
पुणे – गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या पिंकी चैतन्य पवार (वय २६) यांच्यावर करण्यात येणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी लागणाऱ्या ४.४० लाख रुपयांपैकी तब्बल ३.९० लाख रुपयांची वैद्यकीय मदत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मिळाली आहे.
बाणेर रोड येथील ए.वाय.एम.एस. रुग्णालयात पिंकी पवार यांच्यावर अत्यावश्यक शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. मात्र पवार कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने हा खर्च उचलणे त्यांना शक्य नव्हते.
या पार्श्वभूमीवर मोहोळ यांच्या ‘वैद्यकीय मदत कक्षाशी’ संपर्क साधण्यात आला. ‘आरोग्य सेवकां’नी रुग्णालय प्रशासनाशी समन्वय साधत पवार यांच्या आर्थिक अडचणीची माहिती दिली. यानंतर रुग्णालयाच्या प्रस्तावानुसार ३.९० लाख रुपयांची सवलत निश्चित झाली.
या मदतीमुळे पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून आवश्यक उपचार तातडीने सुरू करता आले.



