Saturday, August 22, 2026
Homeसातारासत्य, पारदर्शकता आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी पत्रकारिता ही काळाची गरज –...

सत्य, पारदर्शकता आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी पत्रकारिता ही काळाची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा | साहस Times | 19 एप्रिल 2025
पत्रकारिता ही केवळ बातमी पोहोचवण्याचे माध्यम नसून ती समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. तुमची लेखणी सत्याला साथ देणारी, समाजाला दिशा देणारी असली पाहिजे आणि त्यात पारदर्शकतेबरोबरच नैतिकताही असावी, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. मावळा फौंडेशन आणि जिल्ह्यातील साहित्यिक-प्रवृत्त पत्रकारांच्या वतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते.

यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, अधिस्वीकृतीचे अध्यक्ष हरीश पाटणे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत नवीन तंत्र आत्मसात करावे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता पत्रकारितेतही वापरली जात आहे, त्यामुळे ती अवगत करणे आवश्यक आहे. पत्रकारितेतील मूल्ये केवळ पत्रकारच जपू शकतात. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसावा यासाठी सरकारकडून कायदेशीर संरक्षणाचे प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकार सन्मान निधी दुप्पट
“आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत दिला जाणारा मासिक निधी 11 हजार रुपये होता. आता तो वाढवून 20 हजार रुपये करण्यात आला आहे,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केली. तसेच, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून पत्रकार कुटुंबीयांना मदतीचे हात पुढे करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

रवींद्र बेडकीहाळ यांचे कार्य प्रेरणादायी
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात रवींद्र बेडकीहाळ यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे पवार म्हणाले. पत्रकारितेला समाजप्रबोधनाचे साधन मानून त्यांनी लेखणीच्या माध्यमातून शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला. मर्दे येथील बा. सी. मर्डेकर यांच्या स्मारकासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे स्मारक पूर्ण झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे.

पत्रकारांचा विचारस्वातंत्र्यावर विश्वास – मकरंद पाटील
मकरंद पाटील यांनी पत्रकार व साहित्यिक कोणत्याही एका विचारसरणीशी बांधील नसतात, असे नमूद करताना बेडकीहाळ यांनी नेहमीच निर्भीडपणे सत्य मांडले, असे गौरवोद्गार काढले.

सत्काराला उत्तर देताना बेडकीहाळ म्हणाले…
“सन्मान निधी वाढवण्याचा निर्णय माझ्या मागणीनंतर घेण्यात आला. बा. सी. मळेकर स्मारकासाठी साडेबत्तीस लाख रुपयांचा निधी मिळवून देण्यात आला आहे,” असे सांगताना त्यांनी या पुढील लोकार्पणासाठी सरकारच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले. अनेक साहित्यिक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments