Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रबारामती तालुक्यातील होळ येथे अभ्यासाच्या कारणावरून मुलाचा खून; पोलिसांची तातडीने कारवाई, तीन...

बारामती तालुक्यातील होळ येथे अभ्यासाच्या कारणावरून मुलाचा खून; पोलिसांची तातडीने कारवाई, तीन जणांना अटक

बारामती :- बारामती तालुक्यातील होळ येथे वडिलांनी रागाच्या भरात नऊ वर्षांच्या मुलाचा भिंतीवर डोके आपटून आणि गळा दाबून खून केला. हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडील, आजी आणि चुलत चुलत्याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी १२ तासांत अटक केली.

घटनेचा तपशील

दि. १४ जानेवारी रोजी पीयूष भंडलकर घरात असताना वडील विजय भंडलकर यांनी अभ्यास न केल्यामुळे त्याला जाब विचारला. “तू अभ्यास करत नाहीस, माझी इज्जत घालवत आहेस,” असे म्हणत त्यांनी रागाच्या भरात त्याचे भिंतीवर डोके आपटले आणि गळा दाबला. यानंतर पीयूषची हालचाल बंद झाल्यावर संतोष भंडलकर यांच्या मदतीने त्याला नीरा येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले.

डॉ. भट्टड यांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषित केले. मात्र, पीयूषचा मृत्यू चक्कर आल्यामुळे झाला असे गावकऱ्यांना सांगत अंत्यविधीची तयारी सुरू केली.

पोलिसांची तातडीने कारवाई

घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थ आणि नातेवाईकांशी चर्चा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले.

शवविच्छेदन अहवालात पीयूषचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांना ताब्यात घेतले.

अटक व गुन्हा दाखल

वडील विजय भंडलकर, आजी शालन भंडलकर आणि चुलत चुलता संतोष भंडलकर (सर्व रा. होळ) या तिघांना अटक करण्यात आली. भारतीय दंड संहिता कलम १०३ (१), २३८, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा सक्रिय सहभाग

या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, फौजदार बाळासाहेब कारंडे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई केली. या पथकात महेश पन्हाळे, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, नागनाथ परगे, प्राजक्ता जगताप, रजनी कांबळे यांच्यासह अनेक पोलिसांचा सहभाग होता.

गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

या दुर्दैवी घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी अधिक जागरूक होण्याची गरज आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments