



कराड | प्रतिनिधी. कराड तालुक्यातील वाठार गावामध्ये शुक्रवारी पहाटे उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. केवळ पाच वर्षांची संस्कृती रामचंद्र जाधव या चिमुकलीचा गळा ओढणीने आवळून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणात अवघ्या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलीने पोलिसांना खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिली. मात्र, खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून संस्कृती बेपत्ता झाली होती. घरच्यांनी व गावकऱ्यांनी तिचा शोध घेतला, पण ती कुठेच सापडली नाही. अखेर रात्री कराड ग्रामीण पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवली. गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संस्कृती ही शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत दिसून आली. त्यावरून पोलिसांनी ती मुलगी ताब्यात घेतली आणि चौकशी केली. अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली.
तिने सांगितल्याप्रमाणे, संस्कृतीला खेळायला घेऊन जाण्याचे सांगून ती तिला शेतात घेऊन गेली आणि तेथे तिचा ओढणीने गळा दाबून खून केला. मात्र चौकशीदरम्यान ती खुनामागे वेगवेगळी कारणं सांगत आहे. त्यामुळे पोलीस विविध शक्यतांचा तपास करत आहेत.
संस्कृती आणि ती अल्पवयीन मुलगी एकमेकींच्या घरी ये-जा करत असत. दोन्ही कुटुंबं मूळचे इतर जिल्ह्यातील असून अनेक वर्षांपासून वाठार येथे राहत आहेत. या घटनेने दोन्ही कुटुंबं, गावकरी आणि परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला. संस्कृतीचा मृतदेह पहाटे पाचच्या सुमारास घरामागील शेतात आढळला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला, त्यानंतर शोकाकुल वातावरणात संस्कृतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, खुनामागील नेमकं कारण शोधण्यावर भर दिला जात आहे.


– ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत विशेष अंकाचे प्रकाशन; 5 कोटींच्या निधीची घोषणा
कटगुण, ता. खटाव, जि. सातारा | शुक्रवार, ११ एप्रिल २०२५ :- कटगुणच्या भूमीत विचारांचा जागर झाला, तेव्हा ‘क्रांतीसूर्य महात्मा फुले’ यांच्या तेजस्वी कार्याचा सन्मान मोठ्या उत्साहात करण्यात आला. शुक्रवार, ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य उत्सवाला ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उपस्थित राहिले.
महात्मा फुले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत त्यांनी ‘साप्ताहिक वंदनसृष्टी’चा जयंती विशेष अंक प्रकाशित केला. उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधत त्यांनी महात्मा फुलेंच्या शिक्षण, समता आणि सत्यासाठीच्या लढ्याचे स्मरण करून दिले.
“महात्मा फुले यांची जन्मभूमी असलेल्या कटगुण गावाला लवकरच ब वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, स्मारकाच्या विकासासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच कामाची सुरुवात होणार आहे,” अशी माहिती व आश्वासन गोरे यांनी दिले.
कार्यक्रमात भाजपा कार्यकारिणी सदस्या सौ. प्रियाताई महेश शिंदे, युवानेते अंकुश गोरे (भाऊ), सौ. भारतीताई गोरे, वडूज नगराध्यक्ष सौ. रेश्मा श्रीकांत बनसोडे, संजय कर्पे, अमृतराव काळोखे, प्रताप गोरे, तसेच महात्मा फुले ट्रस्ट कटगुणचे पदाधिकारी, गोरे कुटुंबीय व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Pavan Guntupalli Success Story: यशस्वी माणसाला करिअरमध्ये पुढे जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागलेले असते. या संघर्षमयी काळात प्रयत्नांची कास न सोडता दुप्पट वेगाने लक्ष्याची पाठलाग करणारे यशाच्या शिखरावर पोहोचतात. पवन गुंटुपल्लीची कहाणी अशीच संघर्षमयी आहे. यातून लाखो तरुणांना प्रेरणा मिळतेय.कधीकाळी त्यांना कोणी नोकरी देत नव्हते पण त्यांना आपल्या स्वप्नांवर विश्वास होता. यातूनच ते आज मोठ्या कंपनीचे मालक बनले आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
पवन गुंटुपल्ली हे आयआयटी पदवीधर असूनही त्यांना अनेकवेळा निराशेचा सामना करावा लागला. असे असले तरी त्यांनी कधीही आशा सोडली नाही. स्वतःवर विश्वास ठेवला. पवन यांच्याकडे व्यवसायाची एक कल्पना होती. जी त्यांनी 75 हून अधिक गुंतवणूकदारांना सांगितली. पण त्यांच्या कल्पनेवर विश्वास ठेवण्यास कोणता गुंतवणूकदार तयार नव्हता. या काळात त्यांना अनेकदा नैराश्येचा सामना करावा लागला पण पवन यांनी कधीही हार मानली नाही. परिणामी आज ते व्यावसायिक जगात एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व बनले आहेत. पवन यांनी ‘रॅपिडो’ कंपनी तयार केली आज या कंपनीचे मूल्य 6 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पवन यांचा प्रवास व्यवसाय जगात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्त्रोत बनलाय.
पवन हे तेलंगणातील गुंटुपल्लीचा रहिवासी आहेत. त्यांना लहानपणापासूनच ट्रेडिंग आणि संगणक प्रोग्रामिंगची आवड होती. पवन अभ्यासात हुशार होते म्हणून त्यांना आयआयटी खरगपूरमध्ये जागा मिळाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सॅमसंगमध्ये काम केले. पवन तिथल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीममध्ये होते. असे असले तरी त्यांना नेहमीच काहीतरी वेगळे करण्याची तीव्र इच्छा असे. त्यांनी त्यांचा मित्र अरविंद संकासोबत ‘द करिअर’ ही स्टार्टअप कंपनी सुरू केली.
दुर्दैवाने ‘द करिअर’ व्यवसाय यशस्वी झाला नाही आणि दोघांनाही अडचणींना तोंड द्यावे लागले. तरीही पवन यांनी जिद्द ठेवली आणि त्यांच्या अपयशाचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला. कंपनीला नफा मिळवायचा असेल तर खर्च कमी करावा लागेल आणि ग्राहकांशी थेट संवाद साधावा लागेल, या निष्कर्षापर्यंत ते पोहोचले. मग त्यांना बाईक टॅक्सीची कल्पना सुचली आणि 2014 मध्ये रॅपिडोची स्थापना झाली. हा व्यवसाय सुरू करणे देखील सोपे नव्हते. कारण 75 हून अधिक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यास नकार दिला होता. पण तरीही पवन यांनी कंपनी स्थापन केली. हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. कारण त्यांच्यासमोर ओला आणि उबर सारख्या कंपन्या स्पर्धक म्हणून होत्या. ज्या आधीच बाजारात प्रस्थापित होत्या.
बाईक टॅक्सी सेवेचे मूळ भाडे 15 रुपये ठेवण्याच्या धोरणाचा वापर करून, पवन यांनी ग्राहकांकडून प्रति किलोमीटर ३ रुपये आकारले. सुरुवातीला रॅपिडोला फारसे यश मिळाले नाही. पण दृढनिश्चयी राहून त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. 2016 मध्ये रॅपिडो स्टार्टअपला हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पवन मुंजाल यांच्याकडून पहिला निधी मिळाला. ही गुंतवणूक कंपनीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचा आणि ग्राहकांचा विश्वास मिळाला. हळुहळू रॅपिडोने अधिक निधी उभारला आणि 100 हून अधिक शहरांमध्ये त्यांच्या सेवांचा विस्तार वेगाने केला. कंपनीने कार सेवा कमी असलेल्या आव्हानात्मक पर्वतीय प्रदेशांमध्ये आपली सेवा उपलब्ध करुन दिली.
ट्रॅक्सनने दिलेल्या माहितीनुसार रॅपिडो कंपनीचे 7 कोटीहून अधिक यूजर्स, 50 हजार ड्रायव्हर्स आहेत. रॅपिडो कंपनीची किंमत 825 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच साधारण 6 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

IPL 2025 Why Travis Head Glenn Maxwell and Marcus Stoinis Fight: पंजाब किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्यात तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू एकमेकांशी भिडताना दिसले. पंजाब-हैदराबाद सामन्याच धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळालं. या उच्च धावसंख्येच्या सामन्यात अभिषेक शर्माने १४१ धावांची ऐतिहासिक खेळी खेळली आणि २४६ धावांचे लक्ष्य सहज गाठत हैदराबादने दणदणीत विजय मिळवला. पण अभिषेक शर्माच्या शतकाव्यतिरिक्त, हा सामना तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंमधील वादामुळे देखील लक्षात राहील.
ट्रॅव्हिस हेड हा ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टॉयनिस यांच्यात भर मैदानात वाद घालताना दिसला. ट्रॅव्हिस हेड हा सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग आहे. तर मॅक्सवेल आणि स्टॉयनिस दोघेही पंजाब किंग्स संघातून खेळतात. हे तिन्ही खेळाडू एकमेकांविरूद्ध खेळत होते तर वादही घालताना दिसले. नवव्या षटकात त्याचे सहकारी ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिस यांच्यातील वादाबद्दल सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने खुलासा केला आहे.
हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड वादळी फटकेबाजी करत होते. डावाच्या नवव्या षटकात ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजीसाठी आला होता. षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर हेडने मॅक्सवेलला सलग दोन षटकार मारले, ज्यामुळे मॅक्सवेल निराश झाला. दोन षटकार मारल्यानंतर, मॅक्सवेल ट्रॅव्हिस हेडला काहीतरी बोलला.
षटक पूर्ण झाल्यानंतर, हेडने सूड घेतला आणि मॅक्सवेलकडे गेला आणि त्याला उत्तर दिलं. अशातच दोन्ही ऑस्ट्रेलियन दिग्गजांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. मैदानी पंच पुढे येऊन हस्तक्षेप केल्यानंतर दोघांमधील वाद थांबला. यानंतर लगेच पंजाब संघाचा दुसरा खेळाडू मार्कस स्टॉयनिसही वाद घालण्यासाठी पुढे आला.
सामन्यानंतर वादाबाबत सांगताना हेड म्हणाला, जेव्हा तुम्ही एखाद्याला इतकं चांगलं ओळखता तेव्हा तुम्ही एकमेकांमधील चांगल्या आणि वाईट गुणांबद्दल बोलून जाता. फार काही गंभीर नाहीये, फक्त थोडीशी थट्टा मस्करी होती. आमच्यासाठी तो एक खास दिवस होता. आम्हाला या विजयाची गरज होती. आम्ही आमचं काम अर्ध्या वेळेत पूर्ण केलं. आम्ही स्वतःला संधी दिली, सुरुवातीला थोडा जास्त संयम दाखवला. आम्हाला माहित होतं की ते कोणत्या रणनितीसह उतरणार आहेत. आम्ही स्वतःला आणखी थोडा वेळ दिला आणि चांगली सुरुवात केली.
पंजाब किंग्सविरूद्ध सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लक्ष्याचा पाठलाग करताना आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला. त्याआधी, पंजाबने कर्णधार श्रेयस अय्यरच्या ३६ चेंडूंत सहा षटकार आणि तितक्याच चौकारांसह ८२ धावांच्या खेळीच्या मदतीने सहा विकेट गमावून २४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, अभिषेक (१४१ धावा, ५५ चेंडू, १४ चौकार, १० षटकार) आणि हेड (६६ धावा, ३७ चेंडू, नऊ चौकार, तीन षटकार) यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीच्या जोरावर सनरायझर्सने १८.३ षटकांत २ गडी गमावून २४७ धावा करून सामना जिंकला.