शनिनगर येथील नगरपरिषदेच्या बागेत १७ ऑगस्ट रोजी रंगणार विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम
फलटण : श्रावण महिन्यातील सण-उत्सवांच्या उत्साहात महिलांचा जिव्हाळ्याचा सण असलेल्या नागपंचमीचे औचित्य साधून फलटण नगरपरिषदेच्या वतीने शहरातील महिलांसाठी खास मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.
नागपंचमीच्या दिवशी महिला एकत्र येऊन नागदेवतेची पूजा करतात. तसेच झिम्मा, फुगडी, झोका यांसह विविध पारंपरिक खेळांचा आनंद घेत सण साजरा करण्याची महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे. याच पारंपरिक उत्साहाला आधुनिक मनोरंजनाची जोड देत महिलांना दैनंदिन धावपळीच्या जीवनातून काही काळ विरंगुळा मिळावा आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन व्हावे, या उद्देशाने फलटण नगरपरिषदेने हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता शनिनगर येथील नगरपरिषदेच्या बागेत हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी महिलांसाठी विविध खेळ, मनोरंजनाचे उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, महिलांना मनमुराद आनंद घेता येणार आहे.
नागपंचमीचा सण उत्साह, आनंद आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यासाठी फलटण शहरातील महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच फलटण नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे महिलांना एकत्र येण्याची, पारंपरिक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्याची तसेच नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्याची एक आनंददायी संधी उपलब्ध होणार आहे.
