Friday, September 25, 2026
Homeफलटणसातारा जिल्हा बँक निवडणुकीत संजीवराजे आणि दीपक चव्हाण मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत संजीवराजे आणि दीपक चव्हाण मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल

सोसायटी मतदारसंघातून श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून माजी आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी

सातारा | प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, २५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रमुख नेत्यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागले असताना श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून माजी आमदार दीपक चव्हाण यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत सुरू राहणार आहे. अर्जांची छाननी ५ ऑक्टोबर रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २१ ऑक्टोबर आहे. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हे जाहीर केली जाणार आहेत. १ नोव्हेंबर रोजी मतदान, तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

संजीवराजेंच्या उमेदवारीकडे लक्ष

सोसायटी मतदारसंघातून श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी अर्ज दाखल केल्याने फलटणसह सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांकडून मतदारसंघनिहाय तयारी सुरू असून, उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाल्याने आता निवडणुकीचे चित्र हळूहळू स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून दीपक चव्हाण

माजी आमदार दीपक चव्हाण यांनी अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघाकडेही राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी प्रमुख नावांनी अर्ज दाखल केल्याने आगामी काळात निवडणुकीतील समीकरणांना वेग येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच विविध राजकीय नेत्यांच्या बैठका आणि पॅनेलच्या चर्चांना वेग आला आहे. सर्वपक्षीय पॅनेल तसेच स्वतंत्र पॅनेलच्या शक्यतांबाबतही जिल्ह्यात चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.

आता अर्ज दाखल करण्याच्या पुढील टप्प्यात कोणकोणते दिग्गज नेते रिंगणात उतरतात आणि कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी करतात, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments