Friday, September 18, 2026
Homeफलटणडॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक २च्या खिडक्यांची तोडफोड; शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक २च्या खिडक्यांची तोडफोड; शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अज्ञात समाजकंटकांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी; कंपाउंड वॉल व कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाचीही मागणी

फलटण | प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक २ येथील शाळेच्या खिडक्यांची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याने विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शाळेच्या इमारतीच्या खिडक्यांची तोडफोड नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, शैक्षणिक संस्थेच्या मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रकार गंभीर असून, संबंधित अज्ञात व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समस्त भीमसैनिक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शाळेच्या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने अशा प्रकारांना वाव मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शाळेला कंपाउंड वॉलची मागणी

शाळेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसराला तातडीने कंपाउंड वॉल अथवा योग्य कुंपण उभारण्यात यावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. शाळेचा परिसर संरक्षित केल्यास अनधिकृत प्रवेश तसेच रात्रीच्या वेळी होणाऱ्या गैरप्रकारांना काही प्रमाणात आळा बसण्यास मदत होऊ शकते.

याशिवाय शाळेच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शासकीय मालमत्तेचे संरक्षण यासाठी नगरपरिषद प्रशासनाने केवळ तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दोषींवर कारवाईची मागणी

शाळा हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या भविष्यातील जडणघडणीचे महत्त्वाचे केंद्र आहे. अशा ठिकाणी तोडफोड होणे ही चिंतेची बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करून दोषी व्यक्तींचा शोध घेण्यात यावा आणि कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळेच्या परिसराची पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे. नगरपरिषद प्रशासन या घटनेची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि शाळेच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करते, याकडे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments