Sunday, October 4, 2026
Homeफलटणदुष्काळी परिस्थितीत वृक्षसंवर्धनासाठी सरकारी कंत्राटदार,नागरिक सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा

दुष्काळी परिस्थितीत वृक्षसंवर्धनासाठी सरकारी कंत्राटदार,नागरिक सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा

पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा परिषद सदस्यांचा अभिनव पुढाकार

प्रत्येक शासकीय कामाच्या कंत्राटदाराने ग्रामपंचायतीला किमान १० झाडे देण्याचे आवाहन

बरड ::- बरड जिल्हा परिषद गटातील सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली पर्यावरणाची समस्या लक्षात घेता, शासकीय विकासकामांसोबत वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर बरड जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशाली संदिप कांबळे यांनी शासकीय कामे करणाऱ्या कंत्राटदारांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.

बरड जिल्हा परिषद गटातील ज्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांतर्गत शासकीय विकासकामे सुरू आहेत, त्या कामांचे सरकारी कंत्राटदारांनी सामाजिक बांधिलकी म्हणून संबंधित ग्रामपंचायतीला किमान १० झाडे उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन सौ. वैशाली संदिप कांबळे यांनी केले आहे.

ग्रामपंचायतीने या झाडांची लागवड शाळा परिसर, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या कडेला तसेच उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये करून त्यांचे योग्य संगोपन करावे. केवळ वृक्षलागवड न करता झाडे जगविण्याची जबाबदारीही सामूहिकपणे स्वीकारणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पाणी, पर्यावरण आणि भविष्यातील पिढ्यांचा विचार करून प्रत्येक घटकाने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. शासकीय विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांनीही आपल्या कामासोबत पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिल्यास संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड होऊ शकते.

“विकासकामे ही गावाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत; मात्र विकासासोबत पर्यावरणाचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक कंत्राटदाराने किमान दहा झाडे ग्रामपंचायतीला देऊन या उपक्रमाला हातभार लावावा. आज लावलेले एक झाड उद्याच्या पिढीसाठी मोठी संपत्ती ठरेल,” असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशाली संदिप कांबळे यांनी केले.

या उपक्रमाला ग्रामपंचायती, कंत्राटदार, नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांनी सहकार्य करून ‘विकासासोबत हरित विकास’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणावी, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments