फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; रामराजे नाईक निंबाळकर यांचा समतेचा संदेश

0
13
फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; रामराजे नाईक निंबाळकर यांचा समतेचा संदेश

फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; रामराजे नाईक निंबाळकर यांचा समतेचा संदेश


फलटण  – १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फलटण शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या निमित्ताने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांना सामाजिक समतेचा आणि एकतेचा संदेश दिला आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या संदेशात सांगितले की, “समतेचा विचार हा विकासाचा खरा पाया आहे. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा..!’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रांतीमंत्र आपल्या सर्वांसाठी आजही तितकाच महत्त्वाचा आहे. समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येणे ही आजची गरज आहे.”
तसेच त्यांनी पुढे नमूद केले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण यांच्या स्तुत्य उपक्रमास सहकार्य करताना मला अभिमान आणि आनंद वाटतो. बहुजन समाजाची प्रगती ही केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राच्या विकासाची पायाभरणी आहे.”
शिक्षण आणि संयम हीच खरी शक्ती असल्याचे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, समाजात समता आणि न्यायाचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
“हा उत्सव केवळ आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, तो विचार जागृतीचा आणि सामाजिक परिवर्तनाचा सोहळा आहे. चला, आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रगत आणि समतावादी समाज उभारण्याचा संकल्प करूया,” असे आवाहन त्यांनी शेवटी केले.