विवेकाच्या लढ्याची ज्योत तेवत ठेवण्याचा निर्धार; दाभोळकर स्मृतिदिनी फलटणमध्ये निवेदन
फलटण | २० ऑगस्ट २०२६ : अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा आणि विवेकविरोधी प्रवृत्तींच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फलटण शाखेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून आज प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील दांडेकर पुलावर सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला आज तेरा वर्षे पूर्ण झाली आहेत. “माणूस मारता येतो; विचार मारता येत नाही,” या विचारातून गेली तेरा वर्षे विवेकवादी चळवळीने न्यायासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी संघर्ष सुरू ठेवला आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असली, तरी स्मृतिदिनाच्या अवघ्या तीन दिवस आधी दोन्ही आरोपींना जामीन मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागील सूत्रधार कोण? या हत्येचा व्यापक कट कोणी रचला? या प्रश्नांची संपूर्ण उकल होऊन सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचला पाहिजे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
डॉ. दाभोलकर यांनी समाजात विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि समताधिष्ठित विचार रुजविण्यासाठी आयुष्य समर्पित केले. देव-धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवून सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बाबा-बुवा, भोंदूगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि अनिष्ट प्रथांविरोधात त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून सातत्याने संघर्ष केला. त्यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायद्याच्या निर्मितीसाठी व्यापक सामाजिक चळवळ उभी राहिली.
डॉ. दाभोलकर यांच्यानंतर विचारवंत गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही हत्या करण्यात आली. विवेकवादी, परिवर्तनवादी आणि प्रश्न विचारणाऱ्या विचारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या घटनांमधून झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या सर्व विचारवंतांच्या हत्यांच्या मागील व्यापक मानसिकता आणि सूत्रधार यांचा शोध घेऊन न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
“विचारवंतांच्या हत्या होतात आणि मारेकरी मोकाट सुटतात, ही व्यवस्था आणि लोकशाहीसमोरची गंभीर आव्हानात्मक परिस्थिती आहे. विवेकवादी विचारांची चळवळ दडपण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही,” असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. न्यायासाठी न्यायालयीन लढा, आंदोलन आणि जनजागृतीची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या विवेकवादी व परिवर्तनवादी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने चारही विचारवंतांच्या कार्याचा आणि विचारांचा संदर्भ असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तक प्रकाशनातून विवेक, विज्ञाननिष्ठा, समता आणि प्रश्न विचारण्याची संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास अयाज अतार, आरती कांबळे, मोहिनी भोंगळे, बोराटे सर, जयवंत काकडे, मंदाकिनी गायकवाड, भुजबळ सर, डॉ. शेंडे सर, बनसोडे सर, सचिन शिंदे, निलेश अहिवळे, देशमुख सर, देशमुख मॅडम, वृषाली भुजबळ यांच्यासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व विवेकवादी चळवळीतील नागरिक उपस्थित होते.
डॉ. दाभोलकरांचा देह संपवता आला; मात्र त्यांनी पेटवलेली विवेकाची ज्योत विझवता आली नाही. अंधश्रद्धा, अवैज्ञानिकता आणि शोषणाच्या विरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधानिक मूल्ये आणि माणुसकीचा विचार समाजात रुजविण्यासाठी ही चळवळ यापुढेही अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
“माणूस मारता येतो, विचार मारता येत नाही” – या विचारातूनच दाभोलकरांच्या स्मृतीला खरा अभिवादन!
