उद्धव ठाकरेंच्या स्वागताची जळगावमध्ये जय्यत तयारी, मानराज पार्क परिसरात होणार जाहीर सभा
Source link
उद्धव ठाकरेंच्या स्वागताची जळगावमध्ये जय्यत तयारी, मानराज पार्क परिसरात होणार जाहीर सभा
Jawan Box Office Collection: ‘जवान’चा बॉक्स ऑफिसवर डंका! अवघ्या ३ दिवसांत केली छप्परफाड कमाई

‘जवान’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ५३.२३ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी ७४.५ कोटी रुपयांची कमाई केली असून, एकूण २०२.७३ कोटी रुपयांचे कलेक्शन जमवले आहे. ‘जवान’ रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात होता. ‘जवान’ने या सगळ्या अपेक्षांची पुरती केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानने दुहेरी भूमिका साकारली आहे. त्याची एक भूमिका वडिलांची आणि दुसरी भूमिका मुलाची आहे. या दोन्ही पात्रांमध्ये चाहत्यांना तो खूप आवडला आहे. विजय सेतुपती या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर, दीपिका पदुकोण, संजय दत्त यांनी कॅमिओ भूमिका केल्या आहेत. याशिवाय सुनील ग्रोव्हर, संजीता भट्टाचार्य, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांसारखे स्टार्सही चित्रपटात दिसले आहेत.
CM Eknath Shinde : जी २० परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, पीएम मोदींचं नाव घेत म्हणाले…

दिल्लीत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जी २० देशांची १८ शिखर परिषद दिल्लीत पार पडत आहे. या परिषदेसाठी जगभरातील राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी देखील या परिषदेत सहभागी होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Atul Kulkarni Birthday: दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अतुल कुलकर्णींबद्दल ‘हे’ माहितीये का?

अतुल कुलकर्णी यांनी केवळ मराठीच नव्हे तर , हिंदी, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. या दरम्यान, त्यांनी १९९५मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचा डिप्लोमा केला. त्यानंतर ते पूर्णपणे चित्रपटांकडे वळले. ‘भूमि गीता’ या चित्रपटातून अतुल कुलकर्णी यांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. यानंतर, अतुल कुलकर्णी यांनी प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, नाशिक पुण्यासह २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वरुणराजाने जोरदार पुनरागमन केलं आहे. त्यामुळं सामान्यांसह बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Source link
Anurag Kashyap Birthday: अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेले ‘हे’ हटके बॉलिवूड चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

अनुराग कश्यपचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाला. त्याचा सुरुवातीचा प्रवास अतिशय संघर्षमय होता. मनोज वाजपेयी यांनी राम गोपाल वर्मा यांना लेखक म्हणून अनुराग कश्यप यांचे नाव सुचवले होते. अशाप्रकारे अनुराग कश्यपला सौरभ शुक्लासोबत ‘सत्या’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. २००३मध्ये अनुरागने ‘पांच’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. मात्र, त्याचा हा चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झालेला नाही. अनुराग कश्यप ‘रमन राघव २.०’, ‘मनमर्जियां’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘देव डी’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याचे काही चित्रपट हे प्रत्येकाच्या वॉच लिस्टमध्ये असायलाच हवेत.
संभ्रमाचे मिथक: रात्र आणि दिवस

- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Special Article Write By Datta Patil Sadar Name Is Sanbhrmache Mihak
दत्ता पाटील2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गावातले ढोलताशे थांबल्यानं आता आज्ज्याचा खोकला नीट ऐकू येऊ लागलाय. लांब दाट कडूलिंबाच्या झाडांशी कावळ्यांच्या झुंडी कोणाला तरी जातीबाहेर हुसकावण्यासाठी कालवा करू लागल्याहेत.. वरून थवा चुकलेला नि मागे राहिलेला करकोचा जिवाच्या आकांतानं ओरडत मावळतीकडं उडत चाललाय.. रातकिड्यांना रात्रही कमी पडत असल्यानं दिवसाही त्यांनी त्यांच्या करवती आवाजांना मोकळं सोडून दिलंय.. एक अंधार वगळला, तर रात्र नि दिवस ह्यात काही फरकच ऱ्हायला नाहीय…
पाऊस काही नीट आला नाही. पाऊस केव्हाही येऊन सतत कोसळत राहिल, असा काळोख रोज दाटून येतोय; पण पाऊस येत नाही. घरात नव्वदीचा आज्जा दिवसा-रात्री खोकत राहतो. दिवसा आसमंतात खूप आवाज घुमत राहतात. बैलांचे, गायींचे, मेंढरांच्या कळपांचे, मोबाइलांच्या रिंगटोनांचे, रिळांचे, साळुंक्या, कावळे, आकाशातून जाणाऱ्या विमानांचे आवाज मिक्स होत राहतात. त्यामुळे दिवसा आज्ज्याच्या खोकल्याचा आवाज बाहेर येत नाही. त्यामुळं ‘काय म्हंतोय म्हातारा?’ या बांधापलिकडच्या प्रश्नांना, ‘दिवसा चांगला राहतो, रातच्याला जीव जाईल यवढा खोकलतो..’ असं उत्तर असतं. पाऊसही आज्ज्यासारखाच. सतत असतो आणि त्याचवेळी नसतोही.
मघाशी जेवताना मोबाइलवर ‘अचानक ढगफुटीने जोरदार पाऊस’ ही बातमी पाहिली. नद्या-नाले एकाच पावसानं फुल्ल भरल्यामुळं लोक खूश होते. शेतातली पिकं पुरासोबत निघून गेल्याचा आक्रोश करणाऱ्याकडं कॅमेरामन सेकंदभर थांबला नि आनंद व्यक्त करणाऱ्या टोळ्यांकडं निघून गेला. एकाच दिवसात सगळं काही तुडुंब भरणारा पाऊस आवडू लागलाय लोकांना. चार महिने थांबून राहायची गरजच नाही. इलेक्शन आलं की, आठवडाभरात रस्ते नीट होतात, पाणी रेग्युलर यायला लागतं, गॅसचे भाव कमी होतात.. इलेक्शनच्या काळापुरतीच लोकशाही हवी. त्यानंतर राबवायला ती परवडत नाही. मध्येच लोकशाहीचं कोणी बोलायला लागलं की ते बेमोसमी वाटायला लागतं.
गावातले नोकरीतून निवृत्त झालेले शहाणे, सुखी, समृद्ध लोक हसतात यावर. आता आहे तीच खरी लोकशाही आहे, असं त्यांचं ठाम मत आहे. आधीच्या सरकारातला सगळा काळ नोकरीरूपी छळछावणीत, पारतंत्र्यात गेला. दरवेळी लागू होत गेलेला वेतन आयोग, मिळणारा फरक, मुलांचे शिक्षण, करिअर, नोकरी, आई-वडिलांच्या अपेक्षा इत्यादी गोष्टीत व्यस्त असल्यानं देशातील तत्कालीन लोकशाहीकडं त्यांना लक्षच देता आलं नव्हतं. निवृत्त होता होता किंवा निवृत्तीनंतर योगायोगानं सरकारही बदलल्यानं आणि तेही सतत लोकशाही, लोकशाही असं बोलत असल्यानं गावातले अनेक निवृत्त लोकांना या लोकशाहीच्या संगोपनार्थ देवळांमध्ये, सभामंडपात, सोशल मीडियावर जबरदस्त क्रांतिकारी चळवळ उभी करता येऊ लागली आहे. त्याकाळी मिळत असलेला पगार हा हक्क होता आणि निवृत्तीनंतर आता मिळणारी पेन्शन हा ईश्वरी प्रसाद आहे, असा डायलॉग गेल्या सत्तर वर्षातील चाळीस वर्ष नोकरीरूपी पारतंत्र्यात घालवून आता ‘राष्ट्रउभारणी हीच उद्याची गरज’ या मिशनमध्ये झोकून दिलेल्या काकांनी कालच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या मीटिंगमध्ये हाणला. गावातल्या मंदिराच्या सभोवताली असलेल्या जागेत जॉगिंग ट्रॅक तयार व्हावा, असा प्रस्ताव कालच्या मीटिंगमध्ये झालाय. थोडक्यात, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना सरकार बदललं आणि बदललेल्या लोकशाहीचा आनंद निवृत्तीमुळे तमाम निवृत्त काकांना छान घेता येऊ लागलाय.
गावाचं गावपण संपवून शहरी मध्यमवर्गीय विचारसरणीचे अतोनात संस्कार घराघरात जाऊन केले जाऊ लागल्यानं आमच्या वावरांमधल्या बऱ्याच दोस्त लोकांच्या पडवीत संत तुकोबांच्या, संत नामदेवांच्या, गांधी-नेहरूबाबाच्या फोटोशेजारी दाढीवाले चार-दोन बाबा-बुवा ऐटीत जाऊन बसले आहेत. जरा वेळापूर्वी गावातून ढोल-ताशे ऐकू येत होते. धाकट्या भावाला विचारलं, तर म्हणला, ‘गॅसचे भाव कमी केल्यानं मिरवणूक काढण्यात आलीय..’ मी म्हणलो, ‘मग काल पण वाजत होते फटाके, डीजे.. ते का?’ तर बोलला, ‘गणपतीत रात्री बारापर्यंत ढोल-ताशा, डीजे वाजवायची परवानगी मिळाल्याच्या आनंदात पोरं नाचत होती.’ परवा ग्रामदैवताला सत्यनारायण घातला गावातल्या नेत्यानं. येणाऱ्या जाणाऱ्याला महाप्रसाद ठेवला. देश चंद्रावर पोचल्याच्या आनंदात. पंधरा दिवसापूर्वी सप्ताह बसला होता गावात. मोठ्या मंडपात. दर महिन्याला काहीतरी चालू असतं. गाव असं सतत बिझी राहतं. सप्ताह चालू असताना दोनदा भूरभूर पाऊस आला. कीर्तनकार बुवा म्हणले, ‘आपण न मागता प्रेम करत राहावं ईश्वरावर. बघा, कसा धुवांधार पाऊस सुरू झालाय. हा ईश्वरीय प्रसाद!’ हळूहळू सगळी गावं सारखीच दिसायला लागलीयत. माणसं पण. ती या गावची की त्या गावची, कळत नाही आता. गावातली दुकानं, हॉटेली, बाहेरच्या झिरमिळ्या, लायटिंग, वेफर्स, चिवड्या-शेंगदाण्याच्या पाकिटांच्या माळा.. सगळीकडं सारखंच.
पाऊस नाही. खोकणाऱ्या आजोबाला काहीच माहीत नाही. खूप पावसाळे पाहिले असतील त्यानं नि खूप उन्हाळेही. तो केव्हाही हे जग सोडेल. त्याचा फोटोही नसेल घरात. गेल्यावर खुर्चीत ठेवायला लागेल. पण, रोज रात्रीचं त्याचं खोकणं रानात घुमत जातं, तेव्हा तो जगातून कधीतरी नाहीसा होईल, यावरचा विश्वास उडून जातो. त्यामुळं फोटोही शोधणं राहून जातं. रान हिरवं दिसतंय. पण ते शेतकऱ्याला जगण्यासाठी पुरेसं नाही. शेत नसलेल्या जागेवरची खुरटी हिरवळ हा गावाकडचा निसर्ग अन् समृद्धी वाटून खूप लोकांचा आमच्या तक्रारींवर विश्वास बसत नाही. आम्ही दुष्काळाची, आलेल्या पिकाला भाव नसल्याची तक्रार करताच सोशल मीडियावर गावातले शहरी, सुशिक्षित लोक आमच्यावर तुटून पडतात. ‘सतत सरकारबद्दल तक्रार करणाऱ्यांना शेजारच्या देशात कायमचं पाठवायला पाहिजे,’ हे वाक्य रोज एकदा तरी ग्रुपवर कोणीतरी टाकत असतं.
कंटाळा येतो काम करत राहण्याचा. लहान भाऊ सतत मोबाइलवर बोलताना शेतात काम करत राहतो. बोलणं नसतं तेव्हा गाणी लावतो यूट्यूबवर. जेवताना रिळं पाहात हसत राहतो. मध्येच सहा सहा महिने गावात नव्यानं झालेल्या मॉलसदृश किराणा मालाच्या दुकानात कामाला जातो. महिना पाच हजार कमावतो. त्यानं हप्त्यानं मोबाइल घेतला मागंच. आजोबा आहे तोवर लग्न करावं त्याचं, असा विचार गेली तीन वर्ष सुरू आहे घरात, नातलगात. आजोबा जात नाही आणि ह्याचं लग्नही होत नाही. तोही प्रयत्न करत नाही. दिवसा कामात नाहीतर गावात. त्याचा भोवताली वावर असा नीट नसल्यानं त्याचं असणं-नसणं सारखंच. कधी लागले तर पैसे मागंल. ते लगेच मिळत असल्यानं पुढे संवादही नीट होत नाही. त्याची सगळी मित्रमंडळीही अशीच. कोणाचाही वाढदिवस असो, पार्टी आमच्या मळ्यातच. बोकड किंवा कोंबडीची सोय करून द्यावी लागते. गावात हल्ली बऱ्याच घरांमध्ये मटण खाल्लं जात नाही. त्यामुळं घरातील नवी पोरं ढाब्यावर किंवा इकडं आमच्या मळ्यात येतात. बाटल्या घेऊन. आताही तो निळी जीनची पँट नि पिवळा टोपीवाला टी शर्ट घालून गावात मटण आणायला पैसे घेऊन गेलाय.
मघाशी ऊन होतं. आता कोपऱ्याला ढग आलेत गोळा होऊन. आलाच तर गावशिवाराचा एखादा कोपरा ओला होईल. कुणीतरी व्हिडिओ काढून ‘अमुक गावात धुवांधार पाऊस.’ असं व्हाटस् अॅपवर टाकंल संध्याकाळी. तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला, देशाला, जगाला वाटंल की गावाची ददात मिटली! गावातले ढोलताशे थांबल्यानं आज्ज्याचा खोकला नीट ऐकू येऊ लागलाय. लांब दाट कडूलिंबाच्या झाडांशी कावळ्यांच्या झुंडी कोणाला तरी जातीबाहेर हुसकावण्यासाठी कालवा करू लागल्याहेत… वरून थवा चुकलेला नि मागे राहिलेला करकोचा जिवाच्या आकांतानं ओरडत मावळतीकडं उडत चाललाय… रातकिड्यांना रात्रही कमी पडत असल्यानं दिवसाही त्यांनी त्यांच्या करवती आवाजांना मोकळं सोडून दिलंय… एक अंधार वगळला, तर रात्र नि दिवस ह्यात काही फरकच ऱ्हायला नाहीय…
दत्ता पाटील
dattapatilnsk@gmail.com
संपर्क : ९४२२७६२७७७
पुस्तकामागच्या गोष्टी: काळामागे पडलेला ‘भारतीय-इंग्लिश’ लेखक

- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Special Story Sadar Of Pustakamaagchy Ghoshti Write By Aadubal
आदूबाळ5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
रुड्यार्ड किप्लिंग
काही इंग्रजीत लिहिणारे अभारतीय लेखक त्यांच्या मूळ देशापेक्षा भारतातच जास्त प्रसिद्धी राखून असतात. पी. जी. वूडहाऊस, जेफ्री आर्चर ही त्यातली काही नावं. रुड्यार्ड किप्लिंग हे नाव त्यातच धरायला हवं. ‘जंगल बुक’ या कार्टून मालिकेमुळे किप्लिंग यांचा परिचय भारतातल्या मुलांना बऱ्यापैकी लहानपणी होतो. या पुस्तकाचा मूळ लेखक या नात्याने त्यांची इतर पुस्तकं वाचायला अनेक जण प्रेरित होतात. या दरम्यान कधीतरी किप्लिंग यांचा भारताशी असलेला घनिष्ठ संबंध कळतो आणि त्यांच्याबाबत आणखीच आपुलकी वाटायला लागते. पण, इंग्लंडमध्ये मात्र त्यांना अभिमानास्पद लेखकांच्या मांदियाळीत गणलं जात नाही. का ते पाहूया…
किप्लिंग यांचा जन्म १८६५ मध्ये मुंबईत झाला. त्यांचे वडील जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकलेचे अध्यापक होते. (किप्लिंग यांचा जन्म झाला, ते घर आजही नीलफलक धारण करून आहे.) किप्लिंग परिवार स्वतःला अँग्लो-इंडियन समजे – म्हणजे भारताशी घनिष्ठ संबंध राखणारे इंग्रज. किप्लिंगचं भारतप्रेम आणि दोन्ही संस्कृतींशी असलेला प्रेमळ संबंध याने त्यांच्या लेखनावर अत्यंत प्रभाव टाकला. तत्कालीन अँग्लो-इंडियन मध्यमवर्गीय परंपरेप्रमाणे आई-वडिलांनी त्यांना इंग्लंडमध्ये शिकायला धाडलं. किप्लिंगना इंग्लंड अजिबात मानवलं नाही. त्यांचा अर्धा जीव भारतात अडकला होता. कसेबसे धक्के खात शेवटी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी लाहोरच्या इंग्रजी दैनिकात उपसंपादकाची नोकरी धरली. मुंबईचा किनारा पाहिल्यावर त्यांना हायसं वाटलं. “त्या क्षणानंतर,” ते आपल्या आत्मचरित्रात लिहितात, “माझा ‘इंग्लिश काळ’ कायमचा संपला.” त्यानंतर पुढच्या आयुष्यात इंग्लंडला परतले तरी त्यांनी आपल्या मनात भारताविषयीचा एक तुकडा कायम जिवंत ठेवला.
आज आपल्याला दिसतात ते किप्लिंग लाहोरच्या दैनिकातील नोकरीमुळे घडले. संपादक बदलत राहिले, पण त्यांनी किप्लिंग यांना संपूर्ण लेखनस्वातंत्र्य दिलं होतं. पोटापाण्याची चिंता न राहिल्याने संपूर्ण ताकद लेखनात ओतणं आता त्यांना शक्य झालं. लवकरच फौजी आयुष्यावर लिहिलेल्या विनोदी चारोळ्यांचा संग्रह ‘डिपार्टमेंटल डिटीज’ प्रकाशित झाला. त्यानंतर आपलं लेखन वाचणार कोण, हा प्रश्न त्यांना कधीच पडला नाही. लघुकथा, दीर्घकथा आणि शेवटी कादंबऱ्या – त्यांचा वाचकवर्ग वर्धिष्णू होत राहिला. ‘जंगल बुक’ हे १८९४ मध्ये लिहिलेलं पुस्तक हा वस्तुतः लघुकथांचा संग्रह आहे. त्याची लोकप्रियता पाहता त्यांनी या पुस्तकाचा दुसरा भाग लगोलग १८९५ मध्ये प्रकाशित केला. ‘किम’ ही माझी स्वतःची अत्यंत आवडती कादंबरी १९०१ मध्ये प्रकाशित झाली. किंबॉल ओहारा (उर्फ किम) या एका आयरिश सैनिकाच्या अनाथ मुलाची कहाणी त्यात आहे. या चलाख मुलाला शिक्षण देऊन रशिया-इंग्लंड यांच्यातील राजनैतिक हेरगिरीच्या खेळात ओढलं जातं, पण एका तिबेटी लामाच्या मैत्रीमुळे किमचा प्रवास अध्यात्म मार्गावर सुरू राहतो. कथावस्तू, पात्र, आणि तत्कालीन भारताची निसर्गवर्णने यामुळे ही कादंबरी अत्यंत वाचनीय झाली आहे.
एक काळ असा होता की, किप्लिंग यांची लोकप्रियता इंग्लंडमध्येही अमाप होती. १९०७ मध्ये त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं. पण, वसाहतवादाच्या अंतानंतर किप्लिंग यांची मते लोकांना टोचायला लागली. त्यांचं भारतावरचं प्रेम एकीकडे, पण वसाहतवाद त्यांच्या लेखनात अंतःप्रवाहासारखा वाहतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, ‘व्हाइट मॅन्स बर्डन’ ही त्यांची कविता, ज्यात वसाहतवादाचं उघड उघड समर्थन आहे. इतकंच नाही तर ‘गरीब बिचाऱ्या मागास लोकांच्या आयुष्याचं कोटकल्याण करणे ही गोऱ्या लोकांची जबाबदारी आहे,’ असं प्रतिपादन ते करतात.
हेच ते ‘गोऱ्या कातडीचं ओझं’! यामुळे वसाहतीकरणाच्या कृत्याला एकाएकी तात्त्विक बैठक मिळाली. त्यांच्या लेखनाचं आज वाचन करता इतरही अडचणीच्या गोष्टी जाणवतात. त्यांची पात्रं विशिष्ट पूर्वग्रहांना खतपाणी घालतात. पण तरीही, किप्लिंग वर्णद्वेष्टे होते असं म्हणवत नाही. लेखनात पूर्वग्रह असले, तरी ते दोन्ही बाजूंनी आहेत. उदा. सुप्रसिद्ध ‘गंगादिन’ या कवितेतला गंगादिन युद्धभूमीवरचा भिस्ती असतो. कवितेचा निवेदक, एक गोरा सोजीर, गंगादिनला हिडीसफिडीस करतो, वाईट वागवतो. पण ऐन लढाईत जखमी निवेदकाला गंगादिन स्वतःच्या जीवावर खेळून वाचवतो आणि शेवटी निवेदक गंगादिनची थोरवी मान्य करतो. (पूर्वग्रह टाळून ललित लेखन करणं ही जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे याबाबत किप्लिंग यांचा दयाबुद्धीने विचार करावा, अशी वाचकांना विनंती!)
वसाहतीकरणाच्या अंतानंतर जेव्हा मनातूनही वसाहतवाद नष्ट करण्याची चळवळ पाश्चात्त्य जगात सुरू झाली, तेव्हा आपोआप किप्लिंग जुनाट, कालबाह्य वाटू लागले. ते नि:संशयपणे आपल्या काळाचं अपत्य होते, पण काळच त्यांना मागे टाकून पुढे गेला.
—-
आदूबाळ
aadubaal@gmail.com
माझ्या हिश्श्याचे किस्से: जेव्हा प्राण यांनी ऋषी कपूरच्या चित्रपटातील ‘आजोबा’च्या भूमिकेला नकार दिला होता!

- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Specail Article Majhya Hisshyache Kisse Write By Rumi Jaffrey On Pran Saheb
रूमी जाफरी8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘उपकार’मधील ‘मलंग चाचा’च्या भूमिकेत प्राण. ही व्यक्तिरेखा त्यांनी इतक्या प्रभावीपणे साकारली की ती अजरामर झाली.
प्राण साहेबांनी ऋषी कपूर यांना यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद दिला. ‘या चित्रपटात तुम्हाला आजोबांची भूमिका करायची आहे,’ असं सांगताच ते म्हणाले, ‘मी तुझ्या चित्रपटात काम करणार नाही.’ आमचे चेहरे पडले. आम्ही विचारलं, ‘का?’ तर म्हणाले, ‘नाही, मी तुम्हाला कारण नाही सांगू शकत…’
माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी आज तुम्हाला प्रसिद्ध, दिग्गज अभिनेते “प्राण’ साहेबांबद्दल काही सांगणार आहे. प्राण साहेबांचा चित्रपट प्रवास १९४० मध्ये लाहोरमधून पंजाबी चित्रपट “यमला जट’ आणि १९४२ मध्ये “खानदान’ या हिंदी चित्रपटांपासून सुरू झाला. नूरजहाँ या ‘यमला जट’मध्ये बालकलाकार होत्या आणि त्याच ‘खानदान’मध्ये प्राण साहेबांच्या नायिका होत्या. म्हणजे नूरजहाँ प्राण साहेबांच्या पंजाबी आणि हिंदी दोन्ही चित्रपटांमध्ये होत्या.
असो. प्राण साहेबांनी अनेक चित्रपट केले. पण दरम्यान १९४७ मध्ये फाळणी झाली तेव्हा ते मुंबईत आले आणि त्यांना पुढचे काही महिने अडचणीत काढावे लागले. मग सआदत हसन मंटो यांनी, प्रसिद्ध लेखिका इस्मत चुगताई यांचे पती शाहिद लतीफ यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. ते “जिद्दी’ हा चित्रपट बनवत होते आणि त्यांनी प्राण साहेबांना त्यामध्ये काम दिले. यामध्ये देव आनंद आणि कामिनी कौशल हे मुख्य कलाकार होते. प्राण साहेब काही नवीन कलाकार नव्हते, ते लाहोरमध्ये खूप काम आणि नाव कमावून आले होते. फाळणीने त्यांच्या कारकीर्दीला नक्कीच ब्रेक लावला होता, पण त्यामुळे ते थांबले नाहीत. त्यांनी भारतात “जिद्दी’तून पुनरागमन केले. जिद्दी सुपरहिट झाला आणि त्यांच्या कारकिर्दीची गाडी धावू लागली. त्यानंतर प्राण साहेबांना आयुष्यभर चित्रपटांची कमतरता भासली नाही. खलनायक म्हणून त्यांनी इतके चांगले काम केले की, लोकांच्या मनात त्यांनी स्वतःबद्दल इतका तिरस्कार निर्माण केला की, लोक आपल्या मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्याचे टाळू लागले.
दुसरीकडे, मनोज कुमार यांनी मात्र मोठी जोखीम पत्करून प्राण साहेबांच्या या प्रतिमेवर नव्हे, तर त्यांच्या अभिनयावर आणि प्रतिभेवर विश्वास ठेवत त्यांना आपल्या “उपकार’ चित्रपटात सकारात्मक भूमिका दिली. ही व्यक्तिरेखा प्राण साहेबांनी इतक्या प्रभावीपणे साकारली की ती अजरामर झाली. त्यानंतर त्यांनी अभिनयात खूप प्रयोग केले. वेगळा लूक, वेगळा गेटअप, व्हॉइस मॉड्युलेशन असे विविध प्रयोग केले. नकारात्मक, सकारात्मक आणि विनोदी भूमिकाही केल्या. ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’, ‘साधू और शैतान’ यांसारख्या अनेक चित्रपटांत कॉमेडीही केली. पण, माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी एक अशी घटना सांगणार आहे, जिचा मी स्वत: साक्षीदार आहे. प्राण साहेब किती भावुक होते आणि नात्यांच्या बाबतीत ते किती संवेदनशील होते, हे त्यातून सिद्ध होते.
हा किस्सा माझ्याच चित्रपटाशी संबंधित आहे. १९९७ मध्ये ऋषी कपूर यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली होती आणि ते दिग्दर्शनात पाऊल टाकण्याच्या तयारीत होते. चित्रपटाला कथा माझी होती. कलाकार निवडण्याची वेळ आली तेव्हा नायकाच्या म्हणजेच अक्षय खन्नाच्या आजोबांच्या भूमिकेवर खूप विचार करण्यात आला. ही भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. अनेक नावांचा विचार केल्यावर चिंटूजी अर्थात ऋषी कपूर म्हणाले की, आपण प्राण साहेबांना घेऊयात. “आरके’ला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. प्राण साहेब “आरके’चे सर्वात जुने अभिनेते आहेत, त्यांच्याशी आपले कौटुंबिक नातेही आहे.
या कल्पनेने सर्वांनाच उत्साह आला आणि आम्ही सगळे प्राण साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचलो. प्राण साहेबांना खूप आनंद झाला. त्यांनी ऋषी कपूर, रणधीर कपूर यांना खूप प्रेमाने, आदराने वागवले आणि “आरके”ला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याचा त्यांना खूप आनंद झाला. ऋषी कपूर यांचे अभिनंदन करुन त्यांना नव्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. ज्या कामात (दिग्दर्शनात) ते पाऊल टाकणार आहेत, त्यात यशस्वी व्हावं, असा आशीर्वादही दिला. यात तुम्हाला आजोबांची भूमिका करायची आहे, असं सांगताच ते म्हणाले, “मी तुझ्या चित्रपटात काम करणार नाही.’ आमचे चेहरे पडले. आम्ही विचारलं, “का?’ तर म्हणाले, “नाही, मी तुम्हाला कारण नाही सांगू शकत…’ मग आम्ही म्हणालो, “तुम्ही कथा तर ऐका. कथा आवडली नाही, भूमिका आवडली नाही तर करू नका.’ ते म्हणाले, “नाही, मी चित्रपटच करणार नाही.’ मग चिंटूजींनी आग्रह केला आणि म्हणाले, ‘तुम्ही कारण तर सांगा.’ त्यावर ते म्हणाले, “हे बघ चिंटू! माझं वय झालं आहे, माझी तब्येतही ठीक नाही. तुझं चित्रीकरण अर्ध्यात आल्यावर मला काही झालं तर मी वर जाऊन राज कपूरला काय तोंड दाखवू की मुलांचं नुकसान करून आलो म्हणून? त्यामुळं मी तुझा चित्रपट करणार नाही. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत.’
प्राण साहेब हे अशा महान विचारांचे माणूस होते. त्यांची ही गोष्ट आजतागायत माझ्या मनात घर करून आहे. कलाकार म्हणून मी त्यांचा खूप आदर करायचो, पण त्या दिवसापासून माणूस म्हणूनही मी त्यांचा मोठा चाहता झालो. प्राण साहेबांनी त्या दिवशी जिगर मुरादाबादींचा एक शेर ऐकवला होता, तो मी तुमच्यासाठी इथं लिहितो आहे…
गुदाज़-ए-इश्क़ नहीं कम जो मैं जवान ना रहा, वो ही है आग मगर आग में धुआँ ना रहा।
सुदैवाने मला त्यांच्यासोबत ‘साजन की बाहों में’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्याचे संवाद मी लिहिले होते. शूटिंग सुरू असलेल्या मढ आयलंडच्या बंगल्यात मी पोहोचलो तेव्हा पाहिलं की, सहायक प्राण साहेबांना सीन वाचून दाखवतोय आणि ते स्वत: उर्दूमध्ये लिहून घेताहेत. मी म्हणालो, “प्राण साहेब, तुम्ही म्हणाला असतात तर मी तुम्हाला उर्दूमध्येच लिहून दिले असते.’ ते म्हणाले, “आजकालच्या मुलांना येत नाही आणि या निमित्ताने माझाही सरावही होत राहतो.’ असो. शूटिंगदरम्यान त्यांच्याशी खूप गप्पा झाल्या, ज्या मी पुढे कधी तरी माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये लिहीन. तूर्तास तुम्ही प्राण साहेबांच्या “उपकार’मधील हे गाणे ऐका.. क़समे वादे प्यार वफ़ा, सब बातें हैं, बातों का क्या? स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.
– रूमी जाफरी
बॉलीवूड चित्रपटांचे
लेखक, दिग्दर्शक
रसिक स्पेशल: स्वर समृद्ध आशा…

सुहास किर्लोस्कर11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आशा भोसले यांच्या गाण्यातील वैविध्य, त्यासाठी त्यांनी लावलेला वेगळा आवाज, स्वरपट्टीची निवड, स्वरातील मिंड, खटके, मुरकी या आभूषणांच्या मोजक्या वापरासोबतच, युगल गीतांमध्ये कुशल सह-गायकांच्या सुरात सूर मिसळताना आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या आशाताई हा अभ्यासाचा विषय आहे. ‘या सुखांनो या..’ या गाण्याला चार चांद लावणाऱ्या आशाताईंनी, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘संगीतमय साथ देऊन’ आपल्या साऱ्यांचं जगणं सुख-सुरांनी समृद्ध केलं आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी परवा, ८ सप्टेंबरला ९० व्या वर्षात पदार्पण केले. त्या औचित्याने, त्यांच्या गाण्यांतील शब्द – अभिनयाची अदाकारी अन् तजेलदार सुरांच्या लयकारीची ही सफर…
पार्श्वगायन म्हणजे चित्रपटाच्या पडद्यावर असलेल्या कलाकाराच्या भावना प्रसंगाप्रमाणे व्यक्त करून गायन करणे. चित्रपटामध्ये असंख्य प्रकारचे प्रसंग असतात, अनेक प्रकारचे भाव गाण्यामधून व्यक्त होत असतात. पार्श्वगायनामध्ये आवाज फक्त ‘गोड’ असून चालत नाही, तर त्याला अभिनयाची जोड द्यावी लागते. राग, लोभ, प्रेम, रोमान्स, भक्ती, भीती, असूया, आनंद, आश्चर्य, अभिमान अशा अनेक प्रकारच्या भावना असलेल्या प्रसंगाला साजेशी गाणी लिहावी लागतात, त्याला संगीत द्यावे लागते आणि गायनामधून सादर करावी लागतात. भारतीय चित्रपटामध्ये कोणत्याही प्रसंगामध्ये नायक-नायिका तसेच खलनायक-नायिकासुद्धा गाणे म्हणू शकतात. या सर्व प्रकारच्या प्रसंगांची गाणी लीलया पेलणारा गळा असलेली गायिका आशा भोसले. असा हा गळा जन्मजात लाभलेला नसतो, त्यासाठी निरंतर शिकण्याची तपश्चर्या त्यांना करावी लागली आहेच; शिवाय बदलत्या काळानुसार आवाजाचा पोत बदलून त्या आवाजामध्ये गाणी पेश करण्याची कलाही त्यांनी अवगत केली आहे. या गाण्यांचा आवाका बघितल्यावर (ऐकल्यावर) असे काम इतके वर्षे एकच व्यक्ती कसे काय करू शकते, असा प्रश्न पडत राहतो.
लहान मुलांसाठी वयाने मोठ्या व्यक्तीने गाणी गाताना त्या मुलांच्या भाषेत गावे लागते. ‘उठी गोविंदा उठी गोपाळा’ (वसंत प्रभू) या गाण्यामधला आवाज लडिवाळ आहे. हे गाणे सकाळी ऐकल्यावर कोण जागे होणार नाही? त्याचप्रमाणे लहान मुलांच्या आवडत्या अंगाई गीतामध्ये ‘नन्ही कली सोने चली’, ‘चंदा रे छुपे रहना’ (लाजवंती – एस. डी. बर्मन) या गाण्यांचा आवाज मातृप्रेमाने ओतप्रोत भरलेला वाटतो. ‘दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ’ (घराना – रवी) या गाण्यात लहान मुलांच्या आवाजातील खट्याळ भाव आहेत. कुमारवयीन मुलांना ‘चल मेरे संग संग, ले ले दुनिया के रंग, हो जा रंगीला रे..’ (ए. आर. रहमान) अशी गाणी आपलीशी वाटतात. महाविद्यालयीन युवकांनी ‘बच के तू रहेना’ (कंपनी – संदीप चौटा) गाणे ऐकल्यावर त्यांची अवस्था ‘खल्लास’ असते. पण, त्यांना हे माहीत नसते की, या गाण्याची झिंग चढवणाऱ्या आशा भोसले या गाण्याच्या रेकोर्डिंगच्या वेळी ६० व्या वर्षात पदार्पण करत होत्या.
नवविवाहितांसाठी ‘स्वप्नात रंगले मी’, ‘जिवलगा कधी रे येशील तू’ (सुधीर फडके), ‘स्वप्नात साजणा येशील का’ (विश्वनाथ मोरे) अशा गाण्यांनी वेड लावणाऱ्या आशाताई, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’ (अनिल अरुण) अशा गाण्यातून वेगळाच खट्याळपणा दाखवतात. ‘साधी भोळी मीरा तुला कळली नाही’ (एन. दत्ता) या गाण्यामधून राधेचे कृष्णावरील प्रेम व्यक्त करताना त्या वेगळाच आवाज लावतात, ज्याला दुःखाची झालर आहे. ‘प्रेम वेडी राधा, साद घाली मुकुंदा’ (सुधीर फडके) या गाण्यामधल्या राधेला कृष्णाचा छंद लागला आहे, हे जाणवते. याउलट ‘राधा कैसे न जले, आग तन मन में लगे’ (ए. आर. रहमान) या गाण्यातली राधा कृष्णाच्या असूयेने कशी भावविवश झाली आहे, याचे प्रत्यंतर देताना आशाताईंनी गाण्याच्या शेवटच्या ‘राधा कैसे न जले..’ हीच ओळ हुंदक्याने दाटलेल्या गळ्याने गायली आहे. ‘मराठा तितुका मेळवावा’ चित्रपटातील ‘रेशमाच्या रेघांनी’ (आनंदघन) यासारख्या लावण्यांच्या ठसक्याबरोबरच, ‘नाव सांग गाव सांग’ गाण्यात ‘जा रं..’असं टेचात म्हणणाऱ्या आशाताईंनी अनेक गाण्यांमधील संवाद म्हणताना शाब्दिक अभिनयाचे दर्शन घडवले आहे. ‘हाए रे हाए तेरा घुंघटा’ (आर. डी. बर्मन) या गाण्यामध्ये त्यांनी ‘घुंघटाह’ असा जो उच्चार केला आहे, तो लाजवाब आहे. ‘बैल तुझे हरिणावाणी, गाडीवान दादा’ (सुधीर फडके) गाण्यामध्ये बैल हाकताना म्हटलेलं ‘हे सर्जा, आहा आहा’, ‘आप के कमरे में कोई रहता है’ (आर. डी. बर्मन) या गाण्यामधील ‘डर लगता है..’ अशी अनेक उदाहरणे देता येतील, जी गाणी अन्य कोणी सादर करायला धजावणार नाही. कारण सुरांचा तोल सांभाळताना साभिनय शब्द म्हणणे आव्हान असते.
संसारी स्त्रीच्या रूपात.. ‘मन वढाय वढाय’ (वसंत पवार) या गाण्यातला आशाताईंचा आवाज ऐकला आणि नंतर ‘वक्त’ चित्रपटातील .. “आगे भी जाने न तू’, ‘चेहरे पे ख़ुशी आ जाती है’ आणि ‘कौन आया के निगाहो में चमक जाग उठी’ (रवी) ही गाणी ऐकल्यावर हा एकाच गायिकेचा आवाज आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. एकाच गाण्यातील आवाजाच्या वैविध्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास ‘अब जो मिले हैं तो’ (आर. डी. बर्मन), ‘निगाहंे मिलाने को जी चाहता है’ (दिल ही तो है), ‘मेरी नजर है तुझ पे’ यांसारखी अनेक गाणी सांगता येतील. जितक्या सहजतेने त्यांनी, ‘या रावजी, बसा भावजी’, ‘इन आंखों की मस्ती के’ (खय्याम), ‘मेरा नाम है शबनम’ (आर. डी. बर्मन) यांसारखे नृत्याचे प्रकार पेश केले आहेत, तितक्याच सहजतेने त्या, ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ (हृदयनाथ मंगेशकर), ‘तोरा मन दर्पन कहलाए’ (काजल – रवी) अशा भजनांमधून श्रोत्यांना डोलायला लावतात.
‘भंवरा बडा नादान’ गाण्यामध्ये खोडकर भाव, “जुस्तजू जिसकी थी’ (खय्याम), ‘भोगले जे दुःख’, ‘खाली हाथ शाम आई है’ (आर. डी. बर्मन) अशा गाण्यांमध्ये दुःखाच्या अनेक छटा, ‘ओ मेरे सोना रे’ गाण्यांमधली छेडछाड, ‘पिया तू अब तो आजा’, ‘नहीं नहीं अभी नहीं’ अशा गाण्यांमधील उन्मादक भावनांचे अनेक पदर, ‘सजना है मुझे सजना के लिये’ गाण्यातला सोज्वळ शृंगार (रवींद्र जैन) असे भावनांचे हिंदोळे एकच गायिका सादर करू शकते, याचे आश्चर्य वाटते. इतकेच नव्हे, तर मद्यप्राशन करून गाणे गायल्याचा अभिनय त्यांनी, ‘आओ हुजूर तुम को’ (ओ. पी. नय्यर) या गाण्यात असा केला आहे की, त्यातील सूर आणि अभिनयामधील तारेवरची कसरत सांभाळून ऐकवलेले उचक्यांमधील वैविध्य अचंबित करणारे आहे. भारतातील अनेक भाषांमधील आशाताईंनी गायलेली गाणी तितकीच श्रवणीय आहेत, हे खरेच. ‘आसबो आर इक दिन आज्जाई’ हे बंगाली गाणे, ‘आउंगी इक दिन आज्जा’ इतकेच श्रवणीय आहे. ‘माचेर कांटा खोनपार कांटा’ या गाण्यातील शब्दांच्या उच्चारामध्ये बंगाली मिठास आहे. वेगवेगळ्या देशांतील संगीत वैविध्यपूर्ण असते, त्यामुळे तिथला बाज ओळखून गायलेल्या ‘खतुबा’तील (अलिबाबा और चालीस चोर – आर. डी. बर्मन) अरेबिक संगीताचा लहेजा अनोखा आहे.
आशा भोसले यांच्या गाण्यातील वैविध्य, त्यासाठी त्यांनी लावलेला वेगळा आवाज, स्वरपट्टीची निवड, स्वरातील मिंड, खटके, मुरकी या आभूषणांच्या मोजक्या वापरासोबतच, युगुल गीतांमध्ये कुशल सह-गायकांच्या सुरात सूर मिसळताना आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या आशाताई हा अभ्यासाचा विषय आहे. ‘या सुखांनो या..’ या गाण्याला चार चांद लावणाऱ्या आशाताईंनी, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘संगीतमय साथ देऊन’ आपल्या साऱ्यांचं जगणं सुख-सुरांनी समृद्ध केलं आहे. वयाचं बंधन नसलेल्या या सदाबहार, स्वरसमृद्ध गायिकेला अनंत शुभेच्छा!
—-
सुहास किर्लोस्कर
suhass.kirloskar@gmail.com
संपर्क : ९४२२५१४९१०

