


नाशिक – कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने भाव पडले. ही सरकारची जबाबदारी आहे. नाफेडमार्फत होणाऱ्या खरेदीवर आमचा भरवसा नाही. त्यामुळे कांद्याला आता सरसकट दीड हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली.
दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आलेल्या शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले.
महायुतीच्या नेत्यांनी सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. उद्योगपतींचे कर्ज माफ केले, पण शेतकऱ्यांना मदत केली नाही. पुढील काळात या प्रश्नासाठी सरकारच्या विरोधात संघर्षाचा इशारा त्यांनी दिला. मायक्रो बँका १८ टक्क्यांनी कर्ज देतात. संबंधितांची वसुली करणाऱ्या गुंडांना आम्ही दणका देणार असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केले.
राज्यात अनेक वेळा आपत्ती येऊनही पीक विमा कंपन्यांनी ५० हजार कोटी रुपये कमविले. मागच्या काळात बनावट पीक विमे काढले. सरकार अधिकाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र येणार असेल तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
नाशिक जिल्हा बँकेला सरकारने भागभांडवल दिल्यास बँक पूर्वपदावर येईल. जिल्ह्यातील शेतकरी जिल्हा बँकेवर अवलंबून आहेत. थकबाकीदार असल्याने त्यांना कर्ज मिळत नाही. सावकारी व इतर बँकांकडून कर्ज घ्यावे लागते, याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले.
परभणी जिल्ह्यात दीड लाखांच्या कर्जामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच रात्री त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. त्या महिलेच्या पोटात सात महिन्याचा गर्भ होता, असे शेट्टी यांनी सांगितले. सुनील तटकरेंच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक वाटी आमरस आणि एक मोदक खाण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च केला. तिथे हेलिपॅड बनवले. हजारो कोटी तिकडे खर्च करताना शेतकऱ्यांना एक रुपयाही देत नाही, याबद्दल सरकारला लाज वाटत नाही, अशा शब्दांत त्यांनी अमित शहा यांच्या दौऱ्यावर झालेल्या खर्चावर टिप्पणी केली.



दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहनन म्हणाली की, दैनंदिन जीवनात ज्या प्रकारच्या घटनांना सर्वसामान्य मुलींना सामोरे जावे लागते, अशा घटनांना आपणही सामोरे गेलो आहे. मालविका म्हणाली की, जेव्हा ती मुंबईत शिक्षणासाठी कॉलेजला जायची तेव्हा तिला लोकल ट्रेनमध्ये एका भयानक घटनेला सामोरे जावे लागत होते. एका अनोळखी व्यक्तीने तिला चुंबनाची मागणी कशी केली हे अभिनेत्रीने सांगितले. मालविका म्हणाल्या की, दररोज घराबाहेर पडणाऱ्या असंख्य मुलींसाठी हे शहर सुरक्षित नाही.

पिंपरी : नदी सुधारच्या कामात झाडे तोडली जात असल्याचा आरोप करीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील शंभर पेक्षा अधिक पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटनांनी मुळा नदीकाठी सुरू असलेल्या नदी सुधार प्रकल्पाला विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे नदी स्वच्छतेबाबत साकडे घातल्यानंतर काहीही हाती न लागल्याने हतबल झालेल्या पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आज (रविवारी) सकाळी मुळा नदीपात्रात आंदोलन केले.
पिंपळे निलख स्मशानभूमी जवळ मुळा नदीपात्रात रविवारी आंदोलन करण्यात आले. सुमारे २५ जणांनी नदीपात्रात उतरून ठिय्या आंदोलन केले. शहरातील पवना इंद्रायणी आणि मुळा नद्यांची स्वच्छता करणे आणि नदी सुधार प्रकल्प थांबविण्याच्या आग्रही मागणीसाठी हे आंदोलन मागील काही दिवसांपासून केले जात आहे. या आंदोलनाला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शंभर पेक्षा अधिक पर्यावरणप्रेमी सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
नदी सुधार प्रकल्पाचा निषेध करण्यासाठी ९ मार्च रोजी चापेकर चौक, चिंचवड येथे पहिले आंदोलन झाले. शेकडो शेकडो नागरिकांनी एकत्र येत मानवी साखळी केली. १५ मार्च रोजी बालेवाडी येथे दुसरे आंदोलन झाले. २३ मार्च रोजी पिंपळे सौदागर येथे पुन्हा मानवी साखळी करत नदी सुधार प्रकल्पाचा विरोध करण्यात आला. २९ मार्च रोजी दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याला शेकडो नागरिकांनी स्वच्छ नदीची मागणी करत वृक्षतोडीच्या विरोधात मानवी साखळी करून आंदोलन केले. २० एप्रिल रोजी पिंपळे निलख येथे नदीपात्रात उतरून आंदोलन करण्यात आले.
मुळा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात पशुपक्षी आणि प्राण्यांचा अधिवास आहे. नदी सुधार प्रकल्पात नदीकाठच्या अनेक झाडांची कत्तल केली जात आहे. यामुळे या पशुपक्षी आणि प्राण्यांचा अधिवास संपुष्टात येणार आहे. तसेच नदीपात्र अरुंद होऊन भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यात नदी सुधार प्रकल्पामध्ये पाण्याच्या स्वच्छतेला दुय्यम स्थान दिले गेल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यामुळे सातत्याने आंदोलने केली जात आहेत. पुढील आठवडाभरात हा प्रकल्प थांबवला नाही तर २७ एप्रिल (रविवारी) पुन्हा पिंपळे निलख येथे तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गावात असलेल्या तलावाची मोठी चर्चा आहे. हा तलाव दीडशे वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि तेव्हापासून तो कधीच कोरडा पडलेला नाही. कडाक्याच्या उन्हाळ्यात गावकऱ्यांसाठी ही जीवनवाहिनीपेक्षा कमी नाही. दुर्ग शहरापासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या कंदरका गावात असलेला हा तलाव ‘बडा तलाव’ या नावाने ओळखला जातो. या तलावामुळे वर्षानुवर्षे लोकांची दैनंदिन पाण्याची गरज आणि सिंचनाची गरज भागली आहे. उन्हाळ्यात परिसरातील इतर तलाव व संसाधने कोरडी पडल्यास आजूबाजूच्या सहा गावांसाठी हा पाण्याचा महत्त्वाचा स्त्रोत आहे.


