Tuesday, September 29, 2026
Homeफलटणश्रीराम कारखान्याची ७१ वी वार्षिक सभा उत्साहात; २०२६-२७ गळीत हंगामासाठी सभासदांनी एकजुटीचा...

श्रीराम कारखान्याची ७१ वी वार्षिक सभा उत्साहात; २०२६-२७ गळीत हंगामासाठी सभासदांनी एकजुटीचा निर्धार

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर; कारखान्याच्या आर्थिक बळकटीसाठी सभासदांनी भांडवली सहभाग वाढवण्याचे आवाहन

फलटण प्रतिनिधी : श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. कारखान्याच्या आगामी २०२६-२७ गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कारखान्याच्या अडचणीच्या काळात हंगाम सुरू करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

हा ठराव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता बापू अनपट यांनी मांडला, तर फलटण दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार यांनी त्यास अनुमोदन दिले. उपस्थित सभासदांनी हात वर करून ठरावाला समर्थन दिले. त्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा हार, श्रीफळ व शाल देऊन सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यशाचे श्रेय सभासद व शेतकऱ्यांना

अभिनंदनाचा ठराव स्वीकारताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कारखाना पुन्हा गळीत हंगामासाठी सज्ज होत असल्याचे श्रेय सभासद आणि शेतकरी बांधवांच्या सहकार्याला दिले. कारखान्याच्या अडचणीच्या काळात सभासदांनी दिलेला प्रतिसाद महत्त्वाचा ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी कारखान्याच्या अडचणींच्या काळात राजकारणामुळे कारखाना बंद पडण्याची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. मात्र, सभासदांनी आपल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कारखान्याच्या नक्त मूल्यामध्ये वाढ होण्यास सहकार्य केल्याने आगामी गळीत हंगाम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी सांगितले.

‘कारखाना काही व्यक्तींचा नव्हे, सभासद शेतकऱ्यांचा’

कारखान्याचे भवितव्य मजबूत करण्यासाठी सभासदांनी अधिक सक्रिय सहभाग घेण्याची गरज रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. सहकारी तत्त्वावर उभ्या असलेल्या या संस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उर्वरित सभासदांनी नवीन शेअर्स घेऊन भांडवली सहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

कारखाना हा काही मोजक्या व्यक्तींची संस्था नसून सभासद शेतकऱ्यांच्या मालकीची सहकारी संस्था आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात प्रत्येक सभासदाने आपली जबाबदारी ओळखून कारखान्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी गळीत हंगामासाठी सभासदांमध्ये उत्साह

मागील काळात कारखान्यासमोर निर्माण झालेल्या विविध अडचणींवर मात करून आता कारखाना आगामी गळीत हंगामासाठी सज्ज होत असल्याने सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कारखान्याची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्यासाठी सभासदांचा सहभाग, सहकार्य आणि भांडवली योगदान भविष्यात निर्णायक ठरणार असल्याचे सभेत अधोरेखित करण्यात आले.

कारखान्याच्या कामकाजाचा आढावा

सभेच्या प्रारंभी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी प्रास्ताविक करत कारखान्याच्या कामकाजाची माहिती सभासदांसमोर मांडली. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याच्या सद्यस्थितीचा तसेच कामकाजाचा आढावा घेतला. कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी सभासदांसमोर कारखान्याचा ताळेबंद सादर केला.

सभेतील चर्चेदरम्यान कारखान्याच्या आर्थिक स्थितीबरोबरच आगामी गळीत हंगाम, सभासदांचा सहभाग आणि संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

मान्यवरांची उपस्थिती

सभेला माजी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हाईस चेअरमन नितीन शाहूराज भोसले, फलटण दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, सातारा जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, वैशालीताई कांबळे, ज्योतीताई मोरे, दत्ता बापू अनपट, श्रीराम बाजारचे चेअरमन जितेंद्र पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर, पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, फलटण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, तसेच प्रमोद गाडे, विश्वासदादा गावडे, तानाजी गावडे, परशुराम तावरे, अशोक शिंदे, बाळासाहेब खलाटे, बबनराव घोरपडे यांच्यासह कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या निमित्ताने श्रीराम कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाबाबत सभासदांमध्ये सकारात्मक व उत्साही वातावरण दिसून आले. सभेचे सूत्रसंचालन संचालक संतोष खटके यांनी केले, तर आभार सुखदेव बेलदार यांनी मानले.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments