Friday, August 21, 2026
Homeफलटणराजाळे येथे ‘एक गाव, एक गणपती’चा रौप्य महोत्सव उत्साहात; महिलांसाठी विशेष सहलीचे...

राजाळे येथे ‘एक गाव, एक गणपती’चा रौप्य महोत्सव उत्साहात; महिलांसाठी विशेष सहलीचे आयोजन

राजाळे येथे ‘एक गाव, एक गणपती’चा रौप्य महोत्सव उत्साहात; महिलांसाठी विशेष सहलीचे आयोजन

राजाळे : ‘एक गाव, एक गणपती’ गणेशोत्सव मंडळ, राजाळे यांच्या वतीने सन २०२५ मध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, सामाजिक सलोखा आणि एकोप्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमातून गावातील सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचे काम मंडळाने केले.

गणेशोत्सवाच्या सुरुवातीला सालाबादप्रमाणे गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. कोणत्याही जाती-पातीचा भेद न करता गावातील प्रत्येक गणेश मंडळाला आरतीचा मान देण्यात आला. त्यानंतर सलग दहा दिवस विविध मंडळांच्या सहभागातून नाट्यस्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सहभागी प्रत्येक मंडळाला प्रोत्साहन देत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

गौरी आगमनानिमित्त संपूर्ण गावासाठी गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आली. प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ क्रमांकांना पारितोषिके देण्यात आली. विशेष म्हणजे सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचाही सन्मान करण्यात आला. गणेश विसर्जनाच्या दिवशी गावातील प्रत्येक मंडळाला चौक सजावटीसाठी आमंत्रित करण्यात आले. विविध आकर्षक सजावटींमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. चौक सजावट तसेच ट्रॉली डेकोरेशन स्पर्धेतही प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांकांना बक्षिसे देण्यात आली, तर सहभागी प्रत्येक मंडळाला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.

महिलांसाठी विशेष लकी ड्रॉ आणि आनंददायी सहल

या संपूर्ण गणेशोत्सव काळात मंडळाला लाभलेले समाजसेवक विनोदशेठ अंकुशराव शेडगे यांच्या वतीने दररोज महिलांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने चिठ्ठ्या काढण्यात आल्या. या माध्यमातून निवड झालेल्या महिलांसाठी गणेशोत्सवानंतर विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले.

१९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ४ वाजता राजाळे येथून पाच ट्रॅव्हल्समधून महिलांची सहल रवाना झाली. सहलीच्या शुभारंभप्रसंगी राजाळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संभाजीराव निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सहलीचे उद्घाटन करण्यात आले.

सहलीमध्ये प्रथम कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे दर्शन, त्यानंतर कणेरी मठ, पन्हाळा गड आणि ज्योतिबा दर्शन असा एकदिवसीय प्रवास आयोजित करण्यात आला. संपूर्ण सहलीदरम्यान महिलांसाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे भोजन आणि संध्याकाळचे भोजन यांची उत्तम व्यवस्था विनोदशेठ शेडगे यांच्या वतीने करण्यात आली.

परतीच्या प्रवासात पुन्हा लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये पाच महिलांची निवड करून विनोदशेठ शेडगे यांच्या वतीने पाच पैठणी साड्या भेट देण्यात आल्या. यावेळी उपस्थित सर्व महिलांच्या वतीने समाजसेवक विनोदशेठ शेडगे यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी सौ. रुपाली दत्तात्रेय तोरसे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांच्या आनंदासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. “पुरुषांना अनेकदा फिरता येते; मात्र महिलांना सहलीसाठी घेऊन जाण्याचा विचार फार कमी वेळा केला जातो. विनोदशेठ शेडगे यांनी महिलांसाठी हा आनंदाचा दिवस उपलब्ध करून दिला,” असे सांगत त्यांनी त्यांचे आभार मानले.

गणेशोत्सवातील धार्मिक उत्साहाला सामाजिक एकोपा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांच्या आनंदाची जोड देत ‘एक गाव, एक गणपती’ गणेशोत्सव मंडळ, राजाळे यांनी रौप्य महोत्सवी वर्षाची परंपरा अधिक समृद्ध केली. दहा दिवसांच्या उत्साहानंतर गणरायाला निरोप देताना गावात निर्माण झालेला आनंद, एकोपा आणि बंधुभाव या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments