Wednesday, August 26, 2026
Homeसाताराधम्ममित्र बालसंस्कार वर्गामार्फत सोमवार पेठ फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत...

धम्ममित्र बालसंस्कार वर्गामार्फत सोमवार पेठ फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा जयंती साजरी

फलटण : धम्ममित्र बालसंस्कार वर्गामार्फत सोमवार पेठ, फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांची जयंती विधायक उपक्रमातून साजरी करण्यात आली. त्याग, सेवा आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या स्मरणार्थ वाचनालय व परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य आयु. चंद्रकांत मोहिते यांच्यासह विद्यार्थ्यांनी त्रिसरण पंचशील, भीमस्मरण, भीम स्तुती आणि बुद्ध पूजेद्वारे केली. धम्ममय वातावरणात उपासिका व उपस्थित नागरिकांनी श्रद्धापूर्वक सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या तयारीसाठी विशालजी शिंदे, विक्रम भोसले, प्रदीप खरात व बुवा लोंढे यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.

भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व शाखेचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा परामर्श घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना आयु. सोमीनाथ घोरपडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक न्याय आणि लोककल्याणावर आधारित उभी केली. स्त्रियांचा सन्मान, सर्वधर्मसमभाव, शिस्तबद्ध प्रशासन आणि शौर्य यांचा आदर्श त्यांनी घालून दिला. “रयतेचे राज्य” ही त्यांची संकल्पना आजच्या लोकशाही व्यवस्थेलाही दिशा देणारी आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा शिवरायांच्या जीवनातून मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
संत गाडगेबाबांच्या कार्याविषयी बोलताना आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी सांगितले की, गाडगेबाबांनी आयुष्यभर समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता आणि मानवसेवा यासाठी कार्य केले. “स्वच्छता हीच खरी पूजा” हा त्यांचा मूलमंत्र होता. गावोगावी कीर्तनांच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती, शिक्षण आणि अस्पृश्यता निर्मूलनाचा संदेश दिला. स्वतः झाडू हातात घेऊन कृतीतून आदर्श निर्माण करणे हीच त्यांची खरी शिकवण होती.

कार्यक्रमाचा शेवट धम्ममित्र बालसंस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्वच्छतेचे महत्त्व आणि महापुरुषांच्या विचारांचे संस्कार रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान आयु. चंद्रकांत मोहिते यांनी केले.विद्यार्थ्यांनी सरणतंय घेऊन कार्यक्रमांची सांगता झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments