





संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा २०२५ ची अधिसूचना पाहिली तर लक्षात येते की मुख्य परीक्षेसाठी घेता येणाऱ्या वैकल्पिक विषयांची संख्या २६ आहे. यात पूर्वी लिहिल्याप्रमाणे अनेक विषयांचा समावेश आहे. उदाहरणार्थ जिऑलॉजी, बॉटनी, लॉ, तत्वज्ञान (फिलॉसॉफी). या यादीत २६ व्या क्रमांकावर आहे, पुढीलपैकी कोणत्याही भाषेचे साहित्य. या यादीत असामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराथी, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलगू, उर्दू आणि इंग्रजी अशा २३ भाषांचा समावेश आहे. म्हणजे या २३ पैकी कोणत्याही भाषेचे साहित्य हा वैकल्पिक विषय म्हणून उमेदवार घेऊ शकतात.
संघ लोकसेवा आयोगाने हे एवढे व्यापक पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून दिले आहेत. यातून या परीक्षेतून निवड होणारे उमेदवार कसे विविध प्रकारच्या राज्यातून, विविध विषयांचा अभ्यास करून आलेले असतात हे लक्षात येईल. पूर्वी नागरी सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेत दोन वैकल्पिक असायचे. त्यावेळी साहित्य विषय घेणाऱ्या उमेदवारांची सांख्य खूप मोठी होती. आता काही वर्षांपासून एकच वैकल्पिक विषय मुख्य परीक्षेसाठी असतो त्यामुळे साहित्य विषय घेणाऱ्या उमेदवारांची संख्या बरीच कमी झाली आहे.
आपण वरच्या यादीत पाहिलंच आहे की २३ भाषांमधल्या साहित्याचा वैकल्पिक विषय म्हणून समावेश आहे. प्रत्येक भाषेच्या साहित्यात काही महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्याबद्दल उमेदवाराला माहिती असणं आवश्यक असतं. पण काही सर्वसाधारण स्वरूपाचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात, हे विषय कोणत्याही भाषेच्या साहित्यासंदर्भात विचारले जाऊ शकतात. साहित्य या विषयाच्या अभ्यासाचा तुम्हाला प्रशासनात काय उपयोग आहे? तुम्ही जे साहित्य वाचलं आहे त्यातली कुठली गोष्ट तुम्हाला रोजच्या कामात उपयोगात आणता येईल असं तुम्हाला वाटतं ? साहित्याला समाजाचा आरसा का म्हणतात? साहित्य, समाज आणि कलाकृती यांचा अनुबंध कसा असतो? साहित्य हा वैकल्पिक विषय म्हणून का निवडला अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्याच उत्तर व्यवस्थित तयार करून ठेवावं.
हे सदर मराठी भाषेमधून असल्यामुळे आजच्या लेखात आपण मराठी वाङ्मय हा वैकल्पिक विषय घेणाऱ्या उमेदवारांना मराठी बद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहूया. १९९० साली भूषण गगराणी (आयएएस, सध्या मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त) यांनी मराठी साहित्य आणि इतिहास हे दोन ऐच्छिक विषय घेत भारतात तिसरा क्रमांक पटकावला आणि मराठी साहित्य हा ऐच्छिक विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १९९० ते २००० या दशकात एकदम वाढली. कालांतराने ती संख्या कमी झालेली दिसत आहे. पण मराठी साहित्य ऐच्छिक विषय असणाऱ्या उमेदवारास मुलाखतीत कोणते प्रश्न विचारले जातात याविषयीची माहिती आम्ही या सदरातून आपणास देत आहोत.
कोणत्या मराठी साहित्यकाराला / साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? कोणत्या साहित्यकाराला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे? मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेपासून झाला? मराठी भाषेच्या उगमाचे स्राोत कोण कोणते आहेत? प्राचीन, मध्ययुगीन वा अर्वाचीन तुम्हाला मराठी साहित्यातला कुठचा साहित्य प्रकार आवडतो? मराठी साहित्यातले मुख्य प्रवाह किंवा प्रकार कोणते? एकूण मराठी साहित्यविश्वात दलित वाङ्मयाचे स्थान काय आहे? दलित साहित्य हे विद्रोही साहित्य आहे का? इतर कोणत्याही भारतीय भाषेपेक्षा मराठीत दलित साहित्य मोठ्या प्रमाणावर का लिहिले गेले असे तुम्हाला वाटते? नामदेव ढसाळ यांचे मराठी साहित्यात योगदान काय आहे? विजय तेंडुलकर यांच्या घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकाविषयी तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रात नाट्य परंपरा खूप मोठी आहे, मराठीतले महत्त्वाचे नाटककार कोण आहेत? संत वाङ्मयाचे एकूण मराठी साहित्यात काय योगदान आहे असे तुम्हाला वाटते? तुमचे आवडते साहित्यिक कोण? त्यांच्या लेखनाबद्दलची कुठची गोष्ट तुम्हाला भावते? मराठीतल्या काही महत्वाच्या साहित्य कृतींचे इंग्रजी अनुवाद झाले आहेत का? मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्याचा नेमका काय फायदा होईल? मुलांना प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण द्यावे की इंग्रजी? बोली भाषा आणि प्रमाण भाषा यात काय फरक आहे? मराठी भाषेच्या भवितव्यासाठी आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत?
मराठी वाङ्मय या विषयाचा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास करताना ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास केला असेल त्या सर्वच मुलाखतीसाठी महत्त्वाच्या आहेत. एखाद्या मराठी साहित्यिकाला एखादा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार जाहीर झाला असेल तर त्याबद्दलही माहिती उमेदवाराला असली पाहिजे. साहित्य, कला, संस्कृती या सर्वांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे त्यामुळे अशा प्रकारचे परस्पर संबंधित प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्रातले काही साहित्यिक हे राष्ट्रीय स्तरावर माहिती आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल, त्यांच्या लिखाणाबद्दल चांगली माहिती असलीच पाहिजे.
हे काही उदाहरणादाखल मराठी साहित्यावरचे प्रश्न दिले आहेत. इतर भाषांच्या साहित्या बद्दल त्या त्या साहित्यानुसार प्रश्न विचारले जाऊ शकतात.
mmbips@gmail.com
supsdk@gmail.com


अहिल्यानगर : हवामान विभागाने जिल्ह्यात उद्या, गुरुवारी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी पिवळा इशारा (यलो ॲलर्ट) जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात आज, बुधवारी ऑरेंज ॲलर्ट जारी केला होता. अनेक भागात वादळी वारे वाहिले तसेच तुरळक स्वरूपात पाऊसही झाला.
मेघगर्जनेवेळी, विजा चमकताना किंवा वादळीवारे वाहतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकलपासून दूर राहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे व विद्युत दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा रोहित्राजवळ थांबू नये. जाहिरात फलकाच्या (होर्डिंग्ज्) दुर्घटना टाळण्यासाठी दक्षता घ्यावी.
विजा चमकताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा.
धरणाच्या पाण्यात वा नदीच्या प्रवाहात उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. वादळी वारा, पाऊस व गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच नियोजन करावे. वादळी वारे, वीज, पाऊस, गारपिटीपासून जनावरांच्या संरक्षणाची दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


कोल्हापूर : कर्नाटक राज्य शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका वाढला आहे. कर्नाटक शासनाचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रविवारी दुपारी एक वाजता सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. खासदार, आमदारांसह सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत नेमलेल्या लवादानेही उंची वाढवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे, त्याचा अहवाल प्रसिद्ध करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. कर्नाटक शासन उंची वाढवण्यावर ठाम असून, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने हे काम थांबले आहे. कोणत्याही परिस्थितीत धरणाची उंची वाढवू देणार नाही, त्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली जाईल. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी सांगितले.
मेळाव्याला खासदार शाहू छत्रपती, धैर्यशील माने, धनंजय महाडिक यांच्यासह बाधित तालुक्यांतील आमदार, कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्स, ग्रीन मर्चंट असोसिएशन, कोल्हापूर धान्य व्यापारी संघटना, शेतकरी संघटना, सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अलमट्टी धरणाची सध्या १२५ टीएमसी पाणी साठा क्षमता आहे. धरणाची उंची ५ मीटरने वाढवल्यानंतर ही क्षमता ३०० टीएमसीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे महापुराची शक्यता, भीती अधिकच वाढणार असल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले.
अलमट्टी धरणाची उंची वाढल्याने पावसाळ्यात पाण्याची तुंबी वाढून काेल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराची भीती आहे. दुसरीकडे तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्याला पावसाळ्यातील वाट्याचे पाणी धरणातच राहिल्याने दुष्काळाची भीती सतावत आहे. यावेळी, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील-भुयेकर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टे, चंद्रकांत पाटील, सखाराम चव्हाण, मारुती पाटील उपस्थित होते.
पंचगंगा, कृष्णा नदीला २००५, २००१९, २०२१ साली आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात हाहाकार उडाला. अनेकांचे प्राण गेले, अनेकांचे संसार उघड्यावर पडले, हजारो एकर शेतीचे नुकसान झाले. या प्रत्येक महापुरावेळी कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी हे धरण कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्राकडून करण्यात आला. कर्नाटकाकडून अलमट्टी धरणातून पाणी न सोडण्यात आल्याने कृष्णेच्या पाण्याचा फुगवटा वाढत जाऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याचा दावा महाराष्ट्राकडून करण्यात आला. मात्र आता कर्नाटक सरकारने ते या धरणाच्या भिंतीची उंची ५१९ मीटरवरून आणखी पाच मीटरने वाढवून ५२४ मीटर करणार असल्याचे जाहीर केले आहे.
