Monday, July 20, 2026
Home Blog Page 350

नव्यांची ‘झापुक’ ऊर्जा

0
नव्यांची ‘झापुक’ ऊर्जा



अनुभवसंपन्न कलाकारांबरोबर केलेला चित्रपट गाजल्यानंतर संपूर्णपणे नवीन तरुण कलाकारांना घेऊन चित्रपट करणं हे धाडसच म्हणायला हवं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चर्चेचा विषय ठरलेल्या सूरज चव्हाणचं व्यक्तिमत्व, त्याचं वागणं-बोलणं पाहून दिग्दर्शक केदार शिंदेंना त्यांच्या चित्रपटासाठीची एक संधी दिसली. त्यांनी ती घेतली आणि पूर्णपणे नवीन कलाकारांच्या जोरावर ‘झापुक झुपूक’ मनोरंजनाचा प्रयोग केला.

‘झापुक झुपूक’ची कथामांडणी करताना सूरज चव्हाणचं व्यक्तिमत्व, त्याची वैशिष्ट्यं डोळ्यासमोर ठेवून केदार शिंदे यांनी यात सूरज नावानेच व्यक्तिरेखा उभी केली आहे. जगाचं व्यावहारिक शहाणपण समजू न शकणारा सूरज त्याच्या बालदोस्तांचा सुपरहिरो आहे. तो कसा? याचं उत्तर चित्रपटात शोधलेलं बरं… तर रंगरूपाने साधारण असलेला, अशिक्षित, सूरजवीरच्या गोष्टी रंगवून सांगणारा, चमकदार ‘डायलॉग’बाजी करणाऱ्या सूरजची गोंधळी व्यक्तिरेखा मध्यवर्ती ठेवून त्याच्याभोवतीने इतर व्यक्तिरेखांची गुंफण करण्यात आली आहे.

परदेशात शिकून आलेली साध्यासरळ स्वभावाच्या आणि गोड चेहऱ्याच्या नारायणीला पाहून सूरजच्या मनात नवी परीकथा उमलायला सुरुवात होते. नारायणीचा भूतकाळ, वर्तमानात सूरजशी पडलेली गाठ आणि तिच्या दोन्ही काळातील कुठल्याच गोष्टींची माहिती नसलेला, आपल्याच परीकथेत रमलेल्या सूरजच्या गैरसमजातून उभी राहिलेली चुकांची विनोदी मालिका अशापध्दतीची मांडणी करत लेखक – दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘झापुक झुपूक’ची कथा फुलवली आहे.

विनोदी चित्रपटांची मांडणी ही केदार शिंदे यांची खासियत आहे. सुरुवातीच्या काळातील ‘जत्रा’, ‘गलगले निघाले’ असे काही त्यांचे चित्रपट पाहिले तर त्या त्या कलाकाराची खासियत ओळखून त्या अनुषंगाने व्यक्तिरेखा आणि कथानक चपखल विनोदी मांडणीत बसवण्याची त्यांची शैली जुनी आहे. इथे मात्र हा खेळ त्यांनी पूर्णपणे नवीन कलाकारांना घेऊन केलेला आहे.

‘झापुक झुपूक’ या चित्रपटात नारायणीच्या वडिलांच्या भूमिकेतील अभिनेता मिलिंद गवळी आणि मुख्याध्यापक जांभळे यांच्या भूमिकेतील पुष्कराज चिरपुटकर ही दोन नावं वगळता बाकी सगळीच कलाकार मंडळी नवीन आहेत. जुई भागवतचा एक चित्रपट याआधी प्रदर्शित झाला असला, तरी तुलनेने तिचा चेहरा चित्रपटसृष्टीला नवीनच आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिन्यांवर वेगवेगळ्या मालिकांमधून गाजलेले इंद्रनील कामत, पायल जाधव या दोघांसह खलनायकी भूमिकेत असलेला हेमंत फरांदे हे सगळे कलाकार नवीन आहेत. याशिवाय, सूरजची म्हणून बालदोस्तांची जी गँग आहे ते सगळे बालकलाकारही नवीन आहेत. त्यामुळे एक प्रकारचा ताजेपणा या चित्रपटात आहे. काहीशी परीकथा पद्धतीची सुरुवात करत चित्रपट सूरज, नारायणी आणि शेखर या तिघांची कथा गुंफत जातो. जोपर्यंत गोंधळाची मालिका सुरू असते तोवर चित्रपट रंजन करत राहतो.

एका क्षणाला मात्र अगदी हिंदी चित्रपटांच्या यशस्वी साच्याप्रमाणे नायक-नायिका, तिला विरोध करणारे नायिकेचे वडील, सत्ता बळकावण्यासाठी आसूसलेली सावत्र आई आणि तिचा भाचा… मग त्याची दांडगाई अशा उड्या चित्रपट मारत राहतो. त्यातली गंमत कमी होते आणि मग नेमकं प्रेमाच्या गोष्टीत कोण खर्ची पडतं हे प्रेक्षकांना आधीच कळलेलं असल्याने तो कसा खर्ची पडतो, इथपतच ती उत्सूकता राहते.

सुरुवातीला उभा राहिलेला विनोदी डोलारा कथा पुढे जाते तशी पार कोसळून गेला आहे. त्यातल्या त्यात पुष्कराज वगळता विनोदी अभिनयाची जाण फारशी कोणाला नाही. आणि सूरजच्या व्यक्तिरेखेलाही मर्यादा आहेत. तो काही विनोदी अभिनेता नाही किंवा विनोदबुध्दी उत्तम असलेला कलाकार नाही. त्यामुळे मधून मधून येणारे चमकदार डायलॉग आणि काही निर्णायक प्रसंगांमध्ये त्याने दाखवलेली समज वगळता सूरजचं नवं काही चित्रपटात फारसं पाहायला मिळत नाही. त्या तुलनेत जुई भागवत, इंद्रनील कामत, पायल जाधव आणि हेमंत फरांदे या चौघांनी आपापल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. त्यामुळे अर्धी प्रेमकथा, थोडं ‘सैराट’ वळण, थोडा विनोद असा हा मनोरंजनाचा ‘झापुक झुपूक’ प्रयोग काहीसा अर्धवटच पडद्यावर रंगला आहे, असं वाटत राहतं.

झापुक झुपूक

दिग्दर्शक – केदार शिंदे

कलाकार – सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, हेमंत फरांदे, दिपाली पानसरे.



Source link

रसिक स्पेशल: महाराष्ट्रातील शेती आणि ‘एआय’चा प्रभावी वापर

0
रसिक स्पेशल:  महाराष्ट्रातील शेती आणि ‘एआय’चा प्रभावी वापर


  • Marathi News
  • Opinion
  • Agriculture In Maharashtra And The Effective Use Of AI Rasik Article By Dr Sunil Garantiwar

डॉ. सुनील गोरंटीवार13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात सरकार आणि शेतीशी निगडित संशोधन संस्थांनी कृषी क्षेत्रातील ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापराचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यांची गती आणि दिशा कायम राहिल्यास नजीकच्या काळात शेतीची उत्पादन क्षमता वाढेलच; शिवाय शेतीचा खर्च कमी होऊन ती अधिक सक्षम होईल. त्यातूनच शाश्वत शेतीला चालना मिळेल.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित यंत्रसदृश प्रणाली मानवासारखे विचार करणे, प्रशिक्षित होणे, निर्णय घेणे, समस्या सोडवणे आदी कामे स्वायत्तपणे करू शकते. अलीकडे आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित सर्व क्षेत्रांमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञान वेगाने समरस होत आहे. कृषी क्षेत्रही त्याला अपवाद नाही.

महाराष्ट्रातील शेती आणि ‘एआय’ : शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे व त्याच्या वापरास प्रोत्साहन देणे याबाबत महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आता ‘एआय’ तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर करण्याबाबतही राज्याने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील ‘एआय’चा वापर आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानाच्या विकसनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये; ऊस, कापूस, सोयाबीन, तांदूळ, कांदा आणि मका या पिकांचा प्राधान्याने समावेश आहे. तथापि, अन्य काही क्षेत्रांप्रमाणे इतरत्र विकसित झालेले ‘एआय’ तंत्रज्ञान हे शेतीसाठी जसेच्या तसे किंवा त्यात काही जुजबी सुधारणा करून वापरता येणे शक्य नाही. पीक, जमीन, हवामान, पीक व्यवस्थापन प्रणाली, मागणी – पुरवठा, शेतकऱ्यांचे विविध स्तर, शेत जमिनीचे क्षेत्र आदींमध्ये असलेली प्रचंड विविधता व अनिश्चितता, ही यामागील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे शेती क्षेत्रात ‘एआय’चा प्रभावी वापर होण्यासाठी काही गोष्टी प्राधान्याने कराव्या लागतील. पिकांच्या गरजेप्रमाणे पाणी, खते, रसायने देण्याचे निर्णय घेऊन त्यांच्या वापरात बचत करणे, पिकांच्या अपेक्षित उत्पादनाचे भाकीत आणि त्याप्रमाणे पिकाची काढणी करून जास्तीत जास्त उत्पादन घेणे, हवामान अंदाज तसेच वातावरणातील बदल अचूकपणे वर्तवून त्यानुसार शेतीतील विविध प्रक्रिया करणे, निविष्ठांमध्ये बचत आणि उत्पादनात वाढ, शेतमालाची मागणी व पुरवठा यामध्ये संतुलन आदी गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. लहान-मोठे, बागायती-कोरडवाहू, नगदी-भरडधान्य पिके घेणारे, संगणक साक्षर – निरक्षर अशा सर्व स्तरांतील शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी या प्रणाली स्थानिक स्तरावर विकसित करणे, चाचणी घेऊन त्या उपयोगक्षम करणे आणि शेतकऱ्यांना व शेतीशी संबंधित सर्व भागधारकांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.

कृषी विद्यापीठांचे प्रकल्प : ‘एआय’चे शेतीमधील महत्त्व लक्षात घेता राज्यातील कृषी विद्यापीठे आणि शेतीशी निगडित संशोधन संस्थांनी हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विविध पिकांची स्थानिक स्तरावरील माहिती संकलित करणे, पूर्वीची माहिती एकत्रित करणे सुरू केले आहे. उदा. ‘एआय’ आधारित काटेकोर सिंचनासाठी स्थानिक स्तरावर लागणारे “पीक गुणांक’ ठरवण्यासाठी राहुरी, परभणी आणि अकोला येथील कृषी विद्यापीठांनी ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (पोकरा) प्रायोजित ‘डिजिटल लायसिमीटर संशोधन प्रकल्प’ हाती घेतला आहे. राहुरी विद्यापीठाने पिकांवरील जैविक आणि अजैविक ताण ओळखण्यासाठी पिकांच्या विविध अवस्थांतील वर्गीकृत प्रतिमा आणि वर्गीकृत वर्णकमीय प्रतिसाद स्वाक्षरी संचाचा प्रकल्प सुरू केला आहे. राहुरीच्या म. फुले कृषी विद्यापीठाने २०१८ पासून ‘कास्ट-कासम’ प्रकल्पाद्वारे राज्यातील विविध कृषी हवामान क्षेत्रांमधील वेगवेगळ्या पिकांना निर्दिष्ट सिंचनाद्वारे किती आणि केव्हा पाणी द्यावे याचा निर्णय घेणारी ‘फुले इरिगेशन शेड्युलर’ प्रणाली विकसित केली आहे. तसेच ठिबक सिंचन पद्धतीने पिकाला किती आणि केव्हा खत द्यावे, याचा निर्णय घेणारी ‘फुले फर्टिगेशन शेड्युलर’ प्रणाली तयार केली आहे. पिकाला पाणी देण्याबाबत फुले इरिगेशन शेड्युलरने घेतलेले निर्णय स्वायत्तपणे कार्यरत करणारी ‘ऑटो फुले इरिगेशन शेड्युलर’ ही डिजिटल प्रणालीही विकसित केली असून, शेतकऱ्यांच्या स्तरावर तिचा वापर होत आहे.

राज्यस्तरावर सुरू असलेले उपक्रम : राज्य सरकारने ‘आयआयटी- मुंबई’सोबत सामंजस्य करार करुन आणि त्याद्वारे अर्थसहाय्य देऊन ‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. शिवाय, ‘आयआयटी – मुंबई’ने राज्यात ड्रोन परिसंस्था विकसित करण्यासाठी ‘राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन’च्या अनुदानातून संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये अन्य गोष्टींसोबतच कृषीसाठी पूरक असे ड्रोन आधारित ‘एआय’ तंत्रज्ञान विकसित करण्याविषयी संशोधन सुरू आहे. हवामान बदलांना सामोरे जाण्याची क्षमता असलेले ‘एआय’ तंत्रज्ञान पावसावर अवलंबून असणाऱ्या असुरक्षित शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. तथापि, ‘एआय’ आधारित तंत्रज्ञानाचा विकास करण्यासोबतच त्यासाठी लागणाऱ्या संशोधनाधिष्ठित ज्ञानाची निर्मिती करणेही आवश्यक आहे. अन्यथा, या तंत्रज्ञानाचे अपेक्षित फायदे मिळू शकणार नाहीत.

एकंदरीत, महाराष्ट्र सरकार तसेच राज्यातील शेतीशी निगडित संशोधन संस्थांनी कृषी क्षेत्रातील ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे शेतीमध्ये आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यांची गती आणि दिशा कायम राहिल्यास नजीकच्या काळात शेतीची उत्पादन क्षमता वाढेल. शिवाय, शेतीचा खर्च कमी करुन ती अधिक सक्षम करणे आणि त्यातूनच शाश्वत शेतीला चालना देणे शक्य होईल. फार्म ऑफ द फ्युचर…

बारामतीच्या अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्राने ऑक्सफर्ड विद्यापीठ तसेच मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहाय्याने संवेदके, उपग्रहाद्वारे मिळालेल्या हवामान माहितीच्या आधारे पाणी आणि खत देणारी तसेच तणनियंत्रणाचा निर्णय स्वायत्तपणे घेणारी ‘फार्म ऑफ द फ्युचर’ ही प्रणाली विकसित केली आहे. जवळपास एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर तिचे प्रात्यक्षिकही घेतले आहे. या प्रयोगाची नोंद राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. नागपूरच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि मध्यवर्ती कापूस संशोधन संस्थेनेही कापूस उत्पादकांसाठी कृषी ‘एआय’ आधारित कीड नियंत्रण प्रणाली विकसित केली आहे.

(संपर्क -sdgorantiwar@gmail.com)



Source link

मुद्दे पंचविशी: नोकरशाही : गरज आत्मचिंतनाची…

0
मुद्दे पंचविशी:  नोकरशाही : गरज आत्मचिंतनाची…


महेश झगडे11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नोकरशाही हे लोकशाहीचे शिर नसून हृदय आहे. ते न थकता आणि न डगमगता धडधडत राहावे, यासाठी त्याला नवा ऊर्जास्रोत हवा. हा ऊर्जास्रोत म्हणजे, आत्मपरीक्षण, सजगता, पारदर्शकता आणि नागरिकांप्रति निष्ठा. या व्यवस्थेची आजची दुरवस्था थांबवण्याचा भार राजकीय नेतृत्वावर टाकता येणार नाही. ती प्रशासकीय नेतृत्वाचीच जबाबदारी आहे. इतर कुठल्याही राज्यपद्धतीपेक्षा लोकशाही ही जास्त प्रगल्भ, व्यापक आणि न्यायप्रिय मानली जाते. परंतु, या व्यवस्थेतील मूलभूत त्रुटी म्हणजे, प्रत्येक वेळी समाजातले ज्ञानी, दूरदृष्टीसंपन्न, अनुभवसंपन्न व्यक्तीच सत्तेवर येतील, याची शाश्वती नसते. याच शंका आणि अनुभवातून सॉक्रेटिस, प्लेटो आणि अॅरिस्टॉटल यांच्यासारख्या तत्त्ववेत्त्यांनी लोकशाहीच्या त्रुटींवर बोट ठेवले होते. त्यांचे मत होते की, अज्ञान, लोकप्रियता आणि भावनिक लाटांवर आरूढ होणाऱ्या नेतृत्वामुळे सरकारे अनिर्णयी, अस्थिर आणि कधी कधी विद्ध्वंसकही ठरू शकतील! या संभाव्य त्रुटीवर उपाययोजना म्हणून आणि शासनाची गाडी सतत रुळावर राहावी, यासाठी लोकशाहीतील एक स्थिर, प्रशिक्षित व अनुभवी यंत्रणा म्हणून ‘नोकरशाही’ची संकल्पना जन्माला आली. निवडणुकांचे चक्र सुरू असो वा नसो, सत्तांतर झालेले असो वा कलह निर्माण झालेला असो; शासनकार्याची अखंड गती थांबू नये, यासाठी नोकरशाही ही एक प्रकारची सतत कार्यरत असणारी राज्यपद्धती ठरली.

लोकशाहीतील जबाबदार व्यवस्था

राजशकट चालवणारी हीच नोकरशाही दृढ आणि निस्सीम अशी व्यवस्था म्हणून गेली अडीच हजार वर्षे अडथळ्यांमध्येही न थकता सत्तेच्या चाकांना ओढण्याचे काम करत असते. तिचे ज्ञान, अनुभव आणि दूरदृष्टी यामुळे ती फक्त एक प्रशासन व्यवस्था न राहता, शासनाचा अविभाज्य आणि प्राणवंत भाग बनलेली आहे. राजकारणाचे रंग बदलत राहतात, पण प्रशासनाचे रंग स्थिर, शिस्तबद्ध आणि नीतिमूल्यांशी निष्ठावान राहिले पाहिजेत, हेच लोकशाहीच्या शाश्वततेचे खरे गमक आहे. संविधानाने भाग १४ नुसार या प्रशासकीय सेवेला म्हणजे नोकरशाहीला एक पवित्र आणि अभेद्य स्वरूप दिले. नोकरशाही ही केवळ सरकारच्या आज्ञाधारक नोकरांची फौज म्हणून नव्हे, तर ती लोकशाहीच्या मूळ उद्दिष्टांची कार्यवाही करणारी एक स्थायी, प्रशिक्षित आणि जबाबदार व्यवस्था म्हणून निर्माण केली आहे. परंतु, गेल्या साडेसहा दशकांतील वास्तव पाहता, हीच नोकरशाही राजकीय व्यवस्थेची बटिक होवून जनतेपासून दुरावत चालली आहे की काय, अशी शंका मनात निर्माण होते.

रथाची दिशा घोडेच ठरवणार..?

लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही शासनरुपी रथांची दोन चाके आहेत, हा लोकशाहीतील सर्वात मोठा गैरसमज आहे. ही संकल्पना मुळातच चुकीची आहे. काही स्वार्थी नोकरशहांनी रचलेले हे कुभांड आहे, असे म्हणता येईल. सरकार किंवा शासन म्हणजे जनतेचे स्वत:चे राज्य आणि ते दैनंदिन, अविरत चालवण्यासाठी त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते व्यवहारात अमलात आणले जाते. नोकरशाही ही सरकारची एक सहायकारी यंत्रणा होय. रथाचंच रूपक वापरायचं, तर रथ म्हणजे राज्य, सारथी म्हणजे लोकप्रतिनिधी आणि रथ ओढणारे घोडे म्हणजे नोकरशाही. पण, घोड्यांनीच रथाची दिशा ठरवावी, असा गोंधळ असेल, तर रथ कोठे जाईल, याचा विचार केला पाहिजे. तो न करणे म्हणजे लोकशाहीला अंधारात ढकलण्यासारखे आहे.

भारतीय लोकशाहीची रचना करताना संविधान समितीने नोकरशाहीचा विचार केला, तेव्हा ती राजकीय दबावांपासून स्वतंत्र, पारदर्शक आणि निष्पक्ष असावी, यासाठीच तिला राज्यघटनेत विशेष स्थान देण्यात आले. पण, आज राज्याच्या कारभारात जे बेजबाबदारपणाचे आणि दुर्बलतेचे प्रदर्शन होत आहे, ते पाहता नोकरशाहीने स्वत:ची संकल्पना, मूल्ये आणि उद्दिष्टे हरवल्याचे दिसते. ही अधोगती राजकीय हस्तक्षेपामुळे झाली असली, तरी त्याला खतपाणी घालणाऱ्या काही प्रशासकीय प्रवृत्तीही तितक्याच दोषी आहेत.

नोकरशाही जेव्हा ‘होयबाशाही’ होते…

महाराष्ट्राचा विचार केल्यास गेल्या काही दशकांत आपल्या राज्याचे प्रशासन संपूर्ण देशात सर्वोत्तम मानले जात होते. याचे श्रेय सामाजिकदृष्ट्या जागरूक राजकीय नेतृत्वाला आणि जबाबदारीने वागणाऱ्या प्रशासकीय नेतृत्वाला जाते. पण, अलीकडे हे संतुलन ढळले आहे. कारण नोकरशाहीने आपली भूमिका ‘सेवक’ म्हणून न ठेवता, ‘सत्तेचा अंगवळणी पडलेला भाग’ म्हणून स्वत:चे अवमूल्यन करून घेतले आहे. उदाहरणार्थ, या बदललेल्या मनोवृत्तीमुळेच आज राज्य शासनाच्या ७.२४ लाख मंजूर पदांपैकी तब्बल २.४६ लाख पदे रिक्त आहेत. म्हणजेच सरकारचा कारभाररुपी रथ एकतृतीयांश अपंग झालेला आहे! ही शोकांतिका केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही. ही मानसिक दुर्बलतेची, नियोजनशून्यतेची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रशासकीय नेतृत्वाच्या आत्मसात शक्तीच्या अभावाची परिणामकारक परिणती आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीच ही भयावह रिक्तता राजकीय नेतृत्वासमोर ठामपणे मांडू शकत नाहीत, तेव्हा ती ‘नोकरशाही’ न राहता ‘होयबाशाही’ होते.

प्रशासनाची जबाबदाऱ्यांपासून फारकत

प्रशासनाच्या प्रमुख जबाबदाऱ्या म्हणजे, सध्याच्या आणि भविष्यात येऊ घातलेल्या समस्यांचा वेध घेणे, त्यावर नेमक्या उपाययोजना आखणे, राजकीय नेतृत्वाकडून त्या मंजूर करून घेणे, कायदे आणि धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करणे, राजकीय निर्णय चुकीचे असतील आणि ते राज्य व जनतेच्या हिताचे नसतील, तर त्याविरोधात ठाम भूमिका घेणे. परंतु, आजची नोकरशाही बहुतेक ठिकाणी भीती, लोभ, पदोन्नतीची आस आणि दबाव यांच्या विळख्यात सापडल्याचे दिसते. काही अपवाद वगळता, ही व्यवस्था आपल्या संविधानिक जबाबदाऱ्यांपासून फारकत घेत असल्याचे ठळकपणे जाणवते. राजकीय नेतृत्व निवडणुकीच्या गणितात अडकलेले असते. हेच गणित अनेकदा नोकरशाहीतील निर्णयप्रक्रियेला लागणाऱ्या गतीचा गळा घोटते. मंत्री, आमदार, खासदार यांचे ‘सांगणे’, “कळवणे’, ‘बघा बरं..’ असे शब्दप्रयोग आज प्रशासकीय निर्णयांची व्याख्या ठरले आहेत. नियोजन, अंमलबजावणी, निरीक्षण, लेखापरीक्षण या महत्त्वाच्या टप्प्यांवर आता ‘नजर’ नसते, तर ‘संदर्भ’ असतो. आणि यासाठी जबाबदार कोण? राजकीय नेतृत्वाला सत्तेच्या समीकरणासाठी ही सगळी विकृती पोसणे भागच असते. पण, प्रशासकीय नेतृत्व..? त्याला आपली जबाबदारी कशी टाळता येईल?

राज्यघटनेच्या मूल्यांशी बांधिलकी हवीच

नोकरशाहीच्या पातळीवर ही स्थिती असताना, पुढच्या २५ वर्षांची वाटचाल अधिक गंभीर आणि दूरदृष्टीची असणे आवश्यक बनले आहे. देशातील नव्या पिढीच्या अपेक्षा – आकांक्षा, सामाजिक ताणतणाव, आर्थिक विषमता, तांत्रिक क्रांती आणि हवामान बदल यांसारख्या अक्राळविक्राळ समस्यांचा सामना करण्यासाठी एक उत्क्रांत, ठाम, नैतिकदृष्ट्या सशक्त आणि वैचारिकदृष्ट्या दूरदृष्टीची नोकरशाही हवी आहे. ही नोकरशाही निवडणुकीनंतरच्या सत्तांतराच्या वेळी केवळ यंत्रवत आदेशांची पूर्तता करणारी न राहता, नव्या शासनाला राजकीय दृष्टिकोनास पूरक उपाययोजना सुचवणारी आणि स्वत: जनहिताच्या मुद्द्यांवर सजग असणारी हवी आहे. राजकीय नेतृत्व हे नेहमीच जनतेला गोंजारणाऱ्या घोषणांनी आपली सत्ता टिकवण्याच्या मोहात असते. अशावेळी खऱ्या अर्थाने “रिफॉर्म्स विदीन गव्हर्नन्स’ साध्य होण्यासाठी नोकरशाहीने पुढाकार घ्यावा लागतो. त्यासाठी ‘राजकीय आदेशाची वाट पाहणं’ हा दृष्टिकोन सोडून ‘राज्यघटनेच्या मूल्यांशी बांधिलकी’ हाच एकमेव मार्ग बनायला हवा.

नोकरशाही हे लोकशाहीचे शिर नसून हृदय आहे. ते न थकता आणि न डगमगता धडधडत राहावे, यासाठी त्याला नवा ऊर्जास्रोत हवा. हा ऊर्जास्रोत म्हणजे, आत्मपरीक्षण, सजगता, पारदर्शकता आणि नागरिकांप्रति निष्ठा. या व्यवस्थेची आजची दुरवस्था थांबवायची असेल, तर हा भार कोणत्याही राजकीय नेतृत्वावर टाकता येणार नाही. ती जबाबदारी आहे प्रशासकीय नेतृत्वाची! त्यामुळं हे नेतृत्व तात्कालिक सत्तांवर नाही, तर दीर्घकालीन मूल्यांवर उभं राहिलं पाहिजे. तसे झाले तरच नव्या महाराष्ट्राची नवी दिशा निश्चित होईल… एक अशी दिशा, जिथे नोकरशाही ही सत्तेची गुलामगिरी करणारी नव्हे, तर संविधानाच्या सेवेसाठी झगडणारी स्वाभिमानी यंत्रणा ठरेल.

(संपर्क – maheshzagade07@gmail.com)



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: जेव्हा प्रत्येक दगडावर लिहिले होते कुली नं. 1; सिनेमासाठी प्रमोशन किती आवश्यक असते, हे वासू भगनानी यांनी इंडस्ट्रीला शिकवले

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  जेव्हा प्रत्येक दगडावर लिहिले होते कुली नं. 1; सिनेमासाठी प्रमोशन किती आवश्यक असते, हे वासू भगनानी यांनी इंडस्ट्रीला शिकवले


रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात १९ एप्रिलला फिल्म इंडस्ट्रीतील मोठे आणि प्रसिद्ध निर्माते वासू भगनानीजींचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांच्या घरी डेव्हिड धवन, अभिषेक बच्चन, चंकी पांडे, तुषार कपूर यांच्यासह चार-पाच खास लोकांसाठी डिनर ठेवण्यात आले होते. पाहुण्यांचे स्वागत वासूजींचा मुलगा जॅकी आणि सून रकुलप्रीत यांनी केले. तिथून निघताना मनात विचार आला की, आपण अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, संगीत दिग्दर्शक, कॅमेरामन यांच्याविषयी नेहमी लिखाण करतो; पण निर्मात्यांबाबत आजवर फारसे लिहिले नाही. त्यामुळे आज माझ्या हिश्श्याच्या किस्स्यांमध्ये वासू भगनानीजींविषयी…

वासूजींचा कोलकत्यामध्ये कपड्यांचा व्यवसाय होता. मुंबईत आल्यावर त्यांनी बांधकाम क्षेत्रात कामे करण्यास तसेच ऑडिओ कॅसेट बनवण्यास सुरूवात केली. त्या काळात ऑडिओ कॅसेट खूप विकल्या जायच्या आणि त्या कॅसेटचे कव्हर बनवण्याचे काम वासूजी करायचे. त्यामुळे सगळ्या म्युझिक कंपन्यांच्या मालकांशी त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे वासूजींनी सिनेमांची निर्मिती सुरू केली. त्यांच्या पहिला सिनेमा होता ‘कुली नं. वन’. तो मी लिहिला होता आणि डेव्हिड धवन साहेबांनी दिग्दर्शन केले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर मी त्यांच्या ‘हीरो नंबर वन’, ‘बीवी नंबर वन’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘मुझे कुछ कहना है’ अशा लागोपाठ हिट झालेल्या सिनेमांचे कथानक लिहिले. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कौटुंबिक संबंध तयार झाले. मार्केटिंग, पब्लिसिटी या गोष्टी फिल्म इंडस्ट्रीला शिकवण्याचे श्रेय वासूजींना दिले जाते. सिनेमांसाठी पब्लिसिटी कशी आवश्यक आहे आणि ती किती चांगली ठरते, हे त्यांनी शिकवले.

‘कुली नं. वन’ रिलीज होणार होता, तेव्हा मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यांनी माझ्यासमोर पाण्याची एक बाटली ठेवली. त्यावर कुली नं. वन लिहिले होते, एक अॅश ट्रे होता, त्यावरही कुली नं. वन लिहिले होते. मग त्यांनी स्कूटरच्या स्टेफनीचे काही कव्हर दिले आणि म्हणाले की, तुमच्या ज्या मित्रांकडे स्कूटर असेल त्यांना हे कव्हर द्या आणि स्टेफनीवर लावायला सांगा. त्यावरही कुली नं. वन लिहिले होते. काही लेटरपॅड, पेनही दिले आणि त्यावरही कुली नं. वन लिहिले होते. त्यानंतर काही छत्र्या माझ्या पुढ्यात ठेवल्या आणि जाताना त्या घेऊन जा, असे सांगितले. त्यावरही लिहिले होते.. कुली नं. वन. कारण सिनेमा ३० जूनला रिलीज होणार होता. म्हणजे त्या आधी दोन आठवडे मुंबईत पाऊस सुरू होणार होता. हे सगळे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. मी विचारले, ‘वासूजी, हे सगळे काय आहे? मी आजवर अशा गोष्टी कधी पाहिल्या नाहीत..’ वासूजी नेहमी हसतमुख असतात. तेव्हाही ते हसून म्हणाले, ‘सरकार, हे तुमच्या सिनेमाचे प्रमोशन करतोय!’ आम्ही दोघे एकमेकांना ‘सरकार’ म्हणायचो. ते पुढे सांगू लागले.. ‘या गोष्टींची खूप गरज आहे. तुम्हा फिल्म इंडस्ट्रीवाल्यांना पोस्टर लावून, ट्रेलर दाखवून सिनेमा चालेल असे वाटते आणि तुम्ही त्यालाच पब्लिसिटी समजता. पण, तुम्ही आपल्या प्रॉडक्टची चौफेर पब्लिसिटी करणार नाही, तोवर लोकांना त्याविषयी कसे समजणार? प्रसिद्धीची गरज नसती, तर टाटा- बिर्लांसारख्या मोठमोठ्या कॉर्पोरेटनी आपल्या उत्पादनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले नसते. चहापासून तुपापर्यंत आणि अन्नधान्यापासून सिमेंटपर्यंत सगळ्या प्रॉडक्टच्या पब्लिसिटीवर ते कोट्यवधी रुपये खर्च करतात कारण त्याचा रिझल्ट मिळतो. तुम्ही बघा, आपल्या या पब्लिसिटीचाही रिझल्ट नक्की दिसेल.’ वासूजींच्या या गोष्टीवरुन मला शकील आज़मी यांचा एक शेर आठवतोय…

हर घड़ी चश्म-ए-ख़रीदार में रहने के लिए कुछ हुनर चाहिए बाज़ार में रहने के लिए।

असो. त्यानंतर वासूजी म्हणाले, सरकार, या सगळ्या गोष्टी घेऊन जा, मित्रांना वाटा आणि दोन दिवसांनी घराबाहेर पडा. चौकसपणे आजूबाजूला बघा, तुम्हाला सरप्राइज दिसेल.. दोन दिवसांनी मी घराबाहेर पडलो. जवळच्या बागेत फिरताना एका दगडावर नजर पडली, त्यावर लिहिले होते – कुली नं. वन. मी वांद्र्यापर्यंत गेलो. वाटेतला कुठलाही दगड कोरा नव्हता. भितींवर पोस्टर लागले होते. जिथे कुठे मोकळी जागा होती, तिथे कुली नं. वन लिहिले होते. सिनेमा रिलीज झाला, सुपरहिट ठरला. पुढे अनेक महिने ते दगड तसेच होते, ज्यावर लिहिले होते.. कुली नं. वन. त्यानंतर वासूजींनी पब्लिसिटीची मालिकाच सुरू केली, कारण सगळे सिनेमे हिट होत होते. गाडीतून जात असताना अचानक एखादी स्कूटर समोर यायची, जिच्या स्टेफनीवर ‘कुली नं. वन’ लिहिलेले असायचे. पावसातून जाताना एकाएकी कुणी तरी छत्री घेऊन यायचे, जिच्यावर ‘कुली नं. वन’ किंवा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ लिहिलेले असायचे. मुंबईत जितक्या स्कूटर, गाड्या, छत्र्या असतील, त्यांच्यावर कुठे ना कुठे तुम्हाला वासूजींच्या बॅनरचे नाव दिसेलच. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीचे डोळे उघडले आणि सिनेमांचे प्रमोशन किती आवश्यक आहे, ते सगळ्यांना कळून चुकले. मला आठवतेय की, शाहरुख खान, जूही चावला आणि अजीज मिर्झा यांनी मिळून ‘ड्रीम्स अनलिमिटेड’ ही कंपनी सुरू केली होती. त्यासाठी ऑफिस घेतल्यावर या तिघांनी तिथे पहिल्यांदा वासूजींना बोलावले आणि सिनेमांचे मार्केटिंग, प्रमोशन कसे करायचे ते आम्हाला शिकवा, अशी विनंती केली होती. तर, आज वासूजींसाठी ‘कुली नंबर वन’मधील हे गाणे ऐका…

मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

गोष्ट सांगतो ऐका…: शहाणा!

0
गोष्ट सांगतो ऐका…:  शहाणा!


अरविंद जगताप7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अवस्थी शांत बसून होते. ते एवढंच म्हणाले, ‘मी सीआयडी ऑफिसर आहे. दिल्लीहून आलोय तुम्हाला अटक करायला. तुमचा सगळा भ्रष्टाचार मला माहिती झालाय..’

पोलिस स्टेशन तसं आडवळणाला होतं. पण, बाजूला खूप झाडी असल्यानं काही न काही गुन्हा असायचा. कुणी विचारणारा नसल्यामुळं इन्स्पेक्टर प्रकरण स्टेशनपर्यंत येऊच द्यायचे नाहीत. हवालदार पैसे घेऊन तिथल्या तिथं भानगडी मिटवायचा. ठराविक पैसे स्वत: ठेवायचा. बाकी साहेबांच्या हवाली करायचा. असा एकूण गुण्यागोविंदानं कारभार चालू होता. आजही एक जोडपं साहेबांच्या समोरच त्या दाट झाडीत गेलं होतं. साहेबांनी इशारा केला तसा हवालदार उठून निघाला. आता त्या जोडप्याकडून कमीत कमी हजार एक रुपये तर घेऊन यायचे होते.

हवालदार निघाला. इन्स्पेक्टर साहेब निवांत झाले. आता काही काम नव्हतं. म्हणजे करायचं नव्हतं. त्यांनी मोबाइल काढला. एक एक रील बघू लागले. इन्स्पेक्टर खूप मनमोकळं हसायचे. खूपदा त्यांना वाटायचं, ही नोकरी सोडून रील्स बनवत बसावं. अचानक एक माणूस तावातावात आला. कारमधून उतरला तसा तो रागातच दिसत होता. इन्स्पेक्टर बघत होते. पण, त्यांची जागची उठायची इच्छा झाली नाही. अशा लोकांची त्यांना सवय होती. फक्त या चौकीत आल्यापासून एवढी पांढरपेशी माणसं त्यांना भेटत नव्हती. चांगल्या कपड्यातला हा अतिशय गंभीर माणूस दिसत होता. आल्या आल्या त्यानं खुर्ची ओढली आणि बसला. बसू का? असं विचारलं नाही. इन्स्पेक्टर जरा रागात आले. त्यांना अशा उर्मटपणाची सवय नव्हती. समोर बसलेल्या गृहस्थानं आपलं नाव सांगितलं. इंग्रजीत.. तसे इन्स्पेक्टर जरा सावरून बसले. त्या गृहस्थाचे नाव राजन अवस्थी होते. ते काही क्षण इन्स्पेक्टरकडं एकटक बघत राहिले. या गोष्टीचा इन्स्पेक्टरना त्रास होऊ लागला. सहसा लोक त्यांच्यासमोर उभे असतात आणि ते एकटक बघतात. इन्स्पेक्टर या माणसाला त्याची लायकी दाखवायचा विचार करू लागले. पण, अवस्थी इंग्रजीत बोलल्याने त्यांना जरा शब्द शोधायची वेळ आली. कुठलं वाक्य बोलू, हा विचार ते करतच होते, तेवढ्यात अवस्थींनी हातानंच.. ‘पाणी हवंय’ अशी खूण केली. हे जरा अतीच होतं. चौकीत इन्स्पेक्टर साहेबच एखाद्या जखमीला किंवा रडून तक्रार सांगणाऱ्या स्त्रीला पाणी द्यायला सांगायचे. पण, त्यांना आजवर कुणी पाणी द्या, असं म्हटलं नव्हतं. तेही एवढ्या थंडपणे. अवस्थी पुन्हा इंग्रजीत बोलले.. ‘मी बोललो ते ऐकू आलं नाही का?’ इन्स्पेक्टर साहेबांच्या संयमाचा बांध फुटला. चिडून ते एवढंच म्हणाले.. ‘हु आर यू?’

अवस्थी पुन्हा एकटक इन्स्पेक्टकडं बघू लागले. मग शांतपणे म्हणाले, ‘Are you mad or what? I told you. I’m Rajan Awasthi.. Bring me some water..’ आता हे जरा अतीच झालं होतं. इन्स्पेक्टर जागचे उठले. संतापलेले. अवस्थींच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, ‘काम काय आहे तुमचं?’ अवस्थी अजिबात विचलित झाले नाहीत. शांतपणे पण अस्खलित इंग्रजीत म्हणाले, ‘आधी पाणी आणा, मग सांगतो.’ इन्स्पेक्टर अवस्थीच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेत शक्य तेवढी भीती दाखवत म्हणाले, ‘ही पोलिस स्टेशन आहे, पाणपोई नाही. इथं लोक स्वत:चे प्रॉब्लेम घेऊन येतात.’ अवस्थी तरीही विचलित झाले नाहीत. इन्स्पेक्टरच्या डोळ्यात डोळे घालून ते म्हणाले.. ‘प्रॉब्लेमच घेऊन आलोय; पण तुमचा..’ हे ऐकून इन्स्पेक्टरना खरं तर राग यायला पाहिजे होता. पण, पहिल्यांदा ते दचकले. त्यांना भीती वाटली. ते जरा वेळ शांत राहिले. आपण घाबरलोय, हे त्यांना अवस्थींच्या लक्षात येऊ द्यायचं नव्हतं. त्यांनी आपला चेहरा पुन्हा रागीट केला. अवस्थींना कामाचं बोलायला सांगितलं.. ‘केस काय आहे?’ अवस्थी म्हणाले, ‘तुमचीच केस आहे..’ आता आपण नॉर्मल आहोत, हे दाखवायला इन्स्पेक्टर हसले. म्हणाले, ‘तुमचं डोकं फिरलं का?’ अवस्थी तसेच शांत बसून होते. ते फक्त एवढंच म्हणाले, ‘मी सीआयडी ऑफिसर आहे. दिल्लीहून आलोय तुम्हाला अटक करायला. माझी टीम येईलच. तुमचा सगळा भ्रष्टाचार मला माहिती झालाय. सगळे पुरावे आहेत माझ्याकडं..’

इन्स्पेक्टर साहेबांची पाचावर धारण बसली. त्यांनी स्वत:ला नॉर्मल दाखवायचा खूप प्रयत्न केला. पण, ते अस्वस्थ झाले होते. अवस्थी पुन्हा इंग्रजीत म्हणाले, ‘माझं कार्ड आणि तुमच्या केसची फाइल माझ्या कारमध्ये आहे. घेऊन या..’ इन्स्पेक्टरनी कारकडं बघितलं, पण तिथं जायची हिंमत झाली नाही. उलट ते मागच्या बाजूला गेले. स्वत: पाण्याची बाटली घेऊन अवस्थींच्या समोर बसले. अवस्थी शांतपणे पाणी पिऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही विजयी उन्माद नव्हता. ते फक्त इन्स्पेक्टरकडं बघत राहिले. पाणी पिऊन झाल्यावर शांतपणे उठले. फाइल घेऊन येतो म्हणाले. अवस्थी कारकडं जायला वळले, तोच इन्पसेक्टर साहेबांनी त्यांचा हात धरला. ‘तुमचा काही गैरसमज झालाय..’ वगैरे खूप काही बोलू लागले. प्रेमाने. अवस्थी फक्त एवढंच म्हणाले, ‘तुमचा सहकारी कुठं आहे?’ एकटेच दिसता?’ हे ऐकून इन्स्पेक्टर साहेब जास्तच घाबरले. अवस्थी म्हणाले, ‘आज कुणालाच सोडणार नाही.’ इन्स्पेक्टर आणखी मऊ झाले. पुन्हा विनवणीच्या सुरात बोलू लागले. काही देण्याघेण्याने प्रकरण मिटते का, याचा अंदाज घेऊ लागले. पण अवस्थी म्हणाले, ‘हेड ऑफिसचा नंबर घ्या, कुणालाही विचारा. अवस्थीने आजपर्यंत एक रुपयाची तरी लाच घेतली का?’ इन्स्पेक्टर खचले. त्यातच हवालदाराला येताना बघून तर त्यांच्यात काही त्राण राहिलं नाही. हवालदार सहसा समोर कोण आहे, याचा अंदाज न घेता, किती पैसे मिळाले, कसा येडा बनवला, हे सांगू लागतो.

हवालदार जवळ आला. साहेबांना शांत बसलेलं बघून तो जरा गोंधळून गेला. इन्स्पेक्टर उठून अवस्थी साहेबांची ओळख करून देऊ लागले. हवालदाराने नमस्कार केला. चहा आणतो म्हणून निघून गेला. अवस्थी साहेब घड्याळात बघत होते. इन्स्पेक्टर पुन्हा त्यांना विनवायला लागले. पण, त्याचा काही उपयोग दिसत नव्हता. एवढ्यात हवालदार एका तरुणीसोबत आला. तिला बघून अवस्थी एकदम गोंधळून गेले. ती अवस्थींची मुलगी. झाडीत शोधत होती बापाला.. हवालदाराला तिनं फोटो दाखवला म्हणून लक्षात आलं. तिनं सांगितलं की अवस्थी मानसिकदृष्ट्या स्थिर नाहीत. मध्येच घरातून निघून जातात.. सॉरी.. इन्स्पेक्टर साहेबांना खूप ओरडायचं होतं, पण ते शांत राहिले. अवस्थीकडे बघत राहिले. जाता जाता अवस्थी म्हणत होते.. ‘सोडणार नाही.’ हवालदार म्हणाला, ‘येडा कुठचा!’ इन्स्पेक्टर हवालदाराला म्हणाले , ‘शहाणाय तो.. मला येडा बनवला राव फुकट!’

(संपर्क -jarvindas30@gmail.com)



Source link

वेबमार्क: गुलाबी डॉल्फिन्सचं रम्य अन् रोमांचक रहस्य

0
वेबमार्क:  गुलाबी डॉल्फिन्सचं रम्य अन् रोमांचक रहस्य


  • Marathi News
  • Opinion
  • Sameer Gaikwad Rasik Article On The Beautiful And Exciting Mystery Of Pink Dolphins

समीर गायकवाड5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एकेकाळी उपग्रह वाहिन्यांचे जाळे नव्हते, तेव्हा डिस्कव्हरी वाहिनीचे काही कार्यक्रम दूरदर्शनवर रविवारी सकाळी प्रसारित केले जायचे. त्याला मोठा प्रेक्षकवर्ग लाभला होता. कालांतराने या क्षेत्रात मोठी क्रांती झाली आणि चोवीस तास प्रक्षेपण असणाऱ्या शेकडो वाहिन्या अस्तित्वात आल्या. या त्सुनामीतही डिस्कव्हरी वाहिनी आपलं अस्तित्व टिकवून राहिली, याला कारण तिचं वेगळेपण! या वाहिनीवरील कार्यक्रमांचा आशय विषय ज्यांना आवडतो अशांसाठी एका आगळ्यावेगळ्या डॉक्युमेंट्रीची ही माहिती.. ‘द मिस्ट्री ऑफ द पिंक डॉल्फिन’ हे त्या माहितीपटाचं नाव. तो रिलीज होऊन काही वर्षे झाली असली, तरी अॅमेझॉन प्राइम आणि ‘डॉक्यूबे’वर तो नुकताच दाखल झाला आहे. एरिक एलेना यांनी हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. अॅमेझॉनमधील ‘गुलाबी नदीय डॉल्फिन’ (Pink River Dolphin) ज्याला ‘बोटो’ म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या रहस्यमय उत्पत्ती आणि उत्क्रांतीचा शोध यात घेतला आहे. हा माहितीपट म्हणजे विज्ञान, निसर्ग आणि संशोधन यांचा सुंदर संगम असून, त्यात या अनोख्या, दुर्मिळ प्रजातीच्या पंचवीस दशलक्ष वर्षांच्या अनुकूलनाचा प्रवास मांडण्यात आला आहे.

डॉक्युमेंट्रीची सुरूवात अॅमेझॉनच्या दाट पर्जन्यभारित जंगलातील एका अरुंद उपनदीच्या प्रवाहातून होते, जिथे समुद्रापासून हजारो किलोमीटर दूर अंतरावर गुलाबी नदीय डॉल्फिन आढळतात. डॉल्फिन्सच्या उत्पत्तीविषयी बोलताना, ते समुद्री डॉल्फिनचे वंशज आहेत की प्राचीन काळातील वेगळ्या वंशाचे आहेत, यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या माशांनी अॅमेझॉनच्या उष्णकटिबंधीय पर्यावरणाशी कसे अनुकूलन केले, याचा थेसिस रंजक पद्धतीने समोर येतो.

ही डॉक्युमेंट्री दोन भागात विभागली आहे. पहिला भाग माशांच्या जीवाश्म अभ्यास आणि भूवैज्ञानिक पुराव्यांवर आधारित असून, त्याद्वारे डॉल्फिन्सच्या उत्पत्तीचा शोध लावण्यात आला आहे. यात डॉल्फिन्सच्या प्राचीन इतिहासाचा आणि समुद्रापासून नदीपर्यंतच्या प्रवासाचा समावेश आहे. तर दुसऱ्या भागात, गुलाबी डॉल्फिन्सच्या वर्तमान जीवनाचा आणि त्यांच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचा प्रत्यक्ष शोध, ज्यात त्यांचे पाण्यातले देखणे स्ट्रीमिंग आणि त्यांच्या सुरक्षेचे आव्हान या गोष्टी सामील आहेत. वैज्ञानिक शोधाचा प्रवास कथानकाच्या केंद्रस्थानी असल्याने ते रोचक झाले आहे. शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि त्यांचे निष्कर्ष प्रेक्षकांची उत्सुकता चाळवतात.

या डॉक्युमेंट्रीतील डॉल्फिन्सचे दर्शन अत्यंत सुखावह आहे. त्यांचे नैसर्गिक वर्तन आणि त्यांच्या प्रांतातला मानवी हस्तक्षेप यामुळे त्यांच्यासमोर उत्पन्न झालेले धोके यांचा गोषवारा विचार करण्यास प्रवृत्त करतो. यातील मांडणी वैज्ञानिक आणि दृश्यात्मक घटकांचा समतोल साधते. अॅमेझॉनच्या जंगलातील सुंदर दृश्ये, शांत संगीत आणि क्रिस्टेल लेड्रोइट यांचे संयमित निवेदन यामुळे डॉक्युमेंट्री पाहताना उत्साह टिकून राहतो. पहिल्या भागात डॉल्फिन्सचे प्रत्यक्ष दर्शन घडत नसल्याने ज्यांना केवळ पिंक डॉल्फिन पाहायचे आहेत, त्यांना पहिला भाग काहीसा अनाकर्षक वाटू शकतो. मात्र, खरी माहिती याच हिश्श्यात आहे. अॅमेझॉनच्या जंगलातील दृश्ये तसेच डॉल्फिन्सचे ड्रोनने टिपलेले काही थेट शॉट्स अतिशय नयनरम्य आणि आकर्षक आहेत. यातला सर्वांत महत्त्वाचा संदेश जो जगभरातील सर्वच नागरिकांना लागू होतो तो म्हणजे, मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचे जीवनचक्र विस्कळीत होत आहे. अनेक प्रजाती लुप्त झाल्यात, तर काही प्रजाती लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. अशा जिवांच्या बाबतीत आपण कसे दक्ष राहिले पाहिजे, हे अगदी नेमकेपणे स्पष्ट करण्यात आले आहे.

पिंक डॉल्फिन्सची शिकार करण्याच्या पद्धती किती आधुनिक झाल्या आहेत आणि कसे कमालीच्या निर्दयी पद्धतीने त्यांना मारलं जातं, हे पाहून आपण व्यथित होतो. २०१८ मध्ये इंटरनॅशनल नेचर कन्झर्व्हेशन युनियनने धोक्यात असलेली प्रजाती म्हणून ती घोषित केली आहे. या डॉक्युमेंट्रीतील माहितीचे महत्त्व यावरुन लक्षात यावे. नदीपात्रात आढळणाऱ्या पिंक डॉल्फिन्सचा वंश समुद्री डॉल्फिन्सपासून कसा वेगळा आहे, हे यात लक्षणीयरित्या दाखवले आहे. जगभरातील समुद्रकिनारे गलिच्छ होत चाललेत, असं म्हणून आपण सुटका करून घेऊ शकत नाही. कारण आपण नद्यांच्या पात्रात नेमकं काय काय सोडत आहोत, हेच आपल्याला कळेनासे झाले आहे. यातील काही घटकांचा नदीतील जिवांच्या आयुष्यावर थेट परिणाम होतो, तर काहींचे दुष्परिणाम नदीतील पाणी समुद्रात पोहोचलं तरी होतातच. पिंक डॉल्फिन्सना त्यांच्याशी करावा लागणारा संघर्ष पाहून कोणत्याही सहृदयी व्यक्तीच्या मनावर परिणाम होतो. हा माहितीपट वैज्ञानिक दृष्टिकोनातून गुलाबी डॉल्फिन्सच्या रहस्यमय जगाचा शोध घेण्याचा उत्तम प्रयत्न आहे. मुळात डॉल्फिन्स हे मानवी आकर्षणाचा स्नेहबिंदू आहेत, कारण त्यांचं अजातशत्रू वर्तन आणि मायाळूपण! बुद्धिमान आणि निरागसपणा हे दोन्ही गुण त्यांच्या ठायी असण्यानं त्यांना कितीही पाहिलं, तरी समाधान मिळत नाही. ‘आयएमडीबी’वर याला १० पैकी ७.४ रेटिंग आहे.

जाता जाता…

‘इंटरस्टेलर’ हा ऑल टाइम ग्रेट सिनेमा आता ओटीटीवरून रजा घेईल. ख्रिस्तोफर नोलन यांचा हा मास्टरपीस एव्हरग्रीन सायफाय वर्गातील आहे. त्याचप्रमाणे, मनातल्या भीतीवर कशी मात करावी, याचे अद्भुत तत्त्वज्ञान सांगणारा ‘द कराटे किड’ही अल्पकाळच ओटीटीवर असेल. हे दोन्ही सिनेमे अॅमेझॉन प्राइमवर पाहता येतील.

(संपर्क – sameerbapu@gmail.com)



Source link

रसिक स्पेशल: महासंघर्षाच्या उंबरठ्यावर…

0
रसिक स्पेशल:  महासंघर्षाच्या उंबरठ्यावर…




पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय उपखंडातील दीर्घ संघर्षाची नांदी झाली आहे. भारत – पाकिस्तानमधील तणाव पूर्वी न अनुभवलेल्या अनिश्चिततेच्या वाटेवर पोहोचला आहे. यात पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे जागतिक राजकारणातील स्थान पणाला लागले आहे. त्यामुळे दाराशी आ वासून उभ्या असलेल्या महासंघर्षाला तोंड देण्यासाठी आता सर्व भारतीयांना केवळ भावनिकच नव्हे, तर मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि भौतिक तयारी करावी लागेल. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने भारतातील जनमानसात आक्रोश निर्माण झाला आहे. परंतु, हा हल्ला अचानक झालेला नाही. गेल्या दोन वर्षांत जम्मू विभागात सुरक्षा जवानांवर अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. काश्मिरातील दहशतवादाचा नवा प्रकार म्हणून तो समोर आला आहे. एक तर, पूर्वी या भागांमध्ये दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण अत्यल्प होते. पण, अलीकडे दहशतवाद्यांनी जम्मू विभागाला लक्ष्य केले आहे. ११ जून २०२४ ला वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करत दहशतवाद्यांनी ११ निष्पापांचे बळी घेतले होते. हे दहशतवादी अत्यंत प्रशिक्षित आहेत आणि त्यांना नमवण्यात सुरक्षा दलांची बरीच शक्ती खर्च होत आहे. या सर्व घटना पाहता, जम्मू – काश्मिरातील दहशतवाद संपल्याचे मिथक जाणीवपूर्वक पसरवले गेल्याचे जाणवते. जम्मू-काश्मीरच्या मतदारांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील सहभाग तसेच कोरोना महामारीनंतर या केंद्रशासित प्रदेशातील पर्यटनात झालेली वाढ यांना सूचकांक मानत काश्मीर खोऱ्यातील असंतोष कमी झाल्याचे मानण्यात येत होते. परंतु, त्यापूर्वीही तिथल्या मतदारांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये हिरीरीने भाग घेतला होता आणि त्याआधी अनेकदा काश्मीर खोऱ्यातील पर्यटनही बहरले होते. तरीही तिथे दहशतवादी घटना नित्यनेमाने घडत होत्या, त्याचीच पुनरावृत्ती आता होते आहे. काश्मिरी जनमानसातील गुंतागुंत : काश्मिरी जनमानस अत्यंत क्लिष्ट आहे. काश्मिरी लोकांमध्ये प्रखर मतमतांतरे आहेत. दहशतवाद्यांच्या पूर्णपणे विरोधात असलेला मोठा वर्ग काश्मीर खोऱ्यात आहे, त्याचबरोबर भारतीय सुरक्षा दलांची तैनाती आणि त्यांच्या शोधमोहिमांनी अस्वस्थ होणारा वर्गही तेवढाच मोठा आहे. भारतीय पर्यटकांवर मनापासून प्रेम करणारे काश्मिरी जसे आहेत, तसेच भारत सरकारचा द्वेष करणारेही आहेत. विशेष दर्जाची आस ठेवत भारतीय संघराज्याचा भाग होण्यास हरकत नसलेले काश्मिरी जसे आहेत, तसे पाकिस्तानात अजिबात सामील व्हायचे नाही, ही स्पष्टता असलेले काश्मिरीही आहेत. भारतापासून वेगळे होण्याची आकांक्षा बाळगलेले युवक अद्याप काश्मिरी समुदायात आहेत आणि पाकिस्तानकडून भ्रमनिरास झालेले फुटीरतावादीही त्यात आहेत. पाकिस्तान अशा विखुरलेल्या काश्मिरी जनसमुदायात भारतविरोधी शक्तींना हवा देतो. पण, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करणारे दहशतवादी ही भारताची डोकेदुखी आहे. पाकव्याप्त काश्मिरातून होणारी ही घुसखोरी बंद करणे भारताला अद्याप शक्य झालेले नाही. द्विपक्षीय संबंध मृत्युशय्येवर : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अभूतपूर्व तणाव निर्माण झाला आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याने दोन्ही देशांतील संबंध कमालीचे बिघडले होते आणि २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर द्विपक्षीय संबंध रसातळाला गेले होते. गेल्या ६ वर्षांत जे नाममात्र संबंध उरले होते, तेही आता जवळपास संपुष्टात आले आहेत. व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब परतण्यास भारताने सांगितले आहे आणि भारतासोबत जो किरकोळ व्यापार होता, तो पाकिस्तानने स्थगित केला आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान प्रत्यक्ष व्यापार अगदीच कमी होता. पण, संयुक्त अरब अमिरातीमार्गे दोन्ही देशांच्या वस्तूंचा बऱ्यापैकी व्यापार होतो. अशा तृतीय पक्षीय व्यापारालाही पाकिस्तानने स्थगिती दिली आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी केली आहे. पाकिस्तानची कारस्थाने आणि कोंडी : स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर भारताने पाकिस्तानचे सार्वभौमित्व मान्य करत द्विपक्षीय संबंधांना समानता व सन्मानाच्या चौकटीत विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. मात्र, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताविरुद्ध सातत्याने काश्मीरचे पालुपद वापरल्याने भारताने बांगलादेश मुक्तिसंग्रामाला त्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचवत द्विपक्षीय संबंधांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले होते. काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय स्तरावर सामंजस्याने सोडवण्यात येईल, हे भारताने सिमला कराराद्वारे पाकिस्तानला मान्य करण्यास भाग पाडले होते. या करारामुळे काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण होणे बंद झाले; पण पाकिस्तानने हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्याऐवजी छुप्या युद्धाचा मार्ग पत्करला. दरम्यानच्या काळात जागतिक परिस्थिती कमालीची बदलली. शीतयुद्धानंतर पाश्चिमात्य राष्ट्रांसाठी दहशतवादाविरुद्धचे युद्ध ही प्राथमिकता झाल्याने पाकिस्तानची कोंडी झाली. चीन वगळता इतर कोणत्याही मोठ्या देशाचा त्याला पाठिंबा उरला नाही. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सातत्याने हलाखीची होत गेली. आज त्या देशाची अर्थव्यवस्था चीन आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या कर्जांवर कशीबशी श्वास घेते आहे. अण्वस्त्रसज्जतेचा बागुलबुवा : असे असले तरी भारताच्या तुलनेत झालेली स्वत:ची प्रचंड अधोगती पाकिस्तान मान्य करत नाही. १९९८ मध्ये भारताने केलेल्या अण्वस्त्र चाचणीनंतर पाकिस्ताननेही अशी चाचणी करत स्वत:ला अण्वस्त्रधारी देश घोषित केले. भारताप्रमाणे आपल्याकडेही अण्वस्त्रे असल्यामुळे आपण भारताच्या बरोबरीत आहोत, ही भावना पाकिस्तानी लष्कर आणि सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेत भिनली आहे. याच मानसिकतेतून भारताला सतत असुरक्षित ठेवायचे आणि जागतिक राजकारणात एक मोठी शक्ती म्हणून उदयास येऊ द्यायचे नाही, हे कुतंत्र पाकिस्तानने अवलंबले आहे. अन्यथा; पंजाब, काश्मीर किंवा भारताचा कोणताही भाग दहशतवादी कारवाया करुन भारतापासून तोडता येणार नाही, हे १९९० च्या दशकाअखेरच स्पष्ट झाले होते. तरीही केवळ अण्वस्त्रांच्या बलाबलाचा फायदा घेत भारताला वेळोवेळी जखमी करत राहायचे धोरण पाकिस्तानने राबवले. तो ठराविक काळानंतर अण्वस्त्र-ढालीची चाचणी घेत असतो. १९९९ ची कारगिलमधील घुसखोरी, २००२ मधील भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ला, २००८ चा मुंबई हल्ला, २०१४ चा पुलवामा हल्ला आणि आता पहलगाममध्ये घडवलेले मृत्युकांड या सर्वांतून पाकिस्तानने हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की दोन्ही देशांदरम्यान प्रस्थापित झालेल्या अण्वस्त्र संतुलनामुळे भारताचे प्रत्त्युत्तराचे पर्याय मर्यादित आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकने पाकिस्तानचा अण्वस्त्रांचा बागुलबुवा हाणून पाडल्याची खात्री अनेक सुरक्षातज्ज्ञांना वाटत होती. पहलगाम हल्ल्यानंतर याचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे.
आता पाकिस्तानने भारताच्या पल्ल्यात चेंडू टाकत उपखंडातील दीर्घ संघर्षाची नांदी केली आहे. पाकिस्तानवर वचक ठेवण्यासाठी जे जे करणे गरजेचे होते, ते सर्व उपाय भारताने यापूर्वीही केले आहेत. यावेळी भारताने सिंधू नदी पाणीवाटप करार स्थगित ठेवण्याचे ब्रह्मास्त्र उपसले आहे. परिणामी भारत – पाकिस्तान संघर्ष पूर्वी न अनुभवलेल्या अनिश्चिततेच्या वाटेवर पोहोचला आहे. यात पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे जागतिक राजकारणातील स्थान पणाला लागले आहे. त्यामुळे २०२५ हे दक्षिण आशियासाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. आपल्या दाराशी आ वासून उभ्या असलेल्या महासंघर्षाला तोंड देण्यासाठी आता सर्व भारतीयांना केवळ भावनिकच नव्हे, तर मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि भौतिक तयारी करावी लागेल.

सिंधु कराराचे ‘गहिरे पाणी’… भारत – पाकिस्तान संबंध १९८० च्या मध्यापासून सातत्याने खालावत गेले आहेत. मात्र, अत्यंत तणावाच्या काळातही ना भारताने सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्यासाठी पाऊल उचलले होते, ना पाकिस्तानने सिमला करार रद्दबातल ठरवण्याची दिशा पकडली होती. दोन्ही देशांनी केलेल्या या घोषणांचा एकच अर्थ निघतो, तो म्हणजे भारत – पाकिस्तान संबंधांमध्ये आता प्रचंड मोठी उलाढाल होऊ घातली आहे. त्यातही सिंधु पाणीवाटप कराराच्या स्थगितीचे गहिरेपण पाकिस्तानला सर्वार्थाने आणखी खोलात नेईल.
(संपर्क – parimalmayasudhakar@gmail.com)



Source link

कबीररंग: कबीरांच्या तत्त्वचिंतनाला ओशोंचा रसपूर्ण भावस्पर्श

0
कबीररंग:  कबीरांच्या तत्त्वचिंतनाला ओशोंचा रसपूर्ण भावस्पर्श


हेमकिरण पत्की34 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

चंद्रमोहन जैन हे आचार्य रजनीश तथा ओशो या नावानं आपल्याला ज्ञात आहेत. एक भारतीय दार्शनिक, विचारक आणि विश्ववाड्.मयाचे भाष्यकार म्हणूनही ते आध्यात्मिक क्षेत्रात सर्वपरिचित आहेत. धार्मिक रूढीरीतींचे कट्टर विरोधक अशीही त्यांची अनोखी ओळख आहे. वैश्विक वाड्.मयाची सूत्रं आणि मौलिक विचार हाच त्यांच्या भाष्याचा मूलाधार आहे. एक निभ्रांत चिंतनसूत्र ग्रंथित करण्याचा सफल प्रयत्न ही ओशोंची विदग्ध साधना आहे. या जगातला ओशोंचा प्रवेश म्हणजे नव्या माणसाचं, नव्या जगाचं आणि नव्या युगाचं दर्शन आहे. ओशोंची दर्शनसूत्रं कुठल्याही प्रचलित धर्मावर आधारित नाहीत; तसंच ती कुठल्याही विशिष्ट दार्शनिक विचार-पद्धतीतून निर्माण झालेली नाहीत. वर्तमानाशी जोडलेल्या धर्माशी ही दर्शनसूत्रं आपलं नातं सांगतात आणि जीवनाचं रहस्य सहजपणे उलगडून दाखवतात.

कबीरांच्या दोह्यांचं आणि पदांचं ओशोंनी केलेलं रसग्रहण अद्भुत आहे. हिंदी वाड्.मयाच्या इतिहासातील मध्यकाळात कबीरांवर आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी, पंडित सीताराम चतुर्वेदी, डॉ. रामकुमार वर्मा इ. टीकाकारांनी खूप काही लिहून ठेवलं आहे. पण, ओशोंनी कबीरांवर केलेलं भाष्य विस्तृत आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. तत्त्वचिंतनाच्या दृष्टीनं महान आहे. एकाच वेळी ते भाष्य वर्तमानसंगत आणि नवंही आहे. ओशोंनी कबीरांमधील संतकवीला धर्म, दर्शन, विज्ञान, मनोविज्ञान, समाजशास्त्र आणि युगधर्म या टीकांच्या निकषांवर लोकांपर्यंत पोहोचवलं. ‘सुनो भाई साधो’, ‘कहै कबीर मैं पूरा पाया’, ‘कहै कबीर दीवाना’, ‘न कानों सुना न आँखों देखा’ हे ओशोंचे कबीरांच्या दोह्यांवर आणि पदांवर रसपूर्ण भाष्य करणारे ग्रंथ त्याची साक्ष आहेत.

कबीर स्वाभिमानी, स्वतंत्र बाण्याचे कवी आहेत. त्यांची काव्यचेतना समन्वयवादी आणि प्रतिभा बहुमुखी आहे. कबीर साधक, सिद्ध, संत, व्यंगकार, साधू, हठयोगी, प्रेममार्गी, समाजसुधारक, आत्माभिमानी अशी अनेक गुणविशेषणं असलेले कवी आहेत. त्यांच्या भाषेला कवितेचा सुगंध असून ती हृदयस्पर्शी, तर्कशुद्ध आहे. वाचकाच्या मनाला संतुष्ट करणारी ही भाषा ओशोंनी सहजपणे आपलीशी करून तिचं मर्म आपल्यासमोर ठेवलं आहे.

कबीरांचं काव्य महाविद्यालयांच्या पाठ्यपुस्तकांत आहे, विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या मुखात आहे. कबीरांचे दोहे आणि पदं अनेक विद्वानांनी संग्रहित केले आहेत. श्यामसुंदर दास हे त्याचं उत्तम उदाहरण. कितीतरी लोकगायकांनी कबीरांच्या काव्यातील भक्तिरस आपल्या स्वरांतून सर्वदूर पोहोचवला. अशा प्रकारे लोकचेतनेत सामावून कबीर आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. एक ओळही ग्रंथात न लिहिणारे कबीर काळाला दूर सारून आजही कवी म्हणूनच आपल्या साऱ्यांच्या स्मरणात आहेत! पोथीतील विचारधन काही अंशी कालबाह्य होणारं असलं, तरी त्यातून मिळणारं आत्मज्ञान मात्र व्यापक आहे. जीवन निरंतर आणि परिवर्तनशील आहे. पोथीतील शास्त्र जड आहे आणि जीवन गतिशील आहे. म्हणून कबीर म्हणतात…

कबीरा संसा दूर कर, पुस्तक देय बहाई।

जीवनाचा गाभा जाणून घ्यायचा, तर तो पोथीतून मिळेल का,असा प्रश्न स्वत:ला करून कबीर पोथीतील शास्त्राला प्रेमाचा विकल्प देतात. प्रेमाचा मार्गच केवळ जीवन समजून घ्यायला उपयोगी पडेल. कबीरांचं हेच सूत्र ओशोंनी आपल्या ओंजळीत ठेवलं आहे. पण, कबीरांना अपेक्षित असलेला प्रेमाचा अर्थ नीट समजून घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पोथी पढि-पढि जगमुआ, पंडित भया न कोय। ढाई आखर प्रेम का, पढै सो पंडित होय।।

या दोह्यावरती ओशो भावसुंदर भाष्य करतात. ते म्हणतात, ‘कबीरांसाठी पांडित्याची परिभाषा ही ज्ञानाची परिभाषा आहे. प्रेमाची अडीच अक्षरं वाचण्याची सोय कुठल्याच विचार पोथीत नाही. प्रेमाची स्थिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्याला जीवनाची पोथी वाचावी लागेल, आयुष्याच्या शाळेत जाऊन प्रेम म्हणजे काय, ते शिकावं लागेल. ‘प्रेम’ हा अडीच अक्षरं असलेला शब्द आहे. कबीरांना यात गहन अर्थ दिसतो. एखादी व्यक्ती कुणाच्या प्रेमात पडते, तेव्हा अडीच अक्षरं पूर्ण होतात. एक अक्षर प्रेम करणाऱ्याचं, दुसरं ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं आणि दोघांमध्ये जे अज्ञात आहे, त्यामुळं अडीच अक्षरं होतात. कबीर दोघांमधल्या अज्ञाताला धरून तीन अक्षरं म्हणत नाहीत. याचं एक मधुर कारण म्हणजे प्रेम कधी पूर्ण होत नाही. प्रेम पूर्ण होत नाही, म्हणून मनाला संतुष्टी नाही. प्रेम परमात्म्यासारखं विकसनशील आहे. अपूर्णता हीच त्याची शाश्वतता आहे. प्रेम करणाऱ्या दोघांमधला जो अदृश्य सेतू आहे, तोच द्वैत संपून एकामध्ये रूपांतरित होऊ शकतो.’ माणूस म्हणून जन्माला येण्यानं ‘त्या’ विराट अस्तित्वापासून आपण दूर होतो. हा दुरावा जाणिवेत येण्यानं ‘त्या’ विराटाचा विरह हृदयाला एक अनामिक पीडा देतो. या विरहाची मात्रा म्हणजे प्रेम नाही किंवा त्याचं समाधान म्हणजेही प्रेम नाही. अखंड विरहाची अनुभूती म्हणजे प्रेम आहे. कबीरांच्या दोह्याचा हा अर्थ ओशोंच्या भाष्यामुळे आपल्या ध्यानात येतो. कबीर जसे आपल्या सूत्रशैलीचे शिरोमणी कवी आहेत; तसे ओशो आपल्या भाष्यासाठीचे शिखर-व्याख्याता आहेत.

(संपर्क – hemkiranpatki@gmail.com)



Source link

सहृदय संशोधिकेचा जीवनालेख

0
सहृदय संशोधिकेचा जीवनालेख



डॉ. इरावती कर्वे हे नाव उच्चारलं की सर्वसामान्यपणे डोळ्यासमोर येतात ती ‘युगान्त’, ‘परिपूर्ती’ किंवा ‘आमची संस्कृती’, ‘भोवरा’ या पुस्तकांची नावं. मात्र या पुस्तकांची लेखिका सुमारे शंभर वर्षांपूर्वी जर्मनीला जाऊन तिनं तिथं शारीर मानवशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पार पाडला होता आणि तेवढ्यावरच न थांबता जर्मनीतील वंश श्रेष्ठत्वाच्या सिद्धांताला आव्हानही दिले होते. हे फारच थोड्यांना माहीत आहे. जर्मनीतून परत आल्यावर इरावतीबाईंनी शारीर मानवशास्त्राला सांस्कृतिक मानसशास्त्र, भारतविद्या, वांशिक-ऐतिहासिक ज्ञानशाखा यांची जोड देऊन पुरातत्त्व शास्त्राच्या आधारे वंश म्हणजे जात हे समीकरण मोडीत काढले.

भारतातील जातीयुक्त समाजाला पूर्वीचे मानसशास्त्रज्ञ ‘जिगसॉ पझल’ची उपमा देत असत. इरावतीबाईंनी ती नाकारली. रंगीबेरंगी गोधडीचा दृष्टांत देऊन इथली समाजरचना स्पष्ट केली. इथल्या समाजरचनेत असलेल्या विविध गटांचे विविध ठिकाणांहून, वेगवेगळ्या वेळी स्थलांतर होणे, त्यांचे इतरत्र अद्याप अस्तित्वात असणे वगैरे स्पष्ट केले.

‘आम्ही भारतीय कोण आहोत आणि आहोत ते तसे का आहोत?’ हा प्रश्न त्यांच्या संशोधनाच्या मुळाशी होता. हे सर्व संशोधन भोवती चार पुस्तकं मांडून बंद खोलीत करता येण्यासारखं नव्हतंच. त्यासाठी त्यांनी उदंड फिल्डवर्क केलं. प्राचीन मानवी सांगाड्याच्या शोधात त्यांनी अवघा महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर खननकाम केलं. सांगाड्यांची मोजमापे घेतली. प्रवासाची, निवासाची सोय धड असेल की नाही याची पर्वा न करता जिद्दीनं संशोधन करत राहिल्या. सुज्ञ, सुजाण पती डॉ. दिनकर कर्वे यांची सर्वतोपरीने साथ त्या काळात त्यांना होती, हे महत्त्वाचे. १९४०च्या दशकात प्रवासाची सार्वजनिक साधनं म्हणजे आगगाडी आणि बस. चुकून कधी सरकारी जीप मिळाली तरच. संपर्काची साधनेही उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत अत्यंत काटकसरीनं संशोधन मोहीम पार पाडावी लागे. प्राचीन मानवी सांगाडा मिळाला तर प्राचीन व आधुनिक संस्कृतीचं नातं उलगडू शकेल म्हणून पुरातत्त्व विभागाच्या डॉ. सांकळिया यांच्या बरोबर प्राचीन सांगाड्याच्या शोधात त्यांनी गुजरातमध्ये खननकाम केलं. विशेष म्हणजे जिथे कुठे त्यांचं खननकाम चालू असे आणि शालेय सुट्टीचा काळ असेल तर इरावतीबाई आपल्या आणि परिचितांच्या मुलांना अशा मोहिमांवर नेत. सांगाडे साफ करायला, त्यांची मोजमाप घ्यायला शिकवत. (आजचे प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ माधवराव गाडगीळ त्यांच्या लहानपणी इरावतीबाईंच्या शोधमोहिमांत सहभागी असत.) या मोहिमांत बाईंचा त्या त्या प्रदेशातील संस्कृती, इतिहास, भूगोल, लोकजीवन, राहणीमान, कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध वगैरेंवरही अभ्यास चाले. १९५१-५२मध्ये त्यांना इंग्लंडमधील स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ लंडनने निमंत्रित केलं. तिथल्या वास्तव्यात त्यांनी बरंच लेखन केलं. इकॉनॉमिक वीकली, नेचरसारख्या जगप्रसिद्ध नियतकालिकातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. भारतात परतल्यावर त्यांनी ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ हा महत्त्वाचा शास्त्रीय ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्यात भारतातील नातेदारी संघटनसंस्थेचा शोध अनेक अंगांनी घेतला होता. या ग्रंथाचं त्या काळातील विद्वानांनी खूप कौतुक केलं. भारतीय समाजाची संरचना समजून घेण्यासाठी हा ग्रंथ त्यांना उपयुक्त वाटला. विशेष म्हणजे, इरावतीबाईंनी स्वदेशी स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून भारतीय कुटुंब व्यवस्थेचे विश्लेषण करण्याचं पायाभूत काम केल्याबद्दल तो उल्लेखनीय ठरला. इरावतीबाईंचा भारतीय संस्कृतीकडे बघण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन या पुस्तकातून व्यक्त झाला आहे. त्यांनी पुढे आपल्या संशोधनावर आधारित ‘हिंदू सोसायटी – अॅन इंटरप्रिटेशन’ हा ग्रंथ लिहिला. महाभारतकालीन समाजव्यवस्थेचे संदर्भ देत त्यांनी जात आणि वर्ण याविषयी सविस्तर मांडणी केली. या ग्रंथाचं मोठ्या प्रमाणावर स्वागत झालं. जगभरातील अनेक विद्यापीठांत तो ग्रंथ पाठ्यपुस्तक किंवा संदर्भ ग्रंथ म्हणून लावला गेला.

वयाची साठी ओलांडल्यावरही त्यांचा संशोधकाचा पिंड शांत बसला नाहीच. प्लॅनिंग कमिशनच्या रिसर्च कमिटीला कोयना प्रकल्प विस्थापितांवर सर्वेक्षण अहवाल देऊन त्यांच्या सुस्थापनासाठी उपाय सुचवले. १९६५ सालात त्यांनी केलेलं हे काम पुढे १९८०-९० च्या दशकात सरदार सरोवराच्या निमित्ताने झालेल्या विस्थापनाचा अभ्यास करताना उपयोगी ठरले.

शास्त्रीय लेखनाइतकाच त्यांनी मराठीत ललित लेखन करण्यातही रस घेतला. भरपूर प्रवास केल्यानं त्यांचं अनुभवविश्व समृद्ध होतं. इंग्रजी, संस्कृत वाङ्मयाचं वाचनही दांडगं होतं. संशोधक वृत्ती आणि वर्तमानाचं चिकित्सक भान, त्याला चिंतनशीलतेची जोड यामुळेही त्यांची प्रतिभा ललित लेखनात झळाळून उठली. लेखिका डॉ. प्रतिभा कणेकर यांनी इरावतीबाईंचा हा अनोखा प्रवास बारकाईनं सांगितला आहे. इरावतीबाईंच्या संशोधनामागच्या प्रेरणा, त्यांचा अभ्यास, काळाच्या पुढची त्यांची झेप याविषयी प्रतिभाताईंनी साक्षेपानं लिहिलंय. शक्य तेवढी माहिती जमवून भारतीय मानसशास्त्राच्या प्रांगणातील या आद्या दीपमाळेला मराठीत आणलंय.

इरावतीबाईंच्या शास्त्रीय संशोधन आणि लेखनाइतकाच त्यांच्या महाभारत आणि रामायणावरील अभ्यासपूर्ण लेखनावर प्रतिभा कणेकरांनी स्वतंत्र प्रकरण लिहिलं आहे. त्यांच्या ललित लेखनाची योग्य ती दखल घेतली आहे. त्यांच्या ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’ आणि ‘संस्कृती’ ग्रंथाची माहिती वाचताना इरावतीबाईंचा आवाका पाहून थक्क व्हायला होतं. एका वेगळ्याच ज्ञानशाखेत प्रवेश करून स्वत:चा मार्ग निवडणारी, असीम प्रयत्नांनी त्यात स्वत:चं स्थान निर्माण करणारी मराठी स्त्री शास्त्रज्ञ प्रतिभा कणेकर यांनी मराठीत सादर करून चरित्रवाङ्मयात मोलाची भर घातली आहे. एक मानवशास्त्र संशोधक, गृहिणी, माता, लेखिका, शिक्षिका, सखी, पत्नी… अशा विविध भूमिकांत इरावतीबई आपल्याला या चरित्रात भेटत राहतात. एखाद्या आदिवासीबहुल खेड्यात त्या जितक्या सहजतेनं वावरतात तितक्याच पटुत्वाने त्या कॅलिफोर्निया विद्यापीठात व्याख्यात्या म्हणून लक्षणीय कामगिरीही पार पाडून येतात.

या ग्रंथात प्रतिभा कणेकरांनी इरावतीबाईंचे पती डॉ. दिनकर धोंडो कर्वे यांचीही योग्य ती दखल घेतलेली आहे. खरं तर त्यांचं अस्तित्व थंडावा देणाऱ्या सावलीसारखं सर्वत्र जाणवत राहतं. पत्नीची इच्छा आणि तिचा कल पाहून तिला सर्वतोपरीने प्रोत्साहन देणारा, तिला उच्च शिक्षणासाठी, आपल्या वडिलांच्या आणि सासऱ्यांच्या मनाविरुद्ध जाऊन जर्मनीला पाठवणारा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा मान राखणारा, पत्नी संशोधनकार्यासाठी बाहेर गेल्यावर तिच्या अनुपस्थितीत मुलांचा प्रतिपाळ करणारा, त्यांच्या सांगोपनात रस आणि सहभाग घेऊन घर सांभाळणारा, झाडपेरात रमणारा, तिच्या लेखन कार्यात मदत करणारा, ती आजारी असताना तिच्या लेखांचं शब्दांकन करणारा, तिच्या मृत्यूनंतर तिच्या अप्रकाशित लेखांचा संग्रह संपादित करणारा बुद्धिमान आणि सुस्वभावी सहचर या पुस्तकात कुठे ना कुठे भेटत राहतो. हृद्या अनुभव देतो. प्रतिभा कणेकरांनी असे क्षण निगुतीनं टिपलेत. इरावतीबाई आणि डॉ. दिनकर यांचं मैत्रीपूर्ण नातं सुरुवातीलाच त्या काळात त्यांनी एकमेकांना दिनू आणि इरू अशा संबोधण्यातूनच व्यक्त होत जातं. एक देखण्या, बुद्धिमान, कर्तबगार, चिंतनशील, विचारी आणि तितक्याच सहृदय संशोधक स्त्रीचा हा जीवनालेख ललित्यपूर्ण झाला आहे, हे विशेष.

‘भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्या दीपमाळ : डॉ. इरावती कर्वे’ – प्रतिभा कणेकर, प्रकाशक – इंडस सोर्स बुक्स, पाने- २७०, किंमत- ४५०

veena.gavankar@gmail.com



Source link

mla rohit Pawar faced setback as amrit Kaldates group leader application was rejected

0
mla rohit Pawar faced setback as amrit Kaldates group leader application was rejected



mla rohit Pawar faced setback as amrit Kaldates group leader application was rejected | कर्जतच्या नगराध्यक्षांची २ मे रोजी निवड, गटनेतेपदी संतोष मेहेत्रे, अमृत काळदाते यांचा अर्ज फेटाळला





Source link