
पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहाली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची मालिका आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचेही टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. विराट वैयक्तिक कारणामुळे पहिला सामना खेळत नाहीये. त्याचबरोबर अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. पहिला फलंदाजी करताना अफगाणिस्तानची धावसंख्या 15 षटकांत 3 बाद 105 झाली आहे.
गुरबाज-झद्रान यांच्यात अर्धशतकी भागीदारी
अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि कर्णधार इब्राहिम झद्रान यांच्यात 50 धावांची सलामी भागीदारी झाली. गुरबाजने षटकार ठोकत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने गुरबाजला (23) माघारी धाडले. गुरबाजला यष्टिरक्षक जितेश शर्माने यष्टिचित केले. त्यानंतर 8.2 व्या षटकात शिवम दुबेने दुसरा सलामीवीर झद्रानला रोहितकरवी झेलबाद करून अफगाणिस्तानला दुसरा धक्का दिला. झद्रानने 25 धावांची खेळी केली.
भारताने टॉस जिंकला
पहिल्या टी-20 मध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजू सॅमसन हा सामना खेळत नाहीय. यष्टिरक्षक म्हणून जितेश शर्माला प्राधान्य देण्यात आले आहे. जितेशचे हे घरचे मैदान आहे. तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो.
फिनिशर म्हणून रिंकूकडे जबाबदारी
हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीत फिनिशर म्हणून आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध करण्याची जबाबदारी रिंकू सिंहवर असेल. दक्षिण आफ्रिकेत त्याने चमकदार कामगिरी केली. येथेही त्याने पुन्हा एकदा लक्षवेधी कामगिरी केल्यास टी-20 विश्वचषकासाठी संघातील त्याची निवड जवळपास निश्चित मानली जाईल.
जैस्वाल अनफिट, शुभमन गिल करणार ओपनिंग
रोहित शर्माने सांगितले की, यशस्वी जैस्वाल आजचा सामना खेळत नाहीय. त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे शुभमन गिल सलामीची जबाबदारी सांभाळताना दिसेल. संजू सॅमसनलाही स्थान मिळालेले नाही. जितेश शर्माला यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अष्टपैलू म्हणून शिवम दुबेसह अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान मिळाले आहे. स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला स्थान मिळालेले नाही, त्याच्या जागी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे. संघात एकूण तीन फिरकीपटू ठेवण्यात आले आहेत. तसेच अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमारच्या रूपात दोन वेगवान गोलंदाज आहेत.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान.







