Monday, September 14, 2026
Homeसातारालोणंद शहरातील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम; व्यापाऱ्यांचे तात्पुरते पुनर्वसन होणार

लोणंद शहरातील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम; व्यापाऱ्यांचे तात्पुरते पुनर्वसन होणार

लोणंद : लोणंद शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, या समस्येमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत. या पार्श्वभूमीवर तात्पुरता पर्याय म्हणून लोणंद-सातारा, लोणंद-शिरवळ, लोणंद-खंडाळा या प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर एसटी स्टँड समोरील जागा व बाजार तळ येथे लहान व्यावसायिकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी माहिती लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.

लोणंद नगरपंचायतीच्या कार्यालयात वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पदाधिकारी, व्यापारी आणि मान्यवरांची बैठक पार पडली. या बैठकीत नगराध्यक्षा मधुमती गालिये, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, सचिन शेळके, भरत शेळके, शिवाजीराव शेळके-पाटील, रवींद्र क्षीरसागर, पीडब्ल्यूडी शाखा अभियंता शिवाजी रेड्डी, एमएसईबीचे उपअभियंता तसेच स्थानिक व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.

मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले की, लोणंद शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरपंचायत, महसूल प्रशासन, एनएचआय, पीडब्ल्यूडी, पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे. शिरवळ, सातारा आणि खंडाळा रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे हटवण्यात येतील. तसेच एसटी स्टँडसमोरील जागा आणि बाजारतळ येथे लहान व्यावसायिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून एनएचआयच्या वतीने रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने केले जाणार आहे.

शहरात पार्किंगची योग्य सोय करण्यासाठी गणेश मंदिरासमोर व इतर शासकीय जागांवर व्यवस्था करण्यात येईल. शिरवळ चौक आणि एसटी स्टँड परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

यावेळी पीएसआय विशाल करम म्हणाले की, वाहतूक कोंडीसाठी तात्पुरता उपाय म्हणून अहिल्यादेवी चौकातील तीनही रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्यांचे नियोजन करण्यात येईल. व्यापाऱ्यांनी गुरुवारी बाजारात ट्रान्सपोर्ट मालाची वाहतूक टाळावी. तसेच अतिक्रमण हटाव मोहिमेस कोणीही विरोध करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, राहुल घाडगे, हर्षवर्धन विके-पाटील, संदीप शेळके, असगर इनामदार, बंटी खरात, सागर गारत, गणेश गळके, लक्ष्मण जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments