फलटणच्या ऐतिहासिक वैभवात भर; महाराणी सईबाई राणीसाहेबांसह चार महापुरुषांचे भव्य पुतळे उभारणार

0
3
फलटणच्या ऐतिहासिक वैभवात भर; महाराणी सईबाई राणीसाहेबांसह चार महापुरुषांचे भव्य पुतळे उभारणार

फलटणच्या ऐतिहासिक वैभवात भर; महाराणी सईबाई राणीसाहेबांसह चार महापुरुषांचे भव्य पुतळे उभारणार

फलटण : .फलटण शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. फलटण नगरपरिषदेच्या आवारात सिंहासनाधिष्ठित स्वरूपातील महाराणी श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारातून या कामाला गती मिळाली आहे. विशेष म्हणजे, शहरात आणखी तीन महापुरुषांचे पुतळे उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व पुतळ्यांच्या उभारणीसंदर्भात आर्किटेक्ट रोहन बळीप यांनी नुकत्याच आयोजित विशेष बैठकीत सविस्तर प्रेझेंटेशन सादर केले.
सईबाई राणीसाहेबांचा पुतळा; फलटणकरांसाठी अभिमानाचा क्षण
बैठकीतील सर्वात भावनिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा विषय म्हणजे महाराणी सईबाई राणीसाहेब यांच्या पुतळ्याची उभारणी. श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब यांचे माहेर फलटण असून त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री होत्या. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे फलटण हे आजोळ मानले जाते.
इतके दृढ ऐतिहासिक नाते असूनही आजपर्यंत फलटणमध्ये सईबाई राणीसाहेबांचा पुतळा उभारण्यात आलेला नव्हता. ही ऐतिहासिक उणीव भरून काढण्यासाठी आता नगरपरिषदेच्या आवारात त्यांचा सिंहासनाधिष्ठित भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र पुतळा समिती गठीत करण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे.
राज्यात पहिल्यांदाच पुतळ्यांसाठी विशेष निधी
फलटण शहरासाठी राज्य सरकारकडून ‘विशेष बाब’ म्हणून पुतळ्यांच्या उभारणीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यात अशा प्रकारचा निधी प्रथमच मंजूर झाल्याचे सांगितले जात असून, हा निधी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे उपलब्ध झाला आहे.
शहरात उभारण्यात येणारे इतर तीन पुतळे
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा
शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, सध्या असलेला शिवाजी महाराजांचा जुना पुतळा हटविण्यात येणार नसून, नवीन अश्वारूढ पुतळ्यासमोर सन्मानपूर्वक स्थापित केला जाणार आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती
पाचबत्ती चौक ते बारामती चौक रोड (सिमेंट रोडची सुरुवात) येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. फलटण शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा प्रथमच बसवण्यात येणार असल्याने सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा
पृथ्वी चौक अर्थात राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.
“चारही पुतळे लवकरात लवकर उभारणार” – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले की, फलटणमध्ये प्रस्तावित चारही पुतळ्यांची उभारणी पूर्ण सन्मानाने आणि शक्य तितक्या लवकर करण्यात येईल. पुतळा समित्यांनी दिलेल्या सूचना आणि निर्देशांनुसारच सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, ज्येष्ठ नगरसेवक सोमाशेठ जाधव, नगरसेवक अशोकराव जाधव, संदीप चोरमले, रोहित नागटिळे, किरण राऊत, सुदाम (आप्पा) मांढरे, सचिन अहिवळे, राहुल निंबाळकर, माजी नगरसेवक अनुप शहा, फिरोज आत्तार, फलटण पंचायत समिती सदस्य विकास नाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. दोशी, निरगुडी विकास सोसायटीचे चेअरमन युवराज सस्ते, युवा नेते श्रीवल्लभ हेंद्रे, अमोल सस्ते, पै. संजय देशमुख, बाळासाहेब कदम, विधीज्ञ अॅड. ऋषिकेश काशीद, नगर अभियंता रत्नरंजन गायकवाड, नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख विनोद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.