Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रदैनंदिन ऑनलाइन कामांच्या भरमसाट ओझ्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण धोक्यात

दैनंदिन ऑनलाइन कामांच्या भरमसाट ओझ्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण धोक्यात

दैनंदिन ऑनलाइन कामांच्या भरमसाट ओझ्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण धोक्यात

जेजुरी  :-जेजुरी परिसरातील प्राथमिक शाळांतील शिक्षकांना आता फक्त वर्गात शिकवणेच नव्हे, तर १०० ते १५० प्रकारच्या ऑनलाइन माहितीचे ‘भराव’ पूर्ण करणे हेही रोजचेच काम झाले आहे. शिक्षण विभागाच्या विविध योजनेतून, संस्थांमार्फत, व डॉटमार्फत सतत येणाऱ्या आकस्मिक मागण्या, रिपोर्ट्स, यादी व एक्सेलशीट्स भरताना शिक्षकांचा बहुतांश वेळ मोबाईल-लॅपटॉपमध्येच जातोय.

दररोज सकाळी वर्ग सुरू करण्याआधीच WhatsApp वर लिंक धडकते. ती वेळेत भरली नाही तर फोन येतो. वर्गात विद्यार्थी बसलेले असतात पण शिक्षक मात्र मोबाइल स्क्रीनवर अडकलेले असतात. महिन्यातील १७–१८ दिवस शिक्षकांना अशा आकस्मिक सूचना भरण्याच्या फेऱ्या पडतात.

“शिकवतोय की माहिती भरतोय?” – शिक्षकांचा संतप्त सवाल

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अक्षरनारायण कांबळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ऑनलाइन कामांच्या बोजामुळे शिक्षणाचा मूळ उद्देशच बाजूला पडतोय. प्रशासनाने यावर तातडीने निर्बंध घालायला हवेत.”

पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी सांगितले की, शिक्षकांनी यापूर्वीही कामकाजाच्या अतिरेकाविरोधात मोर्चा काढला होता. पण त्यानंतर कामे कमी होण्याऐवजी अधिकच वाढली.

१०० ते १५० प्रकारची माहिती – कुठे जातंय शिक्षण?

शिक्षक संघटनेचे आयुक्त विनोद चव्हाण यांनी सांगितले की,
“निपुण भारत, निपुण मूल्यांकन, दिक्षा अॅप, माय भारत, शालेय पोषण आहार, पालकसभा, परीक्षा केंद्र व्यवस्थापन, साक्षरता मोहीम, विविध पोर्टल्स आणि योजनेअंतर्गत माहिती मागवली जाते. ती वारंवार मागितली जाते. त्यामुळे वर्गशिक्षणावर थेट परिणाम होतो.”

“मोबाईलवर माहिती भरताना विद्यार्थी दुर्लक्षित” – शिक्षकांचा आक्रोश

पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष दया गायकवाड म्हणाले,
“वर्गात मुलं बसलेली असतात, पण आम्ही मोबाईलवर माहिती भरत बसतो. वेळेत भरलं नाही तर व्हॉट्सअॅपवर सतत सूचना येतात. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय.”

तालुका निरीक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर यांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनेची मागणी केली आहे.

मुख्य मागणी : शिक्षणावर लक्ष केंद्रित होण्यासाठी अनावश्यक ऑनलाइन कामांवर नियंत्रण आणा!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments