम्प्युटर स्वत: शिकतो, तर तो आणखी हुशार कसा काय होऊ शकतो?’ मुलाने त्यांना समजावले.. बाबा, तुम्ही कितीही वेळा एखाद्याला भेटलात, तरी अनेकदा तो तुमच्या लक्षात राहत नाही. पण, कोणी तुम्हाला वारंवार आठवण करून दिली, तर तुम्ही तो चेहरा विसरणार नाही. यालाच डीप लर्निंग (DL) म्हणतात. आता याचीही काही उदाहरणे बघू…
– फेसबुकमध्ये तुमच्या फोटोतील चेहरा कोणाचा आहे, हे ओळखणारी प्रणाली.
– स्वयंचलित कार चालवणारी प्रणाली.
– डॉक्टरांना एक्स रे किंवा एमआरआय स्कॅनमधून रोग निदानासाठी मदत करणारी प्रणाली.
नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) म्हणजे काय? ‘बरं, मग हे मशीन माणसासारखं बोलू शकतं का?’ रामूशेठनी पुढचा प्रश्न विचारला. ‘हो!’ मुलगा म्हणाला.. ‘गुगल असिस्टंट’,‘सिरी’ किंवा “अॅलेक्सा’ हे सगळे NLP वापरतात. NLP म्हणजे ‘नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग.’ म्हणजेच मशीनची मानवी भाषा समजण्याची आणि उत्तर देण्याची क्षमता. याची ही काही उदाहरणे…
– बँकेत तुमच्या तक्रारी ऐकून उत्तर देणारे ‘चॅटबॉट’.
– गुगल ट्रान्सलेट वापरून कोणतीही भाषा अनुवाद करणारी प्रणाली.
– कॉल सेंटरमधील एआय आधारित ग्राहकसेवा.
‘एआय’चा विविध क्षेत्रातील प्रभाव
रामूशेठना कल्पना आली की, ‘एआय’ केवळ मोठ्या कंपन्यांसाठीच नाही, तर ते लहान व्यवसाय, आरोग्य, शिक्षण आणि शेतीमध्येही मोठा बदल घडवू शकते. मुलाने त्यांना ‘एआय’चे या क्षेत्रांत सध्या होत असलेले काही प्राथमिक उपयोगही सांगितले…
कृषी : ‘एआय’च्या मदतीने शेतातील मातीची गुणवत्ता तपासता येते. हवामानाचा अभ्यास करुन उत्पादनाचा अंदाज वर्तवता येतो. कीड आणि रोग ओळखून योग्य औषधांचा सल्ला दिला जातो.
आरोग्य : रोगाच्या अचूक निदानासाठी ‘एआय’ डॉक्टरांना मदत करते. शिवाय, रक्तातील साखर, हृदयाचे ठोके यांचा त्वरित अभ्यास करून तातडीच्या उपचारासाठी सूचना देते, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत ऑनलाइन सल्ला प्रणाली विकसित करता येते.
व्यवसाय : ग्राहकांची मागणी ओळखून मालमत्ता साठवणुकीत सुधारणा, ‘एआय’ आधारित ऑटोमेशनमुळे ग्राहकांना जलद सेवा, डिजिटल पेमेंट आणि सुरक्षेसाठी ‘एआय’ प्रणालीचा वापर.
शिक्षण : ‘एआय’आधारित स्मार्ट क्लासरूम, विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अभ्यासक्रम, ऑनलाइन शिकण्याच्या अधिक प्रभावी सुविधा.
बँकिंग आणि फायनान्स : घोटाळे ओळखण्यासाठी मदत करणारी प्रणाली, रोबो-अॅडव्हायजरच्या मदतीने शेअर बाजार गुंतवणुकीचे सल्ले, बँकेत टोल फ्री नंबरवर ग्राहक सेवा देणारे एआय चॅटबॉट.
‘एआय’चे धोके : रामूशेठ यांच्या मनात विचार आला की, ‘एआय’ फायदेशीर तर आहे खरे; पण त्याचे काही तोटेही असतीलच.. त्याविषयी मुलाला विचारल्यावर त्याने ‘एआय’मुळे होणारे काही बरे-वाईट परिणाम सांगितले…
नोकऱ्यांवर परिणाम : काही पारंपरिक नोकऱ्या ‘एआय’मुळे कमी होतील, पण हे तंत्रज्ञान शिकल्यास नव्या संधीही निर्माण होतील.
गोपनीयता आणि सुरक्षेचा प्रश्न : ग्राहकांचा डेटा योग्य प्रकारे वापरला जाईल, याची खात्री असणे आवश्यक आहे.
तांत्रिक ज्ञानाची गरज : लहान व्यावसायिकांना ‘एआय’ समजून घेण्यासाठी आणि वापरण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे.
रामूशेठ आता त्यांच्या मुलाकडे पाहात म्हणाले, ‘म्हणजे आपलं किराणा दुकानही ‘एआय’ वापरून अधिक चांगल्या प्रकारे चालवता येईल!’ मुलगा हसून म्हणाला, ‘बाबा, आता जमाना बदलतोय. ‘एआय’ फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाही, तर लहान उद्योजक-व्यावसायिकांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठीही आहे. जो हे नवे तंत्रज्ञान शिकेल, तोच यशस्वी होईल!’
(संपर्कः amey@aconsultancy.marketing)
बुकमार्क: अमोल पालेकरांच्या मनस्वी आत्मकथनाचा मौल्यवान ‘ऐवज’
स्वप्नील जोशी14 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
“चप्पल पहनने वाले आदमीने यहाँ बंगला खरीद लिया?” अशा हिणकस टिप्पण्या कानावर पडूनही, जुहूतील प्रतिष्ठित फिल्मी मांदियाळीत उभ्या राहिलेल्या मराठमोळ्या, मध्यमवर्गीय कलावंताच्या ‘चिरेबंदी’ बंगल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.. पुढे हीच वास्तू देश – विदेशातून आलेल्या कित्येक मान्यवर कलाकारांचं हक्काचं घर बनली.. तिथं नाटक, साहित्य, संगीत, दृश्यकला क्षेत्रातल्या कलाकार आणि कलासक्त लोकांची वर्दळ वाढली… हे वर्णन आहे अमोल पालेकर यांच्या ‘ऐवज – एक स्मृतिगंध’ या पुस्तकातले.
आपल्या या आत्मकथनात्मक पुस्तकात ते पुढे म्हणतात की, एका वेगळ्या पद्धतीने माणसांची खरी रूपं समजायलाही ‘चिरेबंदी’ने मला शिकवलं. माझी भावनिक गुंतवणूक असूनही मी कधी त्याचा सौदा होऊ दिला नाही. अभिनेते, दिग्दर्शक, नाट्यकर्मी आणि लेखक अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या पालेकरांचे हे पुस्तक कला क्षेत्रातील गेल्या आठ दशकांच्या अनेक आठवणी आणि अनुभवांचा ‘ऐवज’ आपल्यासमोर खुला करते. मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा कलावंत ते संवेदनशील दिग्दर्शक या प्रवासात विविध कलाकृतींचा आस्वाद घेताना, कलेची मूल्ये, त्यांची निर्मिती प्रक्रिया, तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा परामर्श कशाप्रकारे घेतला, हे पुस्तक वाचताना उलगडत जाते.
मुंबईच्या बालमोहन शाळेतून बोर्डीच्या शाळेत जाण्याचा प्रसंग असेल किंवा आईचा विरोध असूनही केलेला विवाह, मुलगी शाल्मलीचे शालेय वयातच असलेले ठाम विचार आणि गुरुस्थानी असलेल्या पं. सत्यदेव दुबेंना केलेला विरोध हे ‘महापाप’ असल्याची प्रांजळ कबुली… हे सगळं दिसतं तेवढ सोपं नव्हतं. केवळ विरोधासाठी विरोध नव्हे, तर त्यातही विवेकी असणं ही शिस्त पालेकरांनी उमेदीच्या काळातच लावून घेतली. ‘गोची’ या नाटकाने झालेली अभिनय कारकिर्दीची सुरूवात असो की वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी ऐंशी मिनिटे रंगमंचावर ‘ए. सी. पी. दंडवते’ हे पात्र साकारताना हाउसफुल्ल झालेले ‘कुसूर’ या नाटकाचे प्रयोग असोत; त्यांचा हा सगळा रोचक प्रवास तितक्यात रंजकपणे पुस्तकातून आपल्यासमोर उभा राहतो.
ज्या काळात एकदा चित्रित झालेल्या दृश्याचे पुन्हा अवलोकन करण्याची सोय नव्हती, कॅमेऱ्याच्या लेन्स आणि चित्रीकरणाची निश्चित परिमाणे विकसित झालेली नव्हती, अशा काळात एक मनस्वी तरुण मराठी मन घेऊन आपल्या स्वतंत्र घडणीची एक वैचारिक दिशा ठरवत होता. अशी दिशा निश्चित करुन वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हाने पेलताना कोणता संघर्ष करावा लागला? अचानक घडणारी अपघातांची मालिका, जे. जे. स्कूल ऑफ आर्टसची पदवी घेतल्यावर चित्रकार म्हणून केलेली सुरूवात, बँक ऑफ इंडियातील नोकरी, याच कालावधीत व्यावसायिक रंगभूमीकडे वळताना विचारप्रवर्तक चित्रपटांच्या दुनियेत झालेला प्रवेश आणि नंतरचा तिथला लक्षवेधी वावर.. या सर्वांवर हे पुस्तक प्रकाश टाकते.
‘बॉलीवूड’ म्हटल्या जाणाऱ्या मुख्यधारेमध्ये आपण कधी मिसळलो नाही, असे पालेकर ठामपणे सांगतात. हिंदी चित्रसृष्टीतील स्टार्सचे ज्या पद्धतीने अवाजवी लाड केले जायचे, त्याविषयीही त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. वेळेचा, पैशाचा अपव्यय करणे हा अव्यावसायिकपणा त्यांना खटकत असे. स्वत:च्या मागण्यांवर ठाम राहणे, प्रसंगी प्रतिकार करणे, डाव्या आणि उजव्या विचारांच्या सांस्कृतिक संघर्षात प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आग्रही राहणे असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी विशेष पैलू लक्षवेधी ठरतात. कातडी सोलून सांगतानाही आपल्या कथनाला काही एक मर्यादा आहे, हे भान राखतानाच नामदेव ढसाळ यांच्या.. “प्रत्येक कलावंताला स्वत:चं एक वर्गचित्र असतं..” या वाक्याचा संदर्भ पालेकर देतात.
या कोलाहलात सगळं सांगूनही कलावंताच्या मनात काही रानोमाळ उरतो का? याचा धांडोळा घेण्यासाठी पालेकरांचं हे पुस्तक वाचायला हवं. संध्या गोखले यांनी या पुस्तकाच्या संकल्पनेपासून ते संस्करण आणि सजावटीपर्यंतची साधना उत्तमपणे साध्य केली आहे. नरसिंह बालाजी यांची रेखाटनेही अप्रतिम आहेत. एकूणच, सतत नव्या अनुभवाची भुरळ घालणाऱ्या अमोल पालेकरांनी स्वत:च्या आयुष्याच्या कॅनव्हासवर हे एक सुरेख चित्र रेखाटलं आहे. रसिक वाचकांना त्याची मोहिनी पडली नाही तरच नवल!
– पुस्तकाचे नाव : ऐवज – एक स्मृतिगंध – लेखक : अमोल पालेकर – संस्करण : संध्या गोखले – प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन – पाने : २९६, किंमत : रू. ७५०
(संपर्कः swapnilkashi566@gmail.com)

