Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रशेटफळ येथे जमावाकडून घरांची तोडफोड; मारहाणीत अनेक जखमी

शेटफळ येथे जमावाकडून घरांची तोडफोड; मारहाणीत अनेक जखमी

पूर्वीच्या वादातून जमाव आक्रमक; लोखंडी पाइप व लाकडी दांडक्यांनी हल्ल्याचा आरोप; पोलिसांनाही धक्काबुक्की

शेटफळ, ता. मोहोळ | प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील भीमनगर परिसरात गुरुवारी (२४ सप्टेंबर) सकाळी पूर्वीच्या वादातून मोठा जमाव एका कुटुंबाच्या घराकडे गेल्याची गंभीर घटना घडली. जमावाने घराची तोडफोड करून घरातील व्यक्तींना मारहाण केल्याचा आरोप असून, या घटनेत फिर्यादीसह परिसरातील काही नागरिक जखमी झाल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी अरविंद सिद्धेश्वर थोरात (वय ४३, रा. शेटफळ) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून ३७ नामनिर्देशित आरोपींसह सुमारे १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांनुसारही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

पोलिसांना बाजूला सारून घराकडे धावल्याचा आरोप

फिर्यादीनुसार, गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अरविंद थोरात हे पत्नी निता आणि मुलगा अमित यांच्यासह भीमनगर येथील घरी असताना परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता. यावेळी गावातील मोठा जमाव त्यांच्या घराच्या दिशेने येत असल्याने पोलिसांनी जमावाला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने पोलिसांनाही धक्काबुक्की करून बाजूला सारत घराकडे धाव घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

जमावाने घराच्या दरवाजाची मोडतोड करून घरात प्रवेश केला आणि थोरात कुटुंबीयांना मारहाण करून घराबाहेर काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

लोखंडी पाइपने डोक्यात प्रहार केल्याचा आरोप

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संजय उर्फ किंचू अशोक भांगे याने हातातील लोखंडी पाइपने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात अरविंद थोरात यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. तसेच खांदा, हात आणि पायावरही मारहाणीत जखमा झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेत भीमनगरमधील सुधीर सुखदेव रावडे, रितेश सुधीर रावडे, वीर सचिन रावडे, मयुरी सुधीर रावडे, नयन सुधीर रावडे, प्राची सुधीर रावडे, कविता महादेव ओव्हाळ आणि आनंद महादेव ओहोळ यांनाही लोखंडी पाइप व लाकडी दांडक्यांनी मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे. त्यांच्या घरांचीही तोडफोड व नासधूस करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

३७ जणांची नावे; सुमारे १०० जणांविरुद्ध गुन्हा

अमित दत्तात्रय वागज, संजय उर्फ किंचू अशोक भांगे, सोन्या उर्फ विजय अशोक भांगे, मनोज बंडू वागज आणि अमर पमू कुंभार यांच्यासह एकूण ३७ जणांची नावे फिर्यादीत नमूद करण्यात आली आहेत. त्यांच्यासह इतर सुमारे १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास सोलापूर उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत. शेटफळ येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वृत्त आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments