Tuesday, August 18, 2026
Homeसाताराफलटण नगर परिषदेचा इशारा : रस्त्यावर माल व हातगाड्या ठेवल्यास जप्तीची कारवाई

फलटण नगर परिषदेचा इशारा : रस्त्यावर माल व हातगाड्या ठेवल्यास जप्तीची कारवाई


फलटण : फलटण येथील फलटण नगर परिषद यांच्या वतीने शहरातील सर्व फळ विक्रेते, भाजी विक्रेते तसेच विविध चौक व रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या फिरत्या हातगाडी धारकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यालगत किंवा रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शिल्लक माल ठेवू नये आणि हातगाड्या रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या करू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
नगर परिषदेच्या निदर्शनास आले आहे की, अनेक विक्रेते दिवसभराचा व्यवसाय संपल्यानंतर उरलेला माल रस्त्याच्या कडेला किंवा थेट रस्त्यावरच ठेवून जातात. तसेच काही हातगाडी धारक सायंकाळनंतर आपापल्या गाड्या घरी न नेता रस्त्यालगत उभ्या करतात. या प्रकारामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात.
या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले की, “नागरिकांची सुरक्षितता ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिल्लक माल रस्त्यावर ठेवू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित माल व हातगाड्या जप्त करण्यात येतील. तसेच होणाऱ्या नुकसानीस संबंधित मालक स्वतः जबाबदार राहील.”
रात्रीच्या वेळी आग लागणे किंवा इतर आपत्कालीन घटना घडल्यास अग्निशमन दल, रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांना मार्ग मोकळा मिळावा, यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्यास जीवित व मालमत्तेची हानी होण्याचा धोका वाढतो, याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे.
दरम्यान, या संदर्भात लवकरच विशेष पथकाद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. शहरातील सर्व व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments