Tuesday, September 15, 2026
Homeब्लॉगअनागारिक धम्मपाल जयंती : बौद्ध वारसा जपण्याचा दृढ संकल्प

अनागारिक धम्मपाल जयंती : बौद्ध वारसा जपण्याचा दृढ संकल्प

बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे प्रणेते अनागारिक धम्मपाल यांच्या स्मृती जागवताना प्रा. आनंद देवडेकर यांचे प्रतिपादन : बौद्ध समाजाने सांस्कृतिक वारसा जपण्याचे आवाहन.

पिंपरी, पुणे: बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे प्रणेते अनागारिक धम्मपाल यांचे श्रीलंकेत जन्म असूनही बौद्ध धम्म भारतात रुजवण्यासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मचक्र प्रवर्तनाशी त्यांचा अन्वय जोडण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी केले. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आयोजित धम्मलिपी गौरव दिन व अनागारिक धम्मपाल जयंती सोहळ्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे आयोजन संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूह, महाराष्ट्र राज्य यांनी केले होते. अध्यक्षस्थानी आयुष्यमती अर्चनाताई लगड होत्या.

प्रमुख वक्ते प्रा. देवडेकर यांनी अनागारिक धम्मपाल यांच्या कार्याचे स्मरण करीत बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा संदर्भ दिला. त्यावेळी बर्माच्या उ चंदिमा बौद्ध भिक्षूंचे शिष्य श्रामणेर सूरिया आणि श्रामणेर चंद्र हे दोन तरुण भिक्षू भारतात आणले गेले होते. श्रामणेर चंद्र म्हणजेच कुशीनाराचे पूज्य भन्ते महास्थवीर चंद्रमणी होय, ज्यांनी नागपूरच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. आज बाबासाहेबांच्या प्रेरणेतून बौद्ध झालेल्या समाजाने आपली ओळख बौद्ध म्हणून कायम ठेवण्याची गरज आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

ज्येष्ठ लेणी संवर्धक सूरज रतन जगताप यांनीही या कार्यक्रमात महत्त्वाचे विचार मांडले. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सांस्कृतिक वारसा पुढे नेणे आपली जबाबदारी आहे आणि याचा मला अभिमान आहे.”

समारोपात ‘सेव्ह बुद्ध केव्ह ॲन्ड हेरिटेज लेणी संवर्धक पूणे’ यांच्या वतीने ‘सम्राट अशोक पुरस्कार’ यावर्षी संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूह, महाराष्ट्र राज्य यांना प्रदान करण्यात आला.

माजी आमदार गौतम चाबूकस्वार, आयु. शैलेंद्र मोरे आणि आयु. मिलिंदभाऊ अहिरे यांनीही या सोहळ्यात आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष्यमती सारिका कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पूजा वैद्य यांनी केले.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments