Sunday, September 20, 2026
Homeसातारासातारा जिल्हा परिषद निवडीत राजकीय वादळ : सत्तेसाठी प्रशासनाचा गैरवापर केल्याचा गंभीर...

सातारा जिल्हा परिषद निवडीत राजकीय वादळ : सत्तेसाठी प्रशासनाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप


सातारा प्रतिनिधी :-  सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे. भारतीय जनता पार्टीने सर्व प्रकारचे राजकीय डावपेच वापरून अध्यक्षपदी प्रियाताई शिंदे आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड करून सत्ता हस्तगत केल्याचा आरोप राज्याचे पर्यटन मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.
देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, ही निवड प्रक्रिया लोकशाहीला धक्का देणारी असून प्रशासन व पोलिसांचा गैरवापर करून दडपशाहीचे राजकारण करण्यात आले. या संपूर्ण प्रकाराविरोधात न्यायालयात खाजगी एफआयआर दाखल करून न्याय मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पालकमंत्री देसाई यांनी सातारा पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हटले की, पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे चित्र दिसून आले. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाची मागणी मुख्यमंत्रीांकडे करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
त्यांच्या मते, निवड प्रक्रियेच्या वेळी जिल्हा परिषद इमारतीत सुमारे २०० पोलीस साध्या वेशात तैनात होते. मंत्री असूनही स्वतःशी पोलिसांनी दांडगाईची वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला. धक्काबुक्कीत त्यांच्या हाताला दुखापत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सदस्यांना अडवणे व अटक केल्याचा आरोप
देसाई यांनी पुढे सांगितले की, काही सदस्यांना मतदानापासून रोखण्यासाठी अटक करण्यात आली, तर काहींना जबरदस्तीने थांबवण्यात आले. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे अध्यक्षपदी निवडून आल्या, तर उपाध्यक्षपदी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक राजू भोसले यांची निवड झाली.
निवड प्रक्रियेदरम्यान सदस्य कामेश कांबळे यांना मतदानासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
साताऱ्याच्या राजकारणाला काळा दिवस” — मकरंद पाटील
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही या घटनेचा निषेध करत म्हटले की, सातारा जिल्ह्याच्या प्रगल्भ राजकारणाला या प्रकारामुळे धक्का बसला आहे. महाबळेश्वर येथे असलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांना ताब्यात घेण्यासाठी महिला पोलिसांच्या गाड्या पाठवून त्यांच्या खोल्यांची झडती घेण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
त्यांच्या मते, हा प्रकार साताऱ्याच्या इतिहासातील काळा दिवस ठरेल.
विरोधकांचा इशारा : न्यायालयीन व रस्त्यावरचा संघर्ष
विरोधी पक्षनेते शशिकांत शिंदे यांनीही भारतीय जनता पार्टीवर टीका करत सांगितले की, ही सत्ता लोकशाही मार्गाने नव्हे तर प्रशासनाच्या मदतीने बळाचा वापर करून मिळवली आहे.
त्यांनी आरोप केला की, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना महाबळेश्वरला नेण्यात आले, जेणेकरून ते मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीत. संबंधित सदस्यांनी स्वतः अपहरण न झाल्याचे सांगूनही पोलिसांनी दखल घेतली नाही.
या सर्व प्रकाराविरोधात न्यायालयीन लढाईसह रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
प्रमुख उपस्थिती
या पत्रकार परिषदेला माजी आमदार दीपक चव्हाण, खासदार नितीन पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर, राजकुमार पाटील, विराज शिंदे तसेच जिल्हा परिषदेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्हा परिषद निवडीतील या घडामोडींमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील काळात या प्रकरणाचे पडसाद न्यायालयीन आणि राजकीय पातळीवर उमटण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments