Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रकबीररंग: कबीरांच्या तत्त्वचिंतनाला ओशोंचा रसपूर्ण भावस्पर्श

कबीररंग: कबीरांच्या तत्त्वचिंतनाला ओशोंचा रसपूर्ण भावस्पर्श

कबीररंग:  कबीरांच्या तत्त्वचिंतनाला ओशोंचा रसपूर्ण भावस्पर्श

[ad_1]

हेमकिरण पत्की34 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

चंद्रमोहन जैन हे आचार्य रजनीश तथा ओशो या नावानं आपल्याला ज्ञात आहेत. एक भारतीय दार्शनिक, विचारक आणि विश्ववाड्.मयाचे भाष्यकार म्हणूनही ते आध्यात्मिक क्षेत्रात सर्वपरिचित आहेत. धार्मिक रूढीरीतींचे कट्टर विरोधक अशीही त्यांची अनोखी ओळख आहे. वैश्विक वाड्.मयाची सूत्रं आणि मौलिक विचार हाच त्यांच्या भाष्याचा मूलाधार आहे. एक निभ्रांत चिंतनसूत्र ग्रंथित करण्याचा सफल प्रयत्न ही ओशोंची विदग्ध साधना आहे. या जगातला ओशोंचा प्रवेश म्हणजे नव्या माणसाचं, नव्या जगाचं आणि नव्या युगाचं दर्शन आहे. ओशोंची दर्शनसूत्रं कुठल्याही प्रचलित धर्मावर आधारित नाहीत; तसंच ती कुठल्याही विशिष्ट दार्शनिक विचार-पद्धतीतून निर्माण झालेली नाहीत. वर्तमानाशी जोडलेल्या धर्माशी ही दर्शनसूत्रं आपलं नातं सांगतात आणि जीवनाचं रहस्य सहजपणे उलगडून दाखवतात.

कबीरांच्या दोह्यांचं आणि पदांचं ओशोंनी केलेलं रसग्रहण अद्भुत आहे. हिंदी वाड्.मयाच्या इतिहासातील मध्यकाळात कबीरांवर आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी, पंडित सीताराम चतुर्वेदी, डॉ. रामकुमार वर्मा इ. टीकाकारांनी खूप काही लिहून ठेवलं आहे. पण, ओशोंनी कबीरांवर केलेलं भाष्य विस्तृत आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. तत्त्वचिंतनाच्या दृष्टीनं महान आहे. एकाच वेळी ते भाष्य वर्तमानसंगत आणि नवंही आहे. ओशोंनी कबीरांमधील संतकवीला धर्म, दर्शन, विज्ञान, मनोविज्ञान, समाजशास्त्र आणि युगधर्म या टीकांच्या निकषांवर लोकांपर्यंत पोहोचवलं. ‘सुनो भाई साधो’, ‘कहै कबीर मैं पूरा पाया’, ‘कहै कबीर दीवाना’, ‘न कानों सुना न आँखों देखा’ हे ओशोंचे कबीरांच्या दोह्यांवर आणि पदांवर रसपूर्ण भाष्य करणारे ग्रंथ त्याची साक्ष आहेत.

कबीर स्वाभिमानी, स्वतंत्र बाण्याचे कवी आहेत. त्यांची काव्यचेतना समन्वयवादी आणि प्रतिभा बहुमुखी आहे. कबीर साधक, सिद्ध, संत, व्यंगकार, साधू, हठयोगी, प्रेममार्गी, समाजसुधारक, आत्माभिमानी अशी अनेक गुणविशेषणं असलेले कवी आहेत. त्यांच्या भाषेला कवितेचा सुगंध असून ती हृदयस्पर्शी, तर्कशुद्ध आहे. वाचकाच्या मनाला संतुष्ट करणारी ही भाषा ओशोंनी सहजपणे आपलीशी करून तिचं मर्म आपल्यासमोर ठेवलं आहे.

कबीरांचं काव्य महाविद्यालयांच्या पाठ्यपुस्तकांत आहे, विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या मुखात आहे. कबीरांचे दोहे आणि पदं अनेक विद्वानांनी संग्रहित केले आहेत. श्यामसुंदर दास हे त्याचं उत्तम उदाहरण. कितीतरी लोकगायकांनी कबीरांच्या काव्यातील भक्तिरस आपल्या स्वरांतून सर्वदूर पोहोचवला. अशा प्रकारे लोकचेतनेत सामावून कबीर आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. एक ओळही ग्रंथात न लिहिणारे कबीर काळाला दूर सारून आजही कवी म्हणूनच आपल्या साऱ्यांच्या स्मरणात आहेत! पोथीतील विचारधन काही अंशी कालबाह्य होणारं असलं, तरी त्यातून मिळणारं आत्मज्ञान मात्र व्यापक आहे. जीवन निरंतर आणि परिवर्तनशील आहे. पोथीतील शास्त्र जड आहे आणि जीवन गतिशील आहे. म्हणून कबीर म्हणतात…

कबीरा संसा दूर कर, पुस्तक देय बहाई।

जीवनाचा गाभा जाणून घ्यायचा, तर तो पोथीतून मिळेल का,असा प्रश्न स्वत:ला करून कबीर पोथीतील शास्त्राला प्रेमाचा विकल्प देतात. प्रेमाचा मार्गच केवळ जीवन समजून घ्यायला उपयोगी पडेल. कबीरांचं हेच सूत्र ओशोंनी आपल्या ओंजळीत ठेवलं आहे. पण, कबीरांना अपेक्षित असलेला प्रेमाचा अर्थ नीट समजून घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पोथी पढि-पढि जगमुआ, पंडित भया न कोय। ढाई आखर प्रेम का, पढै सो पंडित होय।।

या दोह्यावरती ओशो भावसुंदर भाष्य करतात. ते म्हणतात, ‘कबीरांसाठी पांडित्याची परिभाषा ही ज्ञानाची परिभाषा आहे. प्रेमाची अडीच अक्षरं वाचण्याची सोय कुठल्याच विचार पोथीत नाही. प्रेमाची स्थिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्याला जीवनाची पोथी वाचावी लागेल, आयुष्याच्या शाळेत जाऊन प्रेम म्हणजे काय, ते शिकावं लागेल. ‘प्रेम’ हा अडीच अक्षरं असलेला शब्द आहे. कबीरांना यात गहन अर्थ दिसतो. एखादी व्यक्ती कुणाच्या प्रेमात पडते, तेव्हा अडीच अक्षरं पूर्ण होतात. एक अक्षर प्रेम करणाऱ्याचं, दुसरं ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं आणि दोघांमध्ये जे अज्ञात आहे, त्यामुळं अडीच अक्षरं होतात. कबीर दोघांमधल्या अज्ञाताला धरून तीन अक्षरं म्हणत नाहीत. याचं एक मधुर कारण म्हणजे प्रेम कधी पूर्ण होत नाही. प्रेम पूर्ण होत नाही, म्हणून मनाला संतुष्टी नाही. प्रेम परमात्म्यासारखं विकसनशील आहे. अपूर्णता हीच त्याची शाश्वतता आहे. प्रेम करणाऱ्या दोघांमधला जो अदृश्य सेतू आहे, तोच द्वैत संपून एकामध्ये रूपांतरित होऊ शकतो.’ माणूस म्हणून जन्माला येण्यानं ‘त्या’ विराट अस्तित्वापासून आपण दूर होतो. हा दुरावा जाणिवेत येण्यानं ‘त्या’ विराटाचा विरह हृदयाला एक अनामिक पीडा देतो. या विरहाची मात्रा म्हणजे प्रेम नाही किंवा त्याचं समाधान म्हणजेही प्रेम नाही. अखंड विरहाची अनुभूती म्हणजे प्रेम आहे. कबीरांच्या दोह्याचा हा अर्थ ओशोंच्या भाष्यामुळे आपल्या ध्यानात येतो. कबीर जसे आपल्या सूत्रशैलीचे शिरोमणी कवी आहेत; तसे ओशो आपल्या भाष्यासाठीचे शिखर-व्याख्याता आहेत.

(संपर्क – hemkiranpatki@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments