
फलटण :- फलटण नगरपालिकेच्या निवडणुका अखेर पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया असल्यामुळे, या पदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी यंदा ‘खुले’ आरक्षण जाहीर झाले असून, त्यामुळे या पदासाठी स्थानिक राजकारणात दबदबा असलेल्या नाईक निंबाळकर घराण्यातीलच दोन दिग्गजांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजे गटाकडून माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे नाव चर्चेत असून, ते विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र आहेत. दुसरीकडे, खासदार गटाकडून माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव चर्चिले जात असून, ते माजी खासदार स्वर्गीय हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र आणि सध्या भाजप खासदार असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू आहेत.
दोन्ही नेत्यांना नगरपालिका प्रशासनाचा भरपूर अनुभव असून, आगामी पाच वर्षांच्या दृष्टीने जनतेतून “अनुभवी नेतृत्वालाच संधी मिळावी” अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
आरक्षण जाहीर होताच शहरात आणि सोशल मीडियावर फक्त या दोन नावांचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये चळवळ सुरू झाली असून, उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
संभाव्य थेट लढत:
- 🔹 अनिकेतराजे नाईक निंबाळकर (राजे गट)
- 🔹 समशेरसिंह नाईक निंबाळकर (खासदार गट)





