Friday, June 26, 2026
Home Blog Page 19

पितळखोरा ते गांधार : बुद्धप्रतिमेच्या उत्क्रांतीचा अद्भुत प्रवास

0
पितळखोरा ते गांधार : बुद्धप्रतिमेच्या उत्क्रांतीचा अद्भुत प्रवास

महाभिनिषक्रमण

साहस Times : खालील हे दोन्हीही शिल्प एकाच प्रसंगावर आधारित आहेत, एक शिल्प स्थविर्वादी मान्यतेप्रमाणे आहे तर दुसरे महासांघीक मान्यतेप्रमाणे आहे , स्थवीरवादी शिल्पपट महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मधील पितळखोरा लेणीवर होते, जी कन्नड तालुक्यातील काळीमठ जवळील पाटणा गावाच्या नजीक असलेल्या सातमाळ पर्वतरांगेतील आद्य लेणी आहे ,
इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात सातवाहन राज्य काळात ही लेणी निर्माण करण्यात आली होती, तेव्हा आज आपण पाहतो तसे सम्यक संबुध्द यांचे मानवीय स्वरूपातील बुध्द रूप तयार झालेले नव्हते तेव्हा सम्यक संबुध्दांचे अस्तित्व प्रतिकांच्या माध्यमातून मांडण्यात येत असे , स्थविरवादी मान्यतेप्रमाणे बुद्धांना शिल्पात अथवा चित्रात मांडणे मान्य नव्हते तेव्हा सिध्दार्थ गौतम यांच्या जीवनाला जो कलाटणी देणारा प्रसंग आहे जो बुध्दत्व प्राप्त करून सम्यक संबुध्द बनण्याच्या घटनाक्रम आहे तो इथे सुंदररीत्या साकारण्यात आला आहे. सिद्धार्थ गौतम यांच्या गृहत्यागाला महाभिनिषक्रमण असे बौद्ध साहित्यातून संबोधण्यात आले आहे , तो प्रसंग लेखनाच्या माध्यमातून आपल्यासमोर प्राचीन बौध्द साहित्यातून आलेला आहे त्याला कलाकारांनी दगडात परावर्तित केले आहे त्यावर आधारित हे शिल्प आहे.

परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या प्रसंगाला आपल्या अत्यंत महत्त्वपूर्ण शोध ग्रंथातून शब्दबद्ध केलेला आहे, हा प्रसंग त्यांनी अत्यंत वस्तुनिष्ठ पध्दतीने मांडलेला आहे, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकाला गोसेफल ऑफ बुद्धा हे नाव देण्याचे ठरवले होते पण भारतीय मनाला भारतीय समाजाला ते नाव रुचणार नाही म्हणून त्यांनी त्या पुस्तकाचे नाव बुद्धा अँड हीज धम्मा असे नाव दिले.

परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकात तो प्रसंग शब्दबद्ध केलेला आहे , शाक्य आणि कोलीय ( कोलीय म्हणजे आजचे कोळी ) यांच्यात पाण्याच्या वाटपावरून वाद होतो , शाक्यांच्या संघातून कोलियांच्या विरोधातात युध्दाचा ठराव मांडला जातो ज्याला सिध्दार्थ गौतम हे विरोध करतात , संघाच्या ठरावाच्या विरोधात गेल्या कारणाने संघाने ज्या शिक्षा दिलेल्या होत्या त्याच्यापैकीच एक गृहत्यागाची म्हणजेच देश त्यागाची शिक्षा होती जी सिध्दार्थ गौतम यांनी स्वीकारलेली होती, संघाकडून मिळालेल्या शिक्षेची वार्ता सिद्धार्थ गौतम घरी पोहोचण्या आधीच घरी पोहोचली होती , आपल्या आई-वडिलांची पत्नीची आणि आप्तस्वकीयांची भेट घेऊन सिद्धार्थ गौतम यांनी गृहत्याग केले होते.

आता आपण शिल्प पाहुया

पितळखोरा लेणी ज्या पहाडात कोरण्यात आलेली आहे तिचा दगड हा मृदू स्वरूपातील असल्या कारणाने तिथे अनेक सुट्टे शिल्प खाली वेगळे तयार केले गेले होते म्हणजे सुट्ट्या शिळेवर कोरून मग ते अर्ध उठावातील शिल्प लेणीच्या स्थापत्यात सुशोभिकरण करण्यासाठी वापरले गेले होते. मातकट रंगाच्या दगडाच्या शिळेवर हे शिल्प साकारण्यात आलेले आहे , इथे सिध्दार्थ गौतम यांचे अस्तित्व स्थापित करण्यासाठी त्यांच्याशी निगडीत असलेल्या गोष्टींचा वापर करण्यात आलेल्या आहेत. वरच्या भागापासून सुरुवात केली तर आपल्याला लक्षात येईल की सांची स्तूपावर ज्या पद्धतीचे तोरण द्वार आहेत तशाच प्रकारचे तोरण द्वाराचे अंकन इथे उत्कीर्ण केलेले आपल्याला डाव्या कोपऱ्यात पाहता येईल हे आपल्या राज्याच्या बाहेर सीमारेषा ओलांडून जाण्याचे प्रतीक आहे, आपल्या नगराच्या राज्याच्या सीमेरेषेच्या बाहेर पडणारी वेस म्हणून इथे तोरण द्वार उत्कीर्ण केले गेले आहे , त्या तोरण द्वाराच्या बरोबर उजव्या बाजूला एक व्यक्ती हा प्रसंग पाहत आहे जो आपल्या राज्याच्या सीमेवर रक्षणार्थ तिथे उभा आहे , राज वैभवाचे प्रतीक म्हणून खाली मौल्यवान आभूषणांनी सजवलेला एक घोडा दिसून येत आहे जो सिध्दार्थ गौतम यांचा आवडता घोडा कंठक आहे जो मंद पण जड पावले टाकतांना मार्गस्थ झालेला दिसून येत आहे जे राज वैभव त्यागण्याचे प्रतीक आहे या घोड्यावर छत्र धरले गेले आहे जे राज शासनाचे प्रतीक आहे, मार्गस्थ झालेल्या घोड्याच्या पुढे सेवेकराच्या भूमिकेत एक व्यक्ती दिसून येत आहे. शिल्पातील सर्व व्यक्तिरेखा गतिमान आहे हे स्थापित करण्यासाठी कलाकाराने छान कल्पकता वापरली आहे ही व्यक्ती चालत आहे गतीमान ( चलचित्र समान आहेत) आहे हे दाखवण्यासाठी कलाकाराने या व्यक्तीस पुढे किंचित झुकवलेले आहे त्यामुळेच त्याच्या पुढच्या पायावर जोर आल्याने त्याचा पुढचा पाय गुडघ्यात दुमडलेला आहे व मागचा पाय उचलून पुढे टाकण्याच्या प्रयत्नात आहे ही प्रक्रिया संपूर्ण शिल्पाला गतिमानता प्राप्त करून देत आहे , ही घोड्याच्या पुढे चालणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही व्यक्ति सिध्दार्थ गौतम यांचा खासगी सेवक छन्न आहे. इतर व्यक्तींनी जसे कपडे परिधान केले आहेत त्याहून उमद्या वयाच्या छन्नाचे कपडे वेगळे आहेत त्याने धोतरा समान नेसू नेसलेले आहे तर त्याचा फेटा देखील मौर्य सातवाहन कालीन समोर गाठीचा असतात तसा नसून पागोटे बांधावेत तसे आहे त्याने कानात जी कर्ण फुले घातली आहेत ती सहज आपले लक्ष वेधून घेतात, इथे विशेष म्हणजे छन्नाच्या एका हातात अखुड पात्याचे खड्ग आहे तर दुसर्‍या हातात ढाळण्यासाठी चवरी आहे वारा घालण्यासाठी , महाराष्ट्रात असंख्य लेणी आहेत त्यातून दिसून येणारे सम्यक संबुध्दांच्या शिल्पांच्या शेजारी चवरी ढाळणारे सेवेकर्यांच्या भूमिकेत बोद्धीसत्व पद्मपाणी व बोद्धीसत्व वज्रपाणी दिसून येतात, दोघांच्याही हातात हवा घालण्यासाठी चवरी असते पण इथे मात्र छन्न आपल्याला त्या भूमिकेत दिसून येत आहे कारण सम्यक संबुध्द व बोद्धीसत्व यांची शिल्प तयार होण्याचा काळ अद्यापपर्यंत आलेला नव्हता तो काळ पुढे यायचा होता.
इथे एक बाब समजून घेणे आवश्यक आहे की सिद्धार्थ गौतम यांना वगळून त्यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी दाखवून त्यांचे अस्तित्व इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या शिल्पाकृतीतून झालेला आहे. त्यांच्या नसण्यातुन त्यांच्या असण्याचे प्रकटीकरण प्रत्यक्षरित्या इथे करण्यात आलेला आहे.

पुढचे शिल्प समजून घेण्यासाठी आपल्याला थेट आपला दख्खनचा प्रदेश सोडून हजारो किलोमीटरचा प्रवास करून प्राचीन काळातील गांधार प्रदेशात जावे लागेल जो आज अफगाणिस्तान मधला कंधार आहे तिथे जावे लागेल जिथे या शिल्प शैलीचे उगमस्थान आहे, कुषाण घराण्यातील दुसरे शासक देव पुत्र कनिष्क यांच्या कारकिर्दीमध्ये या शिल्पाची निर्मिती झाली आहे , या शैलीला गांधार शैली असेल संबोधित केले जात असे, प्राचीन काळात तीन प्रमुख शिल्पशैली होत्या त्याच्यापैकीच ही एक, प्रथम होती गांधार शैली दुसरी होती मथुरा शैली आणि तिसरी होती अमरावती शैली ज्या भूभागातून ज्या शैलीचा उगम स्थान आहे त्याच नावाने त्या शिल्पशैलीला नाव देण्यात आले होते.
गांधार शैलीला इंडोग्रीक शैली असे ही म्हणतात जी भारतीय आणि ग्रीक यांच्या मिश्रणातून तयार झाली आहे , राखाडी रंगाच्या छान दगडातून ही सर्व शिल्प साकारली गेली आहेत.
गांधार शैलीतील महाभिनिष्क्रमणाचे शिल्प कलेच्या शिल्पाकृतीच्या अनुषंगाने विकसित आहे, छोट्याशा शिल्पपट्टीमध्ये अनेक व्यक्तिरेखा दिसत आहेत , शिल्पाच्या व आपल्या उजव्या बाजूच्या कोपर्‍यात स्तंभ दिसत आहे जो घडीव आहे ते राजमहालातून बाहेर पडण्याचे प्रतीक आहे म्हणून त्याला पाठीमागे ठेवले गेले आहे, शिल्पातील सर्व व्यक्ती त्याला पाठ करून आहेत राज महालाच्या बाहेर सिध्दार्थ गौतम पडले आहेत गृहत्याग केले आहे म्हणून त्याला मागे स्थान दिले गेले आहे हा सर्व प्रसंग महालाच्या बाहेर घडत आहे हे कलाकाराला सुचवायचे आहे, स्तंभाच्या पुढे मध्यम अंगकाठी असलेली मध्यम वयाची एक व्यक्ती सिध्दार्थ गौतम यांच्यावर छत्र धरून आहे त्यांच्या हातातील छत्राचा दांडा व छत्र खुप काळजीपूर्वकपणे तयार केले गेले आहे ते राज वैभवचा प्रतीक म्हणून इथे वापरण्यात आलेले आहे , शिल्पातील व्यक्तीचे केस हे झुपकेदार असून त्यांची गाठ तयार करून वर बांधण्यात आली आहे त्यांच्या चेहर्‍यावर पिळदार मिश्या आहेत तर चेहऱ्यावरील भाव हे काहीसे गंभीर आहेत तर चेहरा काहीसा मागे झुकलेला आहे त्यांनी कानात गळ्यात हातात मोजकीच अभूषणे ल्यायलेली आहेत तसेच खांद्यावरून रूळणारा शेल्या समान कापड आहे व खाली अधोवस्त्र हे धोतरा समान आहे व पायात कोणत्याही प्रकाराचे पायताण नाही, त्याच्यांच वरती खरंतर ते वरती नसून मागे आहेत पण आपल्या नजरेस पडायला हवे म्हणून कलाकाराने त्यांना वरच्या भागात जागा दिली आहे. त्याकाळात थ्रीडी डायमेन्शन विकसित झालेले नव्हते म्हणून ते आपल्याला मागे न दिसता वर दिसत आहेत,वज्र हातात घेऊन उभी असलेली व्यकी म्हणजे ग्रीक पौराणिक कथेतील सुप्रसिद्ध अलौकिक व्यक्तीरेखा हरक्युलीस आहे जो रक्षण करता (प्रोटेक्टर) म्हणून इथे दर्शवण्यात आलेला आहे . गांधार शिल्पकले मधले विशेषता म्हणजे सिद्धार्थ गौतम ज्या घोड्यावर बसलेले आहेत त्या घोड्याला इथे खाली दोन यक्षांनी हवेत तोलून धरलेले आहे, याचे कारण आहे की सिद्धार्थ गौतम यांनी गृहत्या केले आहे घर सोडत असताना घोड्यांच्या टापांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ नये म्हणून त्यांच्या खुराना अलगदपणे त्यांनी उचललेले आहे.

वरील दोन्हीही शिल्प सिद्धार्थ गौतम यांचे बुद्धत्व प्राप्त केल्यानंतरचे आहेत संबोधी प्राप्त केल्यानंतरचे आहेत त्यामुळे दोन्हीं शिल्पांमधला फरक म्हणजे एक शिल्प स्थाविर्वादी मान्यतेप्रमाणे आहे तर दुसरे महासांघीक संप्रदाय मान्यतेप्रमाणे आहे , बुद्ध धम्मातील दोन पंथांमधला फरक एवढाच आहे की स्थविर्वादी संप्रदायाप्रमाणे सिद्धार्थ गौतमांचं नसणे म्हणजेच त्यांचे आसणे हॊय व महासांघीकांमध्ये सिद्धार्थ गौतम यांचे अस्तित्व सरळ सरळ स्थापित केले गेले आहे हे दोन्ही शिल्प दोन वेगळ्या ठिकाणी आहेत पितळखोऱ्यावर सापडलेले शिल्प आज दिल्ली वस्तू संग्रहालय मध्ये असून व गांधार शिल्पकलेतील शिल्प आज आपल्याला अफगाणिस्ताना व पाकिस्तानच्या वस्तू संग्रहालयात पाहण्यास मिळतात.
पण आज जर आपल्याला महाभिनिषक्रमण शिल्प पाहायचे झाल्यास आपण कर्नाटक मधील कणगणहल्ली (सन्नती ) स्तुपावरती पाहू शकतो.
पांथस्थच्या माध्यमातून आपण ऑगस्ट महिन्यात सन्नती ( कर्नाटक) अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे त्या दौऱ्यामध्ये हे शिल्प आपण उपस्थितांना दाखवणार आहोत, समजून सांगणार आहोत ज्या सदस्यांना पांथस्थच्या सोबत अभ्यास दौऱ्यात सहभाग घ्यायचा आहे त्यांनी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून समूहात जोडून घ्यायचे व अधिक माहिती जाणून घ्यायची आहे अभ्यास दौऱ्यावर येणार असाल तर नक्कीच समूहात जोडून घ्या येणार नसाल तर जोडून घेऊ नका ही विनंती.

सन्नती अभ्यास दौऱ्याची लिंक : https://chat.whatsapp.com/EHIhwDGsrGgG9YDtI6YZS9

सूरज रतन जगताप

   ( लेणी अभ्यासक )

देशहितासाठी शंभूराज देसाईंचा मोठा निर्णय : नियोजित युरोप दौरा रद्द

0
देशहितासाठी शंभूराज देसाईंचा मोठा निर्णय : नियोजित युरोप दौरा रद्द

मुंबई :- देशातील सध्याच्या कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याणमंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही कौटुंबिक सहल नियोजित करण्यात आली होती. या दौऱ्यात London, Paris आणि Amsterdam या प्रमुख शहरांचा समावेश होता. कुटुंबासोबत पर्यटन आणि सुट्टीसाठी हा दौरा आखण्यात आला होता.
मात्र, देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत तसेच विदेशी चलन बचतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने देसाई यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
राजकीय वर्तुळात त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत असून “देश प्रथम” या भूमिकेचे हे एक उदाहरण मानले जात आहे. वैयक्तिक आनंद आणि सुट्टीपेक्षा राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आल्याची चर्चा आहे.
जबाबदारीची जाणीव, साधेपणा आणि देशहिताला प्राधान्य देत शंभूराज देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला दिलेला सकारात्मक प्रतिसाद सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रशासकीय टिप्पणी नसल्याने फलटण नगरपरिषदेची पाणीपुरवठा समितीची सभा गदारोळात तहकूब

0
प्रशासकीय टिप्पणी नसल्याने फलटण नगरपरिषदेची पाणीपुरवठा समितीची सभा गदारोळात तहकूब

फलटण : फलटण नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीची सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली सभा जोरदार गदारोळानंतर अखेर तहकूब करण्यात आली. अजेंड्यातील महत्त्वाच्या विषयांवर मुख्याधिकाऱ्यांची प्रशासकीय टिप्पणी आणि स्वाक्षरी नसल्याचा गंभीर आक्षेप विरोधी शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतल्याने सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक रंगली. अखेर पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर यांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी दुपारी ३ वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सभेसमोर एकूण २१ विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. मात्र कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी अजेंड्यावरील प्रस्तावांना प्रशासनाची तांत्रिक व आर्थिक मान्यता नसताना ते थेट समितीसमोर कसे ठेवण्यात आले, असा सवाल उपस्थित केला. मुख्याधिकाऱ्यांची कोणतीही टिप्पणी नसल्याने विरोधकांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
सभेच्या अजेंड्यावर शहरातील पाणीपुरवठ्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय होते. त्यामध्ये शहरातील अनधिकृत नळ जोडण्या नियमित करणे, नवीन नळजोड अर्जांवर निर्णय घेणे, विविध प्रभागांमध्ये नवीन HDPE वितरण जलवाहिन्या टाकणे, पाणीपुरवठा विभागासाठी जेसीबी भाड्याने घेणे तसेच इलेक्ट्रो फ्युजन व वेल्डिंग मशीन खरेदीचा समावेश होता. याशिवाय वितरण नलिकांच्या दुरुस्तीसाठी साहित्य खरेदी व खोदकामासाठी मनुष्यबळ वापरण्याचे प्रस्तावही प्रलंबित राहिले आहेत.
सभा तहकूब झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कामांना तात्पुरता ब्रेक लागला असून अनेक प्रभागांतील नागरिकांना आता पुढील बैठकीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांच्या प्रशासकीय टिप्पणीशिवाय अजेंडा तयार झाल्याने नगरपरिषदेतील प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तहकूब करण्यात आलेली ही बैठक आता सभापतींच्या पुढील आदेशानुसार पुन्हा आयोजित केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी दत्तात्रेय चव्हाण (तात्या) यांची निवड

0
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी दत्तात्रेय चव्हाण (तात्या) यांची निवड

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी दत्तात्रेय चव्हाण (तात्या) यांची निवड

फलटण : चव्हाणवाडी येथील श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूलच्या स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय श्री दत्तात्रेय बाबुराव चव्हाण (तात्या) यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

दिनांक ९ मे २०२६ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात तात्या यांच्या निवडीबद्दल परिसरातील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर ११ मे २०२६ रोजी श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी येथे मुख्याध्यापक श्री विठ्ठल निकाळजे सर, त्यांचे सर्व सहकारी, मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री आबा धायगुडे सर, श्री बर्गे सर तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत तात्या यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास चव्हाणवाडी गावचे उपसरपंच श्री प्रशांत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री गोरख शिंदे, उद्योजक व कॉन्ट्रॅक्टर श्री सचिन अहिरेकर, श्री किशोर शिंदे, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री राजेंद्र राजपुरे सर, श्री प्रदीप क्षीरसागर सर, श्री सुरेश भोईटे सर, श्री धापड सर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन १९९२ मध्ये विद्यालय स्थापनेत तात्या यांचा सिंहाचा वाटा होता. सुरुवातीच्या काळात हे हायस्कूल त्यांच्या राहत्या घरात भरत होते. त्यांनी स्वतःसाठी केवळ एक खोली ठेवून उर्वरित जागा विद्यालयासाठी उपलब्ध करून दिली. गोरगरीब शेतकरी व बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा त्याग करत गावात रयत शिक्षण संस्थेची शाळा सुरू व्हावी यासाठी अथक परिश्रम घेतले.

याशिवाय त्यांनी स्वतःची ४० गुंठे जमीन विद्यालयाच्या बांधकामासाठी विनामोबदला संस्थेच्या नावे करून दिली. आज त्याच जागेवर विद्यालयाची भव्य इमारत उभी असून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षणाचा वसा तात्या यांनी निस्वार्थ भावनेने जपला.

सुरुवातीच्या काळात शिक्षकांना पगार नसतानाही त्यांनी स्वतःच्या घरातील व परिसरातील लोकांकडून धान्य गोळा करून शिक्षकांची व्यवस्था केली. गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

अलीकडील काळात मुख्याध्यापक श्री विठ्ठल निकाळजे सर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व कमिन्स इंडिया कंपनीच्या CSR निधीतून विद्यालयात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. यामध्ये संपूर्ण कंपाऊंड, अत्याधुनिक स्वच्छतागृहे, इमारतीचे रंगकाम, प्रत्येक वर्गात इंटरॲक्टिव्ह पॅनेल बोर्ड, पाच संगणक, एआय प्रशिक्षण वर्ग, सुसज्ज लायब्ररी, भव्य प्रयोगशाळा व पिण्याच्या पाण्याची सुविधा आदी कामांचा समावेश आहे.

विद्यालयाच्या या प्रगत स्वरूपाची आणि तात्या यांच्या त्यागमय कार्याची दखल घेत रयत शिक्षण संस्थेने त्यांची जनरल बॉडी सदस्यपदी निवड केली आहे. “स्वतः झिजून इतरांना सुगंध देणारे चंदन” अशा शब्दांत ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांच्या वतीने तात्या यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले DCM

0


सातारा: तामिळनाडूत आज थपलती विजय यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. विजय यांच्या शपथविधीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्यात काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. तर, काल पश्चिम बंगालचे (West bengal) नवनिर्वाचित मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यालापंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिग्गजांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) स्टेजवरील उपस्थितांची भेट घेतली. त्यावेळी, 

पंतप्रधान मोदी हे स्टेजवरील प्रत्येकापाशी थांबून त्यांना अभिवादन करत पुढे केले, ते प्रत्येकाला अभिवादन करत पुढे जात होते. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापाशी येताच मोदी बराच वेळ थांबले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. पंतप्रधान मोदी बराचवेळ एकनाथ शिंदे यांच्याशी बोलत होते, त्यांचा हात हातात घेतला. दोघांमध्ये हास्यविनोद झाला आणि नेहमीप्रमाणे खांद्यावर थाप मारुन मोदी पुढे निघून गेले. मोदी-शिंदेंच्या या केमिस्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या दोघांच्या केमिस्ट्रीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. तसेच, मोदींनी नेमकं काय चर्चा केली, याची उत्सुकताही सर्वांना लागली. आता, स्वत: एकनाथ शिंदेंनी मोदी भेटीचा किस्सा सांगितला. तसेच, मोदींनी काय म्हटले, आस्थेवाईकपणे विचारपूस का केली, हेही सांगितले. 

मोदींनी एकनाथ शिंदेंना काय म्हटलं (Modi speak Eknath Shinde)

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी वेळी पंतप्रधान यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बराच वेळ चर्चा केली होती. या चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या चर्चेबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माझ्यावर प्रेम आहे. मुंबईमध्ये हवामान खराब झाल्याने मला एका लग्नसोहळ्यासाठी जात असताना हेलिकॉप्टर अचानक लँड करावे लागले होते. याबाबत मोदींनी विचारणा केली. त्यांना माझी काळजी वाटली म्हणून त्यांनी विचारपूस केली, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी आज सातारा दौऱ्यावर आले असता दिली. 

साताऱ्यात शिवसागर जलाशयावर पूल (Satar shivsagar lake)

साताऱ्यातील कोयना धरणाचा शिवसागर जलाशयावर एक भव्य पूल  होतो आहे. सोळशी आणि कांदाट खोऱ्याला जोडणारा हा 540 मीटर लांबीचा पूल असून या पुलासाठी तब्बल 175 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या पुलाचे काम 90 टक्के पूर्ण झालं  असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुलाची आज पाहणी केली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती देखील घेतली. ह्या पुलामुळे दुर्गम भागात पर्यटन वाढणार असून या भागातील तरुणांना याच ठिकाणी रोजगार मिळणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

हेही वाचा

शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा

आणखी वाचा



Source link

वंचितांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे नेतृत्व : प्रकाश आंबेडकर”

0
वंचितांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे नेतृत्व : प्रकाश आंबेडकर”

वंचितांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे नेतृत्व : प्रकाश आंबेडकर”

फलटण : महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्ट भूमिका, अभ्यासू वक्तृत्व आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवणारे नेते म्हणून प्रकाश आंबेडकर  यांचे नाव विशेष उल्लेखाने घेतले जाते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील यशवंत आंबेडकर होते. लहानपणापासूनच त्यांच्यावर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी विधी शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक आणि राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.
राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी बहुजन समाजाच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत काम सुरू केले. ते अकोला मतदारसंघातून त्यांनी प्रतिनिधित्व करतात . त्यांनी दलितांवरील अत्याचार, आरक्षण, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी आणि संविधान रक्षण यांसारख्या विषयांवर प्रभावीपणे मांडणी केली.
बहुजन समाजाचे राजकीय संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी बरिप बहुजन महासंघ या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडी ची स्थापना करून दलित, इतर मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक आणि वंचित घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. या आघाडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे निर्माण झाली.
प्रकाश आंबेडकर हे स्पष्टवक्ते आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भाषणांमध्ये संविधान, सामाजिक समता, अर्थकारण आणि लोकशाही यांसारख्या विषयांचा सखोल अभ्यास दिसून येतो. ते धर्मनिरपेक्षता आणि संविधानिक मूल्यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
सामाजिक कार्याच्या माध्यमातूनही त्यांनी शिक्षण, मानवाधिकार, सामाजिक जागृती आणि जातीय अन्यायाविरोधात अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातील दलित, इतर मागासवर्गीय आणि बहुजन युवकांमध्ये त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
दरम्यान, त्यांच्या राजकारणावर काही वेळा टीकाही झाली आहे. विरोधकांच्या मते त्यांची स्वतंत्र भूमिका अनेकदा मतविभाजनास कारणीभूत ठरते. मात्र समर्थकांच्या मते ते तत्त्वनिष्ठ आणि तडजोड न करणारे नेते आहेत.
महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेतृत्व म्हणून आजही प्रकाश आंबेडकर यांचे नाव महत्त्वाने घेतले जाते. सामाजिक न्याय आणि संविधान रक्षणाच्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका कायम ठाम राहिली आहे.


कालकथित नितीन भालेराव यांना धम्ममय पुण्यानुमोदनातून आदरांजली

0
कालकथित नितीन भालेराव यांना धम्ममय पुण्यानुमोदनातून आदरांजली

कालकथित नितीन भालेराव यांना धम्ममय पुण्यानुमोदनातून आदरांजली

फलटण : कालकथित नितीन बाबासो भालेराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पुण्यानुमोदन कार्यक्रमात बुद्ध धम्माच्या संस्कार विधीनुसार धम्ममय वातावरणात विधी पार पडला. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य महावीर भालेराव यांच्या हस्ते हा विधी संपन्न झाला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बौद्धाचार्य महावीर भालेराव यांनी नितीन भालेराव यांच्या जीवनकार्याची आठवण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. ते म्हणाले, “जीवनात चांगल्या मित्रांची साथ मिळणे महत्त्वाचे आहे. वाईट संगती सोडून चांगल्या विचारांचा स्वीकार केला पाहिजे. नितीन यांनी अनेक चांगली कार्ये केली आणि समाजात सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न केला. आज ते आपल्या सोबत नसले तरी त्यांचे विचार कायम स्मरणात राहतील. आर्यन आणि गुड्डी यांना सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात अनंत राऊत यांची ‘मित्र’ ही कविता सादर केली. त्यांच्या भावस्पर्शी कवितेमुळे उपस्थितांचे वातावरण भावुक झाले. “मित्र असा असावा जो संकटात मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरेल,” असा संदेश त्यांनी दिला.

आयु. संदीप भालेराव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “नितीन हे सर्वांशी मैत्रीपूर्ण व आदराने वागणारे व्यक्तिमत्त्व होते. मदतीस तत्पर असलेला माणूस चुकीच्या संगतीमुळे व्यसनाच्या आहारी गेला. तथागत बुद्धांनी दुःखमुक्तीचा मार्ग दिला असून व्यसनातून बाहेर पडण्यासाठी संवाद, समजूत आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. माया जरूर करा, पण चुकीवर पांघरूण घालू नका,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आयु. किरण गायकवाड म्हणाले, “गेलेली व्यक्ती परत येणार नाही, मात्र समाजाने यातून बोध घेतला पाहिजे. भीमनगरातून दारूबंदीची सुरुवात व्हावी. समाज त्यांच्या आठवणी कायम जपेल,” असे सांगत त्यांनी जयंती मंडळाच्या वतीने आदरांजली अर्पण केली.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “नितीन माझ्या अत्यंत जवळचे होते. व्यसनाच्या आहारी गेले असले तरी त्यांनी अनेक चांगली कामे केली. ‘धम्माचे कार्य सुरू ठेवा’ माझ्या बंधुला साथ द्या. हा त्यांचा कायम आग्रह असायचा. व्यसनमुक्तीसाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून आणि समाजापासून सुरुवात केली पाहिजे,” असे ते म्हणाले.

भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुका माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप यांनी पंचशील पालनाचे महत्त्व अधोरेखित केले. “लहान मुलांवर योग्य संस्कार आणि लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दुःखावर व्यसन हा उपाय नसून पंचशील आणि धम्माचा मार्गच खरा आधार आहे. समाज दुःखाच्या खाईत जात असताना सर्वांनी एकत्र येऊन व्यसनाला मूठमाती देण्याचा संकल्प केला पाहिजे. आपल्या लहान मुलांवर पहिल्यापासून लक्ष ठेवा. तो कुठे जातोय, काय करतोय हे पाहिले पाहिजे. तेव्हाच मुले व्यसनापासून दूर राहणार आहेत. दुःखाला व्यसन हा पर्याय नाही. तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करा.” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात उपस्थितांनी कालकथित नितीन भालेराव यांना एक मिनिट उभे राहून आदरांजली अर्पण करत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा निर्धार व्यक्त केला.

२० मे रोजी देशव्यापी औषध दुकाने बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट संघटनांचा एल्गार

0
२० मे रोजी देशव्यापी औषध दुकाने बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट संघटनांचा एल्गार


फलटण | प्रतिनिधी. ऑनलाईन औषध विक्रीला विरोध तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रजिस्ट्स’ (AIOCD) यांच्या वतीने २० मे २०२६ रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात सातारा जिल्ह्यासह राज्यभरातील औषध विक्रेते सहभागी होणार असून, त्या दिवशी बहुतांश औषध दुकाने बंद राहणार आहेत.
या आंदोलनाला ‘महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स अँड ड्रजिस्ट्स असोसिएशन’ (MSCDA) तसेच ‘सातारा जिल्हा केमिस्ट अँड ड्रजिस्ट असोसिएशन’ यांनी पाठिंबा दर्शविला आहे. जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची रणनीती आखण्यात आली असून, अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव राजीव सिंघल आणि अनिल नावंदर यांनी सर्व औषध विक्रेत्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रमुख मागण्या काय?
संघटनेकडून केंद्र सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
ई-फार्मसी आणि ऑनलाईन औषध विक्री तातडीने बंद करण्यात यावी.
औषध विक्री संदर्भातील GSR 817 (दि. २८ ऑगस्ट २०१८) निर्णय मागे घ्यावा.
मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यवसायिक सवलतींवर बंदी आणावी.
बनावट औषधांचा धोका टाळण्यासाठी कोविड काळातील GSR 220 (दि. २६ मार्च २०२०) निर्णय रद्द करावा.
संघटनांच्या मते, ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषधांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून ग्रामीण भागातील छोटे औषध विक्रेते आर्थिक अडचणीत सापडत आहेत.
फलटणमध्ये केमिस्ट संघटनेची बैठक
संपाच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे तालुक्यातील सर्व केमिस्ट सभासदांची बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र स्टेट केमिस्ट असोसिएशनचे सदस्य राहुल मोहिते, फलटण तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम धुमाळ आणि उपाध्यक्ष रणजीत कदम उपस्थित होते. त्यांनी सर्व सदस्यांना बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष व्यवस्था
संपादरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी फलटण तालुका केमिस्ट असोसिएशनने विशेष खबरदारी घेतली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी तालुक्यात दोन औषध दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच प्रशासनाशी समन्वय साधून रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना अध्यक्ष संग्राम धुमाळ म्हणाले,
“ऑनलाईन औषध विक्रीमुळे ग्रामीण भागातील औषध दुकानदारांच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाले आहे. हा लढा आमच्या हक्कांसाठी असला तरी जनतेची गैरसोय होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाईल.”

मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा निकाल उल्लेखनीय

0
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा निकाल उल्लेखनीय

यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम

फलटण : फलटण येथील मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चा यंदाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल अत्यंत उल्लेखनीय लागला असून, कु. जान्हवी हंबीर लांडगे हिने 96.40% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशामुळे शाळेचे तसेच परिसराचे नाव उज्ज्वल झाले आहे.
जान्हवीने सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य वेळेचे नियोजन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या यशामागे पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे तिने सांगितले.
यावर्षी शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट यश मिळवत निकालाची गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत शाळेचा निकाल अधिक उंचावला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सौ. वैशाली चोरमले, सातारा जिल्हा अॅम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, कान-नाक-घसा तज्ञ डॉ. जनार्दन पिसाळ, हृदयरोग तज्ञ डॉ. पूनम पिसाळ, डॉ. संदीप देवकाते, सौ. मंगल देवकाते मॅडम, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पालक व नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

नागसेन बुद्ध विहार त्रिमली येथे श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरास उत्साहात प्रारंभ

0
नागसेन बुद्ध विहार त्रिमली येथे श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरास उत्साहात प्रारंभ

नागसेन बुद्ध विहार त्रिमली येथे श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरास उत्साहात प्रारंभ

खटाव : नागसेन बुद्ध विहार, त्रिमली येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व व भारतीय बौद्ध महासभा शाखा खटाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन सोहळा धम्ममय वातावरणात संपन्न झाला. दिनांक ८ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत आयोजित या शिबिरात खटाव तालुक्यातील उपासक श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षणासाठी सहभागी झाले आहेत.

शिबिराच्या प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेच्या भिक्षू संघाचे सदस्य भंते धम्मानंद बोधी यांच्या शुभहस्ते श्रामणेर दीक्षा विधी पार पडला. यावेळी त्यांनी उपासकांना चिवर प्रदान करून त्रिसरण व अष्टशील दिले. बुद्ध, धम्म आणि संघ यांच्यावरील श्रद्धा दृढ ठेवून शील, समाधी व प्रज्ञेच्या मार्गाने जीवन जगण्याचा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.

या प्रशिक्षण शिबिरासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व यांच्या मागणीनुसार केंद्रीय शिक्षक तथा सातारा जिल्हा पूर्वचे हिशोब तपासणी आयु. बाळासाहेब जाधव, आयु. अविनाश बारसिंग सर व आयु. सुनील कदम सर हे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. शिबिरामध्ये धम्म, विनय, बौद्धाचार, त्रिसरण-पंचशील, संघकार्य, धम्मप्रसार आणि सामाजिक बांधिलकी यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस तथा केंद्रीय शिक्षक आयु. बाबासाहेब जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना “भारतीय बौद्ध महासभा ही समाजाची मातृसंस्था असल्याचे सांगितले. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारची २४ शिबिरे आयोजित करून धम्माचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात करण्याचे आवाहन केले. समाजात नैतिकता, समता, बंधुता आणि प्रज्ञेचा विचार रुजवण्यासाठी अशा प्रशिक्षण शिबिरांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच श्रामणेर दीक्षा घेतलेल्या सर्व दीक्षार्थींना शुभेच्छा देत धम्ममार्गावर दृढ राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय शिक्षक आयु. बाळासाहेब जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभा शाखा खटाव तालुक्याचे अध्यक्ष आयु. अरुण रणदिवे यांनी भूषविले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे सरचिटणीस आयु. सुनील कदम यांनी संपूर्ण विधी व कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या प्रोटोकॉलनुसार करून घेतले. त्यांनी कार्यक्रमादरम्यान आवश्यक त्या सूचना देत अध्यक्षांच्या उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला. तसेच हे शिबिर यशस्वी होण्यासाठी आवश्यक समन्वय व नियोजन करत वरिष्ठांशी संपर्क साधून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी भारतीय बौद्ध महासभा शाखा खटाव तालुक्याला शुभेच्छा देत शिबिरात सहभागी झालेल्या श्रामणेर दीक्षार्थींना पुढील धम्मश्रवण व धम्मग्रहणासाठी मंगल शुभेच्छा दिल्या. शेवटी त्यांनी उपस्थित मान्यवर, उपासक व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे केंद्रीय शिक्षक आयु. बाळासाहेब जाधव, सरचिटणीस आयु. सुनील कदम सर, संस्कार उपाध्यक्ष आयु. अविनाश बारसिंग सर, कुमार सरतापे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कार्यालय सचिव तथा केंद्रीय शिक्षक आयु. चंद्रकांत मोहिते सर, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी कार्यकारणी संघटक आनंद जगताप सर, कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर, संरक्षण उपाध्यक्ष कृष्णात केंजळे, दयानंद केंजळे, जिल्हा संघटक सुधाकर शिलवंत, उत्तम मस्के, केंद्रीय शिक्षिका राजश्री ताई मस्के, गौतम केंजळे, रण बहाद्दर तसेच त्रिमली गावातील श्रद्धावान उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण परिसर बुद्ध वंदना, त्रिसरण-पंचशील आणि धम्मभावनेने भारावून गेला होता. हे शिबिर धम्मसंस्कार, संघटन बळकटी आणि धम्मप्रसारासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.