
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात भाजपला दणदणीत विजयी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मतदारांचे आभार मानले. आजच्या विधानसभा निकालांमुळे भाजपच्या विजयाची हॅटट्रिक झाली असल्याचे मोदी म्हणाले. या हॅटट्रिकमुळं पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाच्या हॅटट्रिकची गॅरंटी मिळाली असल्याचं काही जण बोलत असल्याचं मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं. भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि परिवारवादाबद्दल मतदारांमध्ये चिड निर्माण झाली असल्याचं आजच्या निकालातून दिसून येतं, असं मोदी यांनी सांगितलं. दिल्लीत भाजप कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना मोदी संबोधित करत होते. यावेळी मंचावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.








