Saturday, September 12, 2026
Homeसाताराअक्षय तृतीयेच्या निमित्ताने महात्मा बसवेश्वरांची ९१९ वी जयंती उत्साहात साजरी

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने महात्मा बसवेश्वरांची ९१९ वी जयंती उत्साहात साजरी

सातारा, प्रतिनिधी:  अक्षय तृतीया या पवित्र दिवशी लिंगायत धर्माचे संस्थापक, मानवतेचे पुजारी आणि क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर यांची ९१९ वी जयंती संपूर्ण भारतात तसेच परदेशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक समाजव्यवस्थेपर्यंत ठळकपणे जाणवतो.
महात्मा बसवेश्वर यांनी १२व्या शतकात समाजातील जातीभेद, लिंगभेद आणि अन्यायकारक प्रथा यांना ठाम विरोध करून समता, बंधुता आणि श्रमप्रतिष्ठा यांचा संदेश दिला. कर्नाटकातील इंगळेश्वर बागेवाडी येथे जन्मलेल्या बसवेश्वरांनी लहान वयातच अन्यायाविरुद्ध आवाज उठवत पारंपरिक उपनयन संस्कारास विरोध केला. स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या व्यवस्थेविरोधात त्यांनी ठोस भूमिका घेतली.
कुडल संगम येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मंगळवेढा व कल्याण येथे राजकारभार सांभाळताना समाजपरिवर्तनाचे महान कार्य केले. त्यांनी ‘अनुभव मंडप’ या अद्वितीय विचारमंचाची स्थापना करून सर्व समाजघटकांना एकत्र आणले. या मंडपात ७०० शरण आणि ७० शरणी सहभागी होऊन समतेवर आधारित विचारमंथन करत होते.
“कायक वे कैलास” आणि “दासोह” या तत्वांच्या माध्यमातून त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली आणि समानतेवर आधारित समाजरचना घडवली. त्यांच्या विचारांमुळे अनेकांनी वाईट प्रवृत्ती सोडून सदाचाराचा मार्ग स्वीकारला.
स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देताना त्यांनी स्त्रियांनाही धार्मिक व सामाजिक कार्यात समान स्थान दिले. अक्कमहादेवीसारख्या महान शरणींनी या चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
महात्मा बसवेश्वर यांचे कार्य हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक क्रांतीचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या विचारांनी भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना दिशा दिल्याचे मानले जाते.
ई.स. ११६७ मध्ये नागपंचमीच्या दिवशी त्यांनी लिंगैक्य प्राप्त केले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन, विचारमंथन, मिरवणुका आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments