विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाला डिजिटल फलक; गंगाराम रणदिवे यांच्या चार वर्षांच्या पाठपुराव्याला यश
मुंजवडी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या व्यापारी संकुलाला डिजिटल फलक बसविण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेस कमिटी सातारा जिल्ह्याचे सरचिटणीस आयु. गंगाराम अरुण रणदिवे यांनी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, ग्रामपंचायत मुंजवडीने बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल, मुंजवडी येथे डिजिटल फलक बसविला.
व्यापारी संकुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले असतानाही त्यानुसार दर्शनी स्वरूपात डिजिटल फलक असावा, अशी मागणी रणदिवे यांनी सातत्याने केली होती. यासाठी त्यांनी ग्रामपंचायत मुंजवडी तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती फलटण यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले.
या मागणीसाठी दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी उपोषण करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. चार वर्षांपासून सुरू असलेल्या या पाठपुराव्याला अखेर ग्रामपंचायत मुंजवडीने सकारात्मक प्रतिसाद देत डिजिटल फलक बसविला.
डिजिटल फलक बसविल्यामुळे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला साजेसे स्वरूप व्यापारी संकुलाला प्राप्त झाले असून, या निर्णयाचे नागरिक व आंबेडकरी समाजातून स्वागत होत आहे.
आपल्या मागणीची दखल घेऊन डिजिटल फलक बसविल्याबद्दल आयु. गंगाराम अरुण रणदिवे यांनी ग्रामपंचायत मुंजवडीचे आभार मानले आहेत. सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि महापुरुषांचा सन्मान यासाठी लोकशाही मार्गाने सातत्याने पाठपुरावा केल्यास प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही होऊ शकते, असा संदेश या घटनेतून मिळाला आहे.
जय भीम! जय शिवराय! जय संविधान! 🙏💙
