
तांबवे येथील शिवसेना शाखा उद्घाटन व विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी रामराजेंचा विरोधकांवर निशाणा; शंभूराज देसाईंकडून रामराजे-संजीवराजेंच्या नेतृत्वाला बळ देण्याचे आवाहन
फलटण : “आता मला मुंबईत नाही, तुमच्यात राहू द्या; संजीवराजेंना मुंबई गाठू द्या. वरिष्ठ नेत्यांना जेव्हा एखाद्या नेत्याची जनतेमध्ये ताकद असल्याचे जाणवते, तेव्हा त्याला वरून राजकीय ताकद मिळते. त्यामुळे आपली ताकद दाखवा; संजीवराजेंना पाहिजे ते मिळेल,” असे ठाम आवाहन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
तांबवे (ता. फलटण) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच शिवसेना शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे शिवसेना सदस्य तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टीका केली. “जिल्ह्याची संस्कृती संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी कमिन्स आणली, तिला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. साखरवाडीचा कारखाना सुरू केला, तो बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रीराम कारखानाही बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. साखरवाडी आणि श्रीराम बंद पाडून स्वतःचा कारखाना चालविण्याचे षडयंत्र आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील ८० टक्के विकासकामांचा पाया मी घातला; मात्र आता कळस दाखविण्यासाठी काही जण पुढे आले आहेत. बुलेट ट्रेन, विमानतळ अशा स्वप्नांमध्ये ते राहिले आहेत, त्यांना स्वप्नातच राहू द्या. त्यांचा फुगा मी फोडणार. ३० वर्षे कष्ट करून तालुका व्यवस्थित केला होता. तो माझ्या डोळ्यादेखत नष्ट होऊ देणार नाही,” असा इशाराही रामराजेंनी दिला.
यावेळी त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महिन्यातून एकदा सातारा येथे लोकप्रतिनिधींना वेळ द्यावा, अशी मागणी केली.
‘रामराजे-संजीवराजेंच्या कामाला अडथळा येऊ देऊ नका’
सभेला संबोधित करताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “सातारा जिल्ह्याच्या राजकारणाबाबत चर्चा होताना एकनाथ शिंदे हे मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्यासोबत काम करणारे रामराजे आणि संजीवराजे हे नेते आहेत, असे सांगतात. त्यांच्या विकासकामांच्या शब्दाला कोणतीही अडचण येऊ देऊ नका, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.”
“जय-पराजय होत असतो; मात्र ज्या जनतेने आपल्याला मते दिली आहेत, त्यांची कामे करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे फलटण शहरातील विकासकामांचेही प्रस्ताव द्या. ते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू. फलटण विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही,” अशी ग्वाही देसाई यांनी दिली.
शिवसैनिकांवर कुठेही अन्याय होऊ देणार नाही, अडचण आल्यास ठामपणे पाठीशी उभे राहू, असे सांगत रामराजे आणि संजीवराजे यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये शिवसेनेचे मजबूत संघटन उभे करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
‘दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्यात रामराजेंचे योगदान’
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “तालुक्याच्या दुष्काळी भागात पाणी पोहोचण्यामागे कै. मनोहर जोशी, रामराजे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचे योगदान आहे. राजकीय अस्थिर परिस्थितीत आज आपल्याला शिवसेनेने तारले आहे. तुम्ही शिवसैनिक आहात; तुम्ही कोणाच्या वाटेला जाऊ नका. मात्र कोणी तुमच्या वाटेला आले, तर पाया मागे सरकवायला मागे-पुढे पाहू नका.”
‘कामे केली, मात्र त्याची जाहिरात करण्यात कमी पडलो’
माजी आमदार दीपक चव्हाण यांनीही आपल्या भाषणातून गेल्या तीन दशकांतील विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले, “गेल्या ३० वर्षांत तालुक्याच्या वाड्या-वस्त्यांवर विकास पोहोचविला; मात्र त्या कामांची जाहिरात करण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आमच्या कार्यकाळात केलेल्या कामांचे नारळ आज दुसरे फोडत आहेत. ही वाईट प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ताकद द्यावी.”
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांनीही मनोगत व्यक्त केले.
तांबवे येथील या कार्यक्रमातून फलटणच्या राजकारणात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याचे स्पष्ट संकेत मिळाले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही या नेतृत्वाला पाठबळ देण्याची भूमिका जाहीर केल्याने आगामी काळातील फलटणच्या राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
