


Monsoon Updates : यंदाच्या वर्षीचा उकाडा अधिक त्रासदायक असणार असा प्राथमिक इशारा या वर्षाच्या सुरुवातीलाच हवामान विभागानं जारी केला. तसं झालंसुद्धा मात्र, मे महिना या अंदाजासाठी अपवाद ठरलाय सहसा प्रचंड उकाड्याचा मारा करणाऱ्या या महिन्यानं यावेळी एक वेगळंच रुप दाखवलं. राज्यासह देशभरात मे महिन्यात चक्क जोरदार पावसानं हजेरी लावली. महाराष्ट्रात सुरुवातीला अवकाळी आणि आता मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यामुळं थेट मे वगळून जूनमध्येच पोहोचलो की काय, असाच अनेकांचा समजही होत आहे. त्यातच आता हा समज अधिकच पक्का होण्याचं कारण म्हणजे मान्सूनचं मुहूर्ताआधीच झालेलं आगमन.
अंदमान आणि निकोबार बेट समुहांमध्ये काही दिवसांपूर्वीच धडकलेल्या मान्सूननं पुढील रोखानं प्रवास सुरू केला आणि श्रीलंका व्यापल्यानंतर आता हे मोसमी वारे अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराचा काही भागसुद्धा व्यापताना दिसत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार 27 मे आधीच म्हणजेच पुढील 4 दिवसांमध्ये (25 मे 2025) मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळं या वाऱ्यांचा प्रवास अतिशयव वेगानं सुरू असून, यंदा वेळेाधीच या आनंदसरी देवभूमी केरळात आणि परिणामी महाराष्ट्रातही दाखल होण्याचं चित्र आहे.
मान्सूनच्या पुढील चार ते पाच दिवसांच्या वेळापत्रकाविषयी सांगावं तर, हे वारे अरबी समुद्राच्या दक्षिण भागासह लक्षद्वीपचा काही भाग, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागासह मालदीव आणि कोमोरिनचा उत्तरेकडी प्रांत व्यापतील आणि तिथं आपली पकड मजबूत करतील अशी स्थिती निर्माण होत आहे. मंगळवारी मान्सूनच्या वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला मात्र त्याआधी त्यानं मारलेली मजल मोठी होती ही बाब लक्ष देण्याजोगी.
मान्सूननं मारलेली ही मुसंडी पाहता 25 ते 27 जूनदरम्यान ते केरळात धडकतील आणि तिथंलं क्षेत्र व्यापल्यानंतर 1 ते 5 जूनदरम्यान हा मान्सून तळकोकणमार्गे महाराष्ट्राचं दार ठोठावणार हे चित्र स्पष्ट आहे .
हवामान विभागाच्या नव्या अंदाजांनुसार खरंच मान्सूननं चार पाच दिवसांत केरळ गाठलं तर, 2009 नंतर म्हणजेच 16 वर्षांमध्ये मुहूर्ताआधीच दाखल होण्याची ही मोसमी वाऱ्यांची पहिली वेळ असेल. त्यामुळं आता याच मोसमी वाऱ्यांच्याच प्रतीक्षेत सर्वजण आहेत म्हणायला हरकत नाही.
सामान्य प्रणाली पाहिली असला मोसमी पाऊस साधारण जून महिन्याच्या सुरुवातीलाच केरळात दाखल होतो. मात्र यावेळी तो तुलनेनं वेळेआधीच पोहोचणार असून, महाराष्ट्रातील त्याचा मुक्काम मोठा असू शकतो असाही प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.


डॉ. अरविंद परांजपे
डॉ. जयंत नारळीकर आणि माझा परिचय अगदी लहानपणापासूनचा. कारण, माझी आई आणि डॉ. मंगला नारळीकर या बहिणी. मी डॉ. नारळीकरांना लहानपणापासूनच भेटत होतो. मात्र, विज्ञान आणि त्यातील काम यानिमित्ताने आम्हा दोघांचा संबंध गहिरा झाला, तो १९९१पासून. तेव्हापासून मी ‘आयुका’तील कामात प्रत्यक्ष सहभागी झालो. त्याआधी मी बंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स’मध्ये होतो. ‘आयुका’ची सुरुवात झाली, तेव्हा नारळीकर सरांनी माझी हौशी आकाश निरीक्षकांना संपर्क साधण्याकरता नेमणूक केली होती. माझ्या कामातील मोठा भाग या निरीक्षकांना सुविधा पुरविण्याचा होता. त्यानंतर विज्ञान लोकप्रसाराची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आणि तेथून पुढे सलग २२ वर्षे मी ‘आयुका’त विज्ञान लोकप्रसाराचे काम केले.
मला आठवते, ‘आयुका’त दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान असायचे. एकदा नारळीकर सरांनी अमेरिकेतून आल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी ‘जेटलॅग’ असूनही हे व्याख्यान दिले होते. एकदा त्यांनी बांधिलकी दिली, की ते ती पूर्ण करत. विद्यार्थ्यांसाठी तर ते आवर्जून वेळ काढत असत. एकदा पुण्याजवळच्या ग्रामीण भागात एका संस्थेसाठी त्यांनी व्याख्यान द्यायचे कबूल केले. खूप आधी हा कार्यक्रम ठरला. काही दिवसांनी नेमक्या याच दिवशी दिल्लीतील एका कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण आले. मात्र, सरांनी दिल्लीचा कार्यक्रम मोठा असूनही त्यासाठी आपला आधीचा कार्यक्रम रद्द न करता दिल्लीतील कार्यक्रमाला नकार दिला होता. सरांनी त्यांच्या डायरीत एकदा नोंद केली, की ते तो बदलत नसत. विज्ञानप्रसाराचे काम करताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन, संशोधक यांची माहितीही स्थानिकांना व्हावी, याकडेही नारळीकर सरांचे लक्ष असे. पुण्यात किंवा आसपास एखादा परदेशी खगोलशास्त्रज्ञ वा संशोधक आला, तर नारळीकर सर त्याला आवर्जून ‘आयुका’त बोलावत आणि हौशी आकाश निरीक्षकांना त्या व्याख्यानाला निमंत्रति करत. विद्यार्थी आणि संशोधक यांच्यात थेट संवाद व्हावा, यासाठीही नारळीकर सर प्रयत्नशील असत.
(लेखक मुंबईतील नेहरू तारांगणाचे संचालक आहेत.)


पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) स्वारगेट येथील मुख्यालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी पीएमपीचे कार्यालय आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनचे (महामेट्रो) एकत्रित वाहतूक केंद्र (हब सेंटर) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महामेट्रो आणि पीएमपी प्रशासनाकडून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला आहे.
या आराखड्यामध्ये प्रवाशांसाठी वातानुकूलित प्रतीक्षाकक्ष, आसन व्यवस्था, ऑनलाइन तिकीट व्यवस्था, बस संचलनासाठी जागा, वाहनतळ, खाद्यपदार्थ आणि वस्तू विक्री केंद्र आदींचा समावेश असणार आहे. या ठिकाणी पीएमपीच्या कार्यालयाबरोबरच बस दुरुस्तीचे मुख्यालय स्थलांतरित केले जाणार आहे.
या नवीन हब सेंटरसाठी स्वारगेट येथील पीएमपीच्या मुख्यालयाची इमारत पाडण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत मुख्यालय तात्पुरत्या जागेत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पीएमपी आणि महामेट्रो यांच्यात करार करून साडेतीन एकर जागेत मुख्यालय आणि अत्याधुनिक बस स्थानक उभारण्यात येणार आहे. याबाबत साडेचार टक्के खर्चाचे शुल्क पीएमपी देण्यास तयार आहे.- दीपा मुधोळ-मुंडे,व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष, पीएमपीएमएल

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनलमध्ये मंगळवारी झालेल्या वळवाच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे हवाई प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागले. अनेक प्रवासी काही काळ टर्मिनलवरच अडकून पडले होते.
पुणे शहरात वळवाच्या पावसाने मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी हजेरी लावली. मंगळवारी दुपारी जोरदार पाऊस झाल्याने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. दरम्यान, विमानतळ परिसरात असणारी मलनि:सारण वाहिनी तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले. प्रवासी वाहनांना या पाण्यातून मार्ग काढावा लागला. नवीन टर्मिनलमधून बाहेर पडल्यानंतर सर्वत्र पाणी साचल्याने अनेक प्रवासी तेथेच अडकून पडले.
अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. येथील गैरसोयींबाबत समाजमाध्यमांवर संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. अनेकांनी बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह व्यक्त केले आहे, तर अनेकांनी विमानतळ व्यवस्थापन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.दरम्यान, याबाबत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापक संतोष ढोके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.

नांदेड : मोठ्या वलयांकित राजकीय घराण्यातील एक कन्या गेल्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात विधानसभेवर निवडून आली. आमदारपदाची शपथ घेऊन राजकीय आणि विधायक कार्यात सहभागी झाली. तिचा (म्हणजे श्रीजया चव्हाण) आमदारकीनंतरचा वाढदिवस येत्या २६ मे रोजी असून याच दिवशी भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेडमध्ये येत आहेत. या निमित्ताने काँग्रेसचे दोन माजी आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींची परंपरा हैदराबाद राज्याचे पहिले गृहमंत्री दिगंबरराव यांच्यापासून सुरू होते. पण या मतदारसंघाला राज्यभर ओळख दिली, ती शंकरराव चव्हाण यांनी. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अशोक आणि स्नूषा अमिता चव्हाण यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर या दाम्पत्याने आजोबांचा पारंपरिक मतदारसंघ त्यांच्या लाडक्या नातीकडे सोपविला आहे.
२००९ साली भोकर मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर तेथे चव्हाण परिवाराचा झेंडा फडकत आहे; पण पहिल्या तीन निवडणुकांत तेथे काँग्रेसची सरशी झाली तर श्रीजया चव्हाणांच्या माध्यमातून तेथे भाजपाचे ‘कमळ’ प्रथमच फुलले. १९६२ पासूनच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस विचारधारेतील उमेदवाराला कौल देणाऱ्या या मतदारसंघाने ६२ वर्षांनंतर नव्या-दुसऱ्या पक्षाला साथ दिली. नांदेडजवळच्या परभणी जिल्ह्याच्या मेघना बोर्डीकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले, पण चव्हाण परिवारातील श्रीजया यांना संधी मिळाली नाही.
भाषावार प्रांतरचनेनंतरच्या मंत्रिमंडळात शंकरराव चव्हाण थेट उपमंत्री झाले. पुढे १९९३ साली अशोक चव्हाण यांना आमदारकीच्या पहिल्या कारकिर्दीतच राज्यमंत्रिपदी संधी मिळाली. श्रीजयाच्या बाबतीत मात्र तसे घडले नसले, तरी दोन वर्षांनंतर तिला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, असा अशोक चव्हाण यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने ते भाजपामध्ये सक्रिय झाले असून गृहमंत्री अमित शाह यांच्या नियोजित दौऱ्याची सारी सूत्रे चव्हाण व त्यांचे समर्थक सांभाळत आहेत.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नांदेड दौऱ्याची २६ मे ही तारीख आणि आमदार श्रीजयांचा वाढदिवस हा केवळ योगायोग आहे का, किंवा वाढदिवसाचे निमित्त साधत चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे वरील तारीख मागितली, ते कळाले नाही. पण शंकरराव चव्हाण स्मृतिस्थळास गृहमंत्र्यांची भेट आणि भाजपाच्या बैठकीसाठी ‘भक्ती लॉन्स’ हे स्थळ टाळून ती आपल्या शिक्षण संस्थेच्या परिसरातील कुसुम सभागृहात आयोजित करणे, हा काही योगायोग नाही.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अशोक चव्हाण यांनी वरील वास्तूचे उद्घाटन आणि शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत केले होते. आता भाजपाचा एक राष्ट्रीय नेता प्रथमच चव्हाणांच्या शिक्षण संस्थेच्या परिसरात येत असून काँग्रेसचे दोन माजी आमदार आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश होण्याची शक्यता आहे.

मुंबई : मोसमी पाऊस पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. र्नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी जोरदार पडलेल्या वळवाच्या पावसाने मुंबईला झोडपून काढले.त्याचबरोबर मोसमी वारे या चार पाच दिवसांत दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, लक्षद्वीपचा काही भाग, केरळ आणि तामिळनाडूचा काही भाग, बंगाल उपसागराचा काही भाग आणि ईशान्येकडील राज्यांचा काही भाग तसेच मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भाग र्नैऋत्य मोसमी वारे व्यपतील अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. मोसमी वाऱ्यांनी सोमवारपर्यंत श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला होता.
तसेच, दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात वाटचाल केली होती. मालदीव आणि कोमोरिनच्या आणि बंगाल उपसागराच्या काही भागातही मोसमी वाऱ्यांनी मजल मारली होती. मात्र, मंगळवारी मोसमी वारे त्याच जागेवर थिजले होते.दरम्यान, हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, यंदा र्नैऋत्य मोसमी वारे २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होतील. गोव्यामध्ये १ जूनपर्यंत, तर महाराष्ट्रात मुंबई येथे ५ जूनपर्यंत मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेच्या म्हणजेच ३० मे रोजी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता.
दरम्यान, केरळमध्ये मोसमी पाऊस सामान्यत: १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवमान विभागाच्या तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आदी किंवा नंतर पावसाचे आगमन होऊ शकते (म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान) त्यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो.
मुंबई शहर तसेच उपनगरात मंगळवारी सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांच्या कडकडाटासह शहरात हलक्या सरी बरसल्या. तर घाटकोपर, विक्रोळी, बोरिवली, कांदिवली, जोगेश्वरी तसेच विरार परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
मुंबईसह, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले.
मंगळवारी संध्याकाळी मुंबईत पडलेल्या जोरदार पावसाने पश्चिम उपनगराला झोडपून काढले. अंधेरी जोगेश्वरी परिसरात एका तासात ६० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे भुयारी मार्ग वाहतूक पोलिसांनी बंद केला. त्यामुळे अंधेरी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. थोडासा पाऊस पडला की अंधेरी सबवे मध्ये पाणी साचते. त्यानुसार वळवाच्या पावसातच हा सबवे पाण्याखाली गेला आहे. पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिकेने हाती घेतलेली कामे रखडल्यामुळे या पावसाळ्यातही अंधेरी सबवे वारंवार बंद करावा लागणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. वेरवली ते विलवडे रेल्वे स्थानकादरम्यान दरड कोसळून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे मार्गावरील स्थानकांवर गाड्या थांबवून ठेवण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे प्रशासनाने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
मंगळवारी रात्री मुंबई शहर आणि उपनगरांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने, लोकल सेवा विस्कळीत झाली. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत पावसाचा जोर वाढल्याने, लोकल सेवा धिम्या गतीने मार्गस्थ होत होती. त्यामुळे प्रवाशांना परतीचा प्रवास करण्यास प्रचंड उशीर झाला. ठाणे, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, दादर, अंधेरी, कांदिवली, बोरिवली या भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे लोकल सेवा खोळंबली. अनेक लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी प्रचंड झालेली होती.

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरांनी कोथरूड भागातील दोन महिलांची ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर मार्च महिन्यात सायबर चोरांनी संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरांनी त्यांना दाखविले होते. महिलेने सुरुवातीला काही रक्कम चोरांच्या बँक खात्यात जमा केली. गुंतवणूक केल्यानंतर महिलेला परतावा देण्यात आला. परतावा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर महिलेने चोरांच्या बँक खात्यात वेळोवेळी ३३ लाख ४९ हजार रुपये गुंतविले. रक्कम गुंतविल्यानंतर चोरांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
दुसऱ्या एका घटनेत सायबर चोरांनी कोथरूड भागातील आणखी एका महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १० लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. चोरट्यांनी पाठविलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करावे, तसेच अनोळखी संदेश, लिंक उघडू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.