मंगळवेढा क्राईम स्टोरी: विवाहित प्रेयसीसाठी वेडसर महिलेला जाळलं; ‘दृश्यम’लाही लाजवेल अशी भयानक कथा

0
21
मंगळवेढा क्राईम स्टोरी: विवाहित प्रेयसीसाठी वेडसर महिलेला जाळलं; ‘दृश्यम’लाही लाजवेल अशी भयानक कथा

मंगळवेढा, पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात ‘दृश्यम’ चित्रपटालाही मागे टाकणारी एक अघोरी आणि अकल्पनीय गुन्ह्याची घटना समोर आली आहे. दीर-भावजयीच्या अनैतिक नात्यातून सुटका मिळवण्यासाठी विवाहित प्रेयसी किरण सावंत आणि तिचा दीर निशांत सावंत यांनी एक भयंकर कट रचून एका वेडसर महिलेला जाळल्याचा प्रकार उघड झाला आहे.

किरण आणि निशांतला एकत्र नवा संसार मांडायचा होता. यासाठी त्यांनी किरणने आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा डाव आखला. निशांतने पंढरपूरमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या, मुलाच्या शोधात असलेल्या एका बेवारस वेडसर महिलेला फसवून आणले. दोघांनी तिला ठार मारले आणि तिचा मृतदेह सावंत कुटुंबाच्या घराशेजारील गवताच्या गंजीत ठेवून ती गंजी मध्यरात्री पेटवून दिली.

संपूर्ण गाव आणि कुटुंबाला वाटावे की किरणने आत्महत्या केली आहे, यासाठी तिचा मोबाईल मृतदेहाजवळ ठेवण्यात आला. मात्र, पोलिसांनी या मोबाईलचा सीडीआर रेकॉर्ड  तपासल्यानंतर सत्य उघडकीस आले. निशांतच्या नंबरचे तपशील समोर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सुरुवातीला निशांतने काहीही कबूल केलं नाही, पण पोलिसी खाक्याने त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याच मोबाईलवरून किरणला व्हिडीओ कॉल लावला. कॉलवर ती जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कराड येथून तिला ताब्यात घेतले.

पती नागेश सावंत यांचा संतप्त सूर

किरणचा पती नागेश सावंत म्हणाले, “किरणने हे सर्व करताना आपल्या दोन वर्षांच्या मुलीचाही विचार केला नाही. आमचे संपूर्ण कुटुंब हादरले आहे. अशा गुन्ह्याला क्षमा नसावी. आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”

पोलिसांचं कौतुकास्पद तपासकाम

जर मोबाईल सीडीआर तपासला नसता, तर हा बनाव यशस्वी ठरला असता. पण पोलिसांनी सखोल तपास करत ही क्राईम स्टोरी उघडकीस आणली. ही घटना समाजाला हादरवणारी असून गुन्हेगारांची मानसिकता किती विकृत असू शकते, याचे उदाहरण आहे.