धर्मांतराचा आरक्षणावर परिणाम: सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, SC दर्जाबाबत स्पष्टता
नवी दिल्ली: देशातील आरक्षण व्यवस्था आणि अनुसूचित जाती (SC) दर्जाबाबत सुप्रीम कोर्ट ने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार, संविधानातील तरतुदीनुसार केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीय व्यक्तींनाच अनुसूचित जातीचा दर्जा मिळू शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती पी. के. मिश्रा आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर एखादी व्यक्ती हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म सोडून इतर धर्म (जसे ख्रिश्चन किंवा इस्लाम) स्वीकारते, तर तिचा SC दर्जा आपोआप संपुष्टात येतो. यामुळे अशा व्यक्तींना अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocity Act) मिळणारे संरक्षणही लागू राहणार नाही.
कोणत्या धर्मांना काय लाभ? हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीयांना लाभ : या धर्मांमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जातींचा SC दर्जा कायम राहतो. शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळत राहतो.Atrocity Act अंतर्गत कायदेशीर संरक्षण कायम राहते.
शीख धर्म आणि बौद्ध धर्म विशेषतः धर्मांतर करूनही SC दर्जा टिकवण्याची परवानगी (संविधानिक मान्यता) – सामाजिक न्याय योजनांचा लाभ सुरूच राहतो. सरकारी योजना, शिष्यवृत्ती आणि आरक्षणाचा फायदा कायम राहतो.
जैन धर्म बाबत : जैन धर्मीयांना SC दर्जा मिळत नाही (ते स्वतंत्र धार्मिक गट म्हणून मान्य) त्यामुळे आरक्षणाचा लाभ SC म्हणून मिळत नाही
या निर्णयामुळे धर्मांतर आणि आरक्षण यांच्यातील संबंध अधिक स्पष्ट झाले आहेत. विशेषतः बौद्ध धर्म आणि शीख धर्म स्वीकारणाऱ्यांना SC दर्जा कायम ठेवण्याची मुभा असल्याने या धर्मांना अप्रत्यक्ष फायदा होत असल्याचे मानले जात आहे.
मुंबई : सभागृहात एक महत्वाचा मुद्दा आज चर्चेला आला आहे. आपल्या संविधानात मंत्रिमंडळ आहे, विधानसभा, विधानपरिषद आहे, तिघांचेही अधिकार ठरलेले आहेत. प्रत्येकाचे अधिकार ठरलेले आहेत, साधारणपणे सभापती किंवा अध्यक्ष स्थानावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान असतो,, त्यांचे निर्देश पाळायचे असतात. पण, या संदर्भात सभापती किंवा अध्यक्ष एक्झिक्युटीव्हच्या निर्णयामध्ये येऊ शकत नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपसभापति निलम गोऱ्हे यांचे कान टोचले आहेत. विधानपरिषद सभागृहात सोमवारी सातारा (Satara) जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरुन झालेल्या चर्चेनंतर उपसभापति निलम गोऱ्हे यांनी साताऱ्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. त्यावरुन, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले.
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सातारा पोलीस अधिक्षक निलंबनाच्या निर्देशावरुन सभागृहात प्रश्न उपस्थित केले होते. सभापती, उपसभापतीच्या अधिकारासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण मागितले, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. खाली विषय झाला की अधिकारी मंत्र्यांच्या ब्रिफींगला आलेला नाही, अशा स्थितीत एखादा दिलेला निर्देश हा सभागृहाचा निर्देश असतो. एखादा मंत्री बोलतो की निलंबित करेन तेव्हा त्याला तो अधिकार आहे. सभापती यांनी दिलेला निर्देश असतो. वस्तुस्थिती असेल तर एक्झिक्युटीव्हकडून कारवाई होते, पण वस्तुस्थिती वेगळी असेल तर बदलही करू शकतो. आश्वासन पाळता येत नसेल तर हे सभागृहाला सांगावं लागतं, जे executive चे अधिकार आहेत ते त्यांचे अधिकार आहेत. त्या स्थानावर असताना तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्राम्हवाक्य नाही, असे म्हणत उपसभापती निलम गोऱ्हेंच्या आदेशावरुन मुख्यमंत्री फडणवीसांनी कायदेशीर बाजू मांडली. आज उद्या जेव्हा सभापती यांना रुलिंग द्यायचं आहे, ते देऊ शकतील, असेही त्यांनी म्हटले.
सभापतींच्या निर्देशावरुन अनिल परबांचे सवाल
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अनिल परब यांनी सभागृहात बाजू मांडली, उपसभापती यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्री यांनी दिलेलं स्टेटमेंट आणि त्यानंतर सभापती यांनी दिलेला आदेश यावरून आमच्या मनात शंका आहेत. सभापती आणि उपसभापती यांना निलंबन करण्याचे अधिकार आहेत का? जर नसेल तर मग निर्देश दिले कसे काय? उपसभापती यांना अधिकार नसेल तर ते कसं काय केलं? आम्ही याबाबत प्रस्ताव आणत आहोत की उपसभापती यांनी मिस युज पॉवर केलं आहे का? सभापती यांना कारवाई करता येते की नाही हे ह्याच उत्तर मिळायला हवं, अशी मागणी अनिल परब यांनी सभागृहात केली होती, त्यावरुन फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.
फलटण प्रतिनिधी :- फलटण शहरातील नरसोबानगर परिसरात घडलेली एक सकारात्मक आणि प्रेरणादायी घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. धावपळीच्या आणि स्वार्थी जीवनशैलीतही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दर्शन या घटनेतून घडले आहे. नरसोबानगर येथील जीवनज्योत हॉस्पिटल परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकास्तरीय नेते नंदकुमार मोरे आणि त्यांचे सहकारी विशाल भागवत यांना एक बेवारस बॅग आढळली. कोणाची तरी महत्त्वाची वस्तू हरवली असावी, या भावनेतून त्यांनी बॅगेची पाहणी केली असता, त्यामध्ये असलेल्या माहितीवरून ती बॅग मालोजीनगर (कोळकी) येथील रहिवासी सौ. संजना चैतन्य रायकर यांची असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर नंदकुमार मोरे यांनी तत्काळ भाजपचे युवा नेते संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत संजय देशमुख यांनीही त्वरीत सौ. रायकर यांच्याशी संपर्क साधून त्यांची हरवलेली बॅग सुरक्षित असल्याची माहिती दिली. काही वेळातच सौ. संजना रायकर यांना त्यांची बॅग सन्मानपूर्वक आणि पूर्णतः सुरक्षितपणे परत करण्यात आली. आपली हरवलेली बॅग जशीच्या तशी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत सर्व संबंधितांचे मनःपूर्वक आभार मानले. या प्रसंगी नंदकुमार मोरे, विशाल भागवत, संजय देशमुख यांच्यासह रोहित मुळीक, डेव्हिड वाकोडे, गणेश, प्रतीक मोरे आणि यश राठोड आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील नेत्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एका सामान्य नागरिकाच्या मदतीसाठी एकत्र येत दाखवलेला समन्वय आणि प्रामाणिकपणा समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला आहे.
भीमजन्मभूमी महू येथे समता सैनिक दलाच्या महिला सैनिकांची डॉ.बाबासाहेब आंबेडककारांना मानवंदना
महू(मध्यप्रदेश) : महू (डॉ.आंबेडकर नगर) या ऐतिहासिक छावणी शहराची स्थापना १८१८ मध्ये ब्रिटिश अधिकारी जॉन मॅल्कम यांनी केली. आज हे शहर भारतीय सेना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीमुळे विशेष ओळखले जाते. त्यामुळेच या शहराला “डॉ. आंबेडकर नगर (महू)” असेही संबोधले जाते. दरवर्षीप्रमाणे महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन मानवंदना देण्याऐवजी यावर्षी सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील समता सैनिक दलाच्या महिला सैनिकांनी आयुनि आशा रवी सोनवणे यांनी एक वेगळा उपक्रम राबवला. महाराष्ट्र राज्याचे संघटक, पुणे व सातारा जिल्ह्याचे प्रभारी तसेच समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमी असलेल्या मध्य प्रदेशातील महू येथे धम्मसहलीचे आयोजन करण्यात आले. या धम्म सहलीच्या नियोजनासाठी भारतीय बौध्द महासभा शाखा पुणे शहर चे अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे मेजर जनरल राजरत्न थोरात यांनी सर्व महिला सैनिकांना मदत केली व धम्म सहलीसाठी शुभेच्छा दिल्या.
धम्म सहलीतील सहभागींनी सुरवातीला डॉ.बी आर आंबेडकर बौध्द विहार पंचशील नगर इंदोर येथे भंते प्रग्याशील यांच्याकडून त्रिशरण पंचशील ग्रहण केले. सर्व सहभागींनी महाराष्ट्र राज्याचे संघटक, पुणे व सातारा जिल्ह्याचे प्रभारी तसेच समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली भीमजन्मभूमी महू येथे भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाच्या सैनिकांसह उपासक व उपासिका यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. भीमजन्मभूमी महू येथील विहारात ठेवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी कलशाला वंदन करण्यात आले. यानंतर त्रिशरण, पंचशील, बुद्ध पूजा, भीमस्मरण आणि भीमस्मृती सामुदायिक पठण करण्यात आले. येथील सर्व फोटो संग्रह ही पाहण्यात आला. यावेळी आबा दणाणे यांनी वामनदादा कर्डक यांचे ‘भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो’ हे गीत गायले व इतर महिला उपासकांनी भीम गीते गाऊन वातावरण धम्ममय केले.या धम्मसहलीमुळे सहभागी सैनिकांना प्रेरणा, ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकीची नवी जाणीव मिळाली. या धम्म सहलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपासक उपासिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी अमरावतीचे भारतीय महसूल सेवेतील(Indian Revenue Service-IRS) आयु.अविनाश थेटे म्हणाले,”मी बाबासाहेबांच्या कृपेमुळे इथपर्यंत आलो.जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच आहे.त्यामुळे कुटुंबासह आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलो आहोत.तुमच्या सर्व धम्म कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत.
यावेळी आयु. दादासाहेब भोसले यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना आपल्या दैनंदिन जीवनात उतरविण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, धम्मसहल ही केवळ एक यात्रा नसून ती आत्मपरिवर्तन आणि समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी प्रक्रिया आहे. बुद्धाच्या धम्माचा मार्ग स्वीकारून शिक्षण, संघटन आणि संघर्ष या तत्त्वांवर चालत समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. तसेच समता सैनिक दलाच्या माध्यमातून शिस्त, संघटन आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजहितासाठी कार्य करण्याचा संदेश त्यांनी दिला.
यांनतर डॉ.बी.आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विश्वविद्यालय डॉ.आंबेडकर नगर(महू) येथे भेट दिली.या विश्वविद्यालयातील आंबेडकर स्टडी सेंटर, येथील ग्रंथालय, अत्याधुनिक सेवा, शिक्षणाच्या संधी, विविध अभ्यासक्रम व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळ्यास वंदन करण्यात आले.यावेळी ऐतिहासिक आठवण सांगणारी गंभीर नदी पहिल्या ज्याठिकाणी भीमाबाई कपडे धुण्यासाठी जायच्या ते ठिकाण पाहण्यात आले.
या सहली दरम्यान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 18 व्या शतकात बांधलेला राजवाडा, (अहिल्या फोर्ट) कृष्णाबाई होळकर यांची छत्री-घाट व संग्रहालय पाहण्यात आली. या धम्मसहलीमुळे सहभागी सैनिकांना प्रेरणा, ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकीची नवी जाणीव मिळाली.
यावेळी समता सैनिक दलाचे सैनिक आशा रवी सोनवणे, छाया विजय परिहार,नीलम बाविस्कर, आशा नितीन वन्ने, सुरेखा किशोर चव्हाण, शालन अर्जुन कांबळे, सुनीता गायकवाड, कल्पना कांबळे, शोभा भंडारे, विमल भोसले, उपासिका रेखा मनोहर कांबळे, शारदा गंगावणे, आशा कांबळे, रंजना तांबे, रंजना बगाडे, सुमल भोसले, वंदना दणाणे, अलका कांबळे, सुवर्णा गायकवाड, जगाबाई मोरे, माया मनोहर कांबळे, सुनीता धनाजी चंदनशिवे, लीलाबाई माने, मनीषा कांबळे, गौतमी रणबागले, कल्पना कांबळे, मनीषा देखणे, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व)चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, सातारा तालुक्याचे माजी अध्यक्ष आबा दणाणे, उपासक रवी कांबळे, दिनकर आनंदा मोरे यांची उपस्थित होती.यावेळी दिनकर आनंदा मोरे व उपासिका सुनिता गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करून धम्माच्या मार्गावर चालण्याचे आव्हान केले.
ही धम्म सहल यशस्वी होण्यासाठी भारतीय बौध्द महासभा इंदोर चे ईश्वर इंगळे, आयु.शांताराम वाघ, विशाल इंगळे, केंद्रीय शिक्षक व समता सैनिक दलाचे मेजर आयु.उत्तम प्रधान यांनी सर्व सहकार्य केले. सर्वांची निवासाची व्यवस्था केली.
साहस Times :- छत्रपती संभाजीनगर येथील लेणी संवर्धन व जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कार्यकर्ते सूरज जगताप यांना यंदाचा प्रतिष्ठेचा “मिलिंद सन्मान पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. नागसेन फेस्टिव्हलच्या दशकपूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दि. २९, ३० व ३१ मार्च २०२६ दरम्यान लुम्बिनी उद्यान, मिलिंद महाविद्यालय, क्रांतिभूमी नागसेनवन येथे सायंकाळी ७ वाजता हा सोहळा पार पडणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या वेळी सन्मानित करण्यात येणार असून, सूरज जगताप यांच्या लेणी संवर्धन चळवळीतील योगदानाची विशेष दखल घेण्यात आली आहे. जगताप यांनी विशेषतः पितळखोरा लेणीच्या प्रचार-प्रसारासाठी मोठा कालावधी व्यतीत करत जनजागृतीचे काम सातत्याने केले आहे. छत्रपती संभाजीनगर हीच त्यांच्या कार्याची कर्मभूमी ठरली असून, याच भूमीतून त्यांना प्रथमच असा मानाचा पुरस्कार मिळत आहे. या सन्मानाबद्दल त्यांनी आपल्या सर्व हितचिंतकांचे तसेच प्रा. सुनील पुंडकर सर यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. तसेच नागसेन फेस्टिव्हलच्या आयोजकांनी त्यांच्या कार्याची घेतलेली दखल ही अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. हा पुरस्कार त्यांच्या कार्याला नवी उभारी देणारा ठरेल, अशी भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे.
सातारा : जिल्ह्यात खासदार, आमदारांची संख्या वाढल्याने भाजपच्या (BJP) नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपने बाजी मारली आहे. मंत्री शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने साताऱ्यात संख्याबळ नसतानाही भाजपने जिल्हा परिषद अध्यक्षपद ताब्यात घेतलं. मात्र, या निवडणुकीवेळी झालेल्या राड्यावरुन शिवसेना आणि भाजपात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. साताऱ्यातील या निवडीचा वाद आज अधिवेशन काळात सभागृहात दिसून आला. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे (Shashikant shinde) यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कारण, भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे ह्यांनी खोट ओबीसी प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय.
सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदावर ज्या व्यक्ती बसल्या आहेत त्या खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. मात्र, त्या ओबीसी आरक्षित असलेल्या अध्यक्षपदावर बसल्या आहेत. ज्या दिवशी अध्यक्षपदाची निवड होती त्या दिवशी सकाळी 11 वाजता त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतले आहे. याचाच अर्थ खोट्या दाखल्याचा वापर करून त्यांची अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. त्यामुळे, याची तत्काळ चौकशी करावी अशी मागणी शशिकांत देसाई यांनी सभागृहात केली.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ‘स्वबळा’चा नारा देत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेनेच्या नेत्यांना टार्गेट केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीशी तडजोड करुन निवडणुकीत 65 पैकी सत्तेसाठी बहुमतासाठी आवश्यक 35 जागा मिळविल्या. परंतु, भाजप विरुद्ध सर्व असे चित्र जिल्हा परिषद निवडणुकीत निर्माण झाल्याने भाजपला केवळ 27 जागांवर समाधान मानावे लागले. तरीही भाजपने ऑपरेशन लोटसचा प्रयोग करत विरोधकांचे पाच सदस्य फोडून 30 विरूध्द 33 मतांनी जिल्हा परिषदेत सत्ता आणली. त्यावरुन, आता भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलाच दुरावा निर्माण झाला आहे. तर, राष्ट्रवादीनेही साताऱ्यातील घटनेवरुन भाजपविरुद्ध नाराजी व्यक्त केलीय.
खटाव तालुक्यातून जिल्हा परिषद अध्यक्ष
जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे यांनी निवड झाली आहे. डॉ. शिंदे या खटाव तालुक्यातील असून त्या सर्वसाधारण जागेवर निवडून आल्या आहेत. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीदिवशी त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र प्राप्त केले. त्यामुळे, त्या ओबीसी प्रवर्गातून अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. सातारा जिल्हा परिषदेवर मागील चार वर्षे प्रशासक राजवट होती. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी निवडणूक झाली. त्यानंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली.
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाच जिल्हा परिषद सदस्यांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्यानं सत्ता भाजपनं मिळवली. भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष झाल्या तर राजू भोसले उपाध्यक्ष झाले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत गंभीर आरोप केले आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जात आहे,” असा घणाघात गोरेंनी केला. पालकमंत्री कालपासून विनाकारण आकांडतांडव करत आहेत. मागेपुढे पाच गाड्यांचा ताफा घेऊन फिरणे आणि पोलिसांची हरेसमेंट करणे हे त्यांचे नित्याचे झाले आहे. चौकात पोलीस दिसला नाही तर त्याला सस्पेंड करण्याच्या धमक्या दिल्या जातात. साक्षात पोलीस अधीक्षकांशी बोलताना सुद्धा ते एखाद्या घरगड्याशी बोलल्यासारखे वागतात, हे अत्यंत निंदनीय आहे.जिल्हा परिषद अध्यक्षांची ही निवडणूक होती, त्यात पालकमंत्र्यांना आत जाण्याची काय गरज होती?” असा सवाल गोरेंनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजवर कधीही अशा पद्धतीने बैठक लागली नव्हती, मग कालच ती कशी लागली? असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला विचारला.
फलटण :- पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी गेली तब्बल ४२ वर्षे प्रामाणिकपणे पार पाडणारे नाव म्हणजे ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे. सन १९८४ मध्ये बारामती येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक केकावली मधून कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. अनिल साबळे आणि माजी खासदार अमर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या लेखणीची धार अधिक तीक्ष्ण केली. यानंतर १९८७ साली फलटण येथे त्यांनी साप्ताहिक गंधवार्ता ची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली हे वृत्तपत्र सातत्याने प्रगती करत राहिले आणि १९९४ मध्ये त्याचे दैनिकात रूपांतर करून त्यांनी पत्रकारितेत नवा आदर्श निर्माण केला. गेल्या चार दशकांहून अधिक काळात त्यांनी निर्भीड पत्रकारितेची परंपरा जपली आहे. लाचखोरी, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, अतिक्रमण, आरोग्य सुविधा आणि महिलांवरील अन्याय अशा अनेक ज्वलंत विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या प्रभावी लेखणीमुळे अनेक प्रश्नांना न्याय मिळाला आणि प्रशासनालाही सतर्क व्हावे लागले. राजकीय लेखनात त्यांच्या खास शैलीची छाप दिसून येते. म्हणी, पद्यात्मक मथळे आणि प्रभावी मांडणी यामुळे त्यांचे लेखन वाचकांच्या मनात घर करते. चांगल्या निर्णयांना पाठबळ देतानाच चुकीच्या धोरणांवर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. या प्रवासात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, मात्र न्यायालयाने सत्याच्या बाजूने निकाल देत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध केले. पत्रकारितेसोबतच त्यांनी संघटनात्मक कार्यातही मोलाची भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे संचालक तसेच सातारा जिल्हा वृत्तपत्र मालक-मुद्रक-संपादक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. पत्रकारांच्या हक्कांसाठी त्यांनी विविध आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला आणि पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासाठी लढा दिला. फलटण एस.टी. आगाराच्या कारभाराविरोधातील आंदोलनातही त्यांनी पुढाकार घेतला. आंबेडकरी चळवळीतही त्यांनी सक्रिय योगदान दिले. दलित पॅंथरच्या स्थापनेपासून सामाजिक न्यायासाठी ते सातत्याने लढत राहिले. अन्यायाविरोधातील चळवळींना शासन दरबारी पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी आपल्या लेखणीतून केले. त्यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी करण्यात आला आहे. २०१२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचा सन्मान, २०१७ मध्ये भीमस्फूर्ती पुरस्कार, २०१९ मध्ये मूकनायक पुरस्कार आणि २०२३ मध्ये महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘ज्येष्ठ संपादक दर्पण’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहितासाठी झटणाऱ्या, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहणाऱ्या आणि पत्रकारितेचा आदर्श जपणाऱ्या शामराव अहिवळे यांना मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या लेखणीला अधिक बळ मिळो आणि त्यांचे कार्य असेच प्रेरणादायी राहो, हीच सदिच्छा.
सातारा प्रतिनिधी :- सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे. भारतीय जनता पार्टीने सर्व प्रकारचे राजकीय डावपेच वापरून अध्यक्षपदी प्रियाताई शिंदे आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड करून सत्ता हस्तगत केल्याचा आरोप राज्याचे पर्यटन मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, ही निवड प्रक्रिया लोकशाहीला धक्का देणारी असून प्रशासन व पोलिसांचा गैरवापर करून दडपशाहीचे राजकारण करण्यात आले. या संपूर्ण प्रकाराविरोधात न्यायालयात खाजगी एफआयआर दाखल करून न्याय मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह पालकमंत्री देसाई यांनी सातारा पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हटले की, पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे चित्र दिसून आले. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाची मागणी मुख्यमंत्रीांकडे करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यांच्या मते, निवड प्रक्रियेच्या वेळी जिल्हा परिषद इमारतीत सुमारे २०० पोलीस साध्या वेशात तैनात होते. मंत्री असूनही स्वतःशी पोलिसांनी दांडगाईची वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला. धक्काबुक्कीत त्यांच्या हाताला दुखापत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. सदस्यांना अडवणे व अटक केल्याचा आरोप देसाई यांनी पुढे सांगितले की, काही सदस्यांना मतदानापासून रोखण्यासाठी अटक करण्यात आली, तर काहींना जबरदस्तीने थांबवण्यात आले. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे अध्यक्षपदी निवडून आल्या, तर उपाध्यक्षपदी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक राजू भोसले यांची निवड झाली. निवड प्रक्रियेदरम्यान सदस्य कामेश कांबळे यांना मतदानासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “साताऱ्याच्या राजकारणाला काळा दिवस” — मकरंद पाटील मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही या घटनेचा निषेध करत म्हटले की, सातारा जिल्ह्याच्या प्रगल्भ राजकारणाला या प्रकारामुळे धक्का बसला आहे. महाबळेश्वर येथे असलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांना ताब्यात घेण्यासाठी महिला पोलिसांच्या गाड्या पाठवून त्यांच्या खोल्यांची झडती घेण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, हा प्रकार साताऱ्याच्या इतिहासातील काळा दिवस ठरेल. विरोधकांचा इशारा : न्यायालयीन व रस्त्यावरचा संघर्ष विरोधी पक्षनेते शशिकांत शिंदे यांनीही भारतीय जनता पार्टीवर टीका करत सांगितले की, ही सत्ता लोकशाही मार्गाने नव्हे तर प्रशासनाच्या मदतीने बळाचा वापर करून मिळवली आहे. त्यांनी आरोप केला की, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना महाबळेश्वरला नेण्यात आले, जेणेकरून ते मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीत. संबंधित सदस्यांनी स्वतः अपहरण न झाल्याचे सांगूनही पोलिसांनी दखल घेतली नाही. या सर्व प्रकाराविरोधात न्यायालयीन लढाईसह रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रमुख उपस्थिती या पत्रकार परिषदेला माजी आमदार दीपक चव्हाण, खासदार नितीन पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर, राजकुमार पाटील, विराज शिंदे तसेच जिल्हा परिषदेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्हा परिषद निवडीतील या घडामोडींमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील काळात या प्रकरणाचे पडसाद न्यायालयीन आणि राजकीय पातळीवर उमटण्याची शक्यता आहे.
सातारा प्रतिनिधी :- सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. संख्याबळ असूनही राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांना धक्का देत भाजपने दोन्ही पदांवर विजय मिळवला. या निकालानंतर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत प्रशासन आणि भाजपवर तीव्र आरोप केले. “बहुमताचा अपमान, लोकशाहीवर आघात” शंभूराज देसाई यांनी निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “ज्यांच्याकडे स्पष्ट बहुमत होते, त्यांना योजनाबद्ध पद्धतीने दूर ठेवण्यात आले. हा लोकशाहीवर थेट आघात आहे.” साताऱ्याची राजकीय परंपरा जपणारे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची पायमल्ली झाल्याचा आरोप त्यांनी केला. “दडपशाहीचा वापर करून निकाल वळवला” मकरंद पाटील यांनी आरोप करत सांगितले की, संपूर्ण निवड प्रक्रिया ही प्रशासनाच्या मदतीने प्रभावित करण्यात आली. त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे: सदस्यांवर दबाव टाकण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर काही सदस्यांना मतदानापासून रोखण्यासाठी खोटे गुन्हे दाखल महिला सदस्यांना मानसिक त्रास देऊन त्यांची उपस्थिती कमी करण्याचा प्रयत्न निवडणूक दिवशी गोंधळ; मंत्री जखमी निवड प्रक्रियेच्या दिवशी जिल्हा परिषद परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमल्याने परिस्थिती चिघळली. पोलीस आणि नेत्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमध्ये शंभूराज देसाई जखमी झाले. सत्ताधारी नेत्यांनाच पोलिसांशी संघर्ष करावा लागल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. थेट आरोप-प्रत्यारोप; नेत्यांमध्ये वाद या संपूर्ण प्रकरणात भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करण्यात आली. महायुतीतील नेते एकमेकांविरोधात उघडपणे बोलू लागल्याने आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील राजकारणावर परिणाम? या घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. महायुतीतील अंतर्गत तणाव वाढल्यास आगामी निवडणुकांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणीही जोर धरू शकते