Wednesday, October 28, 2026
Homeफलटण५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास सांगता...

५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात

५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात

“कागदावरील नियोजन नव्हे, गावागावांत प्रत्यक्ष धम्मकार्य दिसले पाहिजे!” — आयु. दादासाहेब भोसले

फलटण : भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेच्या वतीने वर्षावास काळात ५६ गावांमध्ये ३२ विषयांवर राबविण्यात आलेल्या प्रवचन मालिकेचा सांगता समारोह रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कोळकी येथील बुद्धविहारात मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. वर्षावास काळात नियोजनबद्ध पद्धतीने विविध गावांपर्यंत धम्मविचार पोहोचविण्याच्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता पंचरंगी धम्मध्वजाला सलामी देऊन ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिसरण, पंचशील, बुद्धपूजा, भीमस्तुती, भीमस्मरण व स्तवन करण्यात आले.

तालुकाध्यक्ष आयु. भीमराव लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष आयु. नानासो मोहिते, राज्य हिशोब तपासणीस आयु. अरुण गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष आयुनि. सुजाता गायकवाड, जिल्हा संघटक आयु. अर्जुन ननावरे, संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे, माजी जिल्हाध्यक्ष आयु. श्रीमंतराव घोरपडे, माजी प्राचार्य आयु. शिवाजी सावंत, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. प्रभुदास मेश्राम, तालुका महिला अध्यक्षा आयु. रंजना रणवरे, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आयु. दादासाहेब कांबळे यांच्यासह जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.

तालुका शाखेचे खजिनदार आयु. राजकुमार रणवरे यांनी वर्षावास प्रवचन मालिकेचा आढावा मांडला. ५६ गावांमध्ये ३२ विषयांवर प्रवचनांचे नियोजन, प्रवचनकारांची निवड आणि गावागावांत कार्यक्रमांचे आयोजन याबाबत त्यांनी माहिती दिली. धम्म लोकांपर्यंत आणि लोकांमध्ये धम्मविचार पोहोचविण्याच्या उद्देशाने ही मालिका राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.

माजी प्राचार्य आयु. शिवाजी सावंत यांनी तालुका शाखेने घेतलेल्या संकल्पानुसार मोठ्या प्रमाणावर गावांमध्ये कार्यकारिणी पोहोचविल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. “आपले म्हणून काहीच नाही; शेवटपर्यंत धम्मसेवक म्हणून काम केले पाहिजे,” असे सांगत त्यांनी पदाच्या अहंकारापेक्षा सेवाभाव महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. धम्मचळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येकाने सेवकाच्या भूमिकेतून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

राज्य हिशोब तपासणीस आयु. अरुण गायकवाड यांनी तालुका व जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन करताना वर्षावास काळात प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांनी सातत्याने संपर्क ठेवावा, नोंदवही अद्ययावत ठेवावी आणि प्रवचनानंतर श्रोत्यांशीही सातत्याने संवाद साधावा, अशी सूचना केली.

माजी जिल्हाध्यक्ष आयु. श्रीमंतराव घोरपडे यांनी नव्याने तयार झालेल्या शाखांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांचे संघटनात्मक अस्तित्व मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. महिला शाखेच्या माध्यमातून उपासिका शिबिरे तसेच श्रामणेर शिबिरांशी संबंधित उपक्रम घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक गावात नियोजनबद्ध पद्धतीने ३२ विषयांवर धम्मविचार पोहोचविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

प्रा. प्रभुदास मेश्राम यांनी धम्मकार्य करताना कोणावरही टीका करण्याची गरज नसल्याचे सांगत धम्माचा प्रसार हा शांतता, समता आणि विवेकाच्या मार्गाने व्हावा, असे मत व्यक्त केले. “मी कुणीही नाही; मी धम्माचा छोटा कार्यकर्ता आहे,” या भावनेतून कार्य करण्याचा संदेश त्यांनी दिला.

आयु. अविनाश जगताप यांनी धम्मकार्यामध्ये सातत्य राखण्याचे आवाहन केले. धम्म चळवळीतील संख्या अपेक्षेप्रमाणे का वाढत नाही, याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुका संस्कार उपाध्यक्ष आयु. दादासाहेब कांबळे यांनी कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही धम्मकार्य थांबविले नाही, याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सुरुवातीला लोकांना एकत्र आणणे आणि त्यांच्यापर्यंत धम्म पोहोचविण्याचे आव्हान होते; विरोध व अडचणी असूनही कार्यकर्त्यांनी सातत्य राखल्याचे त्यांनी नमूद केले.

महिला तालुकाध्यक्षा आयु. रंजना रणवरे यांनी तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन करताना धम्मकार्यामध्ये महिलांचा सहभाग आणखी वाढविण्याची गरज व्यक्त केली. कुटुंबातील मुलांमध्ये बुद्धांच्या समता, करुणा व विवेकाच्या विचारांची रुजवण करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

“कागदावरील नियोजन नव्हे, प्रत्यक्ष गावांमध्ये धम्मकार्य दिसले पाहिजे”

भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संघटक, सातारा व पुणे जिल्हा प्रभारी तसेच समता सैनिक दलाचे असिस्टंट ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांनी वर्षावास प्रवचन मालिका यशस्वीपणे राबविल्याबद्दल फलटण तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

मात्र वर्षावास काळात ५२ गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले असले, तरी आता त्या गावांमध्ये प्रत्यक्ष शाखा स्थापन करून शाखेचे नियुक्तीपत्र व फलक लावण्याच्या दिशेने काम झाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ प्रवचन घेऊन थांबण्याऐवजी त्या त्या शाखांमध्ये नियमित धम्मप्रवचन, विविध शिबिरे आणि समता सैनिक दलाचे सैनिकी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

वर्षावास प्रवचन मालिकेचा सांगता समारोह हा केवळ समारोपाचा कार्यक्रम न राहता प्रत्येक गावातून प्रतिनिधित्व वाढविण्याचे आणि पुढील वर्षभराचे धम्मकार्य निश्चित करण्याचे माध्यम झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. “प्रत्येक काम कागदावर आणि प्रत्यक्षात दिसले पाहिजे; तरच मिशन २५ यशस्वी होईल,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

अध्यक्षीय भाषणात तालुकाध्यक्ष आयु. भीमराव लोंढे यांनी ५६ गावांमध्ये प्रवचन मालिका यशस्वी करण्यासाठी तालुका कार्यकारिणी, ग्रामशाखा आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. आगामी काळात संस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी केशव ठोंबरे, राजकुमार रणवरे, प्रदीप जगताप, चंद्रकांत मोहिते, भिकू भोसले, अर्जुन ननावरे, प्रभुदास मेश्राम, विजय लोंढे, शं. ज्ञा. कांबळे, राजेंद्र अहिवळे, सुनील मोहिते, सुनील कांबळे, धीरज मोरे, अनिकेत कांबळे, संपत माने, राजेंद्र गायकवाड, संजय भोसले, सचिन मोहिते, सचिन रोकडे तसेच विविध ग्रामशाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरदचे आयु. शरद मोरे, झिरपवाडीचे यशवंत काकडे आणि आयु. अविनाश जगताप यांनी मनोगते व्यक्त करून तालुका कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. चंद्रकांत मोहिते यांनी केले. आयु. सचिन मोहिते यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. सामूहिक सरणतयाने कार्यक्रमाची सांगता झाली.

वर्षावास काळात ५६ गावांमध्ये ३२ विषयांवर राबविण्यात आलेली प्रवचन मालिका आणि त्यानंतर झालेला सांगता समारोह यामुळे फलटण तालुका शाखेच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळाली असून, आता या उपक्रमाचे रूपांतर वर्षभर चालणाऱ्या नियमित धम्मकार्यामध्ये करण्याचे आव्हान तालुका कार्यकारिणीसमोर आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments