Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रमुख्य आरोपीचा एन्काऊंटर: बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख गुन्हेगाराचा पोलिसांकडून खात्मा, राज्यभरात खळबळ

मुख्य आरोपीचा एन्काऊंटर: बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख गुन्हेगाराचा पोलिसांकडून खात्मा, राज्यभरात खळबळ

मुंबई : बदलापूर (ठाणे) येथील एका नामांकित खाजगी शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. 20 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. नागरिकांनी बदलापूरसह अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन केले. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.

आज, दि. 23 सप्टेंबर रोजी, अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडसाठी पोलिस घेऊन जात असताना मोठी घटना घडली. शिंदेने अचानकपणे पोलिसाच्या कंबरेची बंदूक हिसकावली आणि पोलिसांवरच गोळीबार केला. या घटनेत एक पोलीस अधिकारी जखमी झाला. या गोळीबाराच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या कारवाईत अक्षय शिंदेला गोळी लागली ठार झाला

राज्यभरात खळबळ:
या एन्काऊंटरची बातमी समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केल्याचे वृत्त समोर येताच, विविध राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश:
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एन्काऊंटरबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या या कारवाईबाबत सत्यता पडताळून पाहण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, विरोधकांनी या एन्काऊंटरवरून सरकारवर हल्ला चढवला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांची टीका:
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “महाराष्ट्र पोलिसांची एक प्रतिमा होती, परंतु पोलिस ठाण्यात माणूस मरतो. त्याचा खून केला का? त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला का?” असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया:
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “हैदराबादच्या बलात्कार प्रकरणात जसे चार आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला होता, तसेच बदलापूर अत्याचार प्रकरणातही घडले आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी पोलिसांच्या स्वसंरक्षणाचा दावा खोटा असल्याचेही स्पष्ट केले.

जयंत पाटील यांचा सवाल:
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “प्रकरण पुढे जाऊ नये म्हणून हे एन्काऊंटर घडवून आणले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांची बंदूक लागणे हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचे त्यांनी नमूद केले. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गुन्ह्याची कबुली दिली होती:
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने वैद्यकीय तपासणी सुरु असताना डॉक्टरांसमोर गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली होती. मात्र, आता त्याच्या एन्काऊंटरमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाला आहे, तर जनतेतही या घटनेमुळे विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.


बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यामुळे राज्यभरात मोठा गहजब उडाला आहे. राजकीय नेते आणि विरोधक सरकारवर टीका करत आहेत, तर या प्रकरणाची सत्यता शोधण्यासाठी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत या एन्काऊंटरची सखोल चौकशी होण्याची अपेक्षा आहे, जेणेकरून सत्य बाहेर येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments