स्मृतिदिनी वंदना सूत्र पठण पुस्तिकांचे वाटप; धम्मप्रचाराचा स्तुत्य उपक्रम
कालकथित यशवंत संपत सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बुद्ध-आंबेडकरी विचारांचे प्रबोधन
फलटण :कालकथित आयु. यशवंत संपत सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी वंदना सूत्र पठण पुस्तिकांचे वाटप करून धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून दिवंगत यशवंत सावंत यांच्या स्मृतींना अभिवादन करत भगवान बुद्धांच्या धम्मविचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या स्मृतिदिनानिमित्त केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य आयु. चंद्रकांत मोहिते यांनी धम्मविधीचे संचालन केले. यावेळी त्यांनी भगवान बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रबोधन केले. बुद्धांचा समता, करुणा, प्रज्ञा आणि बंधुतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या विचारांचे महत्त्व त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमाला सावंत परिवारातील आयु. गणेश सतीश सावंत, आयु. राहुल सतीश सावंत, आयु. महादेव यशवंत सावंत, आयु. संतोष यशवंत सावंत, आयु. महेंद्र सुखदेव सावंत यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते.
तसेच सोमवार पेठेतील बौद्ध उपासक-उपासिकांमध्ये आयु. हेमंत मदने, आयु. विशाल शिंदे, आयु. प्रवीण काकडे, आयु. गौतम नाईक नवरे, आयु. अजित मोरे, आयु. प्रवीण भोसले आणि आयु. विक्रम शिंदे यांची उपस्थिती होती.
स्मृतिदिन केवळ आठवणींना उजाळा देण्यापुरता मर्यादित न ठेवता, वंदना सूत्र पठण पुस्तिकांचे वाटप करून धम्मविचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. दिवंगत यशवंत संपत सावंत यांच्या स्मृतींना अभिवादन करत बुद्ध-आंबेडकरी विचारांच्या प्रसाराचा संकल्प या निमित्ताने अधोरेखित झाला.
