फलटण : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक परिसरात स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
मा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानाला शहरातील विविध भागांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार तसेच उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले यांच्या सूचनेनुसार नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता मोहिमेचे नियोजन केले.
या अभियानांतर्गत महात्मा गांधी चौक, डेक्कन चौक ते महावीर स्तंभ परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रिंग रोड, माळजाई मंदिर परिसर तसेच नगरपालिका परिसरात विशेष स्वच्छता करण्यात आली. रस्त्यालगतचा कचरा, सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग
मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. नगरपालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, मुकादम तसेच स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
गांधी जयंतीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानातून ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ हा संदेश देण्यात आला. शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबरोबरच नागरिकांनीही स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
