
“अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी मंगल मैत्रीची भावना जोपासा — भंते कश्यप”
फलटण : वर्षावास प्रवचन मालिकेतील तिसरे पुष्प समता नगर (विडणी) येथे भक्तिमय व धम्ममय वातावरणात उत्साहात संपन्न झाले. यावेळी धम्मदेसना देताना पूज्य भंते कश्यप (नालासोपारा, मुंबई) यांनी अखिल मानव जातीविषयी मंगल मैत्रीची भावना बाळगणे, विवेकी व नैतिक जीवन जगणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अभिप्रेत केलेल्या कर्तृत्ववान माणसाची जडणघडण याविषयी मार्गदर्शन केले.
पूज्य भंते कश्यप यांनी आपल्या धम्मदेसनेत ‘मंगल मैत्री’ ही केवळ बौद्धांच्या परस्पर संबंधांपुरती मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीविषयी करुणा, मैत्री, सद्भावना आणि कल्याणाची भावना असली पाहिजे, असा विचार मांडला. बुद्धांच्या धम्मामध्ये प्रत्येक जीवाविषयी मैत्रीभाव, करुणा आणि अहिंसक दृष्टिकोनाला अत्यंत महत्त्व आहे. जात, धर्म, पंथ, भाषा, प्रदेश किंवा सामाजिक भेद बाजूला ठेवून सर्व मानवांच्या सुख-दुःखाशी एकरूप होणे, हीच धम्माची व्यापक भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते न्यू पंचशील तरुण मंडळ समता नगर विडणी व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी कार्यकारणी, BBM Family च्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील तिसरे पुष्प गुंफताना/धम्मदेसना देताना बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस हा दीर्घोद्योगी, कष्टाळू, जागरूक आणि ध्येयवादी असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याच संदर्भात भंते कश्यप यांनी आळस, झोपाळूपणा आणि अति खादाडपणा यापासून दूर राहण्याचा संदेश दिला. जीवनामध्ये प्रगती साधायची असेल तर सतत प्रयत्नशील राहणे, वेळेचा सदुपयोग करणे, स्वतःच्या कर्तव्याची जाणीव ठेवणे आणि समाजाच्या हितासाठी कार्यरत राहणे आवश्यक आहे. केवळ वैयक्तिक सुखाचा विचार न करता आपल्या कृतीतून समाजाचे आणि मानवजातीचे कल्याण साधले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
‘आचारो परमो धम्मो’ या भावनेतून आचरणाला धम्मामध्ये असलेले महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. धम्म हा केवळ ऐकण्याचा किंवा बोलण्याचा विषय नसून तो दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याची जीवनपद्धती आहे. मैत्री, करुणा, प्रज्ञा, शील आणि समता या मूल्यांवर आधारित जीवन जगणे हीच खरी धम्मसाधना असल्याचे त्यांनी सांगितले.
बाबासाहेबांचे स्वातंत्र्यलढ्यातील आणि राष्ट्रनिर्माणातील योगदान
कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि स्वतंत्र भारताच्या जडणघडणीतील भूमिका यावर भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस आयु.बाबासाहेब जगताप यांनी विस्तृत मांडणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून मर्यादित नसून, आधुनिक भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय पायाभरणीत त्यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. घटना समितीच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या लोकशाही व्यवस्थेला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा मजबूत आधार दिला.
देशाच्या विकासासाठी जलनीती, सिंचन आणि धरण प्रकल्पांचे नियोजन, औद्योगिक विकास, कामगारांचे हक्क, महिलांचे अधिकार आणि सामाजिक न्याय यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली. कामगारांसाठी कायदे, कामाच्या वेळेचे नियमन, सामाजिक सुरक्षा आणि महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी मांडलेल्या भूमिका या स्वतंत्र भारताच्या प्रगतिशील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरल्या, असे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याची गरज अधोरेखित केली. भारतीय समाजातील विषमता दूर करून प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा व्यापक अभ्यास करून तो समाजजीवनात रुजविण्याची गरज असल्याचे जगताप यांनी नमूद केले.
धम्ममय वातावरणात कार्यक्रम संपन्न
वर्षावास प्रवचन मालिकेतील या तिसऱ्या पुष्पाला समता नगर (विडणी) परिसरातील धम्मउपासक-उपासिका आणि नागरिकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ६.३० वाजता चंक्रमण काढून संपूर्ण समता नगर विडणी ला एक फेरी काढण्यात आली. यामध्ये पंचशील चे ध्वज, बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ व भारतीय संविधान हे चंक्रमणादरम्यान आपले संविधान आपले अधिकार चा जनजागर करण्यात आला. फिरवण्यात आले. आणि त्यानंतर सायंकाळी ७ वाजता धम्मदेसना अशा क्रमाने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे संस्कार विभागाचे माजी सचिव अमोल भोसले सर यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करत उपस्थितांना प्रवचन मालिकेचा उद्देश आणि वर्षावासाचे धम्मातील महत्त्व समजावून सांगितले.
यावेळी उपस्थित धम्मबांधवांनी पूज्य भंते कश्यप यांच्या धम्मदेसनेचा लाभ घेतला. मंगल मैत्री, करुणा, समता, दीर्घोद्योग, नैतिक आचरण आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश देणारे हे प्रवचन उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.
वर्षावास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून धम्मविचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्या सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतावादी, विवेकवादी आणि मानवतावादी विचार जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न होत आहे. समता नगर (विडणी) येथे संपन्न झालेले वर्षावास प्रवचन मालिकेतील तिसरे पुष्प याच व्यापक धम्मप्रबोधनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे यांची चिरंजीव प्रशिक याचा वाढदिवस पूज्य भंते कश्यप जी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पूज्य भंते कश्यप जी यांनी प्रशिक ला आशीर्वाद गाथा गाऊन भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे सर , फलटण तालुका शाखेचे माजी सरचिटणीस बाबासाहेब जगताप सर , माजी फलटण तालुका कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी आयु.राजेंद्र कुमार गायकवाड सर, माजी संघटक अमोल काकडे सर, आनंद जगताप सर, माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष रामचंद्र मोरे सर, संस्कार सचिव आयु बजरंग गायकवाड सर, धम्म मित्र अजय निकाळजे, विजय निकाळजे, यावेळी न्यू पंचशील तरुण मंडळाचे कार्यकर्ते, समता नगर येथील बौद्ध उपासक उपासिका, बालक – बालिका, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
