अकलूज : सोलापूर जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिल्याने पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, धरणातील पाणीसाठ्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर अकलूज नगरपरिषद प्रशासनाने शहरातील नागरिकांना पाणी काटकसरीने व जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
अकलूज नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पाण्याचा गरजेपुरताच वापर करून पाणी बचतीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, नागरिकांनी पाणी वाया जाणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, शहरातील काही ठिकाणी नागरिकांच्या नळांना तोट्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी आपल्या नळांना तात्काळ योग्य तोट्या बसवून घ्याव्यात. नळातून अनावश्यक पाणी वाहत राहणार नाही तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
‘नळांना तोट्या बसवा, पाण्याचा अपव्यय टाळा’ असा संदेश नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे. तसेच वाहन धुणे, अंगण व रस्ते धुणे किंवा इतर अनावश्यक कामांसाठी पाण्याचा अतिरिक्त वापर टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पाणीटंचाईच्या परिस्थितीत नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करून उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा. ‘पाणी गरजेपुरतेच वापरा आणि भविष्यासाठी पाणी वाचवा’ हा संदेश प्रत्येक नागरिकाने आचरणात आणणे गरजेचे आहे.
अकलूज नगरपरिषद प्रशासन नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर असून, सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी पाणी बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
