Tuesday, August 11, 2026
Homeसाताराफलटण नगरपरिषद निवडणूक : महायुती उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याला मोठा प्रतिसाद

फलटण नगरपरिषद निवडणूक : महायुती उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याला मोठा प्रतिसाद

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज वेग आला असून महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यासाठी सभागृहात दाखल झाले. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (खासदार गट) यांच्या बहुतेक उमेदवारांनी दुपारी पालिका सभागृहात उपस्थित राहून आपले अर्ज सादर केले. अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या वेळेपुर्वीच पालिका आवारात राजकीय हालचालींना उधाण आले होते.

निवडणूक आयोगाने अर्ज स्वीकारण्याची अंतिम वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत निश्चित केली होती. नियमांनुसार ३ वाजण्यापूर्वी सभागृहात प्रवेश केलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची तरतूद असल्याने, महायुतीच्या सर्व इच्छुक उमेदवारांना वेळेतच प्रवेश देण्यात आला.

संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत होती. उमेदवारांची कागदपत्रे तपासणे, अर्ज स्वीकारणे आणि त्याची पोच देणे हे कामकाज अत्यंत काटेकोरपणे केले जात आहे. या कामात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव आणि मुख्याधिकारी निखील जाधव यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

महायुतीकडून कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता, वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक उमेदवारांनी अर्ज सादर केले. उमेदवारांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता.

दुपारी ३ नंतर सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले असून, आत शिरलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या नियोजनामुळे कोणतीही गोंधळाची स्थिती उद्भवली नाही.

अर्ज दाखल झाल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होऊ लागले आहे. अर्ज छाननी आणि माघारीची मुदत पूर्ण झाल्यानंतरच अंतिम प्रतिस्पर्धी निश्चित होतील. दरम्यान, शहरात आणि पालिका आवारात राजकीय चर्चांना जोर आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments