Tuesday, September 1, 2026
Homeफलटणलाखो वारकऱ्यांच्या भक्तिसागरात फलटण दुमदुमले; संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत

लाखो वारकऱ्यांच्या भक्तिसागरात फलटण दुमदुमले; संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत

लाखो वारकऱ्यांच्या भक्तिसागरात फलटण दुमदुमले; संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत

फलटण | प्रतिनिधी :  आषाढी वारीच्या अखंड भक्तिप्रवाहात शुक्रवारी फलटण नगरी पूर्णपणे सामावून गेली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन होताच लाखो वारकरी, भाविक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत माऊलींचे दर्शन घेतले. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

महानुभाव पंथीयांची आणि जैन धर्माची दक्षिण काशी म्हणून ऐतिहासिक ओळख असलेल्या फलटण नगरीने माऊलींचे पारंपरिक पद्धतीने आणि अत्यंत उत्साहात स्वागत केले. पालखी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, फुलांची उधळण आणि ढोल-ताशांच्या गजराने सोहळ्याची भव्यता अधिक खुलून दिसत होती.

जिंती नाका परिसरात पालखी शहरात दाखल होताच फलटण नगरपालिकेच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी निखिल जाधव, सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी माऊलींचे विधिवत स्वागत केले. पालखी मार्गावर दर्शनासाठी आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. मुखी विठ्ठलाचे नाम आणि डोळ्यांत माऊलींच्या दर्शनाची आस घेऊन भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले.

ऐतिहासिक श्रीराम मंदिरासमोर पालखीचे आगमन होताच फलटणच्या राजघराण्याच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत  अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत  विश्वजीतराजे नाईक निंबाळकर तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी माऊलींचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.

लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालखी मार्गावर आणि प्रमुख चौकांमध्ये प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वयंसेवकांनीही गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांना मार्गदर्शनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.

माऊलींच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे आणि स्वयंसेवी संघटनांनी अन्नदान, नाश्ता, पिण्याचे पाणी, आरोग्य शिबिरे, मोफत औषधोपचार, दाढी सेवा आणि फूट मसाज अशा विविध सेवांचे आयोजन केले होते. वारकऱ्यांनी या सेवांचे मनापासून स्वागत केले.

भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून फलटण नगरपालिकेने शहरभर पिण्याच्या पाण्याचे टँकर, तात्पुरती शौचालये, स्वच्छतेची विशेष व्यवस्था तसेच पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम वेळेत पूर्ण केले होते. त्यामुळे लाखो भाविकांना पालखी सोहळ्याचा आनंद कोणत्याही अडचणीशिवाय घेता आला.

वारकरी संप्रदायाच्या समता, सेवा आणि भक्तीच्या परंपरेचे दर्शन घडविणारा हा सोहळा फलटणच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात आणखी एक सुवर्णक्षण ठरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments