Saturday, September 12, 2026
Homeसातारालघु वृत्तपत्रांच्या अन्यायाची दखल घेत शासनाने जाहिरातींचे वितरण सुरु - रविंद्र बेडकिहाळ...

लघु वृत्तपत्रांच्या अन्यायाची दखल घेत शासनाने जाहिरातींचे वितरण सुरु – रविंद्र बेडकिहाळ यांचे उपोषण टळले

फलटण, दि. 06: महाराष्ट्र राज्यातील ‘क’ वर्गातील लघु वृत्तपत्रांवर शासकीय जाहिरात वितरणाच्या अन्यायाची दखल घेऊन शासनाने अखेर सकारात्मक पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर, शासनाने ‘मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमा’सारख्या विशेष मोहिमांच्या जाहिराती आता ‘क’ वर्गातील लघु वृत्तपत्रांनाही दिल्या आहेत. या निर्णयामुळे लघु वृत्तपत्रांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

या निर्णयाच्या मागणीसाठी रविंद्र बेडकिहाळ यांच्यासमवेत फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा, उपाध्यक्ष बापूराव जगताप, सचिव रोहित वाकडे, कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. रोहित अहिवळे, प्रसन्न रुद्रभटे, दादासाहेब चोरमले, मयूर देशपांडे, प्रशांत अहिवळे आदींनी सातत्याने पाठपुरावा केला.

बेडकिहाळ यांनी यशाच्या मागील प्रक्रिया स्पष्ट करताना सांगितले की, ‘‘शासनाच्या विविध योजनांच्या जाहिरातीत लघु वृत्तपत्रांना सातत्याने दुर्लक्षित केले जात होते. ‘लाडकी बहीण योजना’ यासारख्या मोहिमांमधूनही पक्षपातीपणाचा अनुभव लघु वृत्तपत्रांना येत होता. या विरोधात आम्ही वारंवार निवेदने दिली होती. मात्र दखल घेतली गेली नाही, त्यामुळे आम्ही 18 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव व माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह आणि मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांचेही या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.’’

माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी महासंचालक ब्रिजेश सिंह यांना तातडीने या समस्येवर सकारात्मक निर्णय घेण्याची शिफारस केली होती. त्यांच्या पुढाकारामुळे आणि संपादक संघाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या भेटीमुळे अखेर लघु वृत्तपत्रांना या मोहिमेच्या जाहिरातींचे वितरण सुरु झाले आहे.

यशस्वी निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ आणि फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण आणि इतर सर्व अधिकारी व पत्रकार संघटनांचे आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments