न्यायालयीन जामीन प्रक्रियेत मदत करण्याच्या नावाखाली लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोघांना ताब्यात घेतल्याने फलटणमध्ये खळबळ
फलटण प्रतिनिधी : न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाची पायरी चढणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना मोफत कायदेशीर मदत मिळावी, यासाठी विधी सेवा समिती कार्यरत असते. मात्र, याच व्यवस्थेतील पॅनल विधीज्ञावर जामीनाच्या कामात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप झाल्याने फलटणच्या न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चार हजार रुपयांच्या लाचेच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पॅनल विधीज्ञ नितीन विलासराव भोईटे आणि खासगी वकील अजीम सलीम मेटकरी यांना रंगेहाथ पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या प्रकरणाचे आरोपपत्र फलटण न्यायालयात दाखल झाले आहे. तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने फलटण तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून नितीन विलासराव भोईटे यांची पॅनल विधीज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान, संबंधित प्रकरणात न्यायालयीन जामीन मिळविण्याच्या कामात मदत करण्यासाठी न्यायालयातील क्लार्कच्या नावाने चार हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या मागणीबाबत तक्रारदाराने २ नोव्हेंबर २०२६ रोजी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने सापळा रचण्याचे नियोजन केले. त्यानुसार ५ नोव्हेंबर २०२६ रोजी फलटण येथील जेएमएफसी न्यायालय परिसरात सापळा लावण्यात आला.
या कारवाईदरम्यान पॅनल विधीज्ञ नितीन विलासराव भोईटे (वय ४५, रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांनी लाचेची रक्कम न्यायालयातील खासगी वकील अजीम सलीम मेटकरी (वय ३४, रा. गोळीबार मैदान, फलटण) यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पंचांसमक्ष चार हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना अजीम मेटकरी यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी नितीन भोईटे यांनाही ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईनंतर फलटण शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्याचे आवाहन
दरम्यान, कोणत्याही लोकसेवकाने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे. नागरिकांनी WhatsApp क्रमांक ७०५७५७१०६४, दूरध्वनी क्रमांक ०२१६२-२३८१३९ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर तक्रार नोंदवावी.
या कारवाईमुळे न्यायालयीन कामकाजाच्या नावाखाली होणाऱ्या कथित गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील पोलीस तपासाकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे.
