Saturday, July 11, 2026
Home Blog Page 216

कबीररंग: आचार्य प्रशांत आणि साधक ते शोधक प्रवासाचे भावसंचित

0
कबीररंग:  आचार्य प्रशांत आणि साधक ते शोधक प्रवासाचे भावसंचित


  • Marathi News
  • Opinion
  • Acharya Prashant And The Emotional Journey From Seeker To Seeker Divya Marathi Rasik Article By Hemkiran Patki

हेमकिरण पत्की5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आचार्य प्रशांत हे एक समकालीन आध्यात्मिक वेदांती, दार्शनिक, लेखक, अद्वैत शिक्षक, पशुप्रेमी, शुद्ध शाकाहाराचे प्रचारक आणि पर्यावरण संरक्षक म्हणून आपल्याला परिचित आहेत. त्यांनी जीवनाविषयीच्या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टीसह ‘प्रशांत अद्वैत फाऊंडेशन’ची स्थापना केली. भगवद्गीता आणि उपनिषदांच्या अभ्याससत्रांचं आयोजन या संस्थेमार्फत केलं जातं. मानवाच्या चेतनेचं सखोल परिवर्तन व्हावं, हा हे फाऊंडेशन स्थापण्यामागचा आचार्य प्रशांत यांचा उद्देश आहे.

आचार्य प्रशांत यांची प्रतिभा वेदांताच्या अभ्यास-आकलनानं तेजाळली आहे. त्यांच्या वाणीत जगातील विविध आध्यात्मिक धारांचा संगम असून, ती विशिष्ट परंपरेमुळं सीमित झालेली नाही. प्रशांतजींची जीवनसरणी कबीरांना आत्मीयतेनं अनुसरणारी आहे. ‘पानी में मीन प्यासी’, ‘हमन है इश्क मस्ताना’, ‘राम निरंजन न्यारा रे’, ‘प्रेम प्याला जो पिए’, ‘कबीर साहेब’, ‘भागे भला न होएगा’, ‘संत कबीर विचारदर्शन’ ही कबीरांवरील त्यांची ग्रंथसंपदा याची उत्तम साक्ष आहे.

प्रशांतजींनी कबीरांच्या दोह्यांवर, पदांवर उत्स्फूर्तपणे केलेलं भाष्य श्रोत्यांना, वाचकांना अंतर्मुख करायला लावणारं आहे. व्याकूळ होऊन ईश्वराचा शोध घेणाऱ्या साधकासाठी कबीरांच्या पदांतून व्यक्त झालेलं भावसत्य आपण समजून घेण्यासारखं आहे.

मोंको कहाँ ढूँढे बंदे,

मैं तो तेरे पास में,

ना मैं देवल ना मैं मसजिद,

ना काबे कैलास में।

ना तो कौने क्रिया-कर्म में,

नहीं योगबैराग में,

खोजी होय तो तुरतै मिलिहौं

पलभर की तालास में।

कहै कबीर सुनो भाई साधो,

सब स्वासों की स्वास में…

भक्तहृदयाला आर्त करणाऱ्या कबीरांच्या या पदात स्वत: भगवानच भक्ताला ‘नेति नेति’च्या अध्यात्मरीतीनं आपला वास श्वासाच्या अनुभूतीत असल्याचं, म्हणजे भक्तातच असल्याचं सांगतात. कबीर म्हणतात, ईश्वराचा शोध घेणारा त्याला अंत:करणाबाहेर म्हणजे देवळात, मूर्तीत, ग्रंथांत, विविध उपासनापद्धतीत, तीर्थक्षेत्रात, योगरीतींमध्ये शोधत राहतो. साधकांची ही बहि:र्मुख वृत्ती जाणून प्रशांतजी त्यांना प्रश्नांकित करतात, ते असं – हा ईश्वराचा शोध घेणारा कोण असतो? त्याच्या शोधामागची तळमळ कशासाठी असते? ईश्वराच्या शोधासाठी असते की स्वतःसाठी असते? हा जो शोधक असतो त्याचं मन अपुऱ्या इच्छांनी भरलेलं असतं का? तो या अपुऱ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी तर ईश्वराचा शोध घेत नसतो? मग त्या इच्छा भौतिक सुखासाठीच्या असोत किंवा जन्ममृत्यूच्या येरझारीतून मोकळं करणाऱ्या मुक्तीच्या असोत…

प्रशांतजी आपलं ध्यान कबीरांच्या पदातील शोधकावर केंद्रित करतात आणि कबीर या पदातून दर्शवतात तसा एक दुसराही शोधक असतो. त्याच्यापर्यंत साधकाच्या जाणिवेचा प्रवास घडवतात. या शोधकाला शोधायची वस्तू स्वतःहून प्रिय असते. त्याला आत्मभावाचं अप्रूप असतं. यासाठी तो आपले प्राणही समर्पित करायला तयार असतो. एखाद्या भोगसुखाच्या प्राप्तीनंतर किंवा जिवलगांच्या कायमच्या ताटातुटीनंतर काही शोधक ईश्वराच्या प्राप्तीचा शोध थांबवतात. मग हा शोध महत्त्वाचा की शोधक? ईश्वराच्या शोधात शोधक स्वतःचं अस्तित्व विसरून जाईल तेव्हाच त्याच्या ध्यानात येईल की, शोधप्रक्रिया आणि शोधण्याचा हेतू यांहून आपण महत्त्वाचे नाही. कारण त्याच्या जाणिवेचा आशय अहंभावाचा आहे.

स्वतःला जाणून घेतल्यावर ईश्वरप्राप्तीचा शोध घेता येईल, असं प्रशांतजी येथे सूचित करतात. आपण आपल्या मनाच्या आंदोलनांशी प्रामाणिक असलो, तर आपल्यातला ईश्वरशोधक केवढ्या विसंगतींनी भरलेला आहे, ते आपल्याला जाणवेल. आपल्याला वस्तुस्थितीचं यथार्थ भान नाही हे कळेल.‘मी’पणाचा आशय आपल्याला उमजलेला नाही, याचा बोध होईल. या ‘मी’वर कबीरांचं ध्यान केंद्रित असल्यानं प्रशांतजी आपल्याला तिकडं घेऊन जातात. त्यासाठी बाह्य जगाच्या प्रलोभनापासून दूर राहण्याचा उपदेश करतात.

कबीरांना बाह्य जगाविषयी अनासक्ती आणि अंतिम सत्याप्रति प्रेम वाटत होतं, हेच प्रशांतजीही सूचित करतात. कबीर आणि प्रशांतजी यांच्यातील हा एकात्म भाव आणि ईश्वराचा शोध घेणारा शोधक एकच असल्याचं भावसत्य आपल्याला जाणवतं. कबीरांच्या या पदातील… खोजी होय तो तुरतै मिलिहौं पलभर की तालास में… या चरणावरील प्रशांतजींचं चिंतन आपल्यातील चेतनेला उंच करत ईश्वराचा शोध घेणाऱ्या खऱ्या शोधकाशी जोडतं. समाजमनाची नस जाणलेल्या, व्यक्ती-व्यक्तींतील बंध सहजतेनं दृढ होण्यासाठी आणि त्यांची संवेदना स्वाभाविकतेनं उमलण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या थोर व्यक्ती स्थलकालाच्या भिन्न अवकाशातही समान धारणांसह आणि जीवनसूत्रांसह जीवन व्यतित करत असतात, हेच कबीर आणि आचार्य प्रशांतजी यांच्या विचार सायुज्यातून आपल्या लक्षात येतं. तसंच पूर्वसूरींनी दिलेलं भावसंचित पुढील पिढीनं सदोदित आपल्या जगण्याचं पाथेय म्हणून ओंजळीत जपायचं असतं, हेही उमजतं.

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link

काँग्रेसचे माजी नगरसेवक कोल्हापुरात शिवसेनेच्या वाटेवर; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

0
काँग्रेसचे माजी नगरसेवक कोल्हापुरात शिवसेनेच्या वाटेवर; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश


कोल्हापूर : कोल्हापुरातील काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाची कोंडी फोडतील, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात मुंबईत बैठक झाली. पालकमंत्री आबिटकर व आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढविल्या जाणार आहेत. काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. प्रवेशाची कोंडी लवकरच फुटेल, असेही कदम म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहर विकासासाठी १०० कोटींचा निधी मिळावा अशी मागणी पालकमंत्री आबिटकर, आमदार क्षीरसागर यांच्या माध्यमातून केली होती. पहिल्या टप्प्यात २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामधून रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याभोवती २ कोटी खर्चाचे स्मारक, फिरंगाईदेवी मंदिर विकासकामासाठी दोन कोटी रुपये मंजूर आहेत. पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी काँक्रिटच्या रस्त्यासाठी निधी मंजूर असल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, शेखर कुसाळे, वैभव माने आदी उपस्थित होते.

हेही वाचा





Source link

वेबमार्क: ‘ब्लॅक बॉक्स डायरीज’ एकाकी स्त्रीच्या संघर्षनोंदी

0
वेबमार्क:  ‘ब्लॅक बॉक्स डायरीज’ एकाकी स्त्रीच्या संघर्षनोंदी


  • Marathi News
  • Opinion
  • ‘Black Box Diaries’ A Lonely Woman’s Struggle Diary Divya Marathi Rasik Article By Sameer Gaikwad

समीर गायकवाड7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘ब्लॅक बॉक्स डायरीज’ ही २०२४ मध्ये प्रदर्शित झालेली, एका पीडित महिलेच्या वैयक्तिक नोंदीविषयीची डॉक्युमेंट्री आहे. जपानी पत्रकार शिओरी इतो यांची ही निर्मिती आहे. सिनेमॅ व्हेरिटे शैलीत निर्मिती केलेल्या या डॉक्युमेंट्रीमध्ये शिओरी यांच्या वैयक्तिक व्हिडिओ डायरी, कोर्टरूम फुटेज आणि गुप्त रेकॉर्डिंग यांचा समावेश आहे.

शिओरी यांनी स्वतःच्या लैंगिक अत्याचाराच्या अनुभवावर निर्मिलेली ही पूर्ण लांबीची डॉक्युमेंट्री त्यांच्या संघर्ष आणि धैर्याचा पट उलगडते. यात शिओरी इतो स्वतःच्या केसचा तपास करतात आणि एका प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध न्याय मिळवण्यासाठीचा आपला लढा दाखवतात. हा लढा जपानमधील तत्कालीन #MeToo चळवळीचा एक महत्त्वाचा भाग बनला होता आणि त्याने जपानच्या कालबाह्य कायदेशीर आणि सामाजिक व्यवस्थांवर प्रकाश टाकला होता.

शिओरी इतो थॉमसन या २०१५ ला रॉयटर्समध्ये इंटर्न होत्या. तेव्हा त्या पंचवीस वर्षांच्या होत्या. या दरम्यानच त्यांनी ‘टीबीएस’चे वॉशिंग्टन डी. सी. ब्युरो प्रमुख नोरियुकी यामागुची यांची नोकरीच्या संधीबद्दल चर्चा करण्यासाठी भेट घेतली. ही भेट एका हॉटेलच्या खोलीत झाली, जिथे त्यांच्यावर कथित लैंगिक अत्याचार झाला. शिओरी यांनी यामागुची यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. परंतु, त्याबाबत तक्रार दाखल करताना त्यांना पोलिसांकडून येणाऱ्या प्रचंड अडथळ्यांचा सामना करावा लागला. जपानच्या पोलिस व्यवस्थेने त्यांना सुरूवातीला गंभीरपणे घेतले नाही.

पोलिसांनी त्यांना सांगितले की, यामागुची यांच्याशी तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांचे घनिष्ट संबंध असल्यामुळे ही केस पुढे जाणे कठीण आहे. या प्रकरणाच्या तपासाला उशीर झाला. शिओरींना अनेक अपमानास्पद प्रश्नांना सामोरे जावे लागले, जसे की तुम्ही त्या रात्री काय परिधान केले होते? मद्यपान का केले होते? वगैरे. वास्तवात पोलिसांनी यामागुची यांना अटक करण्याची तयारी केली होती, पण ऐनवेळी ती रद्द झाली. व्यवस्थेच्या पक्षपाताचा हा अनुभव आल्याने शिओरींनी स्वतःच पुरावे गोळा करायचे ठरवले.

शिओरी यांनी स्वतःच या केसचा तपास केल्याचे डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवले आहे. त्यांनी गुप्तपणे रेकॉर्ड केलेले ऑडिओ, व्हिडिओ डायरी आणि मोबाइल फुटेज यांचा यात समावेश आहे. २०१७ मध्ये जपानच्या पोलिसांनी यामागुची यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने शिओरींनी सिव्हिल कोर्टात खटला दाखल केला. २०१९ मध्ये टोकियो जिल्हा न्यायालयाने शिओरींना ३.३ दशलक्ष येन नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश यामागुची यांना दिला. हा निर्णय जपानमधील लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांसाठी एक ऐतिहासिक विजय मानला गेला. यामागुची यांनी या निर्णयाविरुद्ध अपील केले आणि उलट शिओरी यांच्यावरच अब्रुनुकसानीचा दावा केला. तो २०२० मध्ये फेटाळण्यात आला.

जपानच्या पुरुषप्रधान संस्कृतीत लैंगिक अत्याचाराविषयी उघडपणे बोलणे अत्यंत कठीण मानले जाते. त्यामुळे शिओरींना समाजाकडून टीका, अपमान आणि धमक्या मिळाल्या. परिणामी त्यांचे मानसिक स्वास्थ्य प्रभावित झाले. त्यांना केवळ कायदेशीर अडथळ्यांचाच नव्हे, तर सामाजिक आणि मानसिक दबावांचाही सामना करावा लागला. त्यांचा हा संघर्षच ‘ब्लॅक बॉक्स डायरीज’चा मध्यवर्ती भाग आहे. तो त्यांच्या धैर्याचा, सामाजिक बदलासाठीच्या लढ्याचा आणि जपानमधील लैंगिक हिंसाचाराविरुद्धच्या व्यवस्थात्मक आव्हानांचा पुरावाही आहे.

शिओरींच्या या भावनिक आणि कायदेशीर लढ्यामुळे २०२३ मध्ये जपानच्या बलात्कारविरोधी कायद्यात सुधारणा झाल्या. ही डॉक्युमेंट्री पन्नासहून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवली गेली. तिला ९७ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फीचरसाठी नामांकन मिळाले. शिवाय, नॅशनल बोर्ड ऑफ रिव्ह्यूने २०२४ च्या टॉप फाइव्ह डॉक्युमेंट्रीमध्ये तिची निवड झाली. झ्युरिच फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिला मानाचा पुरस्कार मिळाला.

तथापि, या डॉक्युमेंट्रीविषयी विवादही आहेत. काही जपानी समीक्षक आणि जिज्ञासू व्यक्तींनी यातील काही दृश्ये आपल्या परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप केला. तसेच, जपानमधील सामाजिक आणि सांस्कृतिक समस्यांवर थेट आरोप करत चित्रण केल्याने अनेकांना ते रुचले नाही. यामुळे जपानमध्ये ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित होण्यात अडचणी आल्या आणि अद्यापही तिथे तिचे पब्लिक स्क्रिनिंग झालेले नाही. पॅरामाऊंट प्लस, अॅमेझॉन प्राइम आणि अॅपल टीव्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही डॉक्युमेंट्री पाहता येईल.

‘ब्लॅक बॉक्स डायरीज’ची दखल जगभराने घेतल्यावर शिओरी इतो यांनी मागे वळून पाहिले नाही. एक झुंजार पत्रकार, आक्रमक लेखिका आणि यशस्वी चित्रपट निर्माती म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे. त्यांनी २०१७ मध्ये ‘Black Box’ नावाचे टेबलबुक प्रकाशित केले, ते जगभरातील अकरा भाषांमध्ये अनुवादित झाले. २०२० मध्ये टाइम मॅगझीनने शिओरींचा जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला होता.

जाता जाता… ‘अॅमेझॉन’वरील ‘डार्क विंड्स’ ही सिरीज लवकरच रजा घेतेय. डबल मर्डर मिस्ट्री आणि तपास अधिकाऱ्यांचे परस्परविरोधी स्वभाव याच्या अफलातून चित्रणामुळे तिला हाय रेटिंग मिळाले होते.

(संपर्कः sameerbapu@gmail.com)



Source link

गोष्ट सांगतो ऐका…: हिशेब!

0
गोष्ट सांगतो ऐका…:  हिशेब!


अरविंद जगताप9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मामाने निर्णय घेण्याआधी नवीनच समस्या सुरू झाली होती. दोन-चार दिवसांपासून खानावळीत चपाती आणि भात पुरत नव्हता. मुलं आरडाओरडा करत होती…

चांगले दिवस होते. कॉलेजचे दिवस. विकास आणि मित्र बाहेरून शिकायला आलेले. हॉस्टेलवर राहायचे. कॉलेजची खानावळ होती. मराठी माणूस चालवायचा. विश्वासमामा नाव त्याचं. मामा तसा वरवर रागीट, पण मनाने निर्मळ. स्वच्छता त्याचा जीव का प्राण! कुणी ताटात खरकटं टाकलेलं मामाला अजिबात आवडायचं नाही. आठवडाभर खानावळीचे पैसे उशिरा दिले, तरी मामा एवढं रागावत नाही जेवढं ताटात टाकल्यावर रागावतो. मुलांना शिस्त असावी, चांगलं अन्न मिळावं, असा मनापासून विचार करणारा एक दुर्मिळ खानावळवाला म्हणजे मामा. मामाने आणखी एक भारी गोष्ट केली होती. अभ्यासात बरी आणि गरजू मुलं शोधून त्यांना तो खानावळीचा हिशेब ठेवण्याचं काम द्यायचा. दोन मुलांना तरी हे काम मिळायचं. त्या बदल्यात खानावळीची फी माफ व्हायची.

बरीच मुलं प्रयत्न करायची. पण, निवड मामाच्या हातात होती. आणि हीच एक अडचणीची गोष्ट होती. ज्यांची निवड व्हायची नाही ते मनोमन नाराज असायचे. कारण मामा वारकरी माणूस. हिशेबात कच्चा म्हणण्यापेक्षा निष्काळजी. त्यामुळं घोळ करायला भरपूर संधी. आधी काही सिनिअर पोरांनी जेवणासोबत दारूचाही खर्च भागवला. एकाने बाईकचे हफ्ते भरले वर्षभर.. मामाचा असा निष्काळजी मामला. कारभार सोपवून मोकळे. कारण त्यांना सगळा उत्साह स्वयंपाक आणि भाजीपाला खरेदीत. आवडीची भाजी मिळावी म्हणून अडून बसणार. पोरांनी पालेभाजी खावी म्हणून तळमळ…

…तर मामाने खानावळीसाठी दोघांची निवड केली. विकास आणि तुषार. काही दिवस बरं चाललं. पण, नंतर खटके उडू लागले. दोन गट पडले. विकासाचे मित्र म्हणू लागले विकास एकटाच पुरे आहे हिशेब करायला. तुषारचे मित्र म्हणू लागले, आम्हाला चांगल्या पोळ्या मिळत नाहीत. खरं तर असं काही कारण नव्हतं. दोघांचे दोन चार खादाडखाऊ मित्र या भांडणाला कारण होते. भांडण वाढलं. एवढं वाढलं की, एक दिवस जोरदार बाचाबाची झाली. विकास मामाला फोन करून म्हणाला, ‘मी एकटाच सांभाळतो सगळा हिशेब.’ तुषार पण मामाला भेटला आणि म्हणाला, ‘मी बघतो हिशेब. निदान एक वेळचा..’ मामाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘दोघांनी आपापसात मिटवा,’ म्हणाला. पण, दोघांनी ऐकलं नाही. मामाला राग आला. त्याने दोघांना काढून टाकलं. तुषारने खानावळ सोडून दिली आणि बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊ लागला. त्याला परवडू शकत होतं. पण, विकासने तसं केलं नाही. त्याला खानावळवाल्या मामाचा खूप राग आला होता. पण, लवकर सगळं विसरून तो शांतपणे खानावळीत जेवत राहिला.

विकास त्या दिवसापासून मामाशी फार बोलायचा नाही. पण, खानावळीत जेवणाऱ्या इतर मुलांशी मात्र भरपूर बोलू लागला. इकडच्या-तिकडच्या गप्पा मारू लागला. सगळे नीट जेवताहेत की नाही बघत होता. आग्रह करत होता. मामाचं लक्ष होतंच. विकास बोलत नसला, तरी त्याच्यात झालेला बदल मामाच्या लक्षात येत होता. आधी एकटाच राहणारा, चिडचिड करणारा विकास एकदम वेगळा झाला होता. मनमोकळा. एकेकाळी ज्यांच्याकडं बघायचा नाही, त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन गप्पा मारत होता. इतर मुलंही त्याच्या वागण्यानं सुखावली होती. एक तर अशी काही मुलं होती, जी जेवणावर तुटून पडायची. बाकी सगळे त्यांना हसायचे. पण, ती चार – दोन मुलं त्याकडं दुर्लक्ष करून अक्षरशः जेवणाचा फडशा पाडायची. विकास आता त्यांचा आवडता मित्र झाला. तशी मामाची खाणावळ भरपेट जेवणाची होती. लिमिटेड काही नव्हतं. जेवढ खायचं तेवढं खा, फक्त उष्ट टाकू नका, ही एकच अट.

विकास आता जेवण्यापेक्षा इतर मुलं कसं जेवतात, ते बघत बसायचा. रात्री उशिरापर्यंत खानावळीत बसून राहायचा. मामाला काही अडचण नव्हती. तो आता मनात विचार करू लागला की, उगीच काढलं आपण विकासला.. त्याला कामाची गरज असणार.. हौस असणार. नाही तर कोण अभ्यास सोडून खानावळीत एवढा वेळ देतो? तो विचार करत होता की, पुन्हा विकासला हिशेबाचं काम देऊ.

पण, काही निर्णय घेण्याआधी नवीनच समस्या सुरू झाली होती. दोन-चार दिवसांपासून खानावळीत चपाती आणि भात पुरत नव्हता. मुलं आरडाओरडा करत होती. मामाने लक्ष घातलं. हळूहळू त्याच्या लक्षात आलं की, विकासने भरपूर खाणारे मेंबर गोळा केले होते. त्या सगळ्यांचा तो लीडर झाला होता. त्याच्या सांगण्यावरून सगळे मुद्दाम डबल जेवू लागले. नवीन तीन – चार मेंबर तर चारपट खाणारे होते. सगळे विकासाचे खास. मामाने आजवर कधी कुणाला ‘कमी खा’ म्हणून सांगितलं नव्हतं. इथून पुढं सांगायचा प्रश्न नव्हता. ते मामाच्या स्वभावात नव्हतं. पण, तिथंच घोळ झाला. खूप नुकसान होऊ लागलं. तक्रारी येऊ लागल्या. शेवटी कॉलेजने मामाचं कंत्राट रद्द केलं. मामाही तोटा झेलू शकत नव्हता. सोडून गेला.

विकासचा मोठा विजय झाला. मग तिथं एक गुजराती कंत्राटदार आला. त्यानं विकासकडं हिशेब सोपवण्याचा प्रश्नच नव्हता. तो पक्का हिशेबी असल्यानं त्याने सगळा कारभार स्वतःकडं ठेवला. दोन-तीन मुलं ठेवली. कोण किती चपात्या खातो? कोण किती भात खातो? हे ती मुलं मोजायची. आणि त्याची यादी द्यायची. मग अशा मुलांना खानावळीतून काढायला सुरूवात झाली. जेवण आपोआप लिमिटेड झालं. त्यात ते मराठी पद्धतीचं नसल्यानं मजाही गेली.

विकास अजूनही खानावळीत जातो. चपातीचे फुलके झालेत. ते पण घशाखाली उतरत नाहीत. पण, त्याने गोळा केलेले खादाडखाऊ तेही मजेत खात राहतात. कारण नवीन मालकाने त्यांनाच चपात्या मोजायला ठेवलंय. आता विकासला वाटतं, मामा बरे होते. पण, वेळ निघून गेली. शेवटी हिशेब हातात नसेल, तर विजय पण पराजय वाटू लागतो…

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: मास्टर राजूंना गुलजारांनी पहिल्यांदा निवडले, वयाच्या पाचव्या वर्षी पडद्यावर झळकले, ‘फिल्म फेअर’ विजेते एकमेव बालकलाकार

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  मास्टर राजूंना गुलजारांनी पहिल्यांदा निवडले, वयाच्या पाचव्या वर्षी पडद्यावर झळकले, ‘फिल्म फेअर’ विजेते एकमेव बालकलाकार


  • Marathi News
  • Opinion
  • Master Raju Was First Selected By Gulzar, Appeared On Screen At The Age Of Five, The Only Child Artist To Win A ‘Filmfare’

रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ज्यांना सगळे लोक ‘मास्टर राजू’ या नावाने ओळखतात, त्या आज फहीम अंजानी यांच्याविषयी आज मी माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये सांगणार आहे. मला चांगले आठवतेय.. आमच्या लहानपणाच्या काळात आपल्याकडे ज्यांच्या घरात छोटे बाळ असायचे, त्यांना ते मर्फी बेबीसारखे आणि पाच-सहा वर्षांचा मुलगा असेल, तर तो मास्टर राजूसारखा व्हावा, असे वाटायचे. गोड, निरागस असा हा राजू सर्वांचा आवडता होता.

मी राजू यांना, ‘फिल्म इंडस्ट्रीतील कामाची सुरूवात कशी झाली?’ असे विचारले. त्यांनी सांगितले की, आम्ही दक्षिण मुंबईत राहायला होतो. आमच्या गल्लीतील माझ्या वडिलांचे मित्र असलेले एक जण सिनेमासाठी ज्युनिअर आर्टिस्ट पुरवायचे. त्यामुळे शूटिंगमध्ये मुलांची गरज पडायची, तेव्हा ते मलाही घेऊन जायचे. त्यात अभिनय नसायचा. बसायचे, उभे राहायचे असा केवळ प्रेझेन्स असायचा. या प्रकारे मी ‘उपहार’, “अन्नदाता’, ‘बावर्ची’ अशा सिनेमांत ज्युनिअर आर्टिस्ट मुलांमध्ये काम केले होते. याच दरम्यान, गुलजार साहेब ‘किताब’ हा सिनेमा तयार करत होते. त्यासाठी त्यांना एका मुलाची गरज होती. त्या काळात कास्टिंग डायरेक्टर असा काही प्रकार नव्हता. त्यामुळे ज्युनिअर आर्टिस्ट पुरवणारेच मुलांना त्यांच्यासमोर आणून उभे करत होते. आमच्या गल्लीतील सगळ्या मुलांना त्यांनी नेऊन आणले, पण त्यांची निवड झाली नाही. चला, आता राजूलाही घेऊन जाऊ, म्हणून त्यांनी एकेदिवशी मला आईवडिलांसोबत तिकडे नेले. त्यावेळी मी ५-६ वर्षांचा असेन. आम्ही दक्षिण मुंबईतून ट्रेनने बांद्र्याला गेलो आणि तिथे उतरून गुलजार साहेबांच्या बंगल्यावर पोहोचलो. मी पाहिले, तिथे खूप मुले आली होती आणि गुलजार साहेब सगळ्यांशी बोलत होते. कुणी त्यांना एखाद्या हीरोचे मोठमोठे डायलॉग म्हणून दाखवत होता. कुणी अॅक्टिंग, तर कुणी डान्स करुन दाखवत होता. एखादा मुलगा कविताही ऐकवत होता.

राजूनी पुढे सांगितले की, माझा नंबर येईपर्यंत मी खूप कंटाळून गेलो होतो. घरी जायचे म्हणून रडायला लागलो. सगळ्यांचा मूड गेला. गुलजार साहेबही काही बोलले नाहीत. आम्ही घरी आलो. नंतर त्या ज्युनिअर आर्टिस्ट पुरवणाऱ्याला गुलजार साहेबांचा फोन केला आणि ‘त्या मुलाला परत घेऊन या,’ असे त्यांनी सांगितले. मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला बसवले, खायला दिले आणि ‘मला हाच मुलगा हवा,’ असे सांगितले. सगळ्यांना आश्चर्य वाटले की, या मुलाने ना डायलॉग म्हणून दाखवला, ना डान्स करुन दाखवला, ना कविता ऐकवली..

सगळ्यांनी गुलजार साहेबांना विचारले की, तुम्ही याला सिलेक्ट कसे काय केले? त्यावर ते म्हणाले, ‘मला खराखुरा मुलगा हवा आहे. आतापर्यंत मी ज्यांना ज्यांना भेटलो, ते लहान मुले आहेत, असे वाटतच नव्हते. सगळे मोठमोठ्या हीरोंचे डायलॉग म्हणून दाखवताहेत, डान्स करताहेत. ते बालकलाकारापेक्षा एखाद्या तरुणासारखे वाटताहेत. मला असा मुलगा पाहिजे जो दिसण्यात, बोलण्यात मुलगाच वाटेल. ही गोष्ट या मुलात आहे.’ मी त्यांना म्हणालो, ‘पण, मला तर अॅक्टिंग येत नाही..’ त्यावर त्यांनी सांगितले की, हरकत नाही, मी तुला शिकवेन.. त्यांनी मला अॅक्टिंग शिकवली नाही, माझ्याशी मैत्री केली. मला सेटवर घेऊन गेले. दुसरे कलाकार कसे अॅक्टिंग करतात, हे दाखवले. ते प्रत्येक वेळी मला आपल्यासोबत घ्यायचे. त्यांनी मला अशा वातावरणात ठेवले की, आपण अॅक्टिंग शिकतोय हे मला कधी जाणवलेही नाही. त्यामुळे मी शिकत गेलो. गुलजार साहेब असे गुरु होते, ज्यांच्या केवळ सावलीत राहिल्याने मला अॅक्टिंग शिकण्याची वेगळी गरजच पडली नाही. त्यांच्या सहवासामुळे माझ्यामध्ये आपोआप अभिनयगुण उतरला.. या गोष्टीवरुन मला मुनव्वर राणा यांच्या एक शेर आठवतोय…

ख़ुद से चलकर नहीं ये तर्ज़-ए-सुखन आया है पाँव दाबे हैं बुज़र्गों के तो फ़न आया है…

मी लिहिलेल्या ‘पायल’, ‘रंग’ आणि ‘साजन चले ससुराल’ या तीन सिनेमांमध्ये राजूनी अॅक्टिंग केली आहे. मला ‘किताब’ सिनेमातील एक खूप गाजलेला प्रसंग आठवतोय.. केश्तो मुखर्जी मुलांना ए- बी- सी- डी शिकवत असतात. ते त्यांना सांगताहेत.. ए फॉर अॅपल, बी फॉर बॉल.. राजू लहान मुलगा आहे, त्याला खूप जोराची सूसू आल्याने बाथरुमला जायचे आहे. केश्तो मुखर्जी विचारतात.. के फॉर..? राजू तत्काळ म्हणतो, ‘करना है..!’ आणि थिएटरमध्ये जोरदार हंशा पिकतो.

असो. मास्टर राजूने असा इतिहास लिहिला आहे की, मला नाही वाटत तो कोणी बदलू शकेल. ते एकमेव असे अभिनेता आहेत, ज्यांना ‘किताब’साठी उत्कृष्ट बालकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्या वर्षीच फिल्मफेअरमध्ये उत्कृष्ट बालकलाकाराची श्रेणी होती. ती ना त्याच्या आधी होती, ना नंतर कधी होती. एकदाच फिल्मफेअरमध्ये उत्कृष्ट बालकलाकार ही श्रेणी तयार झाली आणि हा पुरस्कार राजूंना मिळाला. त्यानंतर ‘चितचोर’ सिनेमासाठीही राजूंना उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. राजू एकमेव असे कलाकार आहेत, ज्यांनी टीव्ही मालिकांच्या बऱ्याच एपिसोडमध्ये काम केले. तब्बल तीन हजार एपिसोडमध्ये त्यांनी नारदमुनींची भूमिका केली. मजेची गोष्ट म्हणजे, फहीम यांनी ‘मास्टर राजू’ या नावाने अॅक्टिंग सुरू केली होती, आणखी दोन वर्षांनी ते साठ वर्षांचे होतील. पण, त्यांच्या नावामागची ‘मास्टर’ ही उपाधी अजूनही निघालेली नाही आणि कधी निघणारही नाही. आज मास्टर राजूंसाठी ‘किताब’मधील हे गाणे ऐका…

अ आ इ ई, अ आ इ ई..

मास्टरजी की आ गयी चिठ्ठी…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

रसिक स्पेशल: ‘एआय’मुळे आणखी घातक ठरू शकते हेरगिरी

0
रसिक स्पेशल:  ‘एआय’मुळे आणखी घातक ठरू शकते हेरगिरी


अतुल कहाते13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘अल कायदा’चे दहशतवादी ९ / ११ च्या हल्ल्याआधी तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी एकमेकांना वाघांची चित्रं ई मेलने पाठवायचे. वरकरणी त्यात काहीच वावगं वाटत नसलं, तरी ते या चित्रांमधून आपल्या गुप्त संदेशांची देवाणघेवाण कराचये. आता अशा गोष्टींच्या मदतीला ‘एआय’ आलं आहे. आणि त्यामुळेच धोका आणखी वाढला आहे!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध हाती घेतलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ एकीकडे सुरू असतानाच एक नवीनच प्रकरण उभं राहिलं आहे. ‘यूट्यूबर’ म्हणून प्रसिद्ध असलेली ज्योती मल्होत्रा ही भारतीय महिला आणि इतर काही लोक पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचं निष्पन्न झालं आहे. भारतासाठी महत्त्वाची असलेली अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानी लष्कराच्या आणि अधिकाऱ्यांच्या हाती लागत असल्याचं त्यातून स्पष्ट झालं. स्वाभाविकच, देशाच्या सुरक्षिततेसाठी असे प्रकार अतिशय घातक आणि गंभीर असल्याचा मुद्दा नव्यानं समोर आला. दहशतवादी संघटनांपासून ते अशी हेरगिरी करणाऱ्या लोकांपर्यंत अनेकांनी आजवर तंत्रज्ञानाचा गैरवापर करून निरनिराळे प्रकार केले आहेत. पण, आता ‘एआय’च्या युगात या प्रकारांनी आणखी गंभीर वळण घेतलं असल्यानं यातून काय घडू शकेल, याचा अंदाज बांधणं महत्त्वाचं ठरलं आहे.

1. डीप फेक, व्हॉइस क्लोनिंग

यातील पहिला संभाव्य धोका आपण काही प्रमाणात आधीच अनुभवत आहोत. तो म्हणजे, ‘डीप फेक’ आणि ‘व्हॉइस क्लोनिंग’ या तंत्रज्ञानांचा. आपल्याला हवी असलेली विधानं एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या तोंडून वदवून घेतल्यासारखी खोटेपणानं सादर करण्यासाठी या तंत्रज्ञानांचा गैरवापर होऊ शकतो. म्हणजेच, युद्धाच्या प्रसंगी किंवा एखाद्या अत्यंत गुप्त ठेवण्यात आलेल्या मोहिमेच्या आधी लष्करप्रमुखांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न दिलेला आदेश त्यांनीच दिल्यासारखा भासवून लष्कराला त्यानुसार कारवाई करायला भाग पाडणं किंवा ती करण्यापासून रोखणं असे चित्रविचित्र प्रकार यातून घडू शकतात. कुणाच्याही आवाजाचे पुरेसे नमुने गोळा करून ते ‘एआय’ला दिले, तर त्यातून प्रशिक्षण घेऊन ‘एआय’ आपल्याला या आवाजांच्या नमुन्यांआधारे त्या माणसाच्या आवाजात, पण त्याने न केलेलं वक्तव्य तयार करून देऊ शकते. याहून भयानक म्हणजे, त्या माणसाचे फोटो / व्हिडिओ अशा दृश्यांचे नमुने वापरुन नुसता आवाजीच नव्हे, तर दृश्य प्रकारचा संदेशही यातून तयार होऊ शकतो. आणि त्यामुळे अक्षरश: हाहाकार माजू शकतो. एखाद्या अण्वस्त्रसज्ज देशाकडून अशा प्रकारचा संदेश कुणीतरी प्रसारित केल्यास आणि त्याच्या सत्यासत्यतेची खातरजमा न झाल्यास महाविनाशाकडे जगाचे पाऊल पडू शकते. म्हणूनच या गोष्टी टाळण्यासाठीची प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करणं आता अपरिहार्य व्हायला हवं. प्रत्यक्ष खातरजमा होईपर्यंत अशा कोणत्याही प्रकारच्या आदेशांवर अंमलबजावणी करायची नाही, हे स्पष्टपणे ठरवलं गेलं पाहिजे.

2. संभाव्य विचार-कृतीचा अंदाज

दुसरा धोका म्हणजे, आपला शत्रू नेमका कोणत्या प्रकारे विचार करतो, आत्तापर्यंत त्यानं काय पावलं उचलली आहेत, त्याची धोरणं काय आहेत, या सगळ्या माहितीचे साठे ‘एआय’ला पुरवून यापुढे तो नेमका काय करेल, याचा अंदाज हेरगिरी करत असलेल्या लोकांना लागू शकतो. याचं कारण मानवी मेंदूसारखा विचार करणं आणि त्यासारखी कृती करणं, हे आता ‘एआय’ला सहजपणे जमत आहे. त्यामुळं भविष्यात मानवी मेंदू कसा विचार करेल आणि त्यानुसार काय कृती करेल, याचा अंदाज ‘एआय’ बांधू शकतं. साहजिकच, या शक्यतेनुसार आपले कारनामे सुरू ठेवण्यासाठी, पकडले न जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या गोष्टी हेरगिरी करणाऱ्या देशद्रोही लोकांना समजू शकतात. ‘एआय’चे जनक जेफ्री हिंटन यांनी या संदर्भात काहीशा वेगळ्या पातळीवर मोठा इशारा देऊन ठेवलेलाच आहे.

3. ‘एआय’च करेल हेरगिरी

तिसरा धोका म्हणजे, ‘एआय’ प्रणालीकडून प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या, पण माणसासारख्या कृती करून घेणं. म्हणजेच, आपण जणू माणसाशीच बोलत आहोत, असं पलीकडच्या माणसाला वाटावं. उदाहरणार्थ, एखादा हेर ज्याप्रमाणे काम करतो, त्याच धर्तीवर अशा ‘एआय’ प्रणालीला काम करायला लावायचं. साहजिकच, पलीकडच्या माणसाला आमीष वा भीती दाखवून किंवा ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकावून ही ‘एआय’ प्रणाली महत्त्वाची माहिती मिळवू शकेल. चुकून ही हेरगिरी पलीकडच्या माणसाच्या किंवा यंत्रणेच्या लक्षात आलीच, तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण पकडणार कुणाला? ‘एआय’ला? आणि ते कसं? त्यामुळे हेरगिरी करण्यासाठी अशा प्रणाली तयार करणं आणि तपास यंत्रणांना गुंगारा देणं, असे प्रकार यातून घडू शकतात.

4. गायब होणारं ‘मॅलवेअर’

चौथा धोका म्हणजे, पारंपरिक पद्धतीने कुठल्याही देशाच्या संगणकीय यंत्रणा भेदून, त्यातून माहिती चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या हेरांना आता या प्रयत्नांमध्ये ‘एआय’चा वापर करता येऊ शकतो. या पद्धतीने माहिती चोरण्यासाठी वापरत असलेले, ‘मॅलवेअर’ म्हणून ओळखले जाणारे सॉफ्टवेअर पकडले जाऊ नये म्हणून त्यात ते ऐनवेळी बदल घडवू शकतात. म्हणजेच चोराने तो अगदी पकडला जात असताना अचानक पोलिसांन गुंगारा द्यावा, त्या शिताफीने हे ‘मॅलवेअर’ आपल्यामध्ये एकाएकी बदल घडवून आणतं. यामुळे प्रतिस्पर्ध्याला त्याचा ठावठिकाणा लागत असतानाच अचानक ते ‘गायब’ होतं! हे करण्यासाठी ‘एआय’चा उपयोग होऊ शकतो. कारण नेमके कोणते बदल ‘मॅलवेअर’मध्ये केले पाहिजेत, हे ‘एआय’ ठरवतं. साहजिकच, अशा प्रकारचं ‘मॅलवेअर’ हे सॉफ्टवेअर आपलं अस्तित्व सतत बदलत राहून पकडलं जाऊ नये, यासाठीची दक्षता घेत राहू शकतं.

लेखाचा समारोप करताना, ९ / ११ च्या हल्ल्याआधी ‘अल कायदा’च्या दहशतवाद्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाची आठवण होते. तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी हे लोक एकमेकांना वाघांची चित्रं ई मेलने पाठवायचे. वरकरणी त्यात काहीच वावगं वाटत नसलं, तरी हे दहशतवादी या वाघांच्या चित्रांच्या आत लपवून आपले गुप्त संदेश पाठवत असत. तांत्रिक भाषेत याला ‘स्टेगॅनोग्राफी’ असं म्हणतात. आता अशा सगळ्या गोष्टींच्या मदतीला ‘एआय’ आलं आहे. आणि त्यामुळेच धोका आणखी वाढला आहे.

(संपर्कः akahate@gmail.com)



Source link

वर्चस्व असतानाही समझोता का?

0
वर्चस्व असतानाही समझोता का?



अॅड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

प्ाहलगाम हल्ला, हे गुप्तचर यंत्रणांचं अपयश आहे की नाही, या वादात मी पडणार नाही; मात्र, या यंत्रणांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना माहिती दिल्यानंतर त्यावर तातडीने अंमलबजावणी होणं अपेक्षित असतं. तसं झालं तर हल्ला थांबतो, अन्यथा नाही. पहलगाम हल्ल्यानंतर युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे कारवाई करणं भागच होतं, पण आपण पाकिस्तानच्या कृतीला केवळ प्रत्युत्तर देण्याची बोटचेपी भूमिका घेतली.

युद्ध कोणालाच नको आहे; पण ‘अहिंसा धोक्यात येते, तेव्हा हिंसा हेसुद्धा अहिंसेला वाचवणारं शस्त्र आहे,’ असं बुद्धांनीही म्हटलेलं आहे. अर्थात हिंसा कधी, याचाही बुद्धांनी खुलासा केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाचे हे सिद्धांत दोन वाक्यांत सांगितले आहेत. एक तर इच्छा असणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे गरज आहे का, हे पाहिलं पाहिजे. गेली २५ वर्षं देशात अतिरेकी हल्ले होत आहेत. त्यामुळे जोरदार प्रत्युत्तर देण्याची गरज नक्कीच आहे. आता राहिला प्रश्न इच्छेचा. ही इच्छा लोकशाहीत सत्ताधाऱ्यांनी दाखविली पाहिजे. मात्र, जी काही वक्तव्यं केली गेली त्यावरून असं दिसतं की सत्ताधारी पक्षाला हे सारं करण्याची इच्छा नव्हती. देशवासीयांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना कारवाई करावी लागली.

या अघोषित युद्धाला पाकिस्ताननेच सुरुवात केली होती. आपल्याला नामी संधी होती. दूरगामी परिणाम करणारे तडाखे देणं गरजेचं होतं. कारण पाकिस्तानची आज जी अवस्था आहे, ती यापूर्वी कधीही नव्हती. १९६५ किंवा १९७१ च्या युद्धावेळीही नव्हती. आज पाकिस्तान कंगाल आहे. २५ वर्षांत पाकिस्तानवरचं कर्ज दर पाच वर्षांनी दुप्पट झालं. १९९९ मध्ये जनरल मुशर्रफ यांच्या राजवटीच्या सुरुवातीला सुमारे ११ अब्ज अमेरिकी डॉलरचं कर्ज होतं ते २०२२ मध्ये इम्रान खान सरकारच्या कार्यकाळाअखेरीस सुमारे २२० अब्ज अमेरिकी डॉलर झालं. कर्ज दरवर्षी सरासरी सुमारे १४ टक्के दराने वाढत असताना जीडीपी फक्त ३ टक्के दराने वाढत होता. जून २०२३ पर्यंत पाकिस्तानचं एकूण सार्वजनिक कर्ज आणि देणं सुमारे २२३.८६ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढलं. हे कर्ज पाकिस्तानच्या जीडीपीच्या ७४.३ टक्के आहे. परिणामी पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढली. सरकार आणि जनता बेचैन होती. नवीन हत्यारं विकत घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे चीनव्यतिरिक्त त्यांना कोणाकडूनही हत्यारं घेता आली नाहीत. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे बहुतेक सर्व तळ पंजाब प्रांतात आहेत. त्यामुळे बलुचिस्तान, सिंध आणि कराची इथला समूह अस्वस्थ आहे. ‘बलुचिस्तान लिबरेशन फोर्स’ ‘आम्हाला वेगळा बलुचिस्तान पाहिजे’ अशी मागणी करत आहे. कराचीत आणि परिसरात जे फाळणीनंतर गेले, त्यांना भारतीय मुस्लीम निर्वासित- मुहाजीर- म्हटलं जातं. त्यांना पाकिस्तान ‘आपलं’ म्हणत नाही. त्यामुळे ६०- ७० च्या दशकात अनेक ठिकाणी त्यांच्या दंगली झाल्या. त्यातून मुहाजिरांची लढाऊ संघटना उभी राहिली. बलुचिस्तानमधले मुस्लीम पंजाबच्या मुस्लिमांना आपले मानत नाहीत. पंजाबचे मुस्लीम ‘मुहाजिरां’ना मानत नाही. पहलगाममधील हल्ल्याचा असाही अर्थ काढला जातो की, ‘काश्मीरमध्ये बिगरमुस्लिमांनी येऊ नये यासाठीच काही जणांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या.’ मात्र, याला मी दुर्दैव मानतो. कारण अतिरेक्यांचा उद्देश अतिरेक्यांनी सफल केला असला, तरीही या देशातील सनातनी हिंदूंनी त्याचा एवढा प्रचार केला की, त्यांना यावरून हिंदू-मुस्लीम फूट पाडणं शक्य झालं. वास्तविक, इतर धर्मीयांनासुद्धा अतिरेक्यांनी गोळ्या घातल्याच पुढे स्पष्ट झालं आणि वातावरण बदललं. तरीही सनातनी हिंदू प्रचारक ‘हिंदूंनाच गोळ्या घातल्या,’ असे म्हणत राहिले.

भारताला खरंच कारवाई करायची असती, तर त्यांनी ‘मुहाजिरां’च्या लंडनमध्ये बसलेल्या प्रमुखांशी संधान साधत पाकिस्तानला हादरा दिला असता. २०१५ ला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानचा उल्लेख करत जे वक्तव्य केलं होतं, त्याचा परिणाम म्हणूनही पुन्हा पाकिस्तानला हादरा देता आला असता. या दोन्ही समूहांशी भेट झाली की नाही, याची कल्पना नाही. मात्र, भारताने आपली ही बाजू लंगडी ठेवली, हे खेदाने नमूद करावं लागेल. या दोन्ही भागांमध्ये कारवाई थोडी उशिरा झाली असली, तरी त्यांना उठाव करण्याच्या परिस्थितीत आणून ठेवून पाकिस्तानात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण करता आली असती. पाकिस्तानचं कंबरडं आत्ताच मोडणं भारताला शक्य होतं.

अनेक जण आता आंतरराष्ट्रीय राजकारणाचं काय, हा प्रश्न विचारतात. मात्र, प्रत्येक वेळी ‘आंतरराष्ट्रीय समुदाय काय म्हणेल,’ याचा विचार केला, तर कधीच निर्णय घेता येणार नाही. आंतरराष्ट्रीय समुदायापुढेही स्वत:ला जे वाचवायचं आहे, ते ठामपणे मांडता आलं पाहिजे आणि ते केलंही पाहिजे. पाकिस्तानचे सध्या दोनच मित्र आहेत. चीन आणि तुर्कस्तान. मुस्लीम राष्ट्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणात भारतीय तिथल्या सरकारांना अजिबात त्रास न देता शांततेने काम करतात. तिथल्या राजेशाहीलाही वाटतं की, ही जनता आपल्याशी प्रामाणिक आहे. त्यामुळे स्वत:चं राज्य टिकवण्यासाठी ती सरकारं भारतीयांविरोधात कोणतीही पावलं उचलण्याची शक्यता नाही. त्यामुळेच तुर्कस्तानशिवाय इतर कोणत्याही मुस्लीम देशाने पाकिस्तानला मदत केली नाही. तुर्कस्तान पाकिस्तानला नेहमीच मदत करत राहील. कारण पाकिस्तानकडे असलेली ‘युरेनियम एन्रिचमेंट टेक्नॉलॉजी’ त्यांना हस्तगत करायची आहे.

आता राहिला प्रश्न चीनचा. चीन सध्या पाकिस्तानला मदत करू शकत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर जे ‘व्यापारयुद्ध’ सुरू केलं, त्याचा सर्वाधिक रोख चीनवरच आहे. यातून मार्ग काढण्यासाठी चीनने स्वत:चा स्थानिक व्यापार वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, त्यालाही मर्यादा आहेत. साहजिकच चीनने पाकिस्तानला जवळ केलं. तरीही चीनला नव्या बाजारपेठा शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आम्ही युद्धसमर्थक नाही, हे दाखवणं गरजेचं होतं. त्याच वेळी भारतासोबतही आपला व्यापार किमान १०० बिलियन डॉलर्सपर्यंत वाढू शकतो, हे लक्षात आल्याने त्यांनी पाकिस्तानला मदत केली नाही किंवा खुल्या रीतीने भारताविरोधात मैदानात उतरले नाहीत. भारतातील २५-३० कोटी मध्यमवर्गीय हा चीनचा सर्वांत मोठा ग्राहक आहे. एवढा मोठा ग्राहक वर्ग इतर देशांकडे नाही. त्यामुळेच चीन तटस्थ राहिला. युद्धविराम होण्याच्या दिवशीही पाकिस्तानकडे फक्त सात दिवस पुरेल एवढीच परदेशी गंगाजळी होती. त्यामुळे भारताने ‘एक्स्टर्नल बॅलन्स ऑफ पेमेंट’ थांबवलं असतं, तर पाकिस्तान डिफॉल्टर झाला असता किंवा हे अघोषित युद्ध फार तर आणखी दोन-तीन दिवस चालवू शकला असता. भारताकडे तीन महिन्यांचा शस्त्रसाठा होता. त्यामुळेच हे युद्ध दोन-तीन दिवस चाललं असतं, तर पाकिस्तानची खरी परिस्थिती जगासमोर आली असती.

युद्धविरामाची घोषणा ट्रम्प यांनी करणं हे सर्वांत मोठं आश्चर्य आहे. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प म्हणतात, भारत आणि पाकिस्तानातील युद्धाला विराम मिळायला हवा आणि दोनच दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह किंवा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यापैकी कुणी जाहीर करण्याआधी तिसऱ्या देशाचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प युद्धविराम जाहीर करतात. हा काय प्रकार आहे? याला संधीचा फायदा घेणे म्हणतात. अशी संधी क्वचित येते, जी डोनाल्ड ट्रम्प यांनी हेरली.

९/११ नंतर ओसामा बिन लादेनला अमेरिकेने शोधून ठार केले आणि त्याला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचे हाल केले. अशा पाकिस्तानला चीन मदत करत नाही हे लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी या वादात उडी घेतली आणि पाकिस्तानला नामुष्कीतून वाचवलं. नरेंद्र मोदी ट्रम्प यांना ‘माय फ्रेंड’ म्हणतात. मात्र, त्यांनीच मोदींच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांचा हा खंजीर मोदींना लागला नाही; पण देशाच्या इभ्रतीला लागला. वर्चस्व मिळवलेलं युद्ध तुम्ही हरलात आणि श्रेय पाकिस्तान व अमेरिकेला गेलं.

संघ आणि भाजपची ही नीती नवीन नाही. २००२ मध्ये मुशर्रफ यांनी भारतात येऊन अटलबिहारी वाजपेयींना जो मैत्री संदेश दिला, तो भारताला आतापर्यंत भोगावा लागत आहे. मुशर्रफ भारतात येण्याआधी पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. मुशर्रफ इंग्लंड, अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स आणि ‘जी-१५’ राष्ट्रांकडेही गेले आणि ‘कर्जाची मुदत संपत आल्याने त्याची फेररचना करावी,’ अशी मागणी केली. मात्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनंही नकार दिला. मी लोकसभेत होतो, तेव्हा पाकिस्तानची आर्थिक बाजू मांडली होती आणि पाकिस्तानचे उपद्व्याप सहन करू नयेत, असं म्हटलं होतं. तरीही अटलबिहारी वाजपेयींनी त्यांना आग्य्राला बोलावलं, दोन दिवसांचं समीट झालं, त्यातून मुशर्रफ यांनी जगभर प्रसिद्धी मिळवली. भारताला काही मिळालं नाही. भारताशी संबंध सुधारल्याचं पाहून पाकिस्ताननं ज्या-ज्या राष्ट्रांकडून कर्ज घेतलं होतं, त्या राष्ट्रांनी पाकिस्तानच्या कर्जाची फेररचना करण्याची भूमिका घेतली. पाकिस्तान अडचणीत येणार नाही, अशी परिस्थिती आपणच निर्माण केली. या इतिहासातून अजूनही संघ आणि भाजप काहीही शिकलेलं नाही.

भारत जेव्हा पाकिस्तानला कमकुवत करायला निघाला आणि कमकुवत केलंही, त्या त्या वेळी पाकिस्तानला वाचवण्यासाठी अमेरिकेसारखे देश पुढे आले. तीन वाजता पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशनचा भारतातील डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशनला फोन येतो आणि पाच वाजता युद्धविरामाची घोषणा होते. दुसऱ्याच दिवशी डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटमार्फत पत्रकार परिषद होते. अधिकारी पाकिस्तानात अतिरेक्यांची १०० प्रशिक्षण केंद्र आहेत, असं सांगतात आणि नऊ सेंटर आपण उद्ध्वस्त केली, हेही स्पष्ट करतात, तेव्हा ९१ सेंटर बाकी असताना आपण ‘शस्त्रसंधी’ कसा काय केला, असा प्रश्न उरतो? लष्कर पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या मन:स्थितीत आहे. मात्र, राजकीय नेते कचखाऊ भूमिका घेत आहेत. का घेतली जाते अशी भूमिका? सत्ताधाऱ्यांची काही वैयक्तिक कमजोरी तर अमेरिकेला माहीत नाही ना? कारण वर्चस्वाची परिस्थिती असतानाही आणि पाकिस्तान पुरता अडचणीत असतानाही समझोता केला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, ‘माझ्या समाजाचा आणि इतर समाजाचा प्रश्न असेल, तेव्हा मी माझ्या समाजाच्या बाजूने राहीन; पण देश आणि माझ्या समाजाचा प्रश्न असेल तर मी देशाच्या बरोबर राहीन.’ त्यामुळं सत्तेत असलेल्यांनी सतत लक्षात ठेवावं की, तुमच्यापेक्षा देश मोठा आहे. तिथे एकच भूमिका असली पाहिजे की, मी उद्ध्वस्त झालो तरी चालेल; पण देशाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही!



Source link

Cultural Minister Ashish Shelar expressed the view मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन

0
Cultural Minister Ashish Shelar expressed the view मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन


पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात पुस्तकांचे वाचन, विविध खेळांच्या माध्यमातून नैसर्गिक बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘मुलांवर चांगले संस्कार करणाऱ्या ‘पुणे बाल पुस्तक जत्रे’त पुढील वर्षापासून सांस्कृतिक विभागाचा सहभाग असेल,’ अशी घोषणा त्यांनी केली.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महानगरपालिका, पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद यांच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ ला आशिष शेलार यांनी भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार हेमंत रासने, महापालिका उपायुक्त पृथ्वीराज बी. पी., भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, ‘चिंटू’कार चारुहास पंडित, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.

शेलार म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि इंटरनेटच्या युगात लहान मुलांच्या संवेदना जागृत राहाव्यात, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि त्यांच्या गुणांचा विकास व्हावा यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन गरजेचे आहे. त्यामुळे सांस्कृतिक विभाग या बाल पुस्तक जत्रेचा अधिकृत सहयोगी होईल, राज्यात बालसंस्काराचे एक प्रारूप म्हणून हा उपक्रम ओळखला जाईल.

हेही वाचा

‘कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलेली असताना समाजासमोरच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेला वास्तविक बुद्धिमत्तेची जोड दिल्याशिवाय प्रगती साधता येत नाही. मुलांमध्ये अशी बुद्धिमत्ता निर्माण करण्याची क्षमता बाल पुस्तक जत्रेत आहे. बालकांसाठी पुस्तके, खेळ, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि इतिहासाची माहिती असे सर्व एकाच ठिकाणी आहे,’ असेही शेलार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिष शेलार यांनी विटी-दांडू खेळाचा आनंद लुटला. त्यांच्या हस्ते विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.





Source link

Pimpri Chinchwad Municipal Corporation has started moving towards paperless कामकाज कागदविरहित

0
Pimpri Chinchwad Municipal Corporation has started moving towards paperless कामकाज कागदविरहित


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने एप्रिल २०२५ पासून कागदविरहित प्रशासनाकडे वाटचाल सुरू केली आहे. कामकाजात दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली ( डीएमएस) आणि कार्यप्रवाह प्रणाली (डब्ल्यूएफ) वापरली जात आहे. एक एप्रिलपासून ३१ हजारांहून अधिक कागदपत्रे, तीन हजार ७१६ नस्तीचे कामकाज डिजिटल पद्धतीने पूर्ण केले आहे. त्यामुळे महापालिकेचे संपूर्ण कामकाज डिजिटल झाले आहे.

महापालिकेच्या सर्व ५४ विभागांमध्ये आता एकही नस्ती मानवी हस्तक्षेपाने तयार केली जात नाही. नस्ती तयार करण्यासाठी दस्तऐवज व्यवस्थापन आणि कार्यप्रवाह प्रणालीचा वापर केला जात आहे. या प्रणालीचा वापर करून सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग, ट्रॅकिंग, सामायीकरण व शोध घेणे शक्य झाले आहे. तर, कार्यप्रवाह प्रणालीमुळे प्रत्येक नस्तीचे कामकाज वेळेत पूर्ण होत असून, वेळेची बचत होत असल्याचा दावा माहिती व तंत्रज्ञान विभागाने केला आहे. प्रशासनाचे कामकाज पूर्णतः डिजिटल झाल्यामुळे निर्णयप्रक्रिया, पारदर्शकता व जबाबदारीत लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रणालींच्या वापरामुळे स्मार्ट प्रशासन, पारदर्शक कामकाज या दिशेने वाटचाल सुरू असून महापालिकेच्या सेवासुविधा नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवण्यास देखील मदत होऊ लागल्याचाही विभागाचा दावा आहे.

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन व ठेकेदारांची देयके काढण्यासाठी ‘सॅप’ प्रणालीचा वापर केला जात आहे. मार्च व एप्रिलमध्ये सहा हजार ५०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वेतन व ठेकेदारांची देयके या प्रणालीद्वारे काढण्यात आली आहेत. अभियांत्रिकी विभागांनी ‘सॅप’ प्रणालीवर १७६ अंदाजपत्रके तयार केली आहेत. विवाह नोंदणी, क्रीडा मैदाने व सभागृह बुकिंग, झोपडपट्टी बिलिंग यांसारख्या नागरी सेवादेखील डिजिटल झाल्या आहेत.

हेही वाचा

डिजिटल कामकाजाचा फायदा

५४ विभागांमध्ये शंभर टक्के कागदविरहित कामकाज, जीआयएस आधारित ईआरपी, ‘सिंगल साइन इन’ प्रणाली आणि एकत्रित डॅशबोर्डमुळे प्रत्येक नस्तीची माहिती मिळविणे शक्य झाले आहे. ई-ऑफिस प्रणालीद्वारे आठ हजार ७४२ ई-मेल पाठवण्यात आले आहेत. एक हजार ७०९ डिजिटल स्वाक्षरी ‘की’ तयार करण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या कोणत्याही विभागात आता मानवी हस्तक्षेपाने नस्ती पाठवण्याची गरज राहिलेली नाही. संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात करण्यात आले आहे. यामुळे प्रशासनातील कामकाजाची गती, पारदर्शकता वाढली आहे. या यंत्रणेमध्ये वापरकर्त्यांच्या अभिप्रायावरून सुधारणादेखील केल्या जात आहेत.- शेखर सिंह,आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका





Source link

Deputy Chief Minister Ajit Pawar took the officials of the Public Works Department अजित पवारांनी सुनावले

0
Deputy Chief Minister Ajit Pawar took the officials of the Public Works Department अजित पवारांनी सुनावले


पुणे/नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम करताना झालेल्या चुकांवर नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शनिवारी फैलावर घेतले. इमारत बांधताना सूर्यप्रकाश, हवा अधिकाधिक खेळती कशी राहील आणि ‘व्हेंटिलेशन’ कसे राहिले पाहिजे, याकडे लक्ष द्या. जनतेच्या पैशातून इमारती तयार होत असल्याने पैशाचा अपव्यय होणार नाही हे बघा,’ अशा शब्दांत सुनावले.

नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी झाला. उद्घाटनापूर्वी पवार यांनी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. या पाहणीत जाणवलेल्या त्रुटी दाखवित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. आमदार दिलीप वळसे पाटील, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे (म्हाडा) पुणे विभागाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार अतुल बेनके, सभापती संजय काळे, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, आशा बुचके, गणपत फुलवडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, उपअधीक्षक भाग्यश्री धीरबस्सी, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी, अनिल मेहेर, सुजित खैरे, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार या वेळी उपस्थित होते.

पोलीस ठाण्याच्या नवीन बांधलेल्या इमारतीमध्ये उंची काही प्रमाणात कमी ठेवण्यात आली आहे. ही बाब उपमुख्यमंत्री पवार यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी याबाबत विचारणा केली असता पावसाचे पाणी शिरू नये, यासाठी उंची कमी ठेवल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले. त्यावर पवार यांनी या भागात नक्की किती मिलिमीटर पाऊस पडतो, याची माहिती घेत पावसाचे पाणी जाऊ नये, हे कारण देऊ नका. सार्वजनिक इमारती उभारताना सूर्यप्रकाश, हवा अधिकाधिक खेळती कशी राहील, याकडे लक्ष दिले पाहिजे. या इमारती जनतेच्या पैशांतून बांधल्या जातात. त्याचे काम चांगलेच झाले पाहिजे, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले.

हेही वाचा

२१ हजार कोटी रुपयांची तरतूद

पोलीस दलाच्या पायाभूत सुविधांसाठी २१ हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे, त्यांपैकी सर्वाधिक १ हजार ४०० कोटी रुपयांचा निधी पुणे जिल्ह्याला देण्यात आला आहे. ४२ कोटी रुपये जिल्हा पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आले असून, हा निधी जिल्हा ग्रामीण दलाने समन्वय राखून सायबर गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना, अँटिड्रोन गन, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच अद्ययावत वाहने यासाठी खर्च करावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

खासदार मेधा कुलकर्णींचा धसका

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी वेळेच्या अगोदर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून कोणाचीही वाट न पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उरकला होता. त्यावर भाजपच्या राज्यसभेच्या खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पवार यांना खासदार कुलकर्णी यांना बरोबर घेऊन पुन्हा उद्घाटन करावे लागले होते. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार १५ ते २० मिनिटे अगोदर दाखल झाले होते. कार्यक्रम सकाळी नऊ वाजता असल्याचे कार्यक्रमपत्रिकेत लिहिले असल्याचे लक्षात येताच कार्यक्रमस्थळी लवकर आलेल्या पवार यांनी इमारतीची पाहणी करून त्यानंतर ठरलेल्या वेळेनंतर इमारतीचे उद्घाटन केले. आपल्या मनोगतामध्येही या घटनेचा उल्लेख करत महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेला किस्सा पवार यांनी उपस्थितांना सांगितला.

आमदार शरद सोनवणे अनुपस्थित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात महायुतीची सत्ता असतानाही शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केलेले जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे हे कार्यक्रमाला अनुपस्थित होते. याबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘सोनवणे यांचा फोन आला होता. नारायणगाव पोलीस अधिकारी सहकार्य करीत नसल्याने ते नाराज आहेत.’ कार्यक्रमासाठी सर्वांना आमंत्रित करण्याच्या सूचनाही पवार यांनी प्रशासनाला केल्या.

हेही वाचा





Source link