Sunday, September 13, 2026
Homeसातारापाच वर्षांच्या संस्कृतीचा खून; १४ वर्षीय अल्पवयीन मुलीकडून धक्कादायक कबुली

पाच वर्षांच्या संस्कृतीचा खून; १४ वर्षीय अल्पवयीन मुलीकडून धक्कादायक कबुली

कराड | प्रतिनिधी.  कराड तालुक्यातील वाठार गावामध्ये शुक्रवारी पहाटे उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. केवळ पाच वर्षांची संस्कृती रामचंद्र जाधव या चिमुकलीचा गळा ओढणीने आवळून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणात अवघ्या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलीने पोलिसांना खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिली. मात्र, खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून संस्कृती बेपत्ता झाली होती. घरच्यांनी व गावकऱ्यांनी तिचा शोध घेतला, पण ती कुठेच सापडली नाही. अखेर रात्री कराड ग्रामीण पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवली. गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संस्कृती ही शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत दिसून आली. त्यावरून पोलिसांनी ती मुलगी ताब्यात घेतली आणि चौकशी केली. अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली.

तिने सांगितल्याप्रमाणे, संस्कृतीला खेळायला घेऊन जाण्याचे सांगून ती तिला शेतात घेऊन गेली आणि तेथे तिचा ओढणीने गळा दाबून खून केला. मात्र चौकशीदरम्यान ती खुनामागे वेगवेगळी कारणं सांगत आहे. त्यामुळे पोलीस विविध शक्यतांचा तपास करत आहेत.

संस्कृती आणि ती अल्पवयीन मुलगी एकमेकींच्या घरी ये-जा करत असत. दोन्ही कुटुंबं मूळचे इतर जिल्ह्यातील असून अनेक वर्षांपासून वाठार येथे राहत आहेत. या घटनेने दोन्ही कुटुंबं, गावकरी आणि परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला. संस्कृतीचा मृतदेह पहाटे पाचच्या सुमारास घरामागील शेतात आढळला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला, त्यानंतर शोकाकुल वातावरणात संस्कृतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, खुनामागील नेमकं कारण शोधण्यावर भर दिला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments