फलटण : सातारा येथील छत्रपती श्री शाहू स्टेडियमवर २८ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत फलटणच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करत जिल्ह्याचे विजेतेपद मिळवले. या शानदार विजयामुळे मुधोजीच्या संघाची गडहिंग्लज येथे होणाऱ्या विभागस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मुधोजीच्या खेळाडूंनी आक्रमक आणि नियोजनबद्ध खेळाचे दर्शन घडवत वाई तालुक्याच्या संघावर ३-० अशी मात केली. या विजयामुळे संघाने स्पर्धेत आपली विजयी वाटचाल सुरू केली.
उपांत्य फेरीत मुधोजीसमोर पाचगणी तालुक्याचे कडवे आव्हान होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ केला. अखेर मुधोजीच्या खेळाडूंनी संयम राखत ४-३ असा रोमांचक विजय मिळवून अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्यात कराड तालुक्याच्या बलाढ्य संघाशी मुधोजीच्या संघाची लढत झाली. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मुधोजीच्या खेळाडूंनी सामन्यावर पकड निर्माण केली. गोल करण्याच्या संधींचा योग्य फायदा घेत अखेर ५-३ असा विजय मिळवत मुधोजी हायस्कूलने जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या यशामुळे मुधोजी हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील भक्कम परंपरेत आणखी एका मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता गडहिंग्लज येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेत मुधोजीचा संघ सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून, या स्पर्धेकडून क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
मुधोजी हायस्कूलच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फ.ए.सो. क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, सुधीर अहिवळे, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय पाटील, सौ. पूजा पाटील, क्रीडा मार्गदर्शक तसेच सर्व क्रीडाप्रेमींनी विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
गडहिंग्लज येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी मुधोजीच्या संघाला सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत असून, विभागीय स्तरावरही संघाने चमकदार कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
